संक्रांत - सूर्योपासनेसाठी सण 

 Sankrant a festival for sun worship
Sankrant a festival for sun worship

थंडीपाठोपाठ रुक्षता वाढतेच. संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे सर्व रीतिरिवाज रुक्षता कमी करणारे व थंडीचे निवारण करणारे असतात. आयुर्वेदाने फक्‍त संक्रांतीच्या दिवशीच नाही, तर संपूर्ण हेमंत व शिशिर ऋतूत शीतता व रुक्षता कमी करणारे उपाय योजण्यास सांगितले आहेत. 
 

संक्रांत म्हणजे स्थित्यंतर. ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो, त्याला संक्रांत म्हणतात. त्यामुळे दरवर्षी बारा संक्रांती येतात. मात्र यातील मकरसंक्रांत महत्त्वाची असते व भारतातच नाही, तर इतरही अनेक देशांत पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. मकर ही शनीची राशी, त्यामुळे सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याचा प्रभाव, शनी थंड गुणाचा असल्यामुळे कमी होतो, म्हणून मकरसंक्रांत हा सूर्यशक्‍ती अधिकाधिक मिळविण्याचा, सूर्योपासना करण्याचा उत्सव असतो.
 
आयुर्वेदिक दृष्ट्या विचार करायचा झाला तर संक्रांत येते थंडीच्या दिवसांत म्हणजे हेमंत ऋतूत. हेमंतानंतर येतो शिशिर ऋतू, जो आदान काळातला पहिला ऋतू असतो. आदानाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘रौक्ष्यं आदानजम्’ अर्थात आदानकाळात रुक्षता वाढू लागते, शिवाय शिशिरात थंडीचे प्रमाण खूप वाढणार असते. थंडीपाठोपाठ रुक्षता वाढतेच. संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे सर्व रीतिरिवाज रुक्षता कमी करणारे व थंडीचे निवारण करणारे असतात. आयुर्वेदाने फक्‍त संक्रांतीच्या दिवशीच नाही, तर संपूर्ण हेमंत व शिशिर ऋतूत असेच शीतता व रुक्षता कमी करणारे उपाय योजण्यास सांगितले आहेत. 
चरकसंहितेमधील या सूत्रांवरून हे स्पष्ट होईल. 

गोरसानिक्षुविकृतीर्वसा तैलं नवौदनम्‌ । 
हेमन्तेऽभ्यस्यतस्तोयमुष्णं चायुर्न हीयते ।। 
अभ्यंगोत्सादनं मूर्ध्नि तैलं जेन्ताकमातपम्‌ ।
 
....चरक संहिता 
हेमंत ऋतूत दूध व उसापासून तयार केलेले विविध पदार्थ खावेत, गरम पाणी प्यावे, तेल, वसा वगैरे स्निग्ध पदार्थ खावेत, अंगाला अभ्यंग करावा, स्निग्ध द्रव्यांपासून बनविलेली उटणी लावावीत, डोक्‍यावर तेल लावावे, अंगावर ऊन घ्यावे. संक्रांत साजरी करताना आपण नेमक्‍या याच गोष्टी करत असतो. 

मकरसंक्रांत येते त्या हेमंत-शिशिर ऋतूत वातावरणात वाढलेली थंडी व कोरडेपणा यांचे निवारण करण्यासाठी तीळ व गूळ यांच्यासारखे पदार्थ खाण्यास आयुर्वेदातही सुचविलेले आहे. उसापासून बनविलेले गुळासारखे पदार्थही या दिवसांत आवर्जून खावेत असे सांगितले आहे. स्निग्ध द्रव्यांपासून बनविलेली उटणी वापरणे, उन्हात बसणे हेसुद्धा आयुर्वेदाने सुचविलेल्या उपचारात मोडते. आणि नेमके हेच सर्व आपण आपल्या संस्कृतीनुसार वर्षानुवर्षे करत आलो आहेत. संक्रांतीच्या दिवशी तिळाचा अधिकाधिक उपयोग करण्याची पद्धत आहे. 

सूर्यउपासना व जाठराग्नीचे शक्तिवर्धन 
तीळ-गूळ खाण्याबरोबर तीळमिश्रित पाण्याने स्नान करणे, तीळ अग्नीवर टाकून धूप करणे, तीळ वाटणे वगैरे निरनिराळ्या मार्गांनी तीळ वापरायचे असतात. आयुर्वेदाने सांगितलेला अभ्यंगही औषधांनी सिद्ध तीळ तेलाचाच करायचा असतो. स्निग्ध द्रव्यांचे उटणे बनविताना त्यात त्वचेला हितकर तीळ अग्रणी असावेच लागतात. पतंग उडविण्याच्या निमित्ताने अंगावर ऊनही घेतले जाते. 

‘पिंडी ते ब्रह्मांडी’ हा आयुर्वेदातला महत्त्वाचा सिद्धांत आहे. जे काही विश्वात आहे ते सर्व सूक्ष्म स्वरूपात शरीरात आहे. याच तत्त्वानुसार जसा बाह्य जगतात सूर्य आहे तसे शरीरात अग्नी आहे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. पृथ्वीसाठी ऊर्जेचा मूलस्रोत असतो सूर्य. सूर्यकिरणांच्या साह्याने अन्नधान्याची निर्मिती होते आणि अन्नधान्यातूनच सर्व जिवांचे पोषण होत असते. मात्र या अन्नधान्यातून, मग ते पाणी असो, गवत असो, भाज्या-फळांच्या स्वरूपातले असो किंवा एखाद्या प्राण्याचे मांस असो, शरीरावश्‍यक ऊर्जा तयार करण्याची संरचना प्रत्येक सजीव प्राणिमात्राला लाभलेली असते. या संरचनेतला प्रमुख घटक सूर्याचे प्रतीक स्वरूपच असतो व तो म्हणजे जाठराग्नी. 

संक्रांत साजरी करताना सूर्याची उपासना आणि जाठराग्नीचे शक्‍तिवर्धन हे दोन्ही आपसूक होत असते. 
तीळ व गूळ हे योग्य प्रकारे योजले तर औषधाप्रमाणे उपयोगी पडतात. 
उष्णस्त्वच्यो हिमः स्पर्शः केश्‍यो बल्यस्तिलो गुरुः । 
अल्पमूत्रः कटु पाके मेधाग्निकफपित्तकृत्‌ ।। 

...वाग्भट सूत्रस्थान 
तीळ वीर्याने उष्ण पण स्पर्शाला शीतल असतात, त्वचेला तसेच केसांना हितकर असतात, ताकद वाढवितात, मूत्राचे प्रमाण कमी करतात, अग्नी तसेच मेधा (ग्रहणशक्‍ती) वाढवितात, कफ-पित्त वाढविणारे असतात. 

काळे तीळ औषधी 
पांढरे व काळे असे तिळाचे दोन प्रकार असतात. यातील काळे तीळ औषधाच्या दृष्टीने अधिक गुणकारी असतात. 
औषध म्हणून तिळाचा उपयोग अनेक प्रकारांनी केला जातो. 
- मूळव्याधीमुळे विशेषतः वात-कफ असंतुलनामुळे गुदभागी सूज, वेदना असता तिळाचा कल्क लावण्याने बरे वाटते. 
- तीळ रजःप्रवर्तन वाढवणारे असतात. अंगावरून कमी जात असल्यास तिळाचा काढा गूळ घालून घेतला जातो. गर्भाशयातील वातदोष कमी करण्याच्या दृष्टीनेही तीळ उत्तम असतात. म्हणूनच बाळंतपणानंतर गर्भाशयाची शुद्धी होण्याच्या दृष्टीने तीळ-ओवा-खोबऱ्याची सुपारी खायची पद्धत आहे. 
- जखमेवर तिळाचा कल्क लावला असता जखम कोरडी पडत नाही, उलट लवकर भरून येते. 
- वाटलेले तीळ अंगाला लावून स्नान केले असता त्वचा स्निग्ध व सुकुमार बनते. 

अर्थात तिळाचे हे सर्व उपयोग अतिशय प्रभावी असले तरी त्यांचा प्रयोग करताना तीळ उष्ण असतात हे निश्चितपणे लक्षात घ्यावे लागते. प्रकृती, हवामान, शरीरातले पित्तदोषाचे प्रमाण या गोष्टी लक्षात घेऊनच तिळाचा औषधी वापर करावा. 

गूळ गुणाचा 
गूळ उसाच्या रसापासून बनवितात हे सर्व जण जाणतात, पण गूळ बनविण्याच्या प्रक्रियेत उसाच्या रसावरची मळी काढणे आवश्‍यक असते. मळी काढून तयार झालेला शुद्ध गूळ चवीला मधुर, वात-पित्तशामक व रक्‍तधातूला प्रसन्न करणारा असतो. गूळ वर्षभर ठेवून जुना झाला की मग वापरायचा असतो. नवीन गुळामुळे कफदोष वाढू शकतो, तसेच अग्नी मंद होतो. त्याउलट जुना गूळ गुणांनी श्रेष्ठ असतो. 
स्वादुतरः स्निग्धो लघुरग्निदीपनो विण्मूत्रामयशोधनो रुच्यो हृद्यः पित्तघ्नो वातघ्नस्त्रिदोषघ्नो ज्वरहरः सन्ताप शान्तीप्रदः श्रमहरः पाण्डुप्रमेहान्तकः पथ्यश्च 
...राजनिघण्टु 
जुना गूळ चवीला गोड, रुचकर, स्निग्ध, पचायला हलका असतो, अग्नीदीपन करतो, मल-मूत्र वाढण्याने झालेले रोग दूर करतो. हृदयासाठी हितकर असतो, त्रिदोषांचे शमन करतो, ताप दूर करतो, संताप दूर करून मन शांत करतो, श्रम नाहीसे करतो, पांडू, रक्‍ताल्पता व प्रमेह वगैरे व्याधींमध्ये पथ्यकर असतो. 
- थकून भागून आलेल्याला गुळाचा खडा देण्याची पद्धत आहे. कारण तो ताप-संताप दूर करून श्रम नाहीसे करू शकतो. 
- गूळ रक्‍तधातूपोषक व गर्भाशयाची शुद्धी करणारा असतो. त्यामुळे बाळंतपणानंतर घेण्यास उत्तम असतो. 
- थंडीच्या दिवसांत जेवणात तूप-गूळ खाण्याने थंडीचे निवारण होते, शिवाय ताकद वाढते. 
- तिळाप्रमाणेच गुळाचीही आयुर्वेदाने खूप स्तुती केलेली असली तरी गूळही उष्ण असतो, हे लक्षात घ्यावे लागेल. तसेच अशुद्ध स्वरूपातला गूळ सेवन केला तर त्यामुळे जंत होऊ शकतात, मेदधातू वाढू शकतो. 


फक्‍त संक्रांतीच्या दिवशीच नाही, तर या संपूर्ण हेमंत-शिशिर ऋतूत कोवळ्या उन्हात चालायला जाणे, सूर्यनमस्कार करणे हे आरोग्यच्या दृष्टीने उत्तम असते. 
चला, तर मग या संक्रांतीला ‘तीळ-गूळ घ्या, गोड बोला’ असे एकमेकांना म्हणून स्नेह वाढवूच, बरोबरीने सूर्यशक्‍तीच्या मदतीने आरोग्य मिळविण्याचाही प्रयत्न करू. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com