एक नवी सुरवात...

संतोष शेणई
Friday, 13 October 2017

रजोनिवृत्ती म्हणजे जीवनातून निवृत्ती नव्हे; ती केवळ एक शारीरिक प्रक्रिया आहे हे समजून घेतले पाहिजे. रजोनिवृत्तीदरम्यान आणि त्यानंतर स्त्रियांच्या शरीरात होणाऱ्या आमूलाग्र बदलाबद्दल जागृती करण्यासाठी १८ ऑक्‍टोबर हा ‘जागतिक रजोनिवृत्ती दिन’ म्हणून पाळला जातो.

‘ओचे बांधून पहाट उठते, तेव्हापासून झपझपा वावरत असतेस...’ विंदा करंदीकरांचे शब्द ओठावर आहेत, पण सकाळपासून एकूणच ‘झपताल’ मंद झाला आहे असे वाटते आहे. एरव्हीची पायात लुडबुडणाऱ्या मांजरासारखी स्वप्ने आज तिच्या आसपासही नाहीत. तिचे चित्तच मुळी आज थाऱ्यावर नाही. सकाळपासून प्रत्येक बाबतीत केवळ चिडचिड होतेय तिची. कुठलेही काम करण्यात तिला उत्साह जाणवत नव्हता. आपल्याला काय होतेय, याचा ती विचार करत होती. आणि तिच्या मनात विचार डोकावला, आपण वयाची चाळिशी नुकतीच पूर्ण केली आहे. रजोनिवृत्तीची तर ही लक्षणे नाहीत ना? आणि या विचारांनी तिला धस्स झाले. रजोनिवृत्ती इतक्‍या लवकर?....

चाळिशी गाठल्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या मनात रजोनिवृत्तीचा विचार डोकवायला लागतो. साधारणपणे पंचेचाळिशीनंतर कुठल्याही स्त्रीला नकोशा वाटणाऱ्या परंतु बदलता न येणाऱ्या या बदलाला सामोरे जाण्याची वेळ येते. चाळीस ते पंचावन्न हे रजोनिवृत्तीचे वय असू शकते. चाळिशीआधी रजोनिवृत्ती आली तर ती ‘अकाली’ म्हणता येते. तर पंचावन्न नंतर रजोनिवृत्ती आली तर ती ‘विलंबित’ म्हणावी लागेल. सत्तेचाळीस- अठ्ठेचाळीस हे रजोनिवृत्तीचे सरासरी वय मानण्यात येते.

का येते रजोनिवृत्ती?
 स्त्रीमध्ये दरमहाचा रजस्त्राव होणे पूर्णत: बंद होतो त्या अवस्थेस रजोनिवृत्ती असे म्हणतात. ही एक प्रत्येक स्त्रीमध्ये ठराविक काळानंतर येणारी एक सामान्य अवस्था आहे. वाढत्या वयानुसार शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात आणि ते स्वाभाविकच असतात. स्त्रीच्या शरीरात इस्ट्रोजेन या संप्रेरकाचा अभाव निर्माण झाला की रजोनिवृत्ती होते. या अवस्थेमध्ये स्त्रीच्या प्रजनन अवयवामध्ये क्षीणता येण्यास सुरवात होते. काही कारणामुळे स्त्रीचे गर्भाशय काढले जाते आणि त्यामुळे रजोवृत्ती बंद होते याला ‘सर्जिकल रजोनिवृत्ती’ असे म्हणतात. साधारणपणे पूर्ण वर्षभर जर मासिक पाळी आली नसेल तर निश्‍चितपणे रजोनिवृत्ती सुरू झाली असे म्हणता येईल. ही एक सर्वसामान्य शारीरिक प्रक्रिया आहे. तरीही दर महिन्याला येणारी मासिक पाळी ही आपल्या स्त्रीत्वाची ओळख आहे, असे स्त्रियांना वाटत असते. साहजिकच रजोनिवृत्तीचा संक्रमण काळ अनेक स्त्रियांना मानसिकरीत्या धक्का देतो. अस्वस्थ करून सोडतो. रजोनिवृत्तीमुळे आपल्या सौंदर्याला बाधा येईल, ही दुसरी भीती स्त्रियांच्या मनात घर करून राहते.

संक्रमण काळातील त्रास
रजोनिवृत्तीचा संक्रमण काळ स्त्रियांसाठी शारीरिक, मानसिक आणि भावनिक पातळीवर त्रासाचा असू शकतो. प्रत्येक स्त्रीला सगळेच त्रास होतील असे नाही. कदाचित काहीही त्रास होणारही नाही. पण बहुतांश स्त्रियांना या संक्रमण काळात अंगातून गरम हवा वाहात असल्याचा अनुभव येणे आणि जीव कासावीस झाल्यासारखं वाटणे (हॉट फ्लशेस), रात्री झोपेतून जाग येणे आणि पूर्ण अंग घामाने भिजणे, शारीरिक थकवा जाणवणे, अंगदुखी, डोके दुखणे, कंबर आणि सांध्याच्या ठिकाणी वेदना होणे, अनुत्साह, आळस येणे, चीडचीड होणे, छातीत धडधडणे, झोप न लागणे, स्वभावाच्या वेगाने बदलणाऱ्या लहरी, नैराश्‍य यापैकी काही त्रास होऊ शकतो.

सुरक्षा कवच निखळते
रजोनिवृत्तीमुळे अंडाशयातून स्रवणारे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांची (हार्मोनची) निर्मिती जवळजवळ बंद होते. दर महिन्याचे मासिक चक्र आणि त्या अनुषंगाने गर्भाशयात होणारे बदल घडवण्यासाठी ही संप्रेरके आवश्‍यक असतात. मात्र इस्ट्रोजेनची निर्मिती थांबल्यामुळे शरीरात काही बदल वेगाने होऊ लागतात. रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनचे सुरक्षा कवच निखळल्याने अस्थिठिसूळता आणि हृदयविकार होण्याची शक्‍यता वाढते. इस्ट्रोजेन स्त्रियांना हृदयविकारापासून एक प्रकारचे सुरक्षा कवच प्रदान करते. इस्ट्रोजेनमुळे रक्तवाहिन्या अधिक सुदृढ बनतात. त्यामुळे वयाच्या पंचेचाळिशीपर्यंत स्त्रियांना हृदयविकाराचा झटका क्वचितच येतो. मात्र रजोनिवृत्तीनंतर हृदयविकाराची शक्‍यता स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये समपातळीवर येते.

‘मेलबोर्न स्टडी’ या अभ्यासानुसार, स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीच्या संक्रमण काळात दोन टक्के हाडांचे प्रमाण आणि त्यानंतर एक टक्का प्रमाण दर वर्षी कमी होऊ लागते. मानवी हाडांमध्ये सतत झीज आणि निर्मितीची प्रक्रिया सुरू असते. इस्ट्रोजेनमुळे हाडांची झीज भरून निघते. रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनची निर्मिती होत नसल्यामुळे हाडांची झीज भरून काढण्याची प्रक्रिया जवळजवळ थांबत असल्यामुळे हाडे ठिसूळ बनतात. त्यामुळे रजोनिवृत्तीनंतर अस्थिठिसूळतेचा धोका वाढल्याचे आढळते. यामध्ये हाडांमधील कॅल्शिअमचे घटलेले प्रमाण हाडे ठिसूळ करण्यास कारणीभूत ठरतात. अशी ठिसूळ झालेली हाडे सहज तुटू शकतात.  

रजोनिवृत्तीचा परिणाम म्हणून त्वचा मलूल पडणे, निद्रानाश, बद्धकोष्ठता, छातीत अचानक धडधडणे, पोटात फुगारा वाटणे, हाडे आणि सांधेदुखी, चेहरा अचानक खूप गरम भासणे, अचानक घाम फुटणे, चेहऱ्यावर फोड- मुरूम येणे, त्वचेवर लाल चट्टे दिसणे, सुस्तपणा वाढणे, वजन वाढणे, कामाचा उत्साह न वाटणे अशीही काही लक्षणे दिसू लागतात. या काळात नैराश्‍य येण्याचा व लठ्‌ठपणा वाढत जाण्याचा धोका अधिक असतो.

पर्याय काय?
आपण पाहिले की, रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांच्या शरीरात आढळणारे बदल हे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांच्या अभावामुळे होतात. जर हेच हार्मोन स्त्रियांना बाह्यस्रोतांद्वारे दिल्यास अनेक अनावश्‍यक शारीरिक बदलांना टाळता येऊ शकेल, असा विचार करून शास्त्रज्ञांनी ‘हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी’ (एचआरटी) या उपचार पद्धतीला प्राधान्य देण्यास सुरवात केली. यात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन (प्रोजेस्टेरॉन हार्मोनचे कृत्रिम स्वरूप) हे दोन हार्मोन गोळ्या, पॅचेस, जेल अथवा रोपणाद्वारे इच्छुक स्त्रीला देतात. त्यामुळे विशेषतः हाडांचे ठिसूळ होणे लक्षणीयरीत्या कमी होते, तसेच हृदयविकाराचा धोका टळतो. याशिवाय इतर अनेक लहान-मोठ्या त्रासांपासून मुक्तता मिळते, असे लक्षात येते. मात्र ‘एचआरटी’च्या या फायद्यांबद्दल संशोधकांमध्ये प्रचंड मतभिन्नता आहे. काहींच्या मते, ‘एचआरटी’ उपचारपद्धतीमुळे दिसू लागणारे फायदे आभासी असून, ते वस्तुस्थितीच्या विपरीत आहे. काही संशोधकांच्या मते ‘एचआरटी’मुळे मिळणाऱ्या फायद्यापेक्षा तोटेच जास्त तीव्र आणि धोकादायक आहेत. म्हणजे असे की, ‘एचआरटी’ उपचार घेणाऱ्या स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढलेले आढळले आहे. डोकेदुखी, मळमळणे, वजन वाढणे यासारखी लक्षणेसुद्धा आढळतात. काही संशोधक मात्र यातून सुवर्णमध्य साधतात. प्रत्येक स्त्रीमध्ये रजोनिवृत्तीनंतर आढळणाऱ्या लक्षणांचा अभ्यास करून योग्य त्या प्रमाणातच तिला ‘एचआरटी’ औषधे द्यावीत, असा सल्ला देतात. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे योग्य त्या तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय ‘एचआरटी’ औषधे घेऊ नयेत.

काय खाल?
रजोनिवृत्तीनंतर आहाराकडे विशेष ध्यान देणे आवश्‍यक असते. पौष्टीक, सहज पचणारा, कमी तेलाचा व कमी तिखट, शक्तीवर्धक आहार घ्यावा. हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, विविध फळे यांचा आहारात समावेश करावा. या अवस्थेमध्ये हाडे ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते, हे लक्षात घेऊन आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश ठेवावा. दूध, नाचणी या पासून कॅल्शियम मिळेल. ‘सोया’युक्त आहारामुळे शरीराला एक प्रकारे हिरवे इस्ट्रोजेन प्राप्त होत असते. जपानी स्त्रियांच्या शरीरात ‘सोया’युक्त पदार्थांचा समावेश अधिक असल्यामुळे त्यांना रजोनिवृत्तीनंतर विशेष त्रासांना सामोरे जावे लागत नाही. दही, पनीर यांचा आहारात समावेश करावा. मात्र मांसाहार कमीत कमी असावा. फास्ट फूड, फ्राइड फूड यापासून दूर राहायला हवे. शेंगदाणे, शतावरी, रताळे, हळद, लसूण, ज्येष्ठमध, गाजर, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, कडधान्ये यांच्या नियमित सेवनाने रजोनिवृत्ती काळातील, नंतरच्या त्रासांवर मात करता येऊ शकते.

काय कराल?
वयोपरत्वे येणाऱ्या रजोनिवृत्तीला आणि त्यातील परिणामांना सामोरे जाण्यासाठी पस्तिशीनंतर विशेष लक्ष पुरवायला हवे. अर्धा ते एक तास नियमित व्यायाम व सात ते आठ तास पुरेशी गाढ झोप घेणे आवश्‍यक आहे. धूम्रपान करणे टाळायला हवे. ताणतणावांवर योग्य नियंत्रण ठेवायला हवे. अति अपेक्षा आणि अति महत्त्वाकांक्षा यापासून स्वतःला दूर ठेवायला हवे. सकारात्मक विचारसरणी, नियमित शारीरिक तपासणी, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण पडताळणी या गोष्टी आचरणात आणल्यास रजोनिवृत्तीमुळे होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांना अधिक धैर्याने, उमदेपणाने सामोरे जाणे प्रत्येक स्त्रीला शक्‍य होईल. रोज किमान चाळीस मिनिटे चालण्याचा व्यायाम घ्यावा. त्यामुळे शारीरिक कष्ट करण्याची क्षमता अर्थात स्टॅमिना वाढतो. 

रजोनिवृत्ती टाळता येणे शक्‍य नाही, पण त्या प्रक्रियेला सकारात्मक सामोरे जाणे शक्‍य आहे. रजोनिवृत्ती ही केवळ शारीरिक प्रक्रिया आहे, ती जीवननिवृत्ती नाही; उलट ही एक नवी सुरुवात आहे हे स्वीकारावे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Santosh Shenai article