बहिरे व्हाल!

बहिरे व्हाल!

‘दिवस-रात्र नुसते कानात इअरफोन. बहिरा होशील एकदिवस,’ असा ओरडा आपल्या घरात, आसपास ऐकलेला असेलच. आई-बाबांचे काहीतरीच असते, असे म्हणत हसून आपण त्या गोष्टीकडे काणाडोळाही केला असेल. पण ही हसण्यावारी न्यायची गोष्ट नाही. खरेच बहिरे व्हाल! ‘जर्नल ऑफ अमेरिकन मेडिसीन‘मधे प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, सतत इअरफोन किंवा हेडफोन वापरल्याने बहिरेपण येऊ शकते.

इअरफोनने हानी
वेगाने बदलणाऱ्या आणि सुलभ रीतीने समाजापर्यंत पोहोचणाऱ्या तंत्रज्ञानाने लहान-मोठ्यांकडे  फोन असणे ही सहज गोष्ट झाली आहे. आसपास पाहा, कित्येकजण इअरफोनचा वापर करून गाणी ऐकताना किंवा बोलताना दिसतील. इअरफोन लावल्याने बाहेरचा कोणताही आवाज ऐकायला येत नाही. गाणी ऐकण्यातही मजा येते. त्यामुळे चालताना, गाडी चालवताना, अभ्यास करताना, खाताना इअरफोन लावून गाणी ऐकण्याची सवय शालेय विद्यार्थ्यांना, महाविद्यालयीन युवकांना आणि कार्यालयातून काम करणाऱ्यांनाही लागलेली दिसते. पण असे सतत इअरफोन लावून बसल्यामुळे आपल्या कानांची हानी होते. आता उच्च गुणवत्ता असलेले हेडफोन किंवा इअरफोन उपलब्ध आहेत. ते अगदी कानाच्या आत जातात, त्यामुळे गाणी ऐकण्याचा अद्भुत अनुभव मिळतो. साहजिकच इअरफोनचा वापर खूप जास्त काळ केला, तर कानात हवाच जात नाही. त्यामुळे कानात संसर्ग होण्यापासून श्रवणशक्‍ती कायमची गमावण्याची वेळ येऊ शकते, असे संशोधकांनी लक्षात आणून दिले आहे. 

हॉर्नचा धक्का
यंत्रांच्या आवाजाचा, कर्कश्‍य हॉर्नचा आवाज कानाला हानी पोहोचवतात हे आधीच माहित आहे. वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले असताना सतत आजूबाजूच्या वाजणाऱ्या गाड्यांच्या हॉर्नमुळे अगदी नकोसे होते, हे आपण कित्येकदा अनुभवलेले असेल. अनेकदा त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. मात्र या हॉर्नचा आपल्या कानावर विपरीत परिणाम होऊन कालांतराने बहिरेपण येऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, दरवर्षी गाड्यांच्या हॉर्नमुळे जवळपास दीड कोटी निरोगी लोकांच्या आयुष्यावर परिणाम होतो. या अहवालात नोंदवण्यात आल्यानुसार, मुळात कर्कश्‍य हॉर्नचा कानांवर तर परिणाम होतोच, शिवाय व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर देखील याचा थोड्याफार प्रमाणात परिणाम होतो. कर्कश्‍य हॉर्न सातत्याने ऐकल्यामुळे चिडचिड होणे, डोकेदुखी आणि मानसिक ताणही वाढणे असे घडते. परिणामी व्यक्ती दररोजच्या कामगिरीतही कमी पडू लागते. 

अचानक एखादा मोठ्या आवाजाचा हॉर्न ऐकला तर कान दुखणें, ऐकू कमी येणें या तक्रारी उद्भवतात. या समस्यांव्यतिरिक्त छातीत धडधडणें, रक्तदाब वाढणें आदी घडते.  ज्या व्यक्तींना रक्तदाबाचा त्रास असतो त्यांना असा हॉर्न ऐकल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची देखील शक्‍यता असते. दररोज गाडी चालवताना कर्कश्‍य हॉर्नचा आवाज ऐकणाऱ्यांच्या कानाच्या आत इजा होऊन कालांतराने कायमस्वरूपी बहिरेपण येते. यासाठी लोकांनीही गरज असतानाच हॉर्न वाजवायला हवा. मुळात हॉर्न न वाजवता देखील आपण वाहन नीट नेऊ शकतो. 

मोबाईलही घातक
कर्णकर्कश भोंगे, पावलोपावली कानावर आदळणारा असंख्य वाहनांचा आवाज, मोबाईलवर बोलण्यात आणि त्यावरील गाणी ऐकण्यात जाणारा तासनतास वेळ आदींमुळे शहरांमधील  तरुणांमध्ये बहिरेपण वाढत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. नाक-घसा-कान तज्ज्ञांच्या संघटनेच्या अहवालानुसार, भारतात शहरातील वीस ते पस्तीस वयोगटातील जवळजवळ तीस टक्के तरुणांच्या दोन्ही कानांची ऐकू येण्याची क्षमता कमी झाली आहे. घरातील व्यक्तींनी किंवा जवळच्या कुणीतरी या युवकांना ऐकू येत नसल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर त्यांचा बहिरेपणा लक्षात येतो. सतत मोबाईल कानाला लावून बसल्याचा हा परिणाम असतो. हा सततचा आवाज पुढे पुढे सहन करता येत नसल्याने अधिक विश्रांतीची गरज भासते. त्यानंतर संबंधिकांच्या झोपेची गुणवत्ता बिघडते. श्रवणक्षमता बिघडण्यासह मानसिक अनारोग्यालाही मोबाईलचा आवाज कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. श्रवणक्षमतेमध्ये बिघाड झाल्यानंतर श्रवणयंत्र वापरण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र हा वैद्यकीय सल्लाही अनेक तरुण योग्यवेळी ऐकत नसल्याने कानांचे आरोग्य अधिक बिघडते. मोबाईलवर कमाल आवाज मर्यादेची गाणी ऐकण्याने हा आजार गंभीर रुप धारण करीत असल्याचे अहवालात म्हटले आहे. 
  
इअरफोनमुळे काय होते?
बहिरेपण : कान केवळ ६५ डेसिबल आवाज सहन करू शकतात. इअरफोनचा आवाज कानांसाठी ९० ते १०० डेसिबल म्हणजे कानांच्या क्षमतेहून कितीतरी अधिक असतो. आपण सातत्याने आठ तास इअरफोनचा वापर केल्यास कान सुन्न होतात, श्रवणशक्ती कमी होते आणि अखेर बहिरेपण येण्याची शक्‍यता असते. 

कानदुखी : सतत इअरफोन वापरल्याने कानदुखी  जडू शकते. तसेच, वेळीच सवय न बदलल्यास त्याचे तीव्र परिणाम होऊ शकतात. 

कानातील संसर्ग : इअरफोनने सतत गाणी ऐकल्यामुळे कानाच्या पडद्याचे नुकसान होते. शिवाय एकमेकांचे इअरफोन वापरल्याने कानात संसर्ग होऊ शकतो. आपला इअरफोन इतर कोणाला दिला असेल, तर तो सॅनिटायझरने साफ करून वापरावा. सलग दहा मिनिटांपर्यंत इअरफोन कानात लावून ठेवल्यास कानाच्या आतील पेशी मरतात. त्यामुळे तेथे जीवाणूंची वाढ होते आणि कानात मळ साठतो.

 झोप कमी होणे : झोप न येणे, मानसिक ताण, नैराश्‍य आणि सतत होणारी डोकेदुखी याचे कारण सतत वापरले जाणारे इअरफोन हे असू शकते. 

मेंदूचे नुकसान : इअरफोनमधून निघणारे विद्युत चुंबकीय तरंग मेंदूला खूप नुकसान पोहोचवू शकतात. काही व्यक्‍तींना रात्री झोपताना गाणी ऐकायची असतात. या सवयीचा मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो. 

अपघाताची शक्‍यता : अनेकदा गाडी चालवताना किंवा रस्ता ओलांडताना कानात फोन असतात. त्यामुळे इतर वाहनांचा आवाज ऐकायला येत नाही. परिणामी अपघात होण्याचा धोका वाढतो.  

इथे इअरफोनचा वापर करू नका   
 रस्ता ओलांडताना, रस्त्यावरून फिरताना, चालताना, गाडी चालवताना
 रेल्वे स्टेशन्स, बस स्टॅंड, विमानतळ किंवा बंदरे
 पार्किंग करताना
 पुलाच्या वरून किंवा खालून जाताना
 बांधकामाच्या साइटवर
 मॉल किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी
 एखादे महत्त्वाचे काम करताना

कोणती काळजी घ्याल?
 गाणी ऐकताना आवाज ६० डेसिबलपेक्षा जास्त असू नये
 तीस मिनिटांहून अधिक वेळ इअरफोनचा वापर करू नये
 जेव्हा गरज असेल तेव्हाच इअरफोनचा वापर करावा
 कानातून आवाज येण्याची, झोप अपुरी वाटत असल्याची तक्रार उद्भवत असल्यास तातडीने डॉक्‍टरांकडे जा
 रात्रीच्या वेळी इअरफोन वापरू नका
 कानाच्या बाहेर राहतील असे इअरफोन निवडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com