ऊन सोसेना...

संतोष शेणई
Tuesday, 2 April 2019

उन्हाळा चांगलाच जाणवू लागला आहे. ‘आली होळी, थंडी पळाली’ म्हटले जाते. पण, या वर्षी होळी येण्याआधीच ऊन चांगलेच तापू लागले होते. अंगाला चटके बसू लागले होते. आता तर उन्हापासून अधिक काळजी घ्यायला हवी.

सूर्याचे किरण चांगलेच तळपू लागले आहेत. तापमान वाढायला लागले आहे आणि हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते आहे. आता अंगाची तल्खली सुरू होईल. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच या उन्हाळ्याचा त्रास होत असतो. हा उन्हाळा आरोग्यदायी बनवता येईल. त्यासाठी आधीच काळजी घ्यायला सुरवात केली पाहिजे. या काळात कोणते आजार आणि विकार उद्भवू शकतात, कशाकशाचा त्रास होऊ शकतो, हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने आधीच उपाय योजना सुरू करता येईल.

कोणते होतात विकार?
मूत्रमार्गाचे विकार - उन्हाळ्यात हवा अतिशय गरम असते. अलीकडे महाराष्ट्रात  चाळीस अंशाच्या आगेमागे तापमान असणे हे नित्य झाले आहे. तापमानातील या वाढत्या उष्णतेमुळे आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागते. साहजिकच लघवीचे प्रमाण कमी होऊ लागते, लघवी होताना जळजळ होते. लघवी पिवळी किंवा प्रसंगी तांबडट रंगाची होते. याबरोबरच मूत्रामध्ये जंतुसंसर्ग होऊन थंडीताप येऊ शकतो. मूत्रपिंडात किंवा मूत्रमार्गात खडे निर्माण होऊ शकतात. ज्यांना हा त्रास पूर्वी होऊन गेला आहे अशांना पुनश्‍च तो त्रास उद्भवण्याची शक्‍यता जास्त असते. यावर भरपूर पाणी पीत राहणे हाच उपाय असतो. सकाळी कोमट लिंबू-पाणी पिऊन दिवसाची सुरवात केली तर अधिक उत्तम. पण मूत्रमार्गाचे किंवा मूत्रपिंडाचे खडे झाले असल्यास, वैद्यकीय तपासणी करून योग्य तो उपचार करणेच इष्ट.

पोटाचे विकार : वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे घामही भरपूर येतो. त्यामुळे शरीरातील, विशेषतः आपल्या आतड्यामधील पाण्याच्या, तसेच क्षारांच्या प्रमाणात बदल होतात. परिणामी अनेकांना उलट्या-जुलाबाचा त्रास होऊ लागतो. विशेषतः लहान  मुलांना, त्यातही नवजात अर्भकांना याचा त्रास अधिक होतो. अशावेळी डॉक्‍टरांकडे जाणे हेच उत्तम. पण तोवर लिंबू सरबत घेऊन शरीरातील पाणी व क्षार कमी होणार नाहीत, याची काळजी घ्या. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी अशुद्ध आणि फिल्टर न केलेले पाणी पिण्याची वेळ येते. या काळात अनेक लग्ने-मुंजी आणि सार्वजनिक समारंभांमध्ये जेवणे असतात. सुट्टीमुळे अनेकांचा बाहेर गावी प्रवास होतो. बाहेर खाणे, बागेत जाऊन तेथील उघड्यावरील पदार्थ खाणे, सरबते किंवा रस पिणे असेही घडते. अशुद्ध पाणी, कमी दर्जाचे खाद्यपदार्थ, अस्वच्छता, उघड्यावरच्या खाद्यपदार्थांवरील धूळ या कारणांनी हे पदार्थ सेवन केल्यानंतर अन्नातून जंतुसंसर्गाची, आमांश होण्याची शक्‍यता दाट असते. त्यामुळे उन्हाळ्यात अपचन, उलट्या, जुलाब, आमांश अशा पोटाच्या तक्रारी वाढतात. अशुद्ध पाण्यापासूनच्या बर्फाच्या वापरामुळे टायफॉईड, कावीळ अशांसारखे गंभीर आजारही पसरतात.

पाणी-क्षारांची कमतरता : शरीरात पाणी व क्षाराचे प्रमाण कायम राहणे अतिशय आवश्‍यक आहे. कारण शरीराच्या पेशी, रक्त, मांस यात नव्वद टक्के पाणी असते. आपल्या मेंदूला सतर्क राहण्यासाठी, आपल्या हातापायांच्या हालचालींसाठी आणि एकूणच शरीर टवटवीत राहण्यासाठी आपल्या शरीरात पाणी आणि क्षारांचे योग्य प्रमाण आवश्‍यक असते. बाहेरच्या उकाड्यासरशी घाम येऊन शरीरातील पाणी आणि क्षार कमी होतात. त्यामुळे तोंडाला कोरड पडू लागते. सतत तहानलेले वाटणे, गळून गेल्यासारखे किंवा सतत थकल्यासारखे वाटणे, डोके जड होणे, गरगरणे, हात-पाय तसेच अंग दुखणे, पोटऱ्या दुखणे अशांसारख्या तक्रारी म्हणजे शरीराला पाणी व क्षारांची निकड आहे असे समजा. याच कारणाने तोंडाची चव जाणे, भूक मंदावणे असेही त्रास उन्हाळ्यात सर्रास संभवतात. खूप उन्हात काम केल्यास क्षार आणि पाणी यांची कमतरता निर्माण होऊन उष्माघात होऊ शकतो. आपल्या मेंदूमध्ये शरीराचे तापमान कायम राखणारी एक यंत्रणा असते. पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ही यंत्रणा पूर्ण कोलमडते. परिणामतः त्या व्यक्तीला घाम येणे, मळमळ, उलटया, घबराट आणि जास्त प्रमाणात थकवा, त्वचा निळी पडणे, शरीराचे तापमान अचानक कमी होणे, चक्कर येणे, रक्तदाब आणि नाडीचे ठोके कमी होणे अशी लक्षणे दिसतात. अशा व्यक्तीस वेळेवर उपचार मिळाले नाहीत, तर त्याला झटके येणे, बेशुद्ध होणे, कोमात जाणे अशाप्रकारची गुंतागुंत वाढत जाते. या प्रकारात त्या व्यक्तीच्या जीवावरही बेतू शकते.

डोळ्यांचे विकार : आपल्या डोळ्यांच्या बुबुळावर एक बारीकसा द्रवाचा तवंग असतो. त्यामुळे आपले डोळे थंड राहतात. उन्हाळ्यात हा द्रव पदार्थ कमी होतो आणि डोळे जळजळणे, लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे येणे असे त्रास उद्भवतात. संगणकावर काम करणाऱ्यांचे डोळे कोरडे होऊ लागतात. डोळ्यांना अधूनमधून थंड पाण्याने धुणे, गुलाबपाणी घालणे, काकडीचे काप बंद पापण्यांवर ठेवणे असे काही उपाय डोळे थंड ठेवण्यासाठी करता येतात. डोळ्यांची आग होणे, लाल होणे, सारखे पाणी येणे असे प्रखर उन्हामुळे डोळ्यांना होणारे त्रास कमी करण्यासाठी उन्हाच्या वेळी बाहेर जाताना डोळ्यांवर काळा चष्मा लावणे आवश्‍यक असते. डोळे येण्याचा त्रास होऊ नये यासाठी एक छोटा कांदा बारीक किसून त्याचा दोन थेंब रस दोन्ही डोळ्यात टाकावा. खूप आग होईल पण नंतर थंड वाटेल. 

(हे औषध दोन वर्षांनंतरच्या मुलांपासून सगळ्यांना उपयोगी आहे.) 
 
त्वचेची काळजी
तीव्र उन्हात गेल्याने सर्वांनाच त्वचा लाल होणे, काळी पडणे, चेहऱ्याची आग होणे असे त्रास होतात. अनेक व्यक्तींना तळपायांची आग होते. तसेच उन्हाळ्यामध्ये लहान मुले, नाजूक त्वचा असलेल्या व्यक्तींना अंगावर घामोळ्या येण्याचा त्रास होतो. सतत घाम येत असल्यामुळे काखा आणि जांघा स्वच्छ आणि कोरड्या न ठेवल्यास तिथे गजकर्णासारखे त्वचाविकार होऊ शकतात. बऱ्याच स्त्रियांना स्तनाखाली अशा पद्धतीचे गजकर्ण उन्हाळ्यात उद्‌भवते.  

ओझोनच्या थरावर झालेल्या परिणामामुळे हानिकारक सूर्यकिरण आता पृथ्वीपर्यंत येऊ लागले आहेत. या सूर्यकिरणांच्या संपर्कात त्वचा आल्यामुळे प्रीमॅच्युअर एजिंग म्हणजेच त्वचेवर वार्धक्‍याच्या खुणा लवकर दिसू लागतात. त्वचेवरील नव्वद टक्के सुरकुत्या उन्हामुळे पडतात. प्रदूषणाला व सूर्यकिरणांना सतत सामोरा जाणारा शरीरावरील अत्यंत संवेदनशील भाग म्हणजे त्वचा. म्हणूनच एखादी व्यक्तीला सनबर्न होऊ शकतो. सनबर्नमुळे त्वचेवर लाल रंगाचे चट्टे उमटतात किंवा त्वचा भाजल्यासारखी होते. अशा वेळी डॉक्‍टरांचा सल्ला घेणेच योग्य ठरते. आपल्या त्वचेत मेलेनिम, रंग बनवणाऱ्या पेशी जास्त आहेत आणि या पेशी आपल्या त्वचेचे संरक्षण करतात. या उलट विशेषतः युरोपियन, अमेरिकन हे जास्त गोरे असल्यामुळे त्यांच्यात मेलेनिम, रंग बनवणाऱ्या पेशी कमी असतात. म्हणूनच त्यांच्या त्वचेवर सूर्यकिरणांमुळे होणारे बदल जास्त दिसतात व सूर्यकिरणांमुळे होणारा त्वचेचा कर्करोगही जास्त प्रमाणात आढळतो.
यावर काही सर्वसामान्य उपाय आहेत. प्लॅस्टिक आणि सगळ्या ऋतूत वापरता येणाऱ्या चपला, बूट उन्हाळ्यात टाळावेत. त्याने हाता-पायांच्या तळव्यांची आग होण्याची शक्‍यता अधिक वाढते. चंदनाचा लेप टाळूला लावल्याने डोके शांत लवकर होते. डोळ्यांनाही लावल्यास आराम पडतो. एक खूप जुनी घरगुती पद्धत आहे. पायांना तेल लावून काश्‍याच्या वाटीने घासण्याची. त्यामुळे अंगातली उष्णता निघून जाते.  

त्वचा लालबुंद होत असल्यास वारंवार साध्या पाण्याने तोंड धुवावे, कोरडे करावे आणि गुलाबपाणी लावावे. काकडीच्या रसाने आराम पडतो. 

मेंदू सांभाळा!
वाढत्या उन्हाचा मेंदूवरही परिणाम होत असतो. त्यामुळे उन्हाळ्यात काही आजार उद्भवतात.
अर्धशिशी (मायग्रेन) : हा एक सामान्यत: दिसणारा व मेंदूला रक्तप्रवाह करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील अतिसंवेदनशीलतेमुळे होणारा आजार आहे. थोडेसे दुर्लक्ष झाल्यास या बिघडलेल्या रक्तवाहिन्यांमुळे वारंवार डोकेदुखी उद्भवते, ज्याला आपण मायग्रेन म्हणतो. प्रखर सूर्यप्रकाश, खूप मोठा आवाज, तीव्र वास, ॲसिडिटी, चुकीची व कमी झोप घेण्याची पद्धती, डोक्‍यावरून आंघोळ करणे, उपवास, अतिश्रम, मासिक पाळीचा कालावधी, घट्ट वेणी बांधणे, डिहायड्रेशन, चहा-कॉफीचे सेवन, डबाबंद खाद्य पदार्थांचे सेवन ही या आजाराची काही प्रमुख कारणे आहेत. या कारणांपैकी सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे जास्तीत जास्त लोकांना मायग्रेन होतो. या आजारात व्यक्तीला खूप तीव्र स्वरूपाचा डोकेदुखीचा त्रास होतो. तसेच काही जणांत काही क्षणांसाठी दृष्टीदोषही आढळतो. अंधुक दिसणे, डोळ्यांसमोर चांदण्या चमकणे, मळमळणे असा त्रास होतो. उलटी केल्यानंतर थोड्या वेळासाठी बरे वाटते किंवा झोप घेतल्यानंतरही बरे वाटते. आजाराच्या सुरूवातीच्या काळामधे अडीच-तीन तास किंवा एखादा दिवस डोके दुखत राहते. प्रखर ऊन टाळणे हा यावर सर्वात उत्तम उपाय. असा त्रास वारंवार होत असल्यास तज्ज्ञ डॉक्‍टरांचा वेळीच सल्ला घ्या. झोपण्याची, जेवणाची वेळ, नियमित आणि पुरेसा योग्य व्यायाम, खूप तीव्र आवाजाच्या ठिकाणी जाणे टाळणे, तीव्र वासापासून दूर राहाणे आदी गोष्टी कराव्यात. 

उष्माघात : शरीरातील तापमान वाढल्यानंतर आपले शरीर घामाच्या उत्सर्जनातून व तहान वाढवून तापमान नियंत्रित करते. मात्र घामाच्या उत्सर्जनाचे काम मंदावले किंवा बंद झाले आणि शरीराचे तापमान सारखे वाढतच राहिले, तर उष्माघात होण्याचा धोका असतो. ताप येणे, डोकेदुखी, मळमळ, उलटी, अशक्तपणा, चक्कर येणे अशी लक्षणे दिसतात. एखाद्यावेळी रुग्ण कोमातही जाऊ शकतो. हा त्रास टाळण्यासाठी उन्हात जास्त वेळ फिरू नका. उन्हात फिरतानाही टोपी व गॉगलचा वापर करा. भरपूर पाणी प्या.

सेरिब्रल व्हिनस सायनस थ्रोबोसिस :  हा त्रास मेंदूच्या अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठल्यामुळे होतो. अशुद्ध रक्तवाहिन्यांमधून कमी दाबाने रक्त प्रवाहित होते. त्यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया वाढीस लागते. या कमी दाबाच्या रक्त प्रवाहामुळे रक्तवाहिन्यांवर उलट दिशेने दबाव वाढतो. यामुळे मेंदूला सूज येते, इजा होते. परिणामी डोकेदुखी उद्भवते. तसेच फिट्‌स, अर्धांगवायू, कोमा हेही काहींच्या बाबतीत घडू शकते. अतिव्यायाम, मिरवणुकांमध्ये अति नाचणे, पायी खूप वेळ उन्हातून चालणे, डिहायड्रेशन, हायपर होमेसिस्टिनेमिया यामुळे, तसेच गर्भनिरोधक गोळ्या घेण्यामुळे हा त्रास होऊ शकतो. असा त्रास टाळण्यासाठी उन्हात अनावश्‍यक बाहेर जायचे टाळणे योग्य असते. पाणी ठराविक वेळेच्या अंतराने पिणे आवश्‍यक असते. मीठ टाकून सरबत पिणे, छत्री, टोपी याचा वापर करणे, कोकम सरबत, पन्हे व नारळ पाणी यांचे योग्य प्रमाणात सेवन करणे हे हितकारक ठरते.

मल्टिपल स्क्‍लेरॉसिस : उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे मज्जातंतूंच्या विद्युत तरंगांचा प्रवाह मंदावतो आणि हा आजार उद्भवतो. प्रत्येक मज्जातंतूला मायलिन नावाचे एक आवरण असते. हे मायलिन मेंदूच्या विद्युत तरंगांचे प्रसारण मेंदूपासून इतर अवयवांपर्यंत योग्य रीतीने करते. तसेच या तरंगांची तीव्रता टिकवून ठेवते. या  आवरणाला इजा झाल्यास विद्युत तरंगांचा प्रवाह व्यवस्थित होत नाही. त्यामुळे हात-पाय जड होणे, अर्धांगवायू झाल्यासारखे वाटणे, तोल जाणे, दृष्टी एकाएकी कमी होणे, थकवा जाणवणे, लघवी-शौचावरचे नियंत्रण जाणे यासारखी काही लक्षणे दिसतात. हा त्रास टाळण्यासाठी उन्हात, गर्दीच्या ठिकाणी, दमट वातावरणात रुग्णांनी जाऊ नये हेच बरे. गरम पाण्याने उन्हाळ्यात तरी आंघोळ टाळावी. भरपूर पाणी प्यावे. मोकळ्या हवेशीर जागेत व्यायाम करावा.

मुलांची घ्या काळजी
उन्हाळ्यात लहान मुलाना भूक कमी लागते आणि तहान जास्त लागते. एक लिटर पाण्यात एक छोटा चमचा जिरे आणि तेवढेच धणे घालून हे पाणी उकळून मुलांना दिवसातून दोन-तीन वेळा प्यायला दयावे. यामुळे तहान लागणे कमी होते. कैरीचे पन्हे, लिंबाचे सरबत, शक्‍य असल्यास ताक जास्त प्रमाणात प्यायला दयावे.

रोजच्या आहारामध्ये कच्चा कांदा आवर्जून खावा. त्यामुळे उन्हाळी लागणे, नाकातून रक्त येण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होते.

उन्हाळ्यात घामोळ्याचा त्रास मुलांना होतो. त्यासाठी आठवड्यातून दोन वेळा साबणाऐवजी कैरीचा गर वापरावा.

उन्हामुळे डोके दुखत असेल तर बडीशेप वाटून डोक्‍यावर लेप लावावा. डोके दुखणे थांबते.
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांनी जरूर खेळावे, पण सकाळी लवकर व सायंकाळी उशिरा खेळावे. सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या काळात बाहेर खेळण्याऐवजी घरातील बैठे खेळ, वाचन करावे. दुपारी मैदानी खेळ खेळल्याने उष्माघात होण्याचा धोका असतो. खेळताना जवळ पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या जवळ असाव्यात. खेळताना आणि खेळून झाल्यावर त्यातील थोडे थोडे पाणी घोट घोट घ्यावे. एकदम गटागटा पाणी पिऊ नये. पोटभर खाल्ल्याशिवाय बाहेर पाठवू नये. उन्हातून आल्यानंतर मुलांना लगेच पाणी पिण्यास देऊ नका. त्याआधी एक छोटा गुळाचा खडा खाण्यास दया.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: santosh shenai article Need to be careful from the heat