प्रौढत्वी पोटास जपावे

प्रौढत्वी पोटास जपावे

वय उतारीकडे धावू लागले, की आपल्या हालचाली मंदावतात. साहजिकच आहारही कमी होत जातो. परिणामतः प्रतिकारशक्ती कमजोर होत जाते. त्याच वेळी पोटाचे विविध विकार आकार घ्यायला लागतात. 

आयुष्याची गाडी उताराला लागली, की आरोग्याच्या काही ना काही तक्रारी तोंड दाखवू लागतात. पूर्वी लोक विचारायचे, की पुढच्या पिढीसाठी काय ठेवणार? म्हणजे आंब्याचे झाड लावायचे ते पुढच्या पिढीला आंबे मिळावेत म्हणून. पण, आता काळ बदलला आहे. लोक आता आपल्याच म्हातारपणाची तरतूद करून ठेवायला हवी, असे म्हणू लागले आहेत. वय वाढले की शरीर तक्रारी करू लागते. रक्तदाब, मधुमेह, व्हेरिकोज व्हेन्स, मोतीबिंदू एवढे तरी सोबतीला असतातच. म्हणजे एवढे असणारच, असे आपण मान्य केल्यासारखेच झाले आहे. त्याबरोबरच वाढत्या वयाबरोबर खाण्यावरची वासना कमी झाली, असेही वाटू लागते. सर्वच खायच्या गोष्टींना ‘नको’ म्हणावेसे वाटू लागते. वयाबरोबर असे होणारच, अशी आपण समजूत करून घेतो. पण, खरे तर आपली खाण्याची इच्छा कमी झालेली नसते. तर अपचन, गॅसेस, पोटफुगी अशा पोटाच्या तक्रारी वाढू लागल्याने आपण खाण्याचाच कंटाळा करू लागलेलो असतो. त्यामुळे होते काय, की आहार कमी होत गेल्याने शरीरातील ताकद कमी होते. परिणामतः प्रतिकारशक्तीही कमजोर होत जाते. मग विकार आणखी बळावतात. 

अपचन, बद्धकोष्ठता, पोटफुगी, गॅसेस याकडे आपण किरकोळ दुखणी म्हणून दुर्लक्ष करतो. पण, ही मोठ्या आजाराची लक्षणे असू शकतात, हे लक्षात घेऊन उतारवयात यांसारख्या कोणत्याही दुखण्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. म्हणजे एखाद्या वेळी असा काही त्रास झाला, तर घरगुती उपचार करायला हरकत नाही. पण पोट दुखतेय? खा ओवा, प्या हिंगाचे पाणी. गॅसेस झाले? सोडा किंवा गॅसेस कमी करणारे पेय घे. असे वारंवार करता उपयोगी नाही. म्हणजेच पोटाचे विकार सतत त्रास देऊ लागले, तर घरगुती उपचारांवर अवलंबून राहता नये. सावधगिरी म्हणून डॉक्‍टरांचा सल्ला तातडीने घ्यावा. कारण या वयात काही मोठ्या आजारांची भीती असते. अन्ननलिकेपासून गुदद्वारापर्यंत कुठेही कर्करोग उद्भवू शकतो. त्याची लक्षणे डॉक्‍टर ओळखू शकतील. उदाहरणार्थ, हल्ली घास तोंडातच फिरतो, पुढे घशातून उतरतच नाही, पाण्याच्या घोटाबरोबर बळेच आत ढकलावा लागतो. असे जर घडत असेल, तर अन्ननलिकेत कर्करोगाचा व्रण तयार होत असण्याची शक्‍यता लक्षात घ्यावी लागेल.  

अपचन
अपचन ही प्रौढत्वी जपली जाणारी एक सर्वसामान्य समस्या आहे. काय घडते नेमके?  आतड्याची हालचाल मंदावते, हे एक मुख्य कारण आहे. वय होत गेले, की आपल्या शरीराची एकूणच हालचाल मंद होत जाते. सांध्यांची हालचाल मंदावते. शरीरगती मंदावली की पोटातील आतड्याची हालचालही कमी होत जाते. साहजिकच अन्नमार्गातून पुढे सरकणारे अन्न हळूहळू पुढे जात राहते. अन्न पुढे सरकण्याची गती कमी झाल्यामुळे पोटाला फुगीरपणा जाणवू लागतो. पोट जड होते. स्वाभाविकच काही जणांना बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. हा त्रास मुख्यतः मंदावलेल्या हालचालींमुळे पोट किंवा जठर लवकर रिकामे होत नसल्याने सुरू होतो. मग आहाराच्या दोन वेळांत खूप अंतर असले, तरी पोट भरलेले वाटते आणि भूक लागत नाही. म्हणून वय झाले, तरी सकाळ-संध्याकाळ थोडे चालाच, म्हणजे हा त्रास थोडा कमी होऊ शकेल. प्रौढ वयात पोटातील सर्वच अवयवांची क्षमता कमी झालेली असते. साहजिकच कोणीही प्रौढ व्यक्ती एका वेळी खूप अन्न पचवू शकत नाही.

बद्धकोष्ठता 
प्रौढ वयात बद्धकोष्ठता त्रास देते. अपचनाची जी कारणे आहेत, तीच बद्धकोष्ठतेच्या त्रासामागे असतात. म्हणजे आतड्याची हालचाल मंदावणे व अन्नमार्गातून अन्न पुढे पुढे ढकलण्याची क्रिया मंदावणे, हीच ती मुख्य कारणे. शिवाय पाचक रसांचे प्रमाणही घटलेले असते. परिणामी, खाल्लेले अन्न अन्नमार्गातून फार हळूहळू पुढे सरकते व बद्धकोष्ठाचा त्रास सुरू होतो. बद्धकोष्ठामुळे मल बराच काळ मोठ्या आतड्यात साठून राहतो व कडक बनतो. कडक मल व आतड्यांची मंदावलेली हालचाल यामुळे शौचास जोर काढावा लागतो. परिणामी, गुदद्वाराशी जखमा होतात. याला ॲनल फिशर म्हणतात. त्यावर वेळीच उपचार केले गेले नाहीत की मूळव्याध उद्भवतो. बद्धकोष्ठतेमुळे व आतड्याच्या मंदावलेल्या हालचालीमुळे मोठ्या आतड्यांत जखमा होऊ शकतात. तसेच, जंतुसंसर्ग होऊ शकतो. त्यातून डायव्हर्टिक्‍युलिट्‌स नावाचे आजार निर्माण होतात व पोटदुखी सुरू होते. बद्धकोष्ठतेबरोबरच पोटदुखी असेल, तर डॉक्‍टरांना वेळीच दाखवून डायव्हर्टिक्‍युलिट्‌स नाही ना, याची खातरजमा करून घ्यावी. मंदावलेली आतडी, घटलेले पाचक रस यामुळे अपचन होत राहते व औषधांना प्रतिसादही कमी मिळतो, त्यामुळे प्रौढ वयात उपचारांनाही अधिक काळ लागतो.

वारा सरतो
वय होत गेले, की पोटात गॅसेस होणेही वाढत जाते.
खाताना, पिताना हवा गिळली जाते. विशेषत: भराभर खाल्ले व प्यायले, तर जास्त प्रमाणात हवा गिळली जाते. धूम्रपान, च्युइंगम चघळणे यामुळेही हवा जास्त प्रमाणात गिळली जाते.

अन्न अन्नमार्गातून जात असता तेथील जिवाणू अतिरिक्त प्रमाणात गॅस निर्माण करतात.

खाल्लेले अन्न नीट पचले नाही की गॅसेस होतात. तसेच अन्नरसाचे नीट शोषण झाले नसेल, तर गॅसेस होतात.

डाळी, कडधान्ये, कांदा, लसूण, मुळा, गाजर, रताळी, बटाटे, काजू इत्यादी पदार्थामुळे वाजवीपेक्षा जास्त गॅसेस निर्माण होतात.

स्वादुपिंडाच्या विकारात, इरिटेबल बॉवेल सिन्ड्रोम असेल, तर अन्नमार्गाचा कर्करोग असेल व त्याचे उपचार सुरू असतील, तरी पोटात जास्त प्रमाणात गॅसेस तयार होतात. त्यामुळे गॅसेसचा त्रास नेमका कशामुळे होतो, याची वैद्यकीय तज्ज्ञांकडून खात्री करून घ्यावी, हे उत्तम.

इतर काही...
 हायटूस हार्निया हा प्रौढ वयात त्रासदायक असतो. छातीच्या पोकळीत असणारी अन्ननलिका व पोटातील जठर यांच्यामध्ये एक द्वार असते. या दारावरची झडप जठरातील अन्न पुन्हा अन्ननलिकेकडे वर जाणार नाही, याची काळजी घेते. पण, प्रौढ वयात या झडपेचे स्नायू शिथिल होतात. सैलावलेली झडप कमजोर होते. त्यामुळे जेवणानंतर लगेचच झोपले, तर जठरातील अन्न झड़प ढकलून वर अन्ननलिकेत शिरते. या प्रकाराला गेर्ड म्हणतात. अन्न वर सरकून तेथे जळजळ सुरू होते. हा त्रास ॲसिडिटीसारखा वाटतो, पण तो गेर्डमुळे होत असतो. अनेकदा छाती व पोटाच्या पोकळींना विभागणारा पडदा अशक्त झाल्याने जेवणानंतर आडवे झाल्यावर जठराचा काही भाग सटकन वर छातीच्या पोकळीत जाऊ शकतो व जळजळ उद्भवते, याला हायटूस हार्निया म्हणतात.

 बहुतेकांना रक्तदाबासाठी, हृदयविकारासाठी आणि मधुमेहासाठी औषधे चालू असतात. या औषधांमुळे ॲसिडिटी होऊ शकते. रक्तवाहिनीमध्ये गुठळी होऊ नये म्हणून रक्त पातळ ठेवणारी डिस्पिरीन, ॲस्पिरिनसारखी औषधे साधारणपणे प्रौढ वयात घेतली जातात. एकीकडे ही औषधे आवश्‍यक असतात, पण या औषधामुळे शरीरात कुठेही रक्तस्राव होऊ शकतो. पोटामध्ये रक्तस्राव झाल्यास रक्ताच्या उलट्या होऊ लागतात, हे लक्षात घ्यायला हवे.

उतारवयात माणसाची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. ही वेळ साधून रोगजंतूची लागण लागलीच होते. जठरामध्ये एच. पायलोरी नावाच्या जंतूचा संसर्ग झाला, तर पोटात ॲसिडिटीसारखीच जळजळ होऊ लागते. आतड्याला रोगजंतूंचा संसर्ग होऊन डायरिया उद्भवतो. याचे दुष्परिणाम पूर्ण शरीरावर, मेंदूवर होऊ शकतात. शरीरातील इलेक्‍ट्रोलायटिसचे प्रमाण बिघडते व माणूस गुंगीत जाऊ शकतो.

कर्करोग
उतारवयात अन्नमार्गातील कर्करोग उद्भवू शकतो, याकडे लक्ष वेधले आहेच. वय वाढते तसे बद्धकोष्ठता येते. फिशर व मूळव्याधही होतो. पण, वय झालेल्यांना जर शौचावाटे रक्त जात असेल, तर तो मूळव्याध समजून उपचार करत बसू नये. पोटाच्या सर्जनकडून गुदद्वाराची जागा आतून तपासून घ्यावी. अनेकदा गुदद्वाराच्या किंवा मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागाच्या कर्करोगामुळेही हे रक्त पडत राहते. जठरातील कर्करोगाची लक्षणे सर्वसाधारणपणे ॲसिडिटीसारखी असतात. त्यामुळे नेहमीची औषधे घेऊनही ॲसिडिटी बरी होत नसेल, तर लवकरात लवकर पोटाच्या तज्ज्ञांकडे जाऊन तपासून घ्यायला हवे. अन्नमार्गातील कर्करोग शोधण्यासाठी एन्डोस्कोपी म्हणजे अन्नमार्गात दुर्बीण घालून तपासणी केली जाते. यामुळे या मोठ्या आजाराचे निदान लवकर होते. सुरुवातीलाच निदान झाल्यास उपचार त्वरित करून कर्करोगावर नियंत्रण मिळवणे शक्‍य असते. 

आतड्याचा कर्करोग असेल, तर पोटात खूप दुखू लागते. अगदी शेवटच्या टप्प्याला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वरचेवर पित्ताच्या उलट्या होणे, बद्धकोष्ठ, पोटात दुखणे, शौचावाटे रक्त पडणे आदी लक्षणांबाबत सावध राहायला हवे. आणखीही काही लक्षणे आहेत, ती अशी -

अन्न गिळताना त्रास जाणवणे.
खाण्याआधीच पोट भरल्यासारखे वाटणे. 
सततची पोटदुखी, पोट जड वाटणे.
शौचाला काळे होणे वा शौचावाटे रक्त पडणे.
पित्तासारखा त्रास होणे व औषधाचा उपयोग न होणे.
ॲसिडिटी व अपचन या बरोबर भूक न लागणे वा भूक मंदावणे.
शौचाच्या वेळांमध्ये बदल होणे.
टेनेस्मस म्हणजे एकसारखी शौचाची भावना होणे.
वजन वेगाने व बऱ्याच प्रमाणात घटणे.
उलटीतून रक्त पडणे.

इकडे लक्ष द्या
जे खाल ते नियमित व व्यवस्थित खा. एकाच वेळी भरपूर जेवण घेऊ नका. साधारण तीन-चार तासांनी थोडे थोडे खात राहा. म्हणजे त्याचे पचन होणे सोपे जाईल.
बाहेरचे कच्चे म्हणजे न शिजवलेले, तसेच उघडे अन्नपदार्थ खाऊ नका. म्हणजे बाहेरचा उकळलेला चहा प्यायला हरकत नाही, पण बाहेरील लिंबू सरबत किंवा उसाचा रस पिऊ नका. या वयात प्रतिकारशक्ती मंदावलेली असल्यामुळे पोटामध्ये जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता असते.

अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी नियमितपणे चालणे, सोपे सोपे व्यायाम करणे, पोटाचे व्यायाम नियमित करणे, योगासने-प्राणायाम करणे आवश्‍यक आहे. (पोटातील गॅसेस कमी करण्यासाठी पवन मुक्तासन, बद्धकोष्ठतेसाठी ताडासन जरूर करावे. तसेच कपालभाती, प्राणायामही करावेत.)

जेवणात पालेभाज्या, कोशिंबिरी आवर्जून समाविष्ट करा. दिवसभरात दोन-तीन फळे खा. नाश्‍ता हलकाफुलका ठेवा. नाश्‍त्यात साळीच्या लाह्या घेणे उत्तम. गॅसेस निर्माण करणारे दूध व दुधाचे पदार्थ, डाळी, कडधान्ये, कोबी, मुळा, फ्लॉवर यांसारख्या भाज्या आहारात टाळा. 

तेलकट-तूपकट, तळलेले खूप चमचमीत मसालेदार पदार्थ टाळा. शीतपेय पूर्णतः टाळा. भराभरा जेवू नका. मुद्दाम हवा गिळून ढेकर काढू नका. जेवताना जास्त बडबड करू नका. त्यामुळे खूप हवा पोटात जाते. 

शौचाच्या सवयीतील बदल किंवा काही विशेष लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला शक्‍य तितक्‍या लवकर घ्या. 

पोटामध्ये गॅसेस कमी होण्यासाठी बडिशेप व पुदिनहरा खा.

म्हातारपणी सगळेच अवयव थकलेले असतात. कामे कमी झालेली असतात. एकाकीपण, औदासीन्य, निद्रानाश, मानसिक ताण या सर्व गोष्टींमुळेही खाल्लेले नीट पचत नाही. खाल्लेले अन्न घशाशी येत राहते व ॲसिडिटी होते. अगदी साधे वाटणारे दुखणे केव्हा गंभीर रूप धारण करील हे सांगता येणे कठीण. म्हणून प्रौढत्वी निज पोटासी जपणे हाच आपला बाणा असायला हवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com