वीर्यशक्‍ती हीच खरी शक्‍ती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Semen is real power Great warrior health benefit

‘महावीर विक्रम बजरंगी’ हे शब्द कानी पडले की मूर्तिमंत शौर्य व साहसाचे प्रतीक

वीर्यशक्‍ती हीच खरी शक्‍ती!

‘महावीर विक्रम बजरंगी’ हे शब्द कानी पडले की मूर्तिमंत शौर्य व साहसाचे प्रतीक असणारे हनुमंतराय डोळ्यांसमोर येतात. वीर बाजीप्रभू देशपांडे म्हटले की गनिमांशी तुफान युद्ध करणारा योद्धा डोळ्यांसमोर येतो.

वीरांगना झाशीची राणी म्हटले की स्वातंत्र्यासाठी जिवाची पर्वा न करता लढणाऱ्या लक्ष्मीबाईचे चित्र डोळ्यांसमोर येते. या व अशा अनेक वीर-वीरांगनांचे नुसते स्मरणही मनाची मरगळ दूर करणारे असले तर शरीरातील वीर्यधातू संपन्न असण्याचा कर्तृत्वासाठी, पुरुषार्थासाठी किती फायदा होत असेल?

‘वीर’ या शब्दावरूनच ‘वीर्य’ हा शब्द तयार झालेला आहे आणि जेथे वीर्य आहे तेथे शक्ती, शौर्य, सामर्थ्य, धडाडी हे सगळे भाव अगदी निश्र्चितपणे आहेत. संत तुलसीदासांनी हनुमानचालीसा या मारुतीरायांच्या स्तोत्रात म्हटले आहे, ‘भूतपिशाच निकट नहीं आवै, महावीर जब नाम सुणावै’ भविष्यकाळात काय होईल याची काळजी व भूतकाळात घडलेल्या चुकांची भीती म्हणजे भूत आणि पाठीमागून वार करणारे, ज्यांना सध्या आपण व्हायरस म्हणतो ती न दिसणारी पण रक्त शोषण करणारी ती सर्व पिशाच्च.

महावीर हनुमंतांचे नुसते नाव ऐकण्याने सुद्धा जर भूत-पिशाच जवळ फिरकत नाहीत असे तुलसीदास म्हणत असतील तर ज्याच्या शरीरात वीर्य आहे त्याचे तेज फाकल्यानंतर संकटे, पीडा, दुःख जवळपास फिरकणारही नाहीत हे समजणे अवघड नसावे. वीर्याचा प्रभावच हा होय.

अन्नातून आलेली शक्ती रस, रक्तादी सप्तधातूत परिवर्तित होत होत वीर्य या अवस्थेत येऊन पोचते व त्यातून बाहेर पडणाऱ्या स्फुल्लिंगावर सर्व शरीर चालते. हृदय हे ओजाचे मुख्य स्थान. हृदयात जी एक ठिणगी पडते, जो एक स्पार्क पडतो, त्याने हृदयाचे स्पंदन चालू असते व त्यातून ओजतत्त्व सुटे करून त्या ठिकाणाहून रक्तामार्फत सर्व शरीरभर पोचवले जाते.

त्या शक्तीवर सर्व इंद्रिये (बाह्य व आंतरेंद्रिये सुद्धा) कामे करतात. एखादी वस्तू सेवन केल्यावर त्याच्यात जर मुळातच शक्ती नसली तर वीर्यापर्यंत त्याचे परिवर्तन होण्याचा प्रश्र्नच नसतो. वीर्याचेच शक्तीत रूपांतर होत असल्याने एखाद्या गोष्टीत वीर्य किती आहे त्यावर त्या गोष्टीचे महत्त्व व त्याची किंमत अवलंबून असते.

म्हणूनच वीर्यशक्ती, ओजशक्ती ही प्राणिमात्रांतील सर्वांत महत्त्वाची शक्ती असते. मनुष्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर ज्याच्या जोरावर मनुष्य जीवनास आनंदाने तोंड देतो, जीवनाचा उपभोग घेऊ शकतो ती शक्ती म्हणजे वीर्यशक्ती होय, ओजशक्ती होय. वीर्यशक्ती वाढविण्यासाठी, ओजशक्ती टिकवण्यासाठी आयुर्वेदात ‘रसायन’ कल्पना मांडलेली आहे.

सर्वसामान्यांना आवडणारे, परवडणारे व माहीत असणारे साधे रसायन म्हणजे साजूक तूप व च्यवनप्राश. पण च्यवनप्राश बनवताना रसायन वर्गातील व खूप चांगले वीर्य असलेली औषधे घातलीच नाहीत वा कमी घातली, आवळाच घातला नाही किंवा आयुर्वेदाच्या पाठात सांगितलेला विधी सांभाळला नाही तर शेवटी बनलेल्या च्यवनप्राशचा उपयोग होणार नाही हे समजणे अवघड नाही.

कोणत्याही वस्तूतील शक्तीकडे काणाडोळा करून केवळ बाह्यस्वरूपाला महत्त्व दिले तर त्याचा उपयोग कसा होणार? प्रत्येक मनुष्य निर्जीव पैशांच्या पाठीमागे का? जी संपत्ती येथेच सोडून जायची आहे अशा संपत्तीच्या मागे का? संपत्ती वाचवण्यासाठी प्रत्येक वस्तू स्वस्तात मिळावी असा अट्टहास आपण धरतो ते बरोबर आहे का?

एखादी वस्तू स्वीकारत असताना, मग ते कपडे असो, कापड असो, झाडू असो, घराचा खांब असो, आहारातील काही गोष्टी असो, औषध असो त्यात वीर्यतत्त्व किती आहे हे बघणे आवश्‍यक आहे. असा विचार केला तरच अंतिमतः माणसाचा फायदा होऊ शकेल. वस्तूची किंमत आतील वीर्यावर ठरते.

म्हणून स्वस्त मिळणारी भेळ व महाग वाटणारा डिंकाचा लाडू ह्यातील वीर्य फरक लक्षात घेण्यासारखा आहे. वीर्याच्याही पुढे येते ते ओज. कारण रस, रक्त, वीर्य इत्यादीतून मोकळी झालेली कार्यशक्ती म्हणजे ‘ओज’! पण त्यासाठी मुळात वीर्यसंवर्धन अतिशय काळजीपूर्वक करायला लागेल.

सुखी जीवनाचा आधार कर्मयोग असला तरी त्यासाठी लागणारी कार्यशक्ती मिळते वीर्य-ओजाद्वारे ! लघवीतून जेव्हा धातू किंवा क्षार जातात, स्वप्नदोष आणि हस्तमैथुनातून किंवा अंगावरून पांढरे जाते तेव्हा यातून जास्त नुकसान होते ते वीर्यधातूचे.

म्हणून अगदी आजन्म ब्रह्मचारी असा अट्टहास जरी धरला नाही तरी वरील सर्व शारीरिक क्रिया अति प्रमाणात होणे हे निषिद्ध मानलेले आहे. स्वप्नदोष व अनैसर्गिक मुष्टिमैथुनासारखे प्रसंग याविषयी नेहमीच प्रश्र्न विचारले जातात.

शरीरात इतर सर्व कार्यासाठी, विशेषतः हृदय व मेंदू यांचे कार्य चालण्यासाठी भरपूर वीर्याची गरज असते. ही गरज पूर्ण करून जर वीर्य खर्च झाले तर नेहमीच्या शरीरकार्याला बाधा येणार नाही. एखाद्या टाकीत असलेले पाणी जर वरून वाहून जाऊ लागले तर त्याचा वापर केव्हाही चैनीसाठी वा मजा म्हणून करता येऊ शकेल, पण संपूर्ण टाकी रिकामी केली तर नेहमीच्या गरजा भागवता येणार नाहीत.

तेव्हा स्वप्नदोष वगैरे नैसर्गिक असले तरी त्याचा अतिरेक होऊन वीर्यधातू असंतुलित होणार नाही हे पाहणे इष्ट ठरेल. वीर्य नुसत्या शारीरिक व्यापारांसाठीच उपयोगी असते असे नव्हे तर या वीर्यधातूवरच मन काम करते, बुद्धीही याच शक्तीवर काम करते.

त्यामुळे निरोगी म्हणजे शांत मन हवे असल्यास वीर्यवृद्धी व्हावीच लागेल. भारतीय शास्त्रात आत्मा ही संकल्पना ज्याच्या माध्यमातून अनुभवास येते तो मेंदू व ब्रह्म हे शब्द समानार्थी वापरलेले आहेत (अहं ब्रह्माऽस्मि). मेंदूपर्यंत वीर्यरूपी शक्ती पोचावी हा उद्देश ठेवून जे आचरण केले जाते ते ‘ब्रह्मचर्य’.

म्हणून वीर्याचा ब्रह्मचर्याशी संबंध जोडला गेला आहे. अशा वीर्यधातूचा नाश होऊ नये यासाठी प्रचत्न केला तर भारतीय शास्त्रांमध्ये सांगितलेला धर्म-अर्थ-काम-मोक्षरूपी पुरुषार्थ सिद्ध करता येईल !

टॅग्स :doctorhealth