तीळ पचवा सूर्यप्रकाशात 

Sesame digested in the Sunlight
Sesame digested in the Sunlight

आपल्याला जो सूर्यप्रकाश दिसतो त्याहीपेक्षा वेगळ्या शक्‍तींची वेगवेगळी प्रक्षेपणे या वेळी सूर्यप्रकाशातून होत असतात. सूर्योदयाच्या वेळी आसमंतात असलेला प्रकाश, ज्याला उषःकाल असेही म्हटले जाते, तो खूप प्राणानुकूल असतो. सकाळच्या वेळचा सूर्यप्रकाशही लाभदायक असतो. दिवसातून साधारणपणे अर्धा तास सूर्यप्रकाशात बसावे. सूर्यप्रकाश मिळाला की आपल्या शरीरातच मोठ्या प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्व तयार होते. 
 

सध्या ‘व्हिटॅमिन डी’वर बऱ्याच प्रमाणात चर्चा होताना दिसते. आयुर्वेदात जरी ही संकल्पना या शब्दात सांगितलेली नसली तरी सध्याच्या आधुनिक वैद्यकात याची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली गेलेली आहे. शरीरात व्हिटॅमिन डी कशा प्रकारे कार्य करते, त्याचे शरीराला होणारे फायदे काय असतात यावर बरेच संशोधन झालेले आहे. सध्या अनेकांच्या शरीरात या व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी झालेले दिसते, कारण सध्या माणसांचे पोशाख, राहणीमान, घरे यांची योजना सूर्यप्रकाश आत येण्यास प्रतिबंध करणारी असते. मनुष्य जेथे दिवसातील आठ-दहा तास काम करतो त्या इमारती संपूर्ण वातानुकूलित असतात, त्या इमारतींना खिडक्‍याच नसतात, उलट एक्‍झॉस्ट बसविलेले असतात, जेणेकरून खोल्यांमधील दूषित हवा बाहेर जाऊ शकते, पण सूर्यप्रकाश काही मिळू शकत नाही. मनुष्याने दिवसातून साधारणपणे अर्धा तास सूर्यप्रकाशात बसावे ही कल्पना सध्या लुप्त झालेली दिसते. 
 

व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी साधे-सोपे उपाय कुठले याचा विचार करताना असे दिसते की, सकाळी दहा वाजण्यापूर्वीच्या सूर्यप्रकाशाचा अधिक फायदा होतो. आपल्याला जो सूर्यप्रकाश दिसतो त्याहीपेक्षा वेगळ्या शक्‍तींची वेगवेगळी प्रक्षेपणे या वेळी सूर्यप्रकाशातून होत असतात. सूर्योदयाच्या वेळी आसमंतात असलेला प्रकाश, ज्याला उषःकाल असेही म्हटले जाते, तो खूप प्राणानुकूल असतो. सकाळच्या वेळचा सूर्यप्रकाशही लाभदायक असतो. जसजसा सूर्य आकाशात वर येईल तसतशी सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढते आणि त्यातील उपयोगी रेडिएशन्स कमी होतात. अकरा-बारा वाजता सूर्यप्रकाश तीव्र झाला की मग त्याचा प्रकाश सरळ अंगावर घेणे उपयोगाचे नसते. मात्र त्या आधीच्या सूर्यप्रकाशात बसणे आपल्याला आवश्‍यक असते. सैलसर कपडे घालून सूर्यप्रकाशात बसावे किंवा शक्‍य तेवढा शरीराचा भाग उघडा ठेवून सूर्यप्रकाश घ्यावा, त्याचा अधिक फायदा होतो. 

डी व्हिटॅमिनच्या गोळ्या शरीरात सहजपणे शोषल्या जात नाहीत, त्यामुळे द्रवरूपातील व्हिटॅमिन डी घेणे, अंगावर व्हिटॅमिन डीचा स्प्रे मारून चोळणे वगैरे योजना केलेल्या दिसतात. असेही म्हटले जाते की या सर्व उपायांनी घेतलेले व्हिटॅमिन डी फार कमी प्रमाणात शरीरात शोषले जाते, त्यातला बराचसा भाग शरीराबाहेर फेकला जातो. म्हणजे चवलीची कोंबडी व पावलीची फाडणावळ अशा प्रकारचा हा हातबट्ट्याचा व्यवहार असतो. 
डी व्हिटॅमिन वाढविण्यासाठी काही गोळ्या वगैरे मिळत असतील, परंतु खरे पाहता डी व्हिटॅमिन हे शरीरच निर्माण करते. सूर्यप्रकाशामुळे ते जास्त प्रमाणात शरीरात तयार होते. दूध हा पदार्थ अमृतासारखा का समजला जातो तर त्यात असलेले कॅल्शियम आणि दूध तयार होत असताना गायीवर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे त्यात आलेल्या डी व्हिटॅमिनच्या गुणामुळे दूध शरीरात नुसते पचत नाही तर त्यातील कॅल्शियम शरीरात सात्म्य व्हायला मदत मिळते. शरीराचा मुख्य सांगाडा मजबूत असावा यासाठी दूध महत्त्वाचे असते. दुधानंतर लोण्याचे महत्त्व असते. आयुर्वेदात तुपाला तर अमृतापेक्षाही मौल्यवान स्थान दिलेले दिसते. खाण्या-पिण्यामध्ये डाळींचा समावेश असला तर त्यातून शरीराला काही प्रमाणात डी व्हिटॅमिन मिळत असेलही. सामिष आहार घेणाऱ्यांसाठी मासे डी व्हिटॅमिनची काही प्रमाणात पूर्ती करतात. परंतु खरे पाहता डी व्हिटॅमिनसाठी सूर्यप्रकाशाशिवाय पर्याय नाही. म्हणून सूर्यप्रकाश अंगावर घेतलाच पाहिजे. सर्व दारे-खिडक्‍या बंद करून कायम वातानुकूलित खोलीत विजेच्या दिव्यांच्या प्रकाशात राहण्यात अर्थ नाही. अधून मधून उघड्यावर येण्याची, सूर्यप्रकाश अंगावर घेण्याचीही गरज असते. 

तिळाचे खूप गुण आहेत, परंतु सूर्यप्रकाशाची जोड मिळाली तर तिळाचा खरा उपयोग होऊन हाडे मजबूत होण्यासाठी फायदा होऊ शकतो. हा जोडीचा उपयोग डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या तीन महिन्यांमध्ये विशेष प्रकारे घेतला जातो. भारतासारख्या प्रदेशात या तीन महिन्यांमध्ये थंडी असल्यामुळे सूर्यप्रकाशात जास्त वेळ बसले तरी त्वचा भाजणे वगैरे त्रास होण्याची शक्‍यता नसते. एका बाजूने सूर्यध्यान, सूर्यप्रकाश व दुसऱ्या बाजूने तिळगुळाचे सेवन करायला सुचविणारी ही भारतीय संस्कृती वैज्ञानिक पायावर कशी उभी आहे हे आपल्या लक्षात येऊ शकते. 

आपल्याला सर्वांना माहिती आहे की कॅल्शियम, लोह या गोष्टी बाहेरून शरीरात घेतल्या तर शरीरात उष्णता निर्माण होते. चुना असतो तो कॅल्शियमचा ढोबळ प्रकार म्हणावा असा असतो, चुनकळी पाण्यात टाकली की चक्क बुडबुडे येऊन पाणी गरम होते. तेव्हा पित्तकर प्रकृतीच्या व्यक्‍तींना, मूळव्याध, त्यातून रक्‍त पडणे वगैरे उष्णतेचे त्रास असणाऱ्यांना कॅल्शियम, लोह वगैरे घटक बाहेरून घेण्याने त्रास वाढू शकतो. अशा प्रकारची रासायनिक औषधे घेतली की बद्धकोष्ठता निश्चितपणे होते, परिणामतः कुंथावे लागल्याने त्रास वाढतो. हे सर्व त्रास होऊ नयेत या हेतूने आयुर्वेदाने निसर्गात मिळणाऱ्या कॅल्शियमची अन्नौषधे सुचविलेली असतात. 

तीळ-गूळ व सूर्यप्रकाश या जोडीचे उपयोग समजून घेऊन ते सुरू करण्यासाठी थंडीचा हा काळ चांगला आहे व त्याचा श्रीगणेशा या दिवसात करावा व पुढे ते वर्षभर चालू ठेवावेत आणि आयुष्य आनंदात जगावे. 
 

सोपा उपाय 
सर्वांना करता येण्यासारखा एक सोपा उपाय असा. एक ग्लासभर पाणी सूर्यप्रकाशात ठेवावे व सूर्यनमस्कार घालावे. सूर्यनमस्कारामुळे शरीराला चालना मिळते, पाठीचा कणा मागे-पुढे करणे वगैरे शरीराच्या हालचाली झाल्यामुळे शरीराच्या स्नायूंना व सांध्यांना गती मिळते. ही गती मिळाली की शरीरातील रस-रक्‍तादी धातू वाढतात व शक्‍ती वाढते. सूर्यनमस्कार करून झाल्यावर सूर्यप्रकाशात ठेवलेले पाणी सेवन करावे. सकाळच्या वेळी बाहेर चालायला जावे. त्यामुळेही सूर्यप्रकाश अंगावर पडायला मदत होते. सूर्यप्रकाश असला तर उत्तमच. प्रत्यक्ष सूर्यप्रकाश अंगावर पडला नाही तरी बाहेर जो काही प्रकाश असतो त्याचाही फायदा होतो. अन्नातून येणारे, औषधातून येणारे, डी व्हिटॅमिन शरीराने ओढून घेण्यासाठी याचा फायदा होतो. 

 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com