श्रीकृष्णाष्टमी

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 30 August 2019

श्रीकृष्णांच्या जीवनात पोहे, कदंब व मोरपीस यांना महत्त्व आहे. या तीनही गोष्टी आरोग्यदायी आहेत. श्रीकृष्णांची पूजा-अर्चा करण्याबरोबरीने त्यांनी आचरणात किंवा सहवासात ठेवलेल्या या गोष्टींचा स्वीकार केला तर आरोग्याचेही रक्षण होईल. 
 

श्रीकृष्णांच्या जीवनात पोहे, कदंब व मोरपीस यांना महत्त्व आहे. या तीनही गोष्टी आरोग्यदायी आहेत. श्रीकृष्णांची पूजा-अर्चा करण्याबरोबरीने त्यांनी आचरणात किंवा सहवासात ठेवलेल्या या गोष्टींचा स्वीकार केला तर आरोग्याचेही रक्षण होईल. 
 

श्रीकृष्णाष्टमी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीही सर्वांनी उत्साहाने साजरी केली. ज्या घरात पाळणा हलायला हवा असेल, त्यांनी तर कृष्णजन्माचा उत्सव अधिकच मनापासून साजरा केला असेल. श्रीकृष्णांचे जीवन हे संपूर्ण मानवजातीसाठी एक आदर्शस्वरूप आहे असे म्हणता येईल. त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला खूप काही शिकता येण्यासारखे आहे. उदा. श्रीकृष्णजयंतीच्या निमित्ताने त्यांच्या आवडीचा ‘गोपाळकाला’ खाल्ला जातो. पावसाळ्याच्या उत्तरार्धात आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही तो उत्कृष्ट असतो. पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या गोपाळकाल्याची कृती व त्यातील घटकद्रव्यांचे गुणधर्म याप्रमाणे, 
अर्धी वाटी पोहे घ्यावेत. दोन-तीन वेळा पाण्याने धुऊन निथळत ठेवावेत. पोहे तांदळापासून केले जातात. तांदूळ गरम पाण्यात भिजवून ठेवले जातात, दुसऱ्या दिवशी पुन्हा भाजून कुटले की त्यापासून पोहे तयार होतात. पोह्यांना संस्कृतमध्ये ‘पृथुक’ असे म्हटले जाते. 
पृथुका गुरवो वातनाशनाः श्‍लेष्मला अपि । 
...निघण्टु रत्नाकर 

पोहे पचायला जड असतात, वातनाशक व कफवर्धक असतात. 

पावसाळा हा वातदोष वाढण्याचा व पित्तदोष साठण्याचा काळ. त्यामुळे पावसाळ्याच्या उत्तरार्धात, जेव्हा अधून मधून ऊन पडते तेव्हा पचायला थोडे जड असले तरी पोहे अनुकूल असतात. 

अर्धी वाटी ज्वारीच्या लाह्या घ्याव्यात. यांच्यातील दमटपणा, ओशटपणा निघून जावा यासाठी या लाह्या कढईमध्ये मंद आचेवर भाजून घेतलेल्या असाव्यात. धान्य चांगले भाजून ते फुटले की त्याला लाह्या असे म्हणतात. 
लाजाः स्युर्मधुराः शीतो लघवो दीपनाश्च ते । 
स्वल्पमूत्रमला रूक्षा बल्याः पित्तकफाच्छिदः ।। 
...निघण्टु रत्नाकर 

लाह्या चवीला गोड, वीर्याने शीत, पचायला हलक्‍या, अग्निसंदीपन करणाऱ्या असतात, मल-मूत्र कमी प्रमाणात उत्पन्न करतात, ताकद देतात, गुणाने रुक्ष असतात आणि पित्तदोष तसेच कफदोष यांचा नाश करतात. 

आता अर्धी-पाऊण वाटी दही घ्यावे. हे दही शक्‍यतो गाईच्या दुधाचे व सात-आठ तासांसाठी नीट विरजलेले, पण चवीला फार आंबट नसावे. 
गवां दधि स्वादु बल्यं रुच्यं स्निग्धं च दीपनम्‌ । 
पुष्टिकृत्‌ मधुरं ग्राहि शीतं वातार्शसां प्रणुत्‌ ।। 
...निघण्टु रत्नाकर 

गाईचे दही चवीला गोड, रुचकर, स्निग्धता देणारे, शक्‍ती वाढविणारे व अग्नीचे संदीपन करणारे असते, मलप्रवृत्ती बांधून ठेवण्यास मदत करणारे असते आणि वातज मूळव्याधीवर औषधाप्रमाणे प्रशस्त असते. 

अशा प्रकारे थोडे पोहे पचायला जड असले तरी लाह्या व दही अग्नी प्रदीप्त करणारे असल्याने या तिन्ही गोष्टी एकमेकांना पूरक ठरतात. लाह्या रुक्ष असल्या तरी दह्यामधली स्निग्धता या रुक्षतेला आवाक्‍यात ठेवते. 

ही तिन्ही घटकद्रव्ये एकत्र करून त्यात एक चमचा साखर, अर्धा चमचा जिरे पूड, चवीपुरते सैंधव मिसळावे, नीट एकजीव मिश्रण तयार झाले की वरून कोथिंबीर घालावी. 

या गोपाळकाल्याला तिखट चव हवी असेल तर पळीमध्ये अर्धा चमचा तूप घेऊन त्यात थोडे जिरे, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि किसलेले आले टाकून वरून फोडणी देता येते. परंतु गोपाळकाला मुख्यत्वे लहान मुलांसाठी केला जात असल्याने तो फोडणीशिवाय केला जातो व रुचकर लागतो. 

कदंब 
श्रीकृष्णांच्या कथेमध्ये कदंब वृक्षाचा अनेकदा उल्लेख येतो. कदंबाची फुले लहानशा चेंडूसारखी, पण अतिशय सुंदर व सुगंधी असतात. आयुर्वेदातही कदंबाचे औषधी गुण दिलेले आढळतात. 
कदम्बः कटुकस्तिक्‍तो मधुरस्तुवरः पटुः । 
शुक्रवृद्धिकरः शीतो गुरुर्विष्टम्भकारकः ।। 
...निघण्टु रत्नाकर 

कदंब चवीला तिखट, कडू, मधुर, तुरट व खारट असा असतो. शुक्रधातूचे वर्धन करतो, वीर्याने शीत व पचण्यास जड असतो, मलावष्टंभ करणारा म्हणजे जुलाबात मलप्रवृत्ती बांधून ठेवण्यास मदत करणारा असतो. 

रुक्षः स्तन्यप्रदो ग्राहि वर्णकृत्‌ योनिदोषहा । 
रक्‍तरुक्‌ मूत्रकृच्छ्रं च वातं पित्तं कफं व्रणम्‌ ।। 
दाहं विषं नाशयति । 
...निघण्टु रत्नाकर 

कदंब गुणाने रुक्ष असतो, स्तन्यवर्धनास मदत करतो, वर्ण उजळवतो तसेच योनीचे दोष दूर करतो. रक्‍तदोषामुळे होत असलेली वेदना, लघवी होताना होणारा त्रास कदंबामुळे दूर होतो. वात, पित्त, कफ, व्रण, दाह व विष या सर्वांचा नाश करतो. 

औषधात कदंबाची पाने, साल व फळ मुख्यत्वे वापरले जाते. जखम भरून येत नसेल, जखमेत जंतुसंसर्ग वा पू वगैरे झाला असेल तर कदंबाच्या पानांच्या काढ्याने जखम धुण्याचा व त्यानंतर जखमेवर वावडिंग, कडुनिंब, कदंबाच्या सालीच्या वाळलेल्या तुकड्यांचा धूप घेण्याचा उपयोग होतो. 

डोळे आले असता कदंबाच्या सालीची बारीक चटणी करून त्याचा बंद डोळ्यांवर लेप करण्याचा उपयोग होतो. ओली साल उपलब्ध नसल्यास वाळलेली साल उगाळून तयार केलेला लेप लावला तरी चालतो. 

जुलाब होत असल्यास कदंबाच्या सालीचा काढा घेण्याचा उपयोग होतो. उलट्या होत असल्यास ताज्या सालीचा रस जिऱ्याची पूड व खडीसाखर मिसळून घेण्याचा उपयोग होतो. 

तोंड आल्यामुळे जीभ लाल झाली असेल, तिखट वा गरम स्पर्श सहन होत नसेल तर कदंबाच्या सालीचा काढा तोंडात गंडुषाप्रमाणे धरून ठेवण्याचा उपयोग होतो. 

बहुतेक सर्व त्वचारोगांमध्ये कदंबाची साल उपयुक्‍त असते. बाधित त्वचेवर कदंबाची साल उगाळून केलेला लेप लावण्याचा उपयोग होतो किंवा स्नानाच्या पाण्यात कदंबाच्या सालीचा काढा मिसळण्याचाही उपयोग होतो. 

कदंब वर्ण्य असल्याने उटण्यातही वापरता येतो. साल वाळवून तयार केलेल्या चूर्णात मसुराचे पीठ मिसळून स्नानाच्या वेळी उटणे वापरण्याने त्वचेची कांती सुधारते, दुर्गंध, खाज वगैरे त्रास बरे होतात. 

विषघ्न असा कदंब घराच्या आसपास लावण्याने आसपासची हवा शुद्ध होण्यास मदत मिळते. 

मोरपीस 
श्रीकृष्ण व मोरपीस यांचेही अतूट नाते आहे. कदंबाप्रमाणे मोरपीससुद्धा विष, दुष्ट शक्‍ती यांचा नाश करण्यात अग्रणी असते. म्हणून अन्नावर मोराची दृष्टी पडणे प्रशस्त मानले जाते, यामुळे अन्नातील विषार, दोष नाहीसे होतात असे समजले जाते. मोरपिसांच्या पंख्याने घेतलेला वारा सर्व दोषांना जिंकणारा असतो, असेही सांगितलेले दिसते. 
एते दोषजिता वाताः स्निग्धा हृद्याः सुपूजिताः । 
...निघण्टु रत्नाकर 

असा वारा स्निग्ध, हृदयासाठी हितकर व मन प्रसन्न करणारा असतो. 

पाल, वगैरे विषारी प्राणी, किडे घरात येऊ नयेत यासाठी घरात एखाद-दुसरे मोराचे पीस ठेवायची पद्धत आजही दिसते. 

अशा प्रकारे एकंदरच श्रीकृष्णांची पूजा-अर्चा करण्याबरोबरीने त्यांनी आचरणात किंवा सहवासात ठेवलेल्या गोष्टींचा स्वीकार केला तर आरोग्याचेही रक्षण होईल.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shreekrishnashtamee article write by Dr Shree Balaji Tambe