बुद्धी, धृती, स्मृती व आरोग्याचा अधिपती - श्री गणपती 

Shri Ganapati - Lord of Wisdom, Dhriti, Memory and Health
Shri Ganapati - Lord of Wisdom, Dhriti, Memory and Health

सर्व पत्री आरोग्यासाठी हितकर असतात. गणेशपूजेच्या निमित्ताने या वनस्पतींशी ओळख राहावी, त्या आपल्या आसपास लावल्या जाव्यात, ऐन वेळेस आरोग्यरक्षणासाठी वापरता याव्यात हा भारतीय संस्कृतीचा मूळ हेतू साध्य करणे आपल्याच हातात आहे. श्री गणेशाची प्रार्थना करून बुद्धीचे वरदान मिळेलच. पण त्यांची पूजा-अर्चा करताना, त्यांना दाखविलेला प्रसाद सेवन करतानाही अप्रत्यक्षरीत्या आरोग्याचा लाभ होईल, बुद्धी-स्मृती तल्लख राहतील हे नक्की. 
 

श्री गणेश म्हटले, की त्यांचे गजानन, लंबोदर, एकदंत असे रूप डोळ्यांसमोर येते. समोर ठेवलेले मोदकांचे तबक, मस्तकावर वाहिलेली दूर्वांची जुडी, पत्रींच्या तसेच काही विशिष्ट फुलांच्या सहाय्याने केलेली पूजा याचीही आठवण येते. निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा हा गणेशोत्सव आज फक्‍त महाराष्ट्रातच नाही, तर भारतात तसेच जगभरात अनेक ठिकाणी उत्साहाने साजरा केला जातो. बुद्धीची देवता म्हणजे श्री गणेश हे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो. बुद्धी म्हणजे काय योग्य, काय अयोग्य हे समजायची शक्‍ती; धृती म्हणजे अयोग्य गोष्टींपासून मन व इंद्रियांना दूर ठेवण्याची शक्‍ती आणि स्मृती म्हणजे स्मरणशक्‍ती. यश, समृद्धी, प्रतिष्ठा, नावलौकिक तसेच आरोग्यसुद्धा या तीन शक्‍तींवर, यालाच प्रज्ञा असेही म्हटले जाते. श्री गणेशोत्सव साजरा करताना याची पायाबांधणी होत असते. 
 

गणेशस्थापना होते त्या दिवशी तसेच नंतरही जितके दिवस श्री गणेश घरी असतात, तितके दिवस रोज त्यांना नैवेद्य दाखवला जातो व प्रसाद म्हणून घरातील सर्वांना, मित्रमंडळींना वाटला जातो. यात उकडीचे मोदक अग्रस्थानी असतात. पाठोपाठ खोबऱ्याचे लाडू किंवा वड्या, करंजी, तांदळाची खीर, पातोळी यासारखे पदार्थ करण्याची परंपरा असते. या सर्वांमधली घटकद्रव्ये पाहिली तर त्यात नारळ, गूळ किंवा साखर, तांदूळ, वेलची वगैरेंचा समावेश असताे. गणपती बसतात तो भाद्रपद महिना म्हणजे ऐन पावसाळ्याचे दिवस. पावसाळ्यात शरीरातील वातदोष प्रकुपित झालेला असतो, तसेच पचनशक्‍ती मंदावलेली असते. बरोबरीने पित्तदोष शरीरात साठायला सुरवात झालेली असते. अशा वेळी खवा, बासुंदी, श्रीखंड किंवा तळून केलेले गोड पदार्थ, गव्हापासून तयार केलेली मिष्टान्ने पचणे अवघड ठरू शकते. म्हणून श्री गणेशाला वात-पित्तशामक, पचण्यास सोपी, तळण्याऐवजी वाफवून तयार केलेली पक्वान्ने नैवेद्य म्हणून दाखवायची प्रथा आहे. 
 

नारळाचे फळ चवीला गोड असते, गुणांनी स्निग्ध व गुरू असते, तसेच शीत वीर्याचे असते, पित्तदोषाचे शमन करते, ताकद वाढवते, मांसधातूचे पोषण करते, हृदयाला हितकर असते व मूत्राशयाची शुद्धी करते. याखेरीज स्निग्ध गुणाचे असल्याने नारळ वातदोषाचे शमन करतो व प्राकृत कफाचे पोषण करते. या सर्व गुणांमुळे नारळ वर्षाऋतूत आरोग्यदायी असतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नारळाची रचना राहिली तर ती मनुष्याच्या मस्तकाशी मिळती-जुुळती असते. म्हणजे नारळावर सर्वांत बाहेर शेंडी व धागे असतात ते केसांशी, करवंटीचा टणक भाग कवटीशी, आतले खोबरे व पाणी हे मेंदू व मेंदूजलाशी साधर्म्य दाखविणारे असते. आणि म्हणूनच ओले खोबरे, विशेषतः ओल्या खोबऱ्यातून काढलेले ताजे खोबरेल तेल हे मेंदूला पूरक असते. आधुनिक संशोधनानुसारही स्मृतिनाशासारख्या दुर्धर विकारात रोज खोबरेल तेल घेण्याचा उपयोग होतो, असे दिसून आलेले आहे. मधुर रस हा सातही धातूंचे पोषण करणारा, विशेषतः मज्जा, शुक्र, ओज यांच्यासाठी उत्तम सांगितलेला आहे. बुद्धी, स्मृती, कार्यक्षम राहण्यासाठी हीच तत्त्वे जबाबदार असतात. त्यामुळे प्रसाद म्हणून दिल्या-घेतल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी सहसा गोड असतात. श्री गणेशासाठी नैवेद्य तयार करताना वापरली जाणारी तांदूळ, गूळ किंवा साखर ही सर्व द्रव्ये मधुर रसयुक्‍त असतात. 
 

तांदूळ चवीला गोड, गुणाने स्निग्ध व वीर्याने थंड असतात, बल वाढविण्यास मदत करतात, स्वरासाठी हितकर असतात. शुक्रधातूला वाढवितात, इतर धातूंचेही पोषण करतात, पित्तशमन करतात, पचण्यास सोपे असतात. गूळ चवीला गोड, रुचकर, स्निग्ध, पचायला हलका असतो, अग्निदीपन करतो, हृदयासाठी हितकर असतो, त्रिदोषांचे शमन करतो, संताप दूर करून मन शांत करतो, पांडू, रक्‍ताल्पता, प्रमेह वगैरे व्याधींमध्ये पथ्यकर असतो. गुळाऐवजी साखर वापरली तरी चालते, चांगल्या प्रतीची साखर स्निग्ध असते, थंड असते, वात-पित्तशामक असते, साखरेमुळे ताकद वाढते, शुक्रधातूचे पोषण होते. 
 

श्री गणपतीला दूर्वा प्रिय असतात. दूर्वा मस्तकातील उष्णता कमी करण्यासाठी उत्तम असतात. ताप चढला असता मेंदूचे नुकसान होऊ नये यासाठी दूर्वांच्या रसाचे दोन-तीन थेंब नस्याप्रमाणे नाकात टाकण्याची पद्धत असते. सध्या संगणक, मोबाईल, टीव्हीच्या सतत वापराने डोळ्यांची आग होत असेल, डोळे कोरडे पडत असतील, अकारण चिडचिड होत असेल, चक्कर वगैरे येत असेल तरी दूर्वांच्या रसाचे नस्य उपयुक्‍त असते. दूर्वा थंड असतात, रक्‍तदोष दूर करतात, भूतबाधा म्हणजे अदृश्‍य जीवजंतूंना दूर ठेवतात. उष्णतेमुळे नाकातून रक्‍त येते, त्यासाठी दूर्वांचा रस नाकात घालण्याचा उपयोग होतो. दूर्वा स्वच्छ धुवून त्यांचा रस खडीसाखरेसह घेतल्यास पित्त कमी होते, रक्‍त शुद्ध होते, अनेक त्वचाविकार, नागीण वगैरे त्रास दूर होऊ शकतात. उष्णतेमुळे उलट्या होत असल्यास, पित्त पडत असेल तर तांदळाच्या धुवणात दूर्वा वाटून त्याचा काढलेला रस आणि खडीसाखर हे मिश्रण घेण्याचा फायदा होतो. दूर्वांच्या नुसत्या संपर्कात राहण्याने, दूर्वा हाताळल्यानेसुद्धा आरोग्यावर उत्तम परिणाम होत असतात. म्हणूनच आयुर्वेदात गर्भधारणा व्हावी व गर्भधारणेनंतर गर्भरक्षण व्हावे म्हणून स्त्रीच्या व गर्भवतीच्या आसपास ज्या वनस्पती असाव्यात म्हणून सांगितल्या आहेत, त्यात दूर्वांचा उल्लेख आहे. 
गौरी, गणपतीची पूजा करताना पत्री वापरण्याची पद्धत असते. प्रत्येक पत्रीमध्ये काही ना काही औषधी गुणधर्म असतात. यापैकी मेंदू, बुद्धी, स्मृती यांच्यासाठी उपयुक्‍त पत्री पुढीलप्रमाणे होत, 

 

पिंपळाची पाने - पिंपळाच्या योगे हवा शुद्ध होते असे समजले जाते. पिंपळाची पिकलेली फळे खाण्याने लहान मुलांची वाचा शुद्ध होते. रविवारी पिंपळाच्या पानावर गरम भात वाढून लहान मुलांना जेवू घालण्याने जड जीभ सुधारते व न समजणाऱ्या मुलांनाही उमजू लागते असे वृद्धवैद्याधार आहे. 
 

ब्राह्मी - ब्राह्मी मेंदूसाठी उत्तम असते. तसेच शांत झोप लागण्यासाठी, मनावरचा ताण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. ताज्या ब्राह्मीचा रस तीन महिन्यांसाठी रोज घेतला तर बुद्धी तरतरीत होते, स्मृती वाढते. ज्या लहान मुलांना आकडी येण्याचा त्रास असतो, त्यांच्यासाठी ब्राह्मीच्या रसात वेखंड उगाळून चाटवण्याचा उपयोग होतो. ब्राह्मीचा रस व मेंदूला पोषक असणाऱ्या इतर द्रव्यांनी संस्कारित ब्रह्मलीन घृतासारखे औषधी तूप हे सर्व प्रकारच्या मेंदूच्या व मानसिक विकारांवर उत्तम गुण देताना दिसते. 
 

या व्यतिरिक्‍त इतर सर्व पत्री आरोग्यासाठी हितकर असतात. गणेशपूजेच्या निमित्ताने या वनस्पतींशी ओळख राहावी, त्या आपल्या आसपास लावल्या जाव्यात, ऐन वेळेस आरोग्यरक्षणासाठी वापरता याव्यात हा भारतीय संस्कृतीचा मूळ हेतू साध्य करणे आपल्याच हातात आहे. श्री गणेशाची प्रार्थना करून बुद्धीचे वरदान मिळेलच. पण त्यांची पूजा-अर्चा करताना, त्यांना दाखविलेला प्रसाद सेवन करतानाही अप्रत्यक्षरीत्या आरोग्याचा लाभ होईल, बुद्धी-स्मृती तल्लख राहतील हे नक्की. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com