दुखणी बदलत्या जीवनशैलीची

डॉ. अपर्णा पित्रे
Friday, 6 July 2018

बदलत्या काळाला, बदलत्या जीवनशैलीला लवचिक मानेने, ताठ नव्हे, पण लवचिक कण्याने आणि लवचिक मनानेही आपलेसे करा. अन्यथा कण्याची, मानेची, पाठीची दुखणी ओढवून घ्याल.

पाठीचा कणा जेव्हा त्याच्या वक्रतेत चुकीची भर पडेल अशा स्थितीत तास-न्‌-तास ठेवला जातो. तेव्हा तिथून निघणाऱ्या व स्नायूपर्यंत पोचणाऱ्या मज्जातंतूंवर चुकीचा भार येत राहतो. वर्षानुवर्षे बसण्याच्या अशा चुकीच्या पद्धतीमुळे स्नायूपेशींवर अयोग्य ताण आणि मग मानेत, पाठीत कमरेत वेदना आणि सायटिका अशा गोष्टींना सुरवात होते. संशोधनात दिसून आले आहे की मान, खांदे, हात यांची दुखणी वाढण्याचे प्रमाण अलीकडे बरेच आहे. पळण्याच्या अयोग्य पद्धतीमुळे गुडघे आणि पाय यांचीही दुखणी कमी नाहीत.

मानवी पाठीचा कणा तेहतीस मणक्‍यांनी बनलेला आहे. प्रत्येक दोन मणक्‍यांमध्ये कुर्चा नावाची गादी असते. जिच्यामध्ये हादरे आणि धक्के सहन करण्याची क्षमता असते. या चकतीमुळे मणके एकमेकांना चिकटलेले असतात व या सांध्यांवरच मज्जातंतू गुंडाळलेले असतात. बसण्याच्या किंवा उभे राहण्याच्या सततच्या व अयोग्य स्थितीमुळे त्या मणक्‍यांना सूज येऊन पाठीत किंवा मानेत दुखायला लागते. कुर्चा घासली गेली की तेथून निघणाऱ्या मज्जातंतूंवर ताण पडतो व सूज येऊ लागते. सततची सूज येऊन कुर्चा झिजली जाते व मणके एकमेकांना चिकटतात.

कॉम्प्युटरवर सतत बैठे काम करणाऱ्या लोकांमध्ये शरीराचा पुढचा भाग अनेक वेळा बऱ्याच काळासाठी नकळत पुढे झुकलेल्या अवस्थेत राहतो. त्यामुळे पाठीच्या कण्याच्या आकारात विकृती निर्माण होऊन मणक्‍यांना सूज येऊ शकते.

पुढे झुकलेले खांदे, पाठीत कुबड काढून बसणे, मान व डोके पुढे काढून चालणे, यामुळे पाठीच्या व मानेच्या मणक्‍यांवर अगदी चुकीचा ताण येतो व दुखण्याची सुरवात होते. पोट पुढे काढून चालणे व बसणे, कंबरेत वाकडे होऊन बसणे, खुर्चीवर बसलेल्या स्थितीत गुडघे आतील बाजूला वाकवणे यामुळे कंबरेवर व त्या भागातील मज्जातंतूंवर ताण येऊन सायटिकासारखी दुखणी निर्माण होतात आणि कमरेपासून टाचेपर्यंत वेदना सरकत जाते.

ही सर्व दुखणी आणि वेदना टाळणे केवळ आपल्याच हातात आहे. आधुनिक युगाच्या काम करण्याच्या पद्धती, आयुष्याकडे पाहण्याचा भौतिकवादी दृष्टिकोन ही आजच्या काळातली वस्तुस्थिती आहे. तिच्यावर टीका करण्यापेक्षा या काळाला सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे कसे जाता येईल, या प्रगतीचा योग्य उपयोग कसा करून घेता येईल आणि त्याचवेळी ज्या आरोग्याच्या साहाय्याने आपण ही भौतिकता उपभोगणार आहोत त्या आरोग्याचे रक्षण कसे करता येईल हा मेळ आपल्याला घालता आला पाहिजे.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून असे तासन्‌ तास बैठे काम करणाऱ्या लोकांनी जास्तीत जास्त योग्य स्थिती ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आदर्श स्थितीत डोके, खांदे, पाठीचा कणा, कंबर, गुडघे व घोटे एका सरळ रेषेत राहिले पाहिजेत, अशी स्थिती उभे राहताना योग्य स्थिती समजली जाते. बसताना कंबरेशी (बैठकीशी) वरील शरीराचा नव्वद अंशाचा कोन होईल, अशी स्थिती उत्तम असते. थोडक्‍यात आपल्या शरीराच्या स्थितीचे भान प्रत्येक क्षणी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

आपल्या भारतीय परंपरेकडून आपल्याला मिळालेला सूर्यनमस्कारांचा वारसा खरोखरच अमूल्य आहे. सूर्यनमस्कारांच्या स्थितीचा हा क्रम इतक्‍या अद्‌भुत तऱ्हेने रचला आहे की त्यात पाठीसाठी व मानेसाठी लागणाऱ्या सर्व महत्त्वाच्या आसनांचा समावेश आहे. प्रत्येक व्यक्तीने रोज १२ ते १५ सूर्यनमस्कार शरीरातील कोणत्याही स्नायूंवर अनावश्‍यक ताण न देता घालायचे ठरले, लहानथोरांनी सकाळी उठल्यावर १२ ते १५ सूर्यनमस्कार पूर्ण केल्याशिवाय घराबाहेर पडायचेच नाही, असा नियम केला तर मला वाटते- हाडांच्या आणि स्नायूंच्या दुखण्यापासून प्रत्येक जण पूर्णतः मुक्त राहील. या व्यायामामुळे स्नायूंची व स्नायूबंधांची लवचिकता व शक्ती वाढते. नव्या पिढीने रोजचे सूर्यनमस्कार अंगवळणी पाडले तर शरीराला तर वळण येईलच, पण येणाऱ्या आधुनिकतेच्या विपरीत परिणामांची भीती बाळगण्याऐवजी त्याचे फायदे जास्त उपभोगता येतील. हे सगळे दुष्परिणाम टाळण्यासाठी! पण जे बदल, परिणाम झालेलेच आहेत त्यांच्यासाठी काय? हा पुढचा प्रश्‍न! मानदुखी, पाठदुखी ही त्या व्यक्तीसंदर्भातल्या कोणत्या स्थिती आणि परिस्थितीमुळे होते याचा सर्वांगीण विचार करणारी होमिओपॅथी याला समर्पक उत्तर आहे. होमिओपॅथीत मनुष्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती यांचा मेळ घातल्यांनंतरच औषध निवडले जाते. त्यामुळे ही औषधे हाडांची आणि स्नायूंची नुसती वेदना शमवत नाहीत तर आधीच्या दुष्परिणामामुळे आलेली सूज कमी करून सूज येण्याची प्रवृत्ती कमी करतात.

या प्रकारची दुखणी एका रात्रीत निर्माण होत नाहीत तर आपल्या अनेक वर्षांच्या असावधानतेमुळे, निष्काळजीपणामुळे सावकाश निर्माण होत राहतात आणि एखाद्या दिवशी असे रूप धारण करतात की आपल्याला औषधाची मदत घ्यावी लागते. काही वेळा तर हाडांमध्ये आणि स्नायूंमध्ये असे कायमचे बदल होतात किंवा खराबी होते की शस्त्रक्रिया अपरिहार्य ठरू शकते.

तात्पर्य! बदलत्या काळाला, बदलत्या जीवनशैलीला लवचिक मानेने, ताठ नव्हे, पण लवचिक कण्याने आणि लवचिक मनानेही आपलेसे करा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sickness changing lifestyle