#FamilyDoctor मद्यपानाचे दुष्परिणाम 

#FamilyDoctor मद्यपानाचे दुष्परिणाम 

मद्यपानाबद्दल खरी माहिती प्रामाणिकपणे रुग्ण क्वचितच सांगतात. ‘मी दारू रोज पितो’, असे स्पष्टपणे सांगणारे थोडेच. ‘मी एखाद्यावेळी थोडे ड्रिंक घेतो’, असे फार तर एखादा मद्यपी म्हणतो. रुग्णाला तपासून व त्याच्या आहाराची माहिती नीट ऐकून मद्यपानाबद्दल योग्य प्रश्‍न विचारत माहिती मिळवावी लागते. मद्यपानाचे दुष्परिणाम साधारणपणे तीन प्रकारात शोधावे लागतात. हे तीन प्रकार म्हणजे १) शारीरिक  २) मानसिक आणि ३) सामाजिक अपाय हे होत.

वारंवार पडणे, फिट्‌स (फेफरे) येणे, डोक्‍याला इजा होणे, रक्ताची उलटी होणे, वारंवार कावीळ होणे, अशा तक्रारी शारीरिक दुष्परिणामात मोडतात. मानसिक अपायाचे लक्षण भीती वाटत राहणे किंवा भीतीचे झटके येणे, विस्मृतीमुळे स्थळ - काल यांच्या जाणिवेत गोंधळ होणे, परिचयाच्या किंवा आपल्या कुटुंबीयातील घटकांना ओळखताना चुका करणे, स्वतःला बुद्धिपुरस्सर इजा करून घेण्याची प्रवृत्ती असणे, अशा प्रकारच्या घटना होत राहणे या मानसिक अपायाच्या लक्षणात मोडतात. तिसऱ्या प्रकारच्या दुर्घटना म्हणजे कौटुंबिक अथवा सामाजिक दुष्परिणाम होत राहणे. यात वाहन चालवताना वारंवार अपघात होणे, कौटुंबिक घटकांना मारहाण करणे, हे वारंवार घडू लागणे किंवा शेजारी आणि चांगल्या ओळखीच्या माणसांशी वारंवार भांडण-तंटा होत राहणे, हे सामाजिक अपप्रवृत्तीत मोडतात.

शारीरिक कारणाने हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी निदान वीस टक्के रुग्ण अतिरेकी मद्यपानाचे बळी असू शकतात. दुर्दैवाने यातल्या फारच थोड्या बाबतीत मद्यपानाची माहिती काढण्याचा प्रयत्न केला जातो. आजार शारीरिक असला तरी मद्यपानाचा संबंध शोधावा लागतो. अशी व्यक्ती किती प्रमाणात दारू पिते २) पूर्वीच्या इतिहासात मद्यपानामुळे किती वेळा आणि कोणत्या प्रकाराचा त्रास झाला होता, याची नोंद केली गेली पाहिजे, आणि ३) संबंधित व्यक्तीला दारू पिण्याचे व्यसन लागले आहे का, याचा अंदाज केला पाहिजे (असे व्यसन सुटणे कठीण असते) संबंधित मद्यपी व्यक्ती प्रत्येक वेळा खोटे सांगेल असेच नसते. दारू किती एकक (units) घेतली जाते, हे शोधून काढणे अशक्‍य नसते.४३ टक्के इथाईल अल्कोहॉल असणारा वाइनचा (लहान ग्लास) अथवा तीन टक्के इथाईल अल्कोहोल असणाऱ्या बीअरची २७० एमएल (अर्धा पाइंट) या प्रमाणाला मद्यपानाचा एक पॉइंट गणला जातो. एखाद्या पुरुषाने दर आठवड्याला २८ पॉइंट अथवा एखाद्या स्त्रीने २२ पॉइंट दारूचे सेवन केल्यास कालांतराने निश्‍चित अपाय होईल. इंग्लंडमध्ये केलेल्या पाहणीत पौगंडावस्थेतील व्यक्ती व प्रौढ व्यक्तीसुद्धा ही मर्यादा ओलांडतात. भारतात स्थिती वेगवेगळ्या प्रांतात वेगळी आहे; परंतु सरासरीत फारसा फरक नाही.

कधीतरी एखादा युनिट (एकक) दारूचे सेवन करणे आणि दारूचे व्यसन लागणे यात फरक आहे. व्यसन लागणाऱ्या व्यक्तीमध्ये पुढील गोष्टी आढळतात. एकदा व्यसन लागले की दुष्परिणाम व्हावयास फार वेळ लागत नाही. माणसाला दारूचे व्यसन लागले आहे, हे पुढील मुद्यावरून ओळखता येते.

मद्यपानाचे व्यसन लागले तर पुढील गोष्टी व्यक्तीमध्ये दिसतात.

१) कोणत्याही कारणाने दारू पिणे एकाएकी बंद झाले तर दारू न मिळण्यामुळे काही लक्षणे दिसू लागतात. अशी घटना मद्यपी व्यक्ती अपघातात झालेल्या इजेमुळे हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत दाखल झाल्यावर आढळते. अशी स्थिती अपघात होत असताना व्यक्ती (एकटी) गाडी चालवत असली तर होते. वाहनात दुसरे कोणी व्यक्तीच्या मद्यपानाची माहिती देणारे असेल तर ठीक. अन्यथा निदान करण्यात अडथळा येऊ शकतो. दारू अचानक सोडल्यामुळे पुढील लक्षणे दिसू लागतात. १) हाता-पायाच्या बोटांना कंप सुटतो, २) सर्व अंगावर घाम सुटत आहे हे डॉक्‍टरांच्या लक्षात सहज येते. ३) उमासे (उलटी होण्याची क्रिया) येऊ लागतात, ४) व्यक्तीला कशाची तरी चिंता वाटत राहते.

२. या मद्याच्या अकस्मात अभावाने झालेल्या तक्रारी थोड्या प्रमाणात मद्य दिल्यास लगेच थांबतात.

३. आता काही प्रमाणात दारू घेत असणारी व्यक्ती यानंतर मोठ्या प्रमाणात दारू घेऊ लागते.

४. सकाळी झोपेतून जागे झाल्यावर दारू घेण्याची इच्छा प्रबळ होते. आता थोड्या प्रमाणात पण नेहमीची दारू घेतली तरी कंप लगेच थांबतो.

सतत दारू घेणाऱ्या व्यक्तीच्या आतड्याच्या अस्तराचा दाह होऊ लगतो. त्यामुळे आतड्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होणे संभवते. जठराच्या जखमा (Gastric) होतात. दीर्घकाळ मद्यपानामुळे लिव्हर (यकृत) चा सिरॉयसिस हा बरा न होण्याचा आजार जडणे शक्‍य असते.

या सिरॉयसिसमुळे पोटात पाणी होते (जलोदर). याचा एकच प्रभावी उपचार आहे तो म्हणजे यकृताचे प्रत्यारोपण करणे. याचा सध्या खर्च साधारण ४० ते ४५ लाख रुपये इतका असतो. केवळ औषधे व पथ्य पाळून थोडे दिवस बरे वाटते; परंतु योग्य व्यक्तीचे यकृत रुग्णाच्या यकृताच्या जागी बसवतात. देणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात यकृत पुन्हा वाढू शकते. आता हळूहळू अधिकाधिक माणसाना या शस्त्रक्रियेचा फायदा मिळू लागला आहे व खर्चही आटोक्‍यात येऊ लागला आहे.

दीर्घकाळ मद्यपानामुळे एपिलेप्टिक फिट्‌स येऊ शकतात. त्या येऊ नये म्हणून मद्य बंद करणे व फेफरे ताब्यात ठेवण्याची औषधे किमान पाच वर्षे घ्यावी लागतात. या फेफरामुळे मेंदूवर विपरीत परिणाम होतो व स्मृतिभ्रंश होतो. हा स्मृतिभ्रंश कायमचा राहू शकतो. इथाईल अल्कोहोलचा दुष्परिणाम चेतासंस्थेवर ठिकठिकाणी कायम स्वरूपाचा होतो. हाता-पायाच्या चेता-शिरांचे काम होत नाहीत व हाता-पायाची शक्ती जाते व ठिकठिकाणी वेदना येऊ लागतात. बी १२ जीवनसत्व देण्याचा प्रघात आहे, पण त्याचा फारसा उपयोग होत नाही. स्मृतीत होणाऱ्या अपायामुळे व्हर्निकेत एक कॅफॅलॉपथी नावाचा विकार जडतो व आजारात विस्मृतीबरोबर रचलेली गोष्ट सांगतिली जाते. पायाच्या चेता शिरा काम करत नाहीत त्यामुळे उभे राहणे किंवा चालणे शक्‍य होत नाही; पण अशी व्यक्ती मधूनच ‘मी चालत गेलो’, अशी थाप मारते. या थापा मारण्याच्या दोषाला कॉन्फ्यॅब्युलेशन म्हणतात. या दोषामुळे ही माणसे लंब्या-चौड्या थापा मारतात. स्वतः अशक्‍य गोष्टी केल्या असे सांगतात.

मद्यपानामुळे हाडे ठिसूळ होतात व फिट येऊन पडल्याने ती सहज मोडतात. शिवाय शरीरातील अनेक ग्रंथीवर मद्याचा परिणाम होतो.

यकृतावर परिणाम झाल्याचे आधी लिहिले आहेच. पुरुषत्वाला जबाबदार असणारे हॉर्मोन्स टेस्टास्टेरॉन निर्माण करणारी टेस्टईन ही ग्रंथी हळूहळू कार्य करेनासी होते. परिणामी पुरुषत्व खालावते, संभोगाला आवश्‍यक, संभोगाला आवश्‍यक तो ताठरपणा शिश्‍नात येत नाही. त्यामुळे नपुंसकत्व ओढावते.

अशा अनेक प्रकारे शरीरावर अपाय होत असतानादेखील परिणाम होत असतो. व्यक्ती चिंतातुर होते. काहींना भीतीचे झटके येतील. गर्दीमध्ये जाण्याची, एकटे राहण्याची कमीतकमी भीती वाटते. त्यामुळे बंद खोलीत एकट्याने जाववत नाही. काहींना विमानात बसणे अशक्‍य होते. डिलीशियन्स ट्रेगन्स नावाचा भीतीचा झटका येतो. या झटक्‍यात आपल्या गादीवर किडे व प्राणी फिरताना दिसतात व कमालीची भीती वाटत राहते. वेगवेगळे भास होतात. त्यात काहींना आपल्या वेगवेगळ्या क्षमता खूप वाढल्या आहेत, असेही वाटू लागते. 

सामाजिक अपायात अकारण अनावश्‍यक खर्च करण्याची प्रवृत्ती बळावते त्यामुळे माणसे कर्जबाजारी होतात. कामावरून काढून टाकले जाते. कारण कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊन काम होत नाही. दुकानातून पैसे न देताच वस्तू उचलून नेल्या जातात. 

असे काही शोधून काढून त्याच्यामागे मद्यपान आहे का, याचा शोध घरातील नातेवाइकाकडून काढणे आवश्‍यक असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com