स्लीप एप्निया 

Sleep Apnea
Sleep Apnea

झोपेत असताना श्वसनमार्ग आकुंचित झाल्याने अडथळा आणणारा निद्रानाश (ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्निया) उद्भवतो. श्वसनमार्गातील अडथळ्यांमुळे मनुष्य तोंडाने श्वास घेऊ लागतो. त्यामुळे तो घोरतो. या प्रयत्नात कधी कधी श्वास रुंदतो व जीव घुसमटतो. साहजिकच रात्रीची झोप अशांत होते. 
 
अडथळा आणणारा निद्रानाश (ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया) हा साधारणतः सहज आढळणारा असा आजार आहे. पण बऱ्‍याच वेळा मध्यमवयीन स्त्री-पुरुषांत या स्थितीचे निदान होत नाही. झोपेत जेव्हा आपण आराम करतो तेव्हा स्नायू शिथिल झाल्यामुळे झोपेत वरचा श्वसनमार्ग आकुंचित होतो. कधी कधी काही वैद्यकीय स्थितीमुळे, स्थूलतेमुळे हे श्वसनमार्गाचे आकुंचन होणे बळावते. असे घडले की त्याचा परिणाम म्हणून अडथळा आणणारा निद्रानाश उद्भवतो. 

श्वसनमार्गाचे आकुंचन का? 
- वरच्या श्वसनमार्गाजवळील उतकांवर चरबी जमा झाली, किंवा मानेजवळील वाढलेल्या चरबीवर बाहेरून दबाव आला तर श्वसनमार्गाचे आकुंचन होते. 
- टॉन्सिल्स वाढणे 
- जबड्याची जडन किंवा विचित्र ठेवण 
- इतर वैद्यकीय स्थिती उदा. स्ट्रोक, चेता आणि स्नायूंचे रोग 
- उपशामक औषधे किंवा मद्याचे अतिरिक्त सेवन 
- वाढते वय 
- श्वसनमार्ग संपूर्णपणे कोसळू शकतो. अशावेळी श्वसनमार्ग पूर्णतः बंद होतो व त्यामार्गे श्वास घेता येत नाही, याला अॅप्निया म्हणतात. ते झोपेत उद्भवलेल्या अवरोधामुळे होते म्हणून त्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया म्हणतात. 

 

या विकाराने पीडित असलेली व्यक्ती जेव्हा झोपते तेव्हा वरच्या श्वसनमार्गातील स्नायूंचा ताण सैलावतो व त्यामुळे मार्ग संकुचित होतो. असे झाल्याने गाढ झोपेतून क्षणिक जाग येते किंवा झोप चाळवते. त्यानंतर पीडित अधिक गाढ झोपेत जातो. हे चक्र पुन्हा पुन्हा चालू राहते. कित्येकदा आख्खी रात्र हे असेच चालते. ज्यामुळे झोप अशांत होते व चांगली झोप लागत नाही. यामुळे दिवसा अतिरिक्त झोप येणे, चित्त एकाग्र न होणे आणि सतर्कता कमी होणे अशी लक्षणे दिवसा दिसू लागतात. तसेच या आजाराने पीडित रुग्णांमध्ये अपघातांचे प्रमाण सुमारे बारा पटीने वाढल्याचे दिसते. गाडी चालवत असताना क्षणिक झोप आल्याने महामार्गांवर सुमारे वीस टक्के अपघात होतात. 

वैद्यकीय वैशिष्ट्ये 
- दिवसा अतिरिक्त झोप येणे 
- चित्त एकाग्र करता न येणे 
- घोरणे 
- झोप झाल्यावर तरतरीत न वाटणे 
- झोपेत असताना जीव गुदमरल्यासारखे होणे 
- अॅप्निया लक्षात येणे 
- अस्वस्थ झोप 
- चिडचिडेपणा/व्यक्तिमत्त्वात बदल 
- नॉक्टरिया किंवा रात्री जास्त प्रमाणात लघवी होणे 
- कामप्रेरणा कमी होणे 
- उच्च रक्तदाब 
या निद्रानाशाचा संबंध हृदयात आणि मेंदूत रक्ताभिसरण समस्यांच्या वाढत्या धोक्यांशी असू शकतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक येऊ शकतो. 

झोप येण्याचे (पेंग) मोजमाप 
विविध परिस्थितींमध्ये झोपी जाण्याची शक्यता मापण्याची एप्वर्थ स्लीपीनेस स्केल (इएसएस) ही एक मान्य पद्धत आहे. यातील सर्वाधिक गुणांक आहे 24. क्लिनिक्समध्ये हे परिमाण तुमच्या लक्षणांची गंभीरता मापण्यासाठी वापरले जाते. 
यातून प्राप्त होणाऱ्‍या गुणांकानुसार रुग्णांना सामान्यतः तीन भागात विभागले जाते. दिवसा पेंग येण्याच्या वेळेसंदर्भात ही गंभीरता व्यक्त केली जाते. 
सौम्य ः ईएसएस <11 
माफक ः ईएसएस = 11 ते 14 
गंभीर ः ईएसएस= 15 ते 18 

ज्यांना हा त्रास असतो त्यापैकी पन्नास टक्के रुग्ण लठ्ठ असतात. या रुग्णांच्या मानेचा घेर बऱ्‍याचदा 17 इंचापेक्षा (43 सेंमी) जास्त असतो. याचबरोबर श्वास अवरोध तपासणीत श्वसनमार्ग, जीभ आणि दातांची ठेवण, टॉन्सिल्स यांची पाहणी केली जाते. आणखी काही आजार नाही ना हे तपासण्यासाठी सामान्य श्वसन, कार्डिओ व्हास्क्युलर आणि न्यूरोलॉजिकल तपासण्या केल्या जातात. श्वसन चाचणी घेतली जाते. 
दर तासाला अडथळ्याची पुनरावृत्ती मोजून या आजाराची तीव्रता ठरवली जाते. त्याला अॅप्निया / हायपोप्निया इंडेक्स (एएचआय) म्हणतात. या निद्रानाशाची तीव्रता वेगवेगळी असू शकते. 
सौम्य : एएचआय – 5-14/तास, 
माफक : एएचआय - 15-30/तास, 
गंभीर : एएचआय > 30/तास 

निद्रा अभ्यास 
निद्रा अभ्यासाचा मुख्य उद्देश आहे, एएचआयच्या वैद्यकीय शंकेची खात्री करणे आणि त्याच्या तीव्रतेचे मूल्यांकन करणे हा आहे. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्‍या वेगवेगळ्या पद्धती आहेत : पॉलीसोम्नोग्राफी, लिमिटेड स्लीप स्टडीज, ओव्हरनाइट ऑक्सीमेट्री. तुमचे अचूक निदान करण्यासाठी तुमच्यासाठी कोणती चाचणी योग्य याबद्दल वैद्यकीय तज्ज्ञ तुम्हाला सल्ला देतील. 

 

या आजाराची गंभीरता आणि स्थिती या दोन्हीच्या आधारे, तसेच प्रत्येक रुग्णाच्या वैयक्तिक गुणांकानुसार, त्याच्यासाठी उपचारांचा कोणता पर्याय सर्वात उचित आहे हे ठरवण्यात येते. आपल्या उपचारांच्या पर्यायांबद्दल तुम्ही आपल्या वैद्यकीय सल्लागारांशी बोलू शकता. 

काय कराल? 
वजन कमी करणे, मद्य सेवन कमी करणे, पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर झोपणे हे तातडीने करावे लागेल. 


शस्त्रक्रियेव्यतिरिक्त उपाय  
कन्टीन्यूअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर - माफक किंवा गंभीर लक्षणे असणाऱ्‍या म्हणजे उपचारांची गरज असल्याचे सुचवणारी पुरेशी लक्षणे असणाऱ्‍या रुग्णांमध्ये ही थेरपी सर्वाधिक पसंत केली जाते. 

थोडक्यात 
अडथळा आणणारा निद्रानाश ही एक सर्वसाधारण आरोग्य समस्या आहे आणि त्याचे व्यापक प्रमाण, त्याबद्दलची वाढती जागरूकता यामुळे उपचार केंद्रांची मागणी वाढती आहे. याची लक्षणे खूप त्रासदायक आणि कित्येकदा रुग्णासाठी घातक असू शकतात. याचे निदान करताना रुग्णाचा पूर्वेतिहास बारकाईने तपासणे आणि निद्रा अभ्यासाचे विश्लेषण करण्यातील नैपुण्य आवश्यक आहे. कन्टीन्यूअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर ही उपचारांची मुख्य पद्धती आहे. त्याचे दीर्घकालीन उत्तम परिणाम दिसतात. उपचार मिळाल्यास ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्नियाच्या रुग्णांमध्ये चांगलीच प्रगती दिसते, तसेच त्याचे दीर्घकालीन दुष्परिणामही नसतात. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com