#FamilyDoctor स्तन्यपान स्मार्ट गुंतवणूक

डॉ. मंगला वाणी
Friday, 3 August 2018

स्तन्यपान आई व बाळ या दोघांच्याही दृष्टीने आवश्‍यक व उत्तम असते. बाळाला जन्मानंतर जेवढ्या लवकर व जितक्‍या अधिक वेळा स्तन्यपान केले जाईल, तेवढे बाळाच्या वाढीसाठी व आरोग्यासाठी चांगले असते. स्तन्यपान ही आपल्या बाळासाठी मातेने केलेली गुंतवणूक असते. स्तन्यपान सप्ताहानिमित्त हा विशेष लेख.

सोनलचे बाळ जवळ जवळ महिन्याचे झाले होते. बाळ पूर्णपणे वरच्या दुधाच्या आहारी गेल्यामुळे ती अगदी अगतिक झाली होती म्हणून माझ्याकडे मदतीसाठी आली होती. स्तन्यपानाचा दुःखदायक प्रवास सांगताना तिचे डोळे अश्रूंनी पूर्णपणे डबडबलेले होते. सोनल सांगत होती, की गरोदरपणी तिला वाटायचे की प्रसूती हा सर्वांत अवघड काळ आहे. त्यानंतर अगदी सहजपणे ती बाळाला दूध पाजू शकेल. स्वप्नातदेखील तिला वाटले नव्हते, की बाळाला आपले दूध देण्यात ती अयशस्वी होईल. स्तन्यपानासाठी चिकाटी, धीर, निरीक्षण व कष्ट करायची तयारी पाहिजे व त्यासाठी गरोदरपणीच ही सगळी माहिती करून घ्यायला हवी.

सिझेरिअननंतर तिला विश्रांतीची गरज आहे, तिला सलाइन चालू आहे, तिने काही खाल्ले नाही, तिला औषधे चालू आहेत, तिला बसता येत नाही, तिला अजून दूध आले नाही, अशा अनेक गैरसमजांमुळे पहिले तीन दिवस प्रसूतिगृहात स्तन्यपानाला मदत करण्याची कुणी उत्सुकता दाखविली नाही. प्रसूतीनंतर काही वेळांतच बाळाला डबाबंद पावडरीचे दूध चालू करण्यात आले. चौथ्या दिवशी तिने स्वतःच बाळाला छातीला लावून दूध पाजण्याचा प्रयत्न केला खरा, पण दुपारपर्यंत तिला आढळून आले, की तिचे स्तन आता दुधामुळे कडक झाले आहेत, त्यामुळे बाळाला स्तन नीट पकडता येत नव्हते. सातत्याने तिने प्रयत्न चालूच ठेवले. घरी गेल्यानंतर तिच्या स्तनाग्रावर आता थोडी जखम झाली होती. बाळाला दूध पाजणे हे तिच्यासाठी अत्यंत वेदनादायक झाले होते. तिची मावशी, आत्या, घरची कामवाली बाई, मालीश करणारी बाई, अशा बऱ्याच जणींनी स्तनांना भरपूर चोळून दूध बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दूध तर पुरेसे निघालेच नाही, पण या उपायामुळे तिला स्तनांमध्ये खूप दुखू लागले. हे आठवले, की अजूनही तिच्या अंगावर शहारे येतात. एका आठवड्यानंतर बालरोगतज्ज्ञांकडे गेल्यावर कळले, की बाळाचे वजन बरेच कमी झाले आहे, शिवाय बाळ सारखे झोपते. डॉक्‍टरांनी त्याला कावीळ व शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. बाळाला परत पावडरीचे दूध चालू आहे. घरी आल्यावर तीन दिवसांनी तिने बाळाला आपले दूध पाजायचा प्रयत्न केला, तेव्हा परत तिच्या स्तनाग्रावर जखम झाली. तासन्‌तास छातीला राहूनही बाळाची भूक भागत नव्हती, ते चिडचिडे झाले होते. वरचे दूध हळूहळू बाटलीने सुरू झाले. तिच्या लक्षात येऊन चुकले होते, की तिचे दूध बरेच कमी झाले आहे. आता तर बाळाला अंगावर पाजायला घेतले, की तोंड फिरवायला लागले होते.

आता आपण अदितीकडे वळूया. सुदैवाने अदितीच्या डॉक्‍टरने गरोदरपणात तिला स्तन्यपानाबाबतच्या प्रसूतीपूर्व चर्चासत्रात भाग घ्यायला प्रवृत्त केले. ती सोबत नवऱ्याला व सासूलाही घेऊन गेली. चर्चासत्रातील माहिती तिच्यासाठी एकदम नवीन होती. स्तन्यपानामुळे बाळ व आईला होणारे फायदे, स्तन्यपानाची पूर्वतयारी, एका तासाच्या आत स्तन्यपानाची सुरुवात, आई व बाळाच्या त्वचेला होणारा परस्पर स्पर्श व त्यांच्यामध्ये होणारे अतूट नाते, सुरुवातीच्या काळात येणाऱ्या पिवळसर चिकदुधाचे महत्त्व, वरच्या किंवा डबाबंद पावडरीच्या दुधाचे नको ते परिणाम, बाळाची योग्य पकड व स्थिती, बाळाला भूक लागली कसे ओळखावे, आपले दूध बाळाला पुरेसे आहे हे कसे ओळखावे, कमी वजनाच्या बाळाला आईचे दूध मिळण्यासाठीचे प्रयत्न इत्यादी अनेक गोष्टींवर या वेळी चर्चा झाली. बाळंत झाल्यावर ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्‍टर टाके घालत असतानाच बाळाला तिचा स्पर्श देण्यात आला व स्तन्यपानदेखील चालू झाले.

अदिती रिकव्हरी रूममध्ये गेल्यानंतर बाळाला पाळण्यात न ठेवता तिच्याजवळच ठेवण्यात आले. नातेवाइकांना आत बोलावून स्तन्यपान कसे व किती वेळा द्यायचे, हे नर्सने समजावून सांगितले. अदितीही त्यामुळे खूष होती. नंतरचे दोन दिवस बाळ थोडे रडत असल्यामुळे ती चिंतीत होती, पण स्तन्यपान तज्ज्ञांची तिला या काळात फार मदत झाली. घरी गेल्यानंतर सुरुवातीला सोपे नव्हतेच, बाळ रात्रभर जागवत असे व दूध मागत असे. तिच्या स्तनग्रावर थोड्या भेगाही पडल्या होत्या. लगेचच स्तन्यपान तज्ज्ञांकडून तिला मार्गदर्शन मिळाल्यामुळे स्तन्यपान चालू राहून तिचा आत्मविश्‍वासही वाढला. बाळाचे लंगोट बदलणे, अंघोळ घालणे इत्यादी अनेक गोष्टींसाठी नवऱ्याची तिला बरीच मदत झाली. तिचे बाळ आता दोन महिन्यांचे झाले आहे. स्तन्यपान मस्त चालले आहे व मागच्याच आठवड्यात ती बाळ व कुटुंबीयांबरोबर केरळला सुट्टीवर जाऊन आली.

सोनल व अदिती, दोघीही पहिलटकरणी, दोघींच्या अनुभवात इतका फरक का? स्तनपान हे नैसर्गिक जरी असले, तरी ती एक कला आहे, जी शिकावी लागते, आत्मसात करावी लागते व मार्गदर्शनासाठी स्तनपान तज्ज्ञांची आवश्‍यकता असते.

भारताची सध्याची परिस्थिती 
पाचमधील तीन मुलांना एका तासाच्या आत स्तनपान मिळत नाही.
दोनपैकी एका आईस सहा महिने निव्वळ स्तनपान शक्‍य होत नाही.
दहांपैकी नऊ मुलांना सहा महिन्यांनंतर, स्तनपानाबरोबर पोषक पूरक आहार मिळत नाही.
पुरेसे स्तनपान न दिल्याने मुले व मातांचे आजारपण, मृत्यू व इतर अनुषंगिक हानी जमेस धरली, तर भारताच्या अर्थव्यवस्थेला वर्षाला चौदा अब्ज डॉलरचा निष्कारण भार सहन करावा लागतो.

आपल्याला माहीत आहे का?
स्तनपानामुळे बाळाच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आयुष्याचा पाया भक्कम होतो.
भावी पिढ्यांचे कुपोषण होण्याचे टळते.
बाळाच्या मेंदूची वाढ होऊन, बाळाचा बुद्‌ध्यांक वाढण्यास मदत होते. आईच्या दुधावर वाढलेली बाळे शाळा व कॉलेजमध्ये चांगल्याप्रकारे शिक्षणसंपादन करतात, पुढे जाऊन नोकरीच्या ठिकाणी कामगिरी चांगली केल्यामुळे त्यांची मिळकतही चांगली होते.
प्रत्येक वर्षी पाच वर्षांखालील ९९, ४९९ मुले जुलाब व न्यूमोनियामुळे मृत्युमुखी पडतात. त्यांना जर जागतिक आरोग्य संस्थेच्या शिफारसीप्रमाणे स्तनपान मिळाले असते, तर हे बालमृत्यू नक्कीच टळले असते.
बाळांना जसे संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण मिळते तसेच पुढे जाऊन मधुमेह, कर्करोग, रक्तदाब इत्यादी रोग होण्याचे प्रमाण कमी होते. 
स्तनपान न केल्यामुळे स्त्रियांमधील कर्करोग व मधुमेह यामध्ये अलीकडच्या काळात वाढ झालेली आहे.
स्तनपानाचे प्रमाण अख्ख्या जगातच वाढले, तर प्रत्येक वर्षी आठ लाख वीस हजार बालमृत्यू व वीस हजार मातामृत्यू टळू शकतील.

स्तनपान हे फक्त आईचे काम नाही. त्यासाठी तिला पोषक वातावरण व योग्य आहार याची गरज असते. तिला कुटुंबाचा, समाजाचा त्याचप्रमाणे आरोग्यसेवेचा आधार जरुरीचा आहे. प्रसूतिगृहांचे महत्त्व यामध्ये अनन्यसाधारण आहे. सुरुवातीच्या तीन दिवसांत स्तनपान तज्ज्ञांची तिला मदत मिळाली व त्यानंतरही ती त्यांच्याबरोबर संपर्कात राहिली, तर यशस्वी स्तनपान होण्याचे प्रमाण वाढेल, यात शंका नाही. सुरुवातीचा काळ हा बहुतेकअंशी कठीण असतोच. खूप जणींनी नवजात बाळ हातातसुद्धा कधी धरलेले नसते. प्रसूतिगृहातील मावशीबाईंनी, तुझे स्तनाग्र चपटे आहेत, यामुळे तुला स्तनपान करता येणार नाही किंवा कुणी नातेवाइकांनी बाळ रडते म्हणजे तुझे दूध त्याला पुरत नाही असे शेरे मारले, की तिचा आत्मविश्‍वास डळमळायला लागतो आणि वरचे दूध बाळाला चालू होते. बाटलीने दूध घेताना स्तनपानाला लागतात तसे बाळाला कष्ट करावे लागत नाहीत. तसेच, मातेचे स्तनाग्र व बाटलीचे निप्पल यात बाळाचा गोंधळ होऊन ते स्तन नाकारते. वरचे दूध हे बाळाला पचायला जड असते, त्यामुळे ते तीन-चार तास झोपते. आईचे दूध पचायला हलके असल्यामुळे एक-दीड तासांत बाळ परत दूध मागते, ह्याचा अर्थ आईच्या दुधाने बाळाचे पोट भरत नाही, असा चुकीने काढला जातो. खरेतर, आईने बाळाला भूक लागली की लगेच पाजावे. मग ते अर्ध्या तासाने असो वा दोन-तीन तासाने असो. तसेच दोन स्तनपानातील वेळेचे अंतर वाढवू नये. स्तनपानादरम्यान आई व बाळाच्या त्वचेला होणारा परस्पर स्पर्श व आई-बाळाची एकमेकांना भिडणारी नजर आई व बाळात एक रेशमी बंध निर्माण होण्यास मदत करतो.

थोडक्‍यात काय, तर गरोदर राहिल्यानंतर बेबी फ्रेंडली हॉस्पिटलमध्ये नावनोंदणी करावी जिथे प्रसूतीपूर्व स्तनपान मार्गदर्शन वर्गाचा फायदा मिळेल. प्रसूतीनंतर लवकरात लवकर स्तनपान चालू होऊन, स्तनपान तज्ज्ञांकडून तिला मार्गदर्शन व समुपदेशन मिळेल आणि आईचा आत्मविश्‍वास वाढेल. त्याबरोबर कुटुंबाचा व समाजाचा योग्यरीत्या आधार मिळाला की नक्कीच सर्व अडथळ्यांवर मात करून तिला व बाळाला स्तनपानाचा पुरेपूर आनंद घेता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart investment in breastfeeding