सोम साधना : अग्निउपासना 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 20 December 2019

शरीरस्थ अग्नीचे काम पाहिले तर लक्षात येईल की फक्‍त शरीरच नाही, तर मन, आत्मा, भावना, अगदी प्राणशक्‍तीवरही अग्नीचा प्रभाव असतो. धन, ऐश्वर्य, मान-सन्मान, प्रतिष्ठा, आपुलकी अनुभवायची असेल तर अग्निसंतुलन, अग्निउपासना महत्त्वाची होय. आयुर्वेदाच्या मदतीने शरीरस्थ अग्नीची काळजी घेता येते, तसेच ज्योतिध्यानाचेही विशेष महत्त्व आहे. 

शरीरस्थ अग्नीचे काम पाहिले तर लक्षात येईल की फक्‍त शरीरच नाही, तर मन, आत्मा, भावना, अगदी प्राणशक्‍तीवरही अग्नीचा प्रभाव असतो. धन, ऐश्वर्य, मान-सन्मान, प्रतिष्ठा, आपुलकी अनुभवायची असेल तर अग्निसंतुलन, अग्निउपासना महत्त्वाची होय. आयुर्वेदाच्या मदतीने शरीरस्थ अग्नीची काळजी घेता येते, तसेच ज्योतिध्यानाचेही विशेष महत्त्व आहे. 

जीवन जगत असताना मनुष्यमात्राला तीन एषणा अर्थात तीन इच्छा पूर्ण करण्याची स्वाभाविक आकांक्षा असते. यातील पहिली असते प्राणैषणा म्हणजे प्राण वाचविण्याची, जिवंत राहण्याची इच्छा. यातीलच एक महत्त्वाचा भाग असतो आरोग्यरक्षण, सोम साधनेतील पहिली पायरी ही आरोग्यरक्षणाचीच आहे. 

प्राणैषणेनंतर येते ती धनैषणा अर्थात धनसंपत्तीची किंवा जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या साधनसामुग्रीच्या उपलब्धीची इच्छा. आरोग्य आहे, शरीरात प्राण आहे, जीवन आहे पण ते जगण्यासाठी, जीवनाचा आनंद घेण्यासाठी आवश्‍यक ती साधनसामग्री नाही असे होणे फारच दुःखद असते. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये धन म्हणजे फक्‍त पैसा-अडका नाही, तर पशुधन, कृषिधन असे म्हणण्याची पद्धत आहे. याहीपुढे जाऊन घर-दार, मित्रमंडळी, नातलग, समाजातील नावलौकिक हे सुद्धा एक प्रकारचे ऐश्वर्यच समजले जाते. समृद्धीने परिपूर्ण जीवन जगण्यासाठी सोम साधनेमध्ये यासाठीही मार्ग दाखविलेला आहे. ‘आरोग्यं भास्करात्‌ इच्छेत्‌’ नंतरची पायरी आहे ‘धनं इच्छेत्‌ हुताशनात्‌' म्हणजे धनाची इच्छा अग्नीकडून करावी. 
‘अग्नी' ही संकल्पना अतिशय व्यापक आहे. आयुर्वेदात अग्नीला भगवानस्वरूप मानलेले आहे. शरीरस्थ अग्नीचे काम पाहिले तर लक्षात येईल की फक्‍त शरीरच नाही, तर मन, आत्मा, भावना, अगदी प्राणशक्‍तीवरही अग्नीचा प्रभाव असतो. धन, ऐश्वर्य, मान-सन्मान, प्रतिष्ठा, आपुलकी अनुभवायची असेल तर अग्निसंतुलन, अग्निउपासना महत्त्वाची होय. आयुर्वेदातील पुढील सूत्रातून हे स्पष्ट समजते. 
आयुर्वर्णो बलं स्वास्थ्यं उत्साहोपचयौ प्रभा।ओजस्तेजोग्नयः प्राणाः चोक्‍ता देहाग्निहेतुकाः।। 
आयुष्य, वर्ण, बल, स्वास्थ्य, उत्साह, उत्तम शरीर संहनन, शरीरावरची आभा, ओजस म्हणजे सर्वश्रेष्ठ शरीरशक्‍ती, तेज वगैरे गोष्टी अग्नीवर अवलंबून असतात. 

अशा या अग्नीचे रक्षण करण्यासाठी एक तर शरीरस्थ अग्नीची आयुर्वेदाच्या मदतीने काळजी घ्यावी लागते आणि दुसरे म्हणजे ज्योतिध्यान, अग्नीचे वर्णन करणारे मंत्र म्हणून किंवा ऐकून या अग्नीला उत्तेजित करणे, अग्नीला प्रेरणा देणे हे सुद्धा आवश्‍यक असते. सर्वप्रथम अग्निसंकल्पना थोडक्‍यात समजून घेऊ या. 

बाह्य अग्नी व शरीरातील अग्नी यांचे स्वरूप वेगळे असले तरी काम मात्र एकच असते व ते म्हणजे ‘परिवर्तन करणे, पचन करणे'. आपण अन्न शिजविण्यासाठी जसा अग्नीचा उपयोग करतो, तसेच आपल्या शरीरातील अग्नी खाल्लेल्या अन्नाचे पचन करून त्यापासून शरीरशक्‍ती बनवत असतो. गहू, तांदूळ वगैरे धान्ये किंवा भाज्या कच्च्या असताना ज्याप्रमाणे आपण खाऊ शकत नाही, तसेच अन्नही अग्नीशिवाय शक्‍तीत परिवर्तित होऊ शकत नाही. 

अन्नपचनास जबाबदार असणाऱ्या अग्नीला 'जाठराग्नी’ म्हटले जाते. हा मुख्य अग्नी असून याच्याखेरीज पाच महाभूतांचे पाच भूताग्नी तर सात धातूंचे सात धात्वाग्नी याप्रमाणे एकूण तेरा अग्नी आपल्या शरीरात असतात. 

पांचभौतिक अग्नी 

भौमाप्याग्नेय वायव्याः पंचोष्माणः सनाभसाः।पंचाहार गुणान्स्वान्स्वान्‌ पार्थिवादीन्पचन्ति हि।। 
...चरक चिकित्सास्थान 
पाच महाभूतांपासून तयार झालेल्या शरीरात पाचही भूतांचे पाच अग्नी, पार्थिवाग्नी, आप्याग्नी, आग्नेयाग्नी, वायव्याग्नी व आकाशीयाग्नी आहेत. आपण जे अन्न खातो तेही पांचभौतिक आहे व हे पाच भूताग्नी अन्नातील त्या त्या महाभूतांच्या अंशाचे पचन करतात, तसेच पंचमहाभूतांनी घडलेल्या शरीराचा त्या त्या गुणास पुष्टी देतात. अर्थात गुरु, कठीण, स्थिर अशा प्रकारच्या पार्थिव आहारद्रव्याचे पचन शरीरातील पार्थिव अग्नी करतो व शरीराला स्थिर बनवतो, शरीरातील कठीण घटकांचे पोषण करतो. याच प्रमाणे सर्व महाभूतांच्या बाबतीत होते. 

धात्वाग्नी 

सप्तर्भिदेह धातारो द्विविधं पुनः।यथास्वमाग्निभिः पाकं यान्ति किदृप्रसादात्‌।।
...चरक चिकित्सास्थान 
सात धातूंचे सात धात्वाग्नीही शरीरात आहेत. जाठराग्नीने मुख्य पचन केल्यानंतर तयार झालेल्या आहाररसांचे उत्तरोत्तर सप्तधातूत रूपांतर, परिवर्तन करण्याचे काम हे सात धात्वाग्नी करत असतात. या प्रत्येक परिवर्तनास बरोबरीने त्या त्या धातूंचा मलभागही तयार होत असतो. 

ज्याप्रमाणे घरामध्ये अग्नी असावाही लागतो पण तो सुरक्षित ठेवणेही आवश्‍यक असते. अग्नी नसला तर सर्व कामकाज ठप्प होईल, तसेच जर त्याने अक्राळविक्राळ रूप धारण केले तर त्यामुळे सर्वच भस्मसात होऊ शकते. तसेच शरीरातील अग्नी बिघडू नये यासाठी आधीपासून प्रयत्न करावे लागतात. एकदा का अग्नी बिघडला की तो पूर्ववत करणे सोपे नसते. साक्षात परमेश्वरच अग्नीच्या रूपाने आपल्या शरीरात राहात असल्याने त्याची आपल्याला नीट काळजी घ्यायलाच हवी. शरीरातील अग्नीचे संरक्षण कसे करायचे याबद्दल चरकसंहितेत लिहिलेले आहे, 
तस्मात्‌ तं विधिवद्युस्तैरन्नपानेन्धनैर्हितः।पालयेत्‌ प्रयतस्तस्य स्थितौ ह्यायुर्बलस्थितिः।। 
...चरक विमानस्थान 
ज्या अग्नीवर आपले आयुष्य, बल वगैरे महत्त्वाच्या गोष्टी अवलंबून आहेत त्याचे रक्षण करण्यासाठी सदैव पथ्यकर आहाररूपी इंधनाची आवश्‍यकता असते. 

आहारविषयक 
या दृष्टीने आयुर्वेदाने अतिशय उत्तम मार्गदर्शन केलेले आहे. त्यातील काही मुद्दे याप्रमाणे सांगता येतील, 
- जेवण वेळेवर करणे ः अग्नी हा बाह्य जगातील सूर्याशी संबंधित असतो. सूर्य जसा मध्याह्नी सर्वांत प्रखर असतो, तसा शरीरातील अग्नी दुपारी बारा-साडेबाराच्या सुमाराला सर्वाधिक उत्तम अवस्थेत असतो. म्हणून दुपारचे जेवण या सुमाराला करणे श्रेयस्कर असते. 
- आहाराचे प्रमाण ः मात्राशी स्यात्‌ । आहारमात्रा पुनरग्निबलापेक्षिणी। 
...चरक सूत्रस्थान 
अन्नाचे प्रमाण व्यक्‍तीनुरूप बदलत असते कारण ते पचनशक्‍तीनुसार बदलते. प्रत्येकाची प्रकृती, वय, एकंदर राहणीमान वगैरे गोष्टी लक्षात घेऊन अन्नाचे प्रमाण ठरवावे लागते. यासंबंधात आयुर्वेदाने ‘त्रिविध कुक्षी आहार’ ही संकल्पना मांडली. जेवताना त्यातील एक भाग घन पदार्थाने म्हणजे पोळी, भात, भाजी वगैरे पदार्थांनी भरावा; दुसरा भाग द्रव पदार्थ म्हणजे आमटी, ताक, पाणी वगैरेंनी भरावा तर तिसरा भाग वात-पित्त-कफ यांच्या संचारासाठी मोकळा ठेवावा, जेणेकरून अन्नाचे योग्य प्रकारे व योग्य काळात पचन होऊ शकेल. 
- तूपसेवन ः जसे बाह्य अग्नी तेवत राहण्यासाठी त्याला योग्य इंधनाची आवश्‍यकता असते, तसेच शरीरातील अग्नीला प्रदीप्त करण्यासाठी घरचे साजूक तूप खूप उपयोगी असते. तुपामुळे अग्नीदीपन होते, अग्नीचा सहायक समान वायू संतुलित राहते, आतड्यांना आवश्‍यक ती स्निग्धता मिळते व एकंदरच पचनाचे कार्य व्यवस्थित व्हायला मदत मिळते. 
- दीपन-पाचन द्रव्ये ः अग्नी नीट राहावा यासाठी आयुर्वेदाने दीपन व पाचन द्रव्यांची योजना केलेली आढळते. दीपन द्रव्ये अग्नीला प्रदीप्त करतात तर पाचन द्रव्ये अग्नीची ताकद वाढवून पचनास मदत करतात. स्वयंपाकाच्या माध्यमातून किंवा औषधांच्या स्वरूपात या द्रव्यांची योजना केली असता पचन व्यवस्थित राहण्यास, पर्यायाने आरोग्य नीट राहण्यास निश्चित हातभार लागतो. उदा. आले, मिरी, ओवा, हिंग, आमसूल, जिरे, लिंबू, पुदिना वगैरे गोष्टींचा स्वयंपाकात योग्य प्रमाणात वापर करता येतो. तर पंचलवण, चिंचक्षार, सुंठ वगैरे द्रव्यांपासून बनविलेल्या 'अन्नयोग गोळ्या'सारख्या पाचक गोळ्यांमुळे पचनसंस्थेची सक्षमता टिकून राहण्यास मदत मिळते. 

ज्योतिध्यान 
आहार-औषधांच्या माध्यमातून अग्नीचे रक्षण करता येते, तसेच अग्नीला प्रेरणा मिळावी यासाठी अग्निउपासना सुद्धा महत्त्वाची असते. सर्व धर्मांमध्ये, सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये अग्निउपासना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात केलेली आढळते. मेणबत्ती लावण्यापासून ते यज्ञ करण्यापर्यंतचे सगळे उपक्रम अग्निउपासनेत येतात. भारतीय संस्कृतीमध्ये विशिष्ट मंत्र म्हणून अग्निदेवतेचे आवाहन करून यज्ञ करण्यासाठी जी उपासना विकसित झालेली आहे ती सर्वोत्कृष्ट आहेच, पण घरच्या घरी प्रत्येकाला सहजतेने करता येईल अशी उपासना म्हणजे ज्योतिध्यान. ज्योतिध्यान करण्यासाठी तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करून तो हातभर लांबीवर व डोळ्यांच्या समतल असा ठेवायचा असतो आणि एकाग्रचित्ताने त्या ज्योतीकडे एकटक बघायचा प्रयत्न करायचा असतो. सरावाने हळूहळू तेजःपुंज ज्योतीकडे पापणी व लवता सलग काही वेळ बघणे शक्‍य होते. डोळ्यांनी ज्योत एकटक पाहिल्यानंतर डोळे बंद केले तरी तिचे प्रतिबिंब भ्रूमध्याच्या आत काही वेळासाठी दिसू लागते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अग्नितत्त्वाला उत्तेजना मिळते, शरीरातील संप्रेरकांचे काम सुधारते आणि पूर्वी उल्लेख केल्यानुसार शारीरिक, मानसिक, भावनिक, प्राणिक स्तरांवर सकारात्मक परिणाम मिळाल्याने ‘धनैषणा' पूर्ण होण्याचे सामर्थ्य मिळू शकते. 

सोम साधनेमध्ये ज्योतिध्यान अंतर्भूत आहेच, बरोबरीने अग्नीचे ध्यान-प्रार्थना करणाऱ्या मंत्रांचे पठण-श्रवण हे सुद्धा समाविष्ट आहे. या दुग्धशर्करायोगाने कमी वेळात व कमी कष्टात अधिकाधिक परिणाम मिळू शकतात.
सकारात्मक विचार, सृजनात्मक कल्पना, उत्साह, धैर्य, यशस्विता, तेजस्विता हे सगळे भाव अनुभवायचे असतील तर सोम साधना, त्या अंतर्गत ज्योतिध्यान पर्यायाने अग्निउपासना करायलाच हवी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Som sadhana Ignite article written by Dr Shree Balaji Tambe