सोम उपासना 

Som Upasana
Som Upasana

सध्याच्या आधुनिक काळासाठी अनुरूप व्हावा, यादृष्टीने काही मोजक्‍या योगक्रियांचा "सोम" उपासनेत समावेश केलेला आहे, मात्र त्यात पतंजली ऋषींच्या योग संकल्पनेला धक्का लावलेला नाही. स्कायमध्ये मूळ आसने किंवा प्राणायामादी क्रियांमध्ये अगदी थोड्या प्रमाणात बदल केलेला आहे आणि प्रत्येक क्रिया मनावरही सकारात्मक परिणाम करू शकेल याकडे लक्ष दिलेले आहे. 
 

आयुर्वेदाच्या आरोग्यव्याख्येमध्ये ‘प्रसन्न आत्मेन्द्रियमनः’चा समावेश आहे, म्हणजेच आरोग्य हे फक्‍त शारीरिक पातळीवर असणे पुरेसे नसते, तर इंद्रिय, मन आणि आत्मा या सूूक्ष्म स्तरावरही आरोग्य अभिप्रेत असते. अर्थात यासाठीही प्रयत्न करावे लागतात. संतुलन पंचकर्मामध्ये शारीरिक उपचारांच्या बरोबरीने योग, संगीत, ॐकार, प्राणायाम, वेदपठण यांचा समावेश केलेला असतो आणि म्हणूनच अवघ्या दोन-तीन आठवड्यांमध्ये व्यक्‍तीला स्वतःच्या प्रकृतीमध्ये, मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदल झालेला जाणवू शकतो. विशेषतः पंचमहाभूतांपैकी अग्नी, वायू, आकाश या भौतिक अस्तित्व जवळजवळ नसणाऱ्या तत्त्वांवर काम करण्यासाठी सोम उपासना व त्या अंतर्गत योग खूप उपयोगी पडत असतो. योगशास्त्र हे आयुर्वेदशास्त्राप्रमाणेच अमर्याद आहे. 
सध्याच्या आधुनिक काळासाठी अनुरूप व्हावा, यादृष्टीने काही मोजक्‍या योगक्रियांचा ‘सोम’ उपासनेत समावेश केलेला आहे, मात्र त्यात पतंजली ऋषींच्या योग संकल्पनेला धक्का लावलेला नाही. स्कायमध्ये मूळ आसने किंवा प्राणायामादी क्रियांमध्ये अगदी थोड्या प्रमाणात बदल केलेला आहे आणि प्रत्येक क्रिया मनावरही सकारात्मक परिणाम करू शकेल याकडे लक्ष दिलेले आहे. "सोम" प्रोग्रॅममध्ये समाविष्ट करायला हव्यात अशा संतुलन क्रिया येथे दिलेल्या आहेत. या क्रिया किती सोप्या आहेत हे पाहिले तर आश्‍चर्य वाटेल. कोणालाही सहजपणे, नुसत्या वाचूनही करता येण्याजोग्या अशा आहेत. आज आपण यातील पहिल्या तीन क्रियांची माहिती करून घेऊ या. 

स्थैर्य (ग्राउंडिंग) 
जसे पाया मजबूत असला तरच इमारत आकाशाला भिडू शकते, तसे यथायोग्य स्थिरता असल्याशिवाय व्यक्‍ती यशस्वी होऊ शकत नाही किंवा तिची प्रगतीही होऊ शकत नाही. स्थिरता नसलेला मनुष्य सैरभैर होऊ शकतो. स्कायमधली ही क्रिया आवश्‍यक ती स्थिरता देतेच, बरोबरीने पचनाला मदत करते, पोट सुटून खालच्या बाजूने ओघळण्याची प्रवृत्ती कमी करते. पिच्युटरी ग्रंथीला कार्यप्रेरित करते आणि मेरुदंड सरळ राहण्यास मदत करते. वयानुसार मेरुदंड खचत असतो, असे होऊ न देता मेरुदंड वर उचलण्यासाठी ही क्रिया मदत करते. यात आत घेतलेला श्वास वरच्या दिशेने, मेंदूकडे नेण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे मेंदू अधिक सक्रिय, आरोग्यसंपन्न व सर्जनशील बनतो. 
क्रिया करण्याची पद्धत (एकूण पाच वेळा करणे) 
1. ताठ उभे राहावे, टाचांमध्ये 15 ते 20 सेंमी. अंतर असावे व पाऊल थोडेसे बाहेरच्या बाजूला वळलेले असावे. हात शरीरालगत सरळ असावेत. दोन्ही हातांची मूठ बंद केलेली असावी व अंगठ्याचे टोक जमिनीच्या दिशेला असावे. 
2. टाचा व पायाची बोटे जमिनीवर अशा प्रकारे घट्ट रोवावीत, जणू पायाला मुळे असून ती जमिनीत रुजत आहेत. 
3. सावकाश संथ गतीने श्वास घेत असतानाच चवड्यांवर उभे राहावे, हे करत असताना जणू टाळूला दोर बांधलेला आहे व आपण वरच्या बाजूला ओढले जात आहोत अशी कल्पना मनात करावी. दृष्टी सरळ दिशेत, एका बिंदूवर स्थिर असावी. 
4. पोट आत व वरच्या दिशेला ओढून श्वास धरून ठेवावा. या वेळी लक्ष सहस्राधार चक्राच्या ठिकाणी म्हणजे मस्तकावरील टाळूच्या ठिकाणी केंद्रित करावे. खांदे आखडणार नाहीत याकडेही लक्ष असावे. 
5. आता श्वास बाहेर सोडताना, हळूहळू टाचा जमिनीला टेकवाव्यात व पोटावरील ताण दूर करावा. 
6. हीच क्रिया परत करावी. 

समर्पण (सरेंडर) 
समर्पण या शब्दाचा अर्थ येथे हार पत्करणे, आत्मविश्वास गमावणे किंवा प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यासमोर हात पसरण्याची गरज पडणे असा होत नाही. हे समर्पण समोरच्या व्यक्‍तीच्या प्रती विनम्रता आणि आदर दर्शविणारे आहे. या क्रियेमुळे आपल्यातील समर्पण वृत्ती वाढते आणि ती करत असताना वाकणे, ताण देणे (स्ट्रेचिंग), पोटावर हलका दाब आल्यामुळे वायू सरण्यास मदत मिळणे आणि थायरॉईड ग्रंथीच्या कार्याचे संतुलन होणे या सर्वांचा फायदा होतो. या क्रियेच्या नियमित सरावामुळे नितंब प्रदेशातील लवचिकता वाढते, पाठ व मानेवर योग्य प्रमाणात ताण आल्याने मेरुदंडाची लवचिकता वाढते. सर्व्हायकल प्लेस्कस सक्रिय होते. डोळे, श्वसनसंस्था आणि मेंदू यांच्या कार्यात सुधारणा होते. स्पॉंडिलायटिस, कंबरदुखीसारखे त्रास होऊ नयेत, यासाठी ही क्रिया उपयुक्‍त असते. विनम्रता व श्रद्धापूर्ण भावाने "स्व'पर्यंत जाण्याची वृत्ती विकसित होते. 
क्रिया करण्याची पद्धत (तीन वेळा) 
1. वज्रासनात बसावे. दोन्ही हात नमस्तेच्या स्थितीत जोडून छातीसमोर ठेवावेत व श्वास पूर्णपणे आत घ्यावा. 
2. हात जोडलेल्या स्थितीतच ठेवून शरीरासमोर सरळ करावेत. या वेळी बोटे समोरच्या दिशेला व अंगठे वरच्या दिशेला असावेत. नजर अंगठ्यावर केंद्रित असावी. पुढच्या तिन्ही कृती करताना नजर अंगठ्यावर स्थिर असावी. 
3. दोन्ही हात नमस्तेच्या स्थितीत व कोपरातून ताठ असतानाच खाली आणावेत 
4. थोडेसे पुढे झुकून बोटांची टोके दोन्ही गुडघ्यांच्या मधे जमिनीवर टेकवावीत. या वेळी पाठीचा कणा सरळ असावा. 
5. नजर अंगठ्याच्या अग्रावर स्थिर ठेवत, श्वास हळूहळू सोडत असताना हात जमिनीवर समोरच्या बाजूने पुढे सरकवावेत. हे करताना किंचितसा दाब द्यावा. शरीर शक्‍य तितके पुढे ताणले जाईल, छाती मांड्यावर टेकेल अशा स्थितीत यावे. या वेळी नितंब टाचांना टेकलेलेच राहतील आणि हात कोपरातून सरळ असतील याकडे लक्ष ठेवावे. 
6. श्वास पूर्ण सोडल्यावर दोन्ही हातांमध्ये थोडे अंतर घेऊन तळहात जमिनीवर टेकवावेत. त्याच वेळी डोकेसुद्धा जमिनीवर टेकवावे. श्वास पूर्णपणे सोडलेल्या स्थितीत असेच क्षण-दोन क्षणासाठी राहावे. 
7. आता डोके वर उचलून नजर पुन्हा अंगठ्याच्या अग्रावर ठेवून, श्वास आत घेत घेत, हातांचे तळवे पुन्हा जोडलेल्या स्थितीत आणून जमिनीलगत ठेवत जवळ घ्यावेत. या वेळी पाठ व हात कोपरातून सरळ असावेत. 
8. पूर्ववत ताठ स्थितीत बसावे, दोन्ही हात जोडलेल्या स्थितीत छातीजवळ आणून श्वास सोडावा. 
9. श्वास घेऊन पुढचे आवर्तन सुरू करावे. 
सूचना - शारीरिक अक्षमतेमुळे वज्रासनात बसणे अवघड असले तर सुखासनात बसून किंवा खुर्चीत बसून गुडघ्याच्या रेषेत टेबल ठेवूनही हे आसन करता येते. 
पोटाचा आकार वाढलेला असल्याने वज्रासनाच्या स्थितीत पूर्णपणे पुढे वाकणे शक्‍य नसले तर दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडे अंतर ठेवता येते. 


स्कंधचक्र 
आजकाल बहुतेक जण लिहिण्याच्या निमित्ताने, संगणक किंवा टॅबलेटवर काम करण्याच्या निमित्ताने खूप वेळ बसलेले असतात, असे मोठ्या प्रमाणावर दिसते. यामुळे मान अवघडलेल्या व एकाच स्थितीत खूप वेळ डोक्‍याचे वजन पेलत राहते. याचा संपूर्ण पाठीच्या कण्यावर भार येतो. खांदे व मानेच्या स्नायूंवर इतका ताण येतो, की त्याचा परिणाम मान व डोक्‍याच्या रक्‍तपुरवठ्यावर होतो. पाठीचा कणा आकुंचित होऊ लागतो. दोन मणक्‍यांमधील जागा कमी होण्यामुळे आणि मान व पाठीच्या कण्यातील स्नायूमधे कडकपणा आल्याने हे होत असते. या स्थितीत सुधारणा होण्यासाठी ट्रॅक्‍शन गरजेचे असते आणि नेमके हेच या क्रियेमुळे होत असते. यामुळे खांदे, खांद्याच्या आजूबाजूचा भाग आणि संपूर्ण हात रिलॅक्‍स होत असतात. या तणावमुक्‍त अवस्थेमुळे मनुष्य अधिक चांगल्या प्रकारे विचारही करू शकतो. शिवाय ज्या हातांच्या योगे आपण जबाबदाऱ्या स्वीकारत असतो व इतरांना आधार देऊ शकतो, त्या हातांमध्ये ताकद आणि विश्वास वाढण्यासही मदत मिळते. ज्यांच्या पाठीला कुबड असेल त्यांनी या क्रियेत फक्‍त मागच्या बाजूने आवर्तने करावीत. 
क्रिया करण्याची पद्धत 
1. हात कोपरांत वाकवून दोन्ही हातांची बोटे खांद्यांवर टेकवावी. 
2. या स्थितीत दोन्ही कोपरे वर्तुळाच्या आकारात अशा प्रकारे फिरवावीत, जेणेकरून दोन्ही कोपर शरीराच्या समोर परस्परांना स्पर्श करतील. 
3. प्रथम चार-पाच आवर्तने पुढून मागच्या बाजूला आणि नंतर चार-पाच आवर्तने मागून पुढच्या बाजूला करावीत. 
4. असे पुन्हा एकदा करावे. 
याच्या पुढील क्रियांची माहिती आपण पुढच्या आठवड्यात घेऊ या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com