सोम उपासना - मुद्रा 

Som upasana Mudra
Som upasana Mudra

सोम उपासनेत संपूर्ण आरोग्यासाठी, मानसिक प्रसन्नतेसाठी तसेच आध्यात्मिक उन्नतीसाठी यातील निवडक गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत. यातीलच एक भाग म्हणजे मुद्रा. योगशास्त्र व नृत्यशास्त्रात ‘मुद्रा’ संकल्पना विस्ताराने समजावलेली दिसते. या मुद्रा करायला सोप्या तर असतातच, पण अतिशय प्रभावशाली व लागलीच परिणाम देणाऱ्या असतात. 

भारतीय विज्ञान हे अत्यंत प्रगत व विविधतेने संपन्न असे आहे. यात निसर्गाचा, शरीराचा, वातावरणाचा, ऋतुमानाचा समस्त प्राणिमात्रांच्या उन्नतीसाठी, विकासासाठी जो उपयोग करून घेतलेला आहे, त्याला तोड नाही. कमीत कमी साधनांमध्ये, अधिकाधिक फायदा कसा मिळेल याचाही विचार आपल्या ऋषिमुनींनी प्रत्येक ठिकाणी केलेला दिसतो. सोम उपासनेत संपूर्ण आरोग्यासाठी, मानसिक प्रसन्नतेसाठी तसेच आध्यात्मिक उन्नतीसाठी यातील निवडक गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत. यातीलच एक भाग म्हणजे मुद्रा. योगशास्त्र व नृत्यशास्त्रात ‘मुद्रा’ संकल्पना विस्ताराने समजावलेली दिसते. आयुर्वेदातही ‘हस्तमेव प्रधान यन्त्रम्‌’ म्हणजे हात हे शरीरातील सर्वोत्तम साधन आहे असे म्हणून या मुद्राशास्त्राला अभिमोदन दिलेले आहे. 

हात व हाताच्या पाचही बोटांच्या मदतीने एका विशिष्ट स्थितीत येणे म्हणजे मुद्रा करणे. मुद्रा करायला सोप्या तर असतातच, पण अतिशय प्रभावशाली व लागलीच परिणाम देणाऱ्या असतात. शरीरातील शक्‍तिस्रोतसे (मेरिडियन्स) आणि चेतावहसंस्थेवर मुद्रांच्या योगे काम करता येते. मन, इंद्रिये, अग्नी वगैरे सूक्ष्म तत्त्वांवर काम करण्यासाठीसुद्धा मुद्रा सक्षम असतात. 

या ठिकाणी काही सोप्या व संपूर्ण दिवसात वेळ मिळेल त्यानुसार केव्हाही करता येतील अशा मुद्रा दिलेल्या आहेत. यामुळे छोटे-छोटे त्रास तर पूर्णतः बरे होऊ शकतात, पण गंभीर विकारांतही यांचा उत्तम हातभार लागू शकतो. जेव्हा केव्हा मोकळा वेळ असेल तेव्हा या मुद्रा करता येतात. जी मुद्रा करायची असेल ती दोन-तीन मिनिटांसाठी करायची असते. मुद्रा करण्यापूर्वी सुखावह आसनात यावे, श्वास संथ व नियमित पद्धतीने चालला आहे याची खात्री करावी आणि मग मुद्रा करावी. 

१. शंख मुद्रा - शंख हे सुसंवादाचे प्रतीक समजले जाते. जेव्हा संवाद साधण्यात कष्ट होत असतील, आवाजाशी संबंधित कोणताही त्रास असेल, थायरॉईड ग्रंथीच्या असंतुलनामुळे आवाजात बदल झाला असेल तेव्हा शंखमुद्रा करणे हितावह असते. अपचन, त्यामुळे उद्भवणारी पोटदुखी यातही शंखमुद्रेचा उपयोग होतो. 
पद्धत - उजव्या हाताच्या तर्जनी ते करंगळी या चार बोटांमध्ये डाव्या हाताचा अंगठा पकडावा. डाव्या हाताची तर्जनी व उजव्या हाताचा अंगठा यांचा परस्परांशी स्पर्श होईल अशा स्थितीत यावे. डाव्या हाताची उर्वरित बोटे सरळ असावीत. हातांचा हा आकार शंखाप्रमाणे दिसतो. 

२. सहज शंखमुद्रा - शंखमुद्रेपेक्षा ही मुद्रा करायला सोपी असते. लहान मुलेसुद्धा ती करू शकतात. बोलण्याशी संबंधित कोणताही त्रास असला, उदा. तोतरेपणा, मध्ये मध्ये अडखळणे, सुरुवातीला तत-पप होणे, उच्चार स्पष्ट नसणे, आवाज फार बारीक निघणे, स्वरयंत्रात काही बिघाड असणे वगैरेंवर ही मुद्रा उपयुक्‍त असते. शरीराचे पोश्‍चर (डौलदारपणा) तसेच मानसिक दृष्टिकोन सुधारण्यास या मुद्रेचा उपयोग होतो. पचनसंस्थेच्या कार्यात सुधारणा होते व पचनासंबंधित त्रास दूर होतात. मणिपूर चक्र (सोलर प्लेक्‍सस)ची कार्यक्षमता वाढते. 
पद्धत - दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर दाबावेत व बोटे एकमेकांमध्ये अशा प्रकारे गुंफावीत, की उजव्या हाताची बोटे डाव्या हाताच्या मागच्या बाजूला आणि डाव्या हाताची बोटे उजव्या हाताच्या मागच्या बाजूला स्पर्श करतील. दोन्ही अंगठे फक्‍त सरळ असावेत, त्यांचा एकमेकांना आतल्या बाजूने स्पर्श झालेला असावा आणि तर्जनीवर स्थित असावेत. 

३. योनी मुद्रा - ही मुद्रा एकाग्र होता न येणे, चित्तवृत्ती शांत न होऊ शकणे, शक्‍ती कमी पडणे आणि व्यवहारात, दैनंदिन वागण्याचालण्यात विसंगती असणे वगैरे तक्रारींसाठी उपयुक्‍त असते. मेंदूतील डाव्या व उजव्या बाजूत जेव्हा सुसंगती, सुसूत्रता नसते तेव्हा मन अशांत होते, योगशास्त्रात वर्णन केल्याप्रमाणे चित्तवृत्ती म्हणजे मनातील तरंग स्थिर होऊ शकत नाही अशा स्थितीतही योनीमुद्रा मदत करते. ही मुद्रा मेंदूतील दोन्ही भागांच्या कामामध्ये संतुलन घडवून आणते व शरीराला शक्‍ती तसेच मनाला स्थिरता प्रदान करते. ध्यान करताना मनातील विचार कमी करण्यासाठी, पर्यायाने मन एकाग्र होऊन ध्यानस्थ होऊ शकावे यासाठी तसेच मन जाणिवेने परिपूर्ण होऊन त्याचवेळी शांत स्थितीत राहण्यासाठीसुद्धा ही मुद्रा उपयोगी असते. 
पद्धत - दोन्ही हातांचे मधले बोट, अनामिका व करंगळी ही बोटे एकमेकांत गुंफावीत. दोन्ही तर्जनी एकमेकांना जोडलेल्या व समोरच्या दिशेला दर्शवणाऱ्या असाव्यात. दोन्ही अंगठ्यांच्या पहिल्या पेरांचा एकमेकांना स्पर्श करावा आणि ते मागच्या दिशेला सरळ करावेत. 

४. लिंगमुद्रा - श्वसनसंबंधित कोणताही त्रास, सायनोसायटिस, सर्दी, खोकला, दमा वगैरेंसाठी उपयुक्‍त. या मुद्रेमुळे छाती मोकळी होण्यास मदत मिळते. कमी रक्‍तदाब असणाऱ्यांसाठी ही मुद्रा उपयुक्‍त असते, यामुळे शरीरात उष्णता तयार होते, वजन कमी होण्यास व शक्‍ती वाढण्यासाठी उपयोगी पडते. 
पद्धत - दोन्ही तळवे एकमेकांना जोडावेत, बोटे एकमेकांत गुंफावी. डाव्या हाताचा अंगठा वरच्या दिशेत सरळ करावा, याच्या तळाशी उजव्या हाताचा अंगठा व तर्जनी यांच्या मदतीने गोलाकार रिंगण करावे. 

५. हृदयमुद्रा - उच्च रक्‍तदाब कमी करण्यासाठी, हृदयाला पुरेसा रक्‍तपुरवठा होण्यासाठी उपयुक्‍त मुद्रा. पोट वेळच्या वेळी व पूर्णपणे साफ होत नसेल तर तसेच डोकेदुखीसाठी उपयुक्‍त मुद्रा. 
पद्धत - तर्जनी दुमडावी व अंगठ्याच्या तळाशी स्पर्श करावा. मधले बोट, अनामिका व अंगठा एकत्र आणावेत. करंगळी शक्‍य तितकी उभी व सरळ असावी. 

६. शून्यमुद्रा - या मुद्रेमुळे कानदुखी, कान खाजणे वगैरे त्रास तसेच चक्कर येणे कमी होते. 
पद्धत - मधले बोट वाकवावे व त्याचा अंगठ्याच्या मुळाशी स्पर्श करावा. अंगठ्याने मधल्या बोटावर दाब द्यावा. इतर सर्व बोटे शक्‍य तितकी उभी व सरळ करावीत. 

७. कानाच्या आरोग्यासाठी विशेष श्वसनक्रिया - कमी ऐकू येणे, कानातून आवाज येणे किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा कानाशी संबंधित त्रास असला तर ही क्रिया करता येते. 
पद्धत - नाकावाटे शक्‍य तितका श्वास आत घ्यावा. तोंड बंद ठेवावे व बोटांच्या मदतीने नाकही बंद करावे आणि हवा कानावाटे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करावा. यासाठी श्वास चार-पाच वेळा वरच्या दिशेने कानाकडे ढकलावा, मग नाकावाटे श्वास सोडावा. असे दोन वेळा करावे. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com