सोमयोग (2)  शरीरस्थ्य अग्निसंतुलन 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 20 December 2019

अनेक प्रकारच्या अनुभवातून, तपस्येतून जाणे हीही भविष्यासाठीच्या अग्नीची आराधना आहे. धनाची प्राप्ती व्हावी व जीवन सुखकर होण्यासाठी आवश्‍यक ते सर्व साहित्य मिळावे अशी ज्यांना इच्छा असते त्यांना अग्नीची उपासना करणे फार आवश्‍यक आहे. काही वेळ दीपज्योतीकडे पाहण्याने त्या प्रकाशाच्या माध्यमाद्वारा शरीरस्थ अग्नीला जागे केले जाते. प्राणायामामुळेही शरीरस्थ अग्नीला जागृत करून त्याला वाढवून त्याचे शक्‍तीत रूपांतर केले जाते. 

मागच्या वेळी आपण आरोग्यासाठी सूर्योपासनेचे महत्त्व पाहिले. 

अनेक प्रकारच्या अनुभवातून, तपस्येतून जाणे हीही भविष्यासाठीच्या अग्नीची आराधना आहे. धनाची प्राप्ती व्हावी व जीवन सुखकर होण्यासाठी आवश्‍यक ते सर्व साहित्य मिळावे अशी ज्यांना इच्छा असते त्यांना अग्नीची उपासना करणे फार आवश्‍यक आहे. काही वेळ दीपज्योतीकडे पाहण्याने त्या प्रकाशाच्या माध्यमाद्वारा शरीरस्थ अग्नीला जागे केले जाते. प्राणायामामुळेही शरीरस्थ अग्नीला जागृत करून त्याला वाढवून त्याचे शक्‍तीत रूपांतर केले जाते. 

मागच्या वेळी आपण आरोग्यासाठी सूर्योपासनेचे महत्त्व पाहिले. 

"धनमिच्छेत्‌ हुताशनात्‌' हेही अत्यंत महत्त्वाचे आणि मार्गदर्शक तत्त्व आहे. हुताशन म्हणजे अग्नी. अग्नीच्या उपासनेने जीवनासाठी आवश्‍यक असलेले धन मिळते. धन म्हणजे सरकारने चलनासाठी बनविलेले पैसे नव्हेत. येथे सर्व प्रकारचे धन अपेक्षित आहे. तसे पाहताना शरीरसंपदा हे एक प्रकारचे धनच समजले जाते. जीवनमान सोपे करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्‍यकता लागेल त्यांची खरेदी करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या धनाबरोबर मित्रमंडळी, नातीगोती, पशुधन, वनातील धन वगैरेंचाही यात समावेश होतो. 
दोन प्रकारचे अग्नी आपल्याला मदत करतात. पहिला शरीरस्थ अग्नी व दुसरा बाह्य अग्नी. सूर्यापासून उत्पन्न झालेला प्रकाश आणि उष्णतारूपी अग्नी पृथ्वी, झाडे, पाने, फुले शोषून घेतात, पर्यायाने अग्नीचे संरक्षण करतात. यापासून तयार झालेल्या खनिजातून तेल काढता येते, जे जाळल्यानंतर अग्नीत प्रकट होऊ शकते. तेव्हा एक प्रकट अग्नी आणि दुसरा अप्रकट अग्नी असेही म्हणायला हरकत नाही. अग्नी ही कर्मशक्‍ती आहे. कर्मशक्‍ती वापरल्याशिवाय कुठलीच गोष्ट तयार होणार नाही किंवा त्याचे धनामध्ये रूपांतर होणार नाही. लाकडाच्या ओंडक्‍याची किंमत शंभर रुपये असली तर त्यावर शक्‍ती वापरून कर्मप्रक्रिया झाल्यावर त्यापासून तयार होणाऱ्या वस्तूची किंमत हजार-दोन हजार रुपयेसुद्धा असू शकते. 

शरीरातील अग्नीमुळे शरीर उबदार राहते. हा शरीरातील अग्नी अप्रकट अग्नी होय. या अप्रकट अग्नीचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे जाठराग्नी किंवा वैश्वानर अग्नी. आधुनिक वैद्यकशास्त्रात हॉर्मोन्स म्हणून जी संकल्पना सांगितलेली आहे ती शरीरातील अप्रकट अग्नीला प्रकट करण्याची व साठविण्याची व्यवस्था आहे. आरोग्यवान शरीरातील अप्रकट अग्नीमुळे शरीराची काम करण्याची क्षमता वाढते व पर्यायाने धन मिळते. शरीरातील सात प्रकारचे अग्नी, ज्यांना धात्वग्नी म्हटले जाते, शरीर टिकविण्यासाठी व शक्‍ती आकर्षित करण्यासाठी उपयोगी ठरतात. सेवन केलेल्या अन्नाचे रूपांतर रसात, रसाचे रूपांतर रक्‍तात, रक्‍ताचे रूपांतर मांसात, मांसाचे रूपांतर मेदात, मेदाचे रूपांतर अस्थीत, अस्थीचे रूपांतर मज्जेत व मज्जेचे रूपांतर ओजात-वीर्यात होत असताना अग्नीला प्रकट केले जाते. शेवटी अग्नी अशा एका पातळीवर येतो की त्याचे रूपांतर शक्‍तीत होते व ती शक्‍ती कर्मासाठी वापरली जाते. शक्‍ती आंतरेंद्रियाची असो, बाह्येंद्रियाची असो, कर्मेंद्रियांची असो, ज्ञानेंद्रियाची असो, ही सर्व शक्‍ती, या सर्व इंद्रियांना लागणारी शक्‍ती ती त्यातूनच प्रकट होऊ शकते. 

जीवनशक्‍ती या सर्व प्रकारच्या शक्‍तींना प्रकट होण्यास भाग पाडते. म्हणून शरीरात प्राण असेपर्यंत शरीर उबदार लागते. ज्या वेळी शरीर थंड पडते त्या वेळी प्राण गेला व जीवनयात्रा संपली, असे म्हणावे लागते. 

सूर्योपासना ही एक प्रकारच्या अग्नीचीच उपासना आहे. एखाद्या वनस्पतीला खलबत्त्यात घोटले तर वनस्पतीवर अग्नीचीच प्रक्रिया होते. अनेक प्रकारच्या अनुभवातून, तपस्येतून जाणे हीही भविष्यासाठीच्या अग्नीची आराधना आहे. धनाची प्राप्ती व्हावी व जीवन सुखकर होण्यासाठी आवश्‍यक ते सर्व साहित्य मिळावे अशी ज्यांना इच्छा असते त्यांना अग्नीची उपासना करणे फार आवश्‍यक आहे. काही वेळ दीपज्योतीकडे पाहण्याने त्या प्रकाशाच्या माध्यमाद्वारा शरीरस्थ अग्नीला जागे केले जाते. प्राणायामामुळेही शरीरस्थ अग्नीला जागृत करून त्याला वाढवून त्याचे शक्‍तीत रूपांतर केले जाते. व्यायाम, चालणे, खेळ हे सर्व शरीरस्थ अग्नी प्रकट करण्याचे निरनिराळे मार्ग आहेत. एखाद्या खेळात जो विशेष कौशल्य दाखवतो तो त्या खेळात निपुण होतो व त्याला शरीरस्थ अग्नीचा लाभही होतो. 

जीवनसाधनेत किंवा सोमसाधनेत अग्नीध्यान हे महत्त्वाचे अंग आहे हे समजणे आवश्‍यक आहे. उपासनामार्गासाठी सर्व जगात अग्नीला महत्त्वाचे स्थान दिलेले आढळते. दीपज्योत ही शरीरस्थ्य अग्नीला आकर्षित करून कार्यप्रवण करणारी व्यवस्था आहे. 

वैदिक ज्ञानाचा उपयोग करून घेऊन भारतीयांनी यज्ञप्रक्रियेपर्यंत अग्नीच्या माध्यमातून ईप्सित साध्य करून धनप्राप्तीचे संशोधन केलेले आहे. अग्नीध्यानासाठी सर्वांत सोपी व कुठल्याही प्रकारचा त्रास न होता करता येण्यासारखी व्यवस्था म्हणजे ज्योतिध्यान. ज्योतिध्यानासाठी वापरली जाणारी शक्‍ती तेलातून किंवा तुपातून मिळविता येते. तूप जळत असताना त्याचे अणुरेणू वातावरणात पसरत असतात. तुपाच्या दिव्याची उष्णता सौम्य व शीतल असते. साधारण एक हात अंतरावर तुपाचे निरांजन पेटवून ठेवावे, मान फार खाली करावी लागणार नाही किंवा आकाशाकडे पाहिल्यासारखी मान उंच करावी लागणार नाही इतपत उंचीवर निरांजन ठेवून साधारण पाच मिनिटे ज्योतीकडे पाहावे. बरोबरीने वैश्‍विक व वैयक्‍तिक अग्नीला स्पंदित करण्यासाठी अग्नीचे मंत्र म्हणता वा ऐकता येऊ शकतात. अशा प्रकारे अग्नीचे ध्यान दिवसातून दोन वेळा करणे इष्ट असते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Som Yoga (2) : Anatomical fire balance article written by Dr Shree Balaji Tambe