सोमयोग : आरोग्यं भास्करात्‌ इच्छेत्‌ 

Soma Yoga : Arogyam Bhaskaraat Ichshet
Soma Yoga : Arogyam Bhaskaraat Ichshet

भारतासारख्या देशात सुदैवाने सूर्यप्रकाशाची कमतरता नाही. उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्याची पूर्वीपासूनच प्रथा भारतीय संस्कृतीमध्ये होती. आज शब्दशः अर्घ्य देता आले नाही, तरी सकाळच्या, शक्‍यतो सूर्योदयाच्या कोवळ्या उन्हात पंधरा-वीस मिनिटे बसणे अशक्‍य ठरणार नाही. बरोबरीने ध्यान, प्राणायामादी क्रिया केल्या तर दुग्धशर्करायोगच म्हणावा लागेल. सूर्याराधनेचे, सूर्यप्रकाशाचे याप्रकारे अनेक फायदे असले, तरी तीव्र सूर्यप्रकाश पित्तदोष वाढवून आरोग्यास हानिकारक ठरू शकतो, तेव्हा दुपारच्या प्रखर उन्हापासून संरक्षणच करावे. 
 

जीवन जगण्यासाठी ज्या मूलभूत गोष्टी आवश्‍यक असतात त्यात अग्रणी असते आरोग्य. आयुर्वेदाचा मुख्य हेतू आरोग्यरक्षण असला तरी ते जीवनाची इतिकर्तव्यता पार पाडण्यामागचे साधनमात्र आहे हेसुद्धा आयुर्वेदात सांगितलेले आहे. आयुर्वेदाच्या प्राचीन संहितांपैकी ‘चरकसंहिता’ ही आजही उपलब्ध आहे. त्यामध्ये पहिल्या अध्यायात सांगितलेले आहे, 
धर्मार्थकाममोक्षाणां आरोग्यं मूलमुत्तमम्‌ । 
रोगास्तस्यापहर्तारः श्रेयसो जीवितस्य च ।। 
प्रादूर्भूतो मनुष्याणां अन्तरायो महानयम्‌ । 

धर्म म्हणजे सर्व कर्तव्यांचे पालन करणे, अर्थ म्हणजे जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व साधनसंपत्तीची उपलब्धी असणे, काम म्हणजे इच्छा-आकांक्षांची पूर्ती होणे आणि मोक्ष म्हणजे आत्मज्ञान होणे. हे चारही पुरुषार्थ अनुभवायचे असतील तर त्यासाठी आरोग्य ही मूलभूत आवश्‍यकता असते. श्रेयस्कर अशा जीवनाचा नाश करणारे ते रोग असतात. मनुष्याच्या एकंदर विकासामध्ये, सुखामध्ये, जगण्यामध्ये रोग हे मोठे विघ्न असते. 

म्हणूनच जीवनाचा आनंद घ्यायचा असो, विद्यार्जन करायचे असो, त्यासाठी आरोग्याची शिदोरी बरोबर असावीच लागते. ध्यान-उपासना करतानासुद्धा मनाची एकाग्रता होण्यासाठी आरोग्य अत्यावश्‍यक असते. पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी फक्‍त शारीरिकच नाही, तर मानसिक आरोग्यही तेवढेच महत्त्वाचे असते. ‘सोम’ साधना करताना आरोग्याची पहिली पायरी, जी आयुर्वेदाच्या मदतीने पार करायची, ती म्हणजे ‘आरोग्यं भास्करात्‌ इच्छेत्‌.’ ‘सोम’ साधनेची माहिती घेण्याच्या निमित्ताने आरोग्यासाठी सूर्याचे योगदान, सूर्योपासनेचे महत्त्व समजून घेऊ या. 

उगवणाऱ्या सूर्याबद्दल वेदात सांगितलेले आहे, उद्यन्नादित्य कृमीन्‌ हन्ति । म्हणजे उदय होणाऱ्या सूर्यामुळे कृमी, सूक्ष्म जीवजंतू, अदृष्ट दुष्ट शक्‍ती, प्रचलित भाषेतील जीवाणू, विषाणू वगैरे नष्ट होतात. याच कारणासाठी वेदात सूर्याप्रती प्रार्थनास्वरूप मंत्र सांगितले आहेत, 
नः सूर्यस्य सदृशे ना युयोथाः । 
...ऋग्वेद 
सूर्यप्रकाशापासून आमचा कधीही वियोग न होवो. 

शरीराचा फिकटपणा, निस्तेजता कमी होण्यासाठी सूर्यकिरण उत्तम होत. लाल सूर्यकिरणांनी वाढलेल्या पित्ताचा पिवळेपणा आणि हिरवेपणा नाहीसा होतो व सौंदर्य तसेच बलाची प्राप्ती होते, निरोगी दीर्घायुष्याचा लाभ होतो, शिरोरोग दूर होतात, असेही अथर्ववेदात सांगितलेले सापडते. सूर्याचा प्रकाश जास्तीत जास्त मिळावा, विशेषतः कृमींचा नाश करण्यास समर्थ असणाऱ्या उगवत्या सूर्याचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी आयुर्वेदात चिकित्सागार (दवाखाना), सूतिकागार (बाळंतघर), कुमारागार पूर्वाभिमुख असावे असे सांगितलेले आहे. 

सूर्योपासना ही डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची असते. सूर्याचा आणि डोळ्यांचा संबंध सुचवणारी एक कथा सुश्रुतसंहितेत सांगितली आहे. जनकराजाने एकदा यज्ञात प्राण्यांचा बळी दिला; पण निरपराध प्राण्यांवर झालेला अन्याय पाहून भगवान विष्णू राजावर रागावले व त्यांनी शाप दिल्याने जनकाची दृष्टी गेली. चूक लक्षात आल्यावर जनकाने प्रायश्चित्त म्हणून कठोर तपस्या केली, तेव्हा संतुष्ट झालेल्या सूर्यदेवांनी जनकाला पुन्हा दृष्टी दिली व बरोबरीने चक्षुर्वेदाचे ज्ञानही दिले. दृष्टी तेजस्वरूप असते असे आयुर्वेदातही सांगितलेले आहे. सूर्य हे डोळ्यांचे अधिदैवत आहे असाही आयुर्वेदात उल्लेख आहे. 

सूर्योपासनेला गर्भसंस्कारातही महत्त्वाचे स्थान आहे. गर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी गर्भवती स्त्रीने उगवत्या सूर्याची पूजा करावी असे सुचवलेले आहे. 
अर्चेत्‌ आदित्यमुद्यन्तं गन्धधूपार्घ्यवार्जपैः । 
...काश्‍यप शारीरस्थान 
गर्भवती स्त्रीने उदय होणाऱ्या सूर्याची गंध, धूप, नैवेद्य तसेच जप करून पूजा करावी. गर्भवतीने अस्त होणाऱ्या सूर्याकडे पाहू नये असेही पुढे काश्‍यपाचार्य सांगतात. 
सुश्रुतसंहितेमध्ये सूर्यप्रकाशाचा उपयोग जलशुद्धीसाठी सांगितला आहे. 
व्यापन्नस्य चाग्निक्वथनं सूर्यातपप्रतापनं....। सुश्रुत सूत्रस्थान 
दूषित पाणी निर्दोष करण्यासाठी अग्नीच्या उष्णतेने कढवावे किंवा सूर्यप्रकाशात (उन्हात) कडकडीत तापवावे. 

सूर्यशक्‍तीचा संबंध आपल्या शरीरातील चेतासंस्थेच्या व हाडांच्या आरोग्याशीही असतो. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे अंधार नाहीसा झाला की निसर्ग जागा होतो व सर्वदूर उत्साह संचारतो, तसेच मेंदू व चेतातंतूंचे अभिसरण व्यवस्थित होण्यासाठी, चेतनत्व येण्यासाठीही सूर्यशक्‍तीची आवश्‍यकता असते. आधुनिक विज्ञानही हेच सांगते, की सूर्याच्या किरणांतून मिळणाऱ्या ड जीवनसत्त्वाची शरीरात कमतरता उत्पन्न झाली, जी सूर्याचे दिवसेंदिवस दर्शन न होणाऱ्या अतिथंड व बर्फाळ प्रदेशातील व्यक्‍तींमध्ये उद्भवू शकते, तर तोल जाणे, चक्कर येणे, पाठीमागे पडायला होणे वगैरे त्रास उद्‍भवू शकतात. लहान मुलांमध्ये हाडे मृदू झाल्याने हात-पाय वाकू लागले उदा. मुडदूस, तर त्यावर आधुनिक वैद्यकातही ‘सौरचिकित्सा’ म्हणजे सूर्यप्रकाशात बसवणे याच उपायाचा अवलंब केला जातो. 

आयुर्वेदाने उपचारांचे प्रकार समजावले असून त्यात ‘आतपसेवन’ म्हणजे सूर्यकिरणांत बसणे याचा समावेश केला व तो लंघनाचा एक प्रकार आहे असेही सांगितले. 
लंघनप्रकार ः आतपसेवनम्‌ । मध्यबलस्थूलमनुष्येषु स्थौल्यापनयनाय । 
...चरक सूत्रस्थान 
चांगली किंवा मध्यम ताकद असणाऱ्या स्थूल मनुष्याची स्थूलता दूर करण्यासाठी आतपसेवन उपयुक्‍त असते. 
सुश्रुतसंहितेत अजूनही फायदे सांगितले आहेत, 
दुष्टव्रणपीडितेषु कुष्ठिषु तैलपानाभ्यङ्‌गाद्‌ अनन्तरमन्तःशोधनार्थं प्रयुक्‍तश्चिकित्सोपक्रमः । 
जुना, दूषित व्रण नष्ट करण्यासाठी, त्वचारोग नाहीसा करण्यासाठी, अंतःशुद्धीसाठी केला जाणारा उपचार म्हणजे आतपसेवन होय. स्वेद उपचार समजावतानाही अनेक ठिकाणी उन्हाचा वापर केलेला आढळतो. काही मानसिक रोगांवर उपचार म्हणून उन्हात बसवावे, झोपवावे असे उल्लेख सापडतात.
एकंदरच आरोग्य टिकवताना किंवा मिळवताना सूर्याची मोठी आवश्‍यकता असते. 

‘पिंडी ते ब्रह्मांडी’ हा आयुर्वेदातील महत्त्वाचा सिद्धांत आहे. जे काही विश्वात आहे ते सर्व सूक्ष्म स्वरूपात शरीरात आहे. याच तत्त्वानुसार जसा बाह्य जगतात सूर्य आहे, तसे शरीरात पित्त आहे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. 
विसर्गादानविक्षेपैः सोमसूर्यानिलः यथा । धारयन्ति जगद्देहं कफपित्तानिलस्तथा ।। 
सूर्य जसे बाह्यसृष्टीत परिवर्तनाचे, पचनाचे काम करतो, तसेच त्याचे प्रतीकस्वरूप असणारे पित्त अन्नपचनासाठी, शरीरातील धातुपरिवर्तनासाठी जबाबदार असते. 
एवढेच नाही तर सूर्याचा आणि पित्ताचा प्रवासही एकाच पद्धतीने होत असतो. दुपारी बारा वाजता सूर्य सर्वाधिक प्रखर असतो, याच वेळी शरीरातील पाचक पित्ताची पाचनक्षमता सर्वोत्तम असते. म्हणूनच दुपारचे जेवण वेळेवर घ्यावे व चारठाव परिपूर्ण असावे असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. 

भारतासारख्या देशात सुदैवाने सूर्यप्रकाशाची कमतरता नाही. उगवत्या सूर्याला अर्घ्य देण्याची पूर्वीपासूनच प्रथा भारतीय संस्कृतीमध्ये होती. आज शब्दशः अर्घ्य देता आले नाही तरी सकाळच्या, शक्‍यतो सूर्योदयाच्या कोवळ्या उन्हात पंधरा-वीस मिनिटे बसणे अशक्‍य ठरणार नाही. बरोबरीने ध्यान, प्राणायामादी क्रिया केल्या तर दुग्धशर्करायोगच म्हणावा लागेल. 

सूर्याराधनेचे, सूर्यप्रकाशाचे याप्रकारे अनेक फायदे असले तरी तीव्र सूर्यप्रकाश पित्तदोष वाढवून आरोग्यास हानिकारक ठरू शकतो, तेव्हा दुपारच्या प्रखर उन्हापासून संरक्षणच करावे. प्रखर सूर्याकडे सरळ बघितल्याने किंवा सूर्यग्रहण बघितल्याने अंधत्व येऊ शकते, असेही आयुर्वेदात सांगितले आहे. 
डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जसे सूर्यग्रहण बघू नये, तसेच एकंदर शारीर-मानस आरोग्यासाठी सूर्यग्रहणाच्या वेळेत विशिष्ट आचरण करण्यासही सांगितलेले आहे. विशेषतः गर्भवतीने, 
सोमार्कौ संग्रहौ श्रुत्वा गर्भिणी गर्भवेश्‍मनि । शान्तिहोमपराऽसीत्‌ मुक्‍तयोगं तु याचयेत्‌ ।। 
...काश्‍यप शारीरस्थान 
सूर्यग्रहण व चंद्रग्रहण असताना गर्भगृहात म्हणजे घरामध्ये राहून शांती, होम वगैरे गोष्टी मन लावून कराव्यात व सूर्याची वा चंद्राची ग्रहणातून मुक्‍तता होण्यासाठी प्रार्थना करावी, असा उल्लेख काश्‍यपसंहितेत सापडतो.
गर्भवती स्त्री अतिशय नाजूक व संवेदनशील असल्याने तिच्यासाठी या गोष्टी जरी आवर्जून कराव्यात असे सांगितले असले, तरी आरोग्य इच्छिणाऱ्या कोणत्याही सुजाण व्यक्‍तीला याचा उपयोग नक्कीच करून घेता येईल. 
थोडक्‍यात, सूर्योपासना ही भारतीयांच्या संस्कृतीत रुजलेली आहे. सकाळी लवकर उठणे, उगवत्या सूर्याला अर्घ्यदान देणे, सूर्यनमस्कार करणे असे सूर्योपासनेचे अनेक पैलू असतात. सूर्याला अनुसरून आपलाही दिनक्रम आखला, सूर्यप्रकाशाचा युक्‍तीने वापर करून घेतला, तर आरोग्यरक्षणाचा उद्देश निश्चितपणे साध्य होईल आणि ‘सोम’ साधनेतील एक पायरीही पूर्ण होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com