आयुर्वेदातील काही त्रिसूत्री संकल्पना 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 6 December 2019

आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे. अध्यात्मशास्त्रात किंवा योगशास्त्रात एकट्या मनावर वा आत्म्यावर काम करणे सयुक्‍तिक ठरू शकते. आयुर्वेदात मात्र मन, आत्मा व शरीर या तिघांचा जोपर्यंत संयोग आहे तोपर्यंतच काम करता येते असे सांगितलेले आहे. आयुर्वेद हा कुणी एक-दोन व्यक्‍तींनी लिहिलेला नसून तो अनादी काळापासून चालत आलेला आहे आणि अनंतकाळापर्यंत टिकून राहणारा आहे, आयुर्वेदाच्या संकल्पना कालातीत आहेत. 
 

आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे. अध्यात्मशास्त्रात किंवा योगशास्त्रात एकट्या मनावर वा आत्म्यावर काम करणे सयुक्‍तिक ठरू शकते. आयुर्वेदात मात्र मन, आत्मा व शरीर या तिघांचा जोपर्यंत संयोग आहे तोपर्यंतच काम करता येते असे सांगितलेले आहे. आयुर्वेद हा कुणी एक-दोन व्यक्‍तींनी लिहिलेला नसून तो अनादी काळापासून चालत आलेला आहे आणि अनंतकाळापर्यंत टिकून राहणारा आहे, आयुर्वेदाच्या संकल्पना कालातीत आहेत. 
 

भारतीय परंपरेत अनेक देवदेवता मानलेल्या दिसतात, त्यांची उपासना, पूजा-अर्चा केली जाते, मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाते. या प्रत्येक देवदेवतेचे काही ना काही वैशिष्ट्य असते. जसे श्रीगणेश गजमुख असतात, श्रीकृष्णांच्या हातात बासरी असते, श्रीलक्ष्मी देवता कमळावर आसनस्थ असते वगैरे. श्रीदत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्या एकत्रीकरणातून तयार झालेले आणि म्हणून ‘तीन शिरे, सहा हात’ असे त्यांचे वर्णन केलेले आढळते. ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती’ असेही त्यांचे स्वरूप समजावलेले दिसते. अत्रि ऋषी आणि माता अनसूया यांच्या घरी प्रकटलेले श्रीदत्तात्रेय आयुर्वेदाच्या ऋषी परंपरेच्या जवळचे असतात. श्रीधन्वंतरींच्या हातातील शंख, चक्र ही आयुधे श्रीदत्तात्रेयांच्याही हातात असतात. लवकरच श्रीदत्तजयंती साजरी होणार आहे. त्रिमूर्ती स्वरूप असणाऱ्या श्रीदत्तात्रेयांच्या स्मरणाच्या बरोबरीने तिनाच्या संख्येत असणाऱ्या आयुर्वेदातील काही महत्त्वाच्या संकल्पनांची माहिती घेऊ या. 
चरकसंहितेच्या अगदी पहिल्या अध्यायात आयुर्वेदाची त्रिसूत्री सांगितलेली आहे ती अशी, 
हेतु लिङ्घौषधज्ञानं स्वस्थातुरपरायणम्‌। त्रिसूत्रं शाश्वतं पुण्यं बुबुधे यं पितामहः।।...चरक सूत्रस्थान 

स्वस्थ तसेच रोगी व्यक्‍तींसाठी उत्तम मार्गदर्शन करणारा, हेतू (कारण), लिंग (लक्षणे), औषध (उपचार) यांचे ज्ञान करून देणारा असा त्रिसूत्र आयुर्वेद ब्रह्मदेवांनी जाणला. 

या छोट्याशा श्लोकात जणू संपूर्ण आयुर्वेद सार-स्वरूपात सांगितला आहे. रोग होऊ नये तसेच रोग बरा होण्यासाठीसुद्धा आयुर्वेद तितकाच महत्त्वाचा आहे हे या श्लोकात सांगितले आहे. 
रोग होऊ नये म्हणून दिनचर्या, ऋतुचर्या, सद्‌वृत्त यांच्या रूपाने मार्गदर्शन केले आहे, तर रोग झाल्यावर रोगाचे कारण शोधून ते टाळणे, रोगाची संप्राप्ती समजून घेणे व ती संप्राप्ती मोडून पुन्हा शरीरात संतुलन स्थापण्यासाठी उपचार करणे याविषयीचे वर्णन केलेले आहे. आयुर्वेदाचा अभ्यास करणे, आयुर्वेदाची जीवनशैली जगणे हे पुण्यकारक आहे हेसुद्धा यातून समजते. आयुर्वेद हा कुणी एक-दोन व्यक्‍तींनी लिहिलेला नसून तो अनादी काळापासून चालत आलेला आहे आणि अनंतकाळापर्यंत टिकून राहणारा आहे, आयुर्वेदाच्या संकल्पना कालातीत आहेत हेसुद्धा या श्लोकात सांगितले आणि आयुर्वेद स्वर्गातून या पृथ्वीतलावर आला, सृष्टीची उत्पत्ती करणाऱ्या ब्रह्मदेवांनीसुद्धा त्याचे फक्‍त स्मरण केले हेसुद्धा यात सांगितले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आयुर्वेदाची त्रिसूत्री समजावली. या त्रिसूत्रीच्या आधारावरच आयुर्वेद स्वतःचे शाश्ततत्त्व टिकवून आहे. कालपरत्वे कितीही नवनवीन रोग आले, अवघड समस्या उद्‍भवल्या तरी जर आयुर्वेदाच्या त्रिसूत्रीचा आधार घेतला तर त्यावर उत्तर मिळतेच. 

त्रिसूत्रीप्रमाणे आयुर्वेदात ‘त्रिदंड’सुद्धा सांगितलेले आहेत. हे संपूर्ण विश्व तसेच प्रत्येक स्वतंत्र व्यक्‍ती तीन आधारभूत दंड म्हणजेच त्रिदंड होत. ज्याप्रमाणे श्रीशंकरांच्या पिंडीवर अभिषेक करणासाठी अभिषेकपात्र तीन पायांच्या त्रिपादिकेवर ठेवले जाते. ही त्रिपादिका तिच्यावर ठेवलेल्या पाण्याच्या वजनाचा भार समर्थपणे सांभाळते, त्याप्रमाणे या समस्त लोकाचा व पुरुषाचा भार हे त्रिदंड सांभाळत असतात. 

सत्त्वमात्मा शरीरं च त्रयमेतत्‌ त्रिदण्डवत्‌। लोकस्तिष्ठति संयोगात्‌ तत्र सर्वं प्रतिष्ठितम्‌।।...चरक सूत्रस्थान 

सत्त्व (मन), आत्मा व शरीर हे त्रिदंडाप्रमाणे होत. जोपर्यंत हे भरभक्कमपणे आधार देण्याचे काम करतात तोपर्यंत जीवन चालते. यांच्यावरच सर्व काही अवलंबून आहे. 
आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे.

अध्यात्मशास्त्रात किंवा योगशास्त्रात एकट्या मनावर वा आत्म्यावर काम करणे सयुक्‍तिक ठरू शकते. आयुर्वेदात मात्र मन, आत्मा व शरीर या तिघांचा जोपर्यंत संयोग आहे तोपर्यंतच काम करता येते असे सांगितलेले आहे. येथेही पहिला आधार मनाचा सांगितलेला आहे, कारण व्यवहारात किंवा जीवन जगताना मनाने संयुक्‍त आत्माच अर्थपूर्ण असतो. शरीरातील आत्मा निघून गेला, मनादी सूक्ष्म तत्त्वे वेगळी झाली की अस्तित्व संपुष्टात येते. आणि अशा अवस्थेत जीवनाचे शास्त्र कामाला येत नाही. 

आयुर्वेदात त्रिस्रैषणा म्हणजे तीन एषणा अर्थात तीन इच्छासुद्धा सांगितल्या आहेत, ज्या व्यक्‍तीचे मन, बुद्धी, पुरुषार्थ म्हणजेच कर्तव्य यथाव्यवस्थित पार पाडण्याची शक्‍ती व पराक्रम या गोष्टी शाबूत असतात त्यांना या तीन एषणा असतात. थोडक्‍यात खऱ्या अर्थाने जीवन जगण्यासाठी या एषणा मनुष्यमात्राला प्रेरित करत असतात. या एषणा कोणत्या? 
तद्यथा प्राणैषणा, धनैषणा, परलोकैषणा इति। ...चरक सूत्रस्थान 
प्राण एषणा, धन एषणा व परलोक एषणा या तीन एषणा सांगितल्या आहेत. 
प्राण एषणा - म्हणजे जगण्याची, जीव वाचविण्याची इच्छा. ही इच्छा जन्माला आलेल्या 
प्रत्येक सजिवाला असते व ती अत्यंत उत्स्फूर्त असते. रोजचे जीवन जगताना, कळत-नकळत आपण ही एषणा अव्याहतपणे पूर्ण करत असतो. जीवनाच्या उत्क्रांतीमध्ये अगदी खालच्या थराला असणाऱ्या प्राणी-पक्ष्यांना, जीवजंतूंनाही जीवन शाबूत ठेवण्यासाठी करायची धडपड अंगभूतच असते. उदा. जन्माला आलेल्या बालकाला जसा श्वास घ्यायला शिकवावा लागत नाही तसेच माशाच्या किंवा कासवाच्या पिलाला पोहायचे कसे हे उपजतच माहीत असते. सरड्यासारख्या प्राण्यांना आपला रंग बदलण्याची असलेली सोय किंवा काही वनस्पतींना जवळ आलेला किडा किंवा कीटक पानामध्ये गपकन बंद करून खाऊन टाकण्याची सोय निसर्गाने दिलेली असते, ती प्राण-एषणेचाच एक भाग असतो. बहुतेक वेळेला ही क्रिया इतकी उत्स्फूर्तपणे घडते की ती इच्छेमुळे केलेली आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. पण डोळ्यात चुकून जाणाऱ्या बोटामुळे इजा होऊ नये म्हणून निमिषार्धात डोळा मिटला जातो तेव्हा ती क्रिया प्राण एषणेमुळेच होत असते. अन्न शोधण्याची, खाण्याची इच्छा, त्रास होणाऱ्या गोष्टीपासून दूर होण्याची इच्छा, भीती, प्रतिकार करण्याची, एखाद्या गोष्टीला विरोध करण्याची प्रवृत्ती, विरोध करणे शक्‍य नसल्यास नमते घेण्याची प्रवृत्ती या सर्वांचा प्राण एषणेत समावेश होतो. 

प्राण एषणेनंतर दुसरी येते ती धन-एषणा. कारण, 
प्राणेभ्यो ह्यनन्तरं धनमेव पर्येष्टव्यं भवति।...चरक सूत्रस्थान 

म्हणजे प्राण राहिले की जीवन जगण्यासाठी, जीवनातील व्यवहार करण्यासाठी, जीवनाचा आनंद घेण्यासाठी धनाची, संपत्तीची गरज असते आणि या धनप्राप्तीसाठी योग्य साधनांची आवश्‍यकता असते. 
धन-एषणेच्या संबंधात अजून एक गोष्ट आयुर्वेदात तसेच इतरही भारतीय शास्त्रात सांगितलेली आहे, ती अशी, 
न ह्यतः पापात्‌ पापीयोऽस्ति यदनुपकरणस्य दीर्घमायुः।...चरक सूत्रस्थान 
दीर्घायुष्य आहे, जीवन आहे पण ते अनुभवण्यासाठी, जीवनाचा आनंद घेण्यासाठी आवश्‍यक साधनसामग्री नसण्यासारखे दुसरे मोठे पापाचे फळ नाही. म्हणूनच धनप्राप्तीसाठी योग्य वेळी, योग्य ते प्रयत्न केले पाहिजेत. 

चरकसंहितेत धनप्राप्तीचे काही उपाय उदाहरणादाखल दिलेले आहेत, कृषी (शेती करणे), पशुपाल्य (गाय, म्हैस वगैरे मनुष्योपयोगी प्राण्यांचे पालन करणे), वाणिज्य (व्यापार करणे), राजोपसेवा (नोकरी करणे) वगैरे. याखेरीज विद्यापार्जन, भिक्षुकी, वैद्यकी यांसारखा इतर कोणताही व्यवसाय असू शकतो, पण तो असा असावा की ज्याची चांगले लोक निंदा करणार नाहीत, असेही चरकाचार्य स्पष्ट करतात. व्यवसाय असा असावा की ज्यामुळे जीवन व्यवस्थित जगता येईल, संपत्ती, घर-दार यांची समृद्धी उपलब्ध होईल, पण प्रतिष्ठाही कायम राहील. पैसा खूप आहे, पण प्रतिष्ठा पाठीशी नाही, हे आयुर्वेदाला संमत नाही. 

धन हा शब्द या ठिकाणी फक्‍त पैसा, संपत्ती या अर्थाने वापरलेला नाही तर मुले-बाळे, धान्य, इतर जीवनावश्‍यक गोष्टीही एक प्रकारे धनातच मोडतात. ज्याप्रमाणे संपत्तीरूपी धनाला प्रतिष्ठेचे पाठबळ हवे तसेच इतर धनाला म्हणजे संतानरूपी धनाला, धान्यरूपी धनाला किंवा इतर कोणत्याही जीवनावश्‍यक धनाला संपन्नतेची जोड हवी व ही संपन्नता लाभण्यासाठी योग्य ते प्रयत्न अवश्‍य करावेत. उदा. उत्तम अपत्यासाठी स्त्री-पुरुषांनी अगोदरपासून स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे, गर्भावस्थेपासून योग्य संस्कार करणे किंवा जीवनावश्‍यक गोष्टी शुद्ध स्वरूपात व उत्तम प्रतीच्या उपलब्ध होतील यासाठी सतर्क राहणे, राहण्या-वागण्याला, आचार-विचारांना संस्कारांची जोड देणे वगैरे गोष्टी जीवनात समाविष्ट करता आल्या तर धन-एषणा खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकेल. 

यानंतर येते परलोक एषणा
अर्थात देहत्याग केल्यानंतर, जिवाची पुढची वाटचाल योग्य दिशेला व्हावी, कर्मानुसार पुनर्जन्म मिळायचा असला तर तो चांगला म्हणजे स्वतःची उन्नती करण्यास पोषक असा मिळावा किंवा स्वर्गप्राप्ती व्हावी ही जिवाची मूळ इच्छा म्हणजे "परलोक एषणा'. चरकसंहिता लिहिली गेली त्या किंवा त्याच्या आधीच्या काळातही परलोक, पुनर्जन्म वगैरे विषयांबद्दल काही लोकांच्या मनात शंका, अविश्वास होता म्हणूनच चरकाचार्य म्हणतात; 
अथ तृतीयां परलोकैषणामापद्येत्‌। संशयश्चात्र, कथं? भविष्याम इतरश्‍च्युता न वेति, कुतः पुनः संशय इति। 
तिसऱ्या परलोक एषणेविषयी मात्र मनात संशय उत्पन्न होतो. कारण इहलोकाचा म्हणजेच देहत्याग केल्यानंतर पुन्हा जन्म घेणार किंवा नाही याविषयी संदेह असतो. 
पुनर्जन्म असतो व तो या जन्मात केलेल्या बऱ्या-वाईट कर्मानुसार चांगला किंवा वाईट, सुखयुक्‍त किंवा दुःखयुक्‍त असा मिळणार असतो हे एकदा पटले की साहजिकच चांगल्या कर्माची आवश्‍यकता ध्यानात येऊ शकते. ही परलोक एषणा होय. परलोक एषणा पूर्ण करण्यासाठी ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम या चारही चारही पुरुषार्थांचे यथायोग्य पालन करायला सांगितलेले आहे. 

गुरुशुश्रुषायाम्‌ अध्ययने व्रतचर्यायाम्‌ - गुरुंची सेवा करणे, त्यांनी दाखविलेल्या मार्गाचे अनुकरण करणे, विद्येचे अध्ययन करणे, व्रत, अनुशासन अंगी बाणवणे. 
दारक्रियायां अपत्योत्पादने भृत्यभरणे अतिथिपूजायां दाने अनभिध्यायाम्‌ - योग्य वेळी गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून संपन्न, निरोगी अपत्यास जन्म देणे, पदरीच्या व हाताखालच्या लोकांचे भरणपोषण करणे, अतिथीचे स्वागत करून त्याला शक्‍य ती मदत करणे, यथाशक्‍ती व योग्य ठिकाणी दान देणे तसेच दुसऱ्याचे धन घेण्यास, काम न करता आयता मिळणारा मोबदला स्वीकारण्यास नकार देणे. 

तपसि अनसूयायां देहवाङ्‌मानसे कर्मणि अक्‍लिष्टे - तपस्या करणे, असूया त्यागणे, शारीरिक व मानसिक कर्म करत राहणे. यालाच अपेक्षारहित समाजसेवा करणे, सत्कृत्य करणे, समाजाच्या भल्यासाठी व इतरांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या संस्थांसाठी विनामोबदला काम करणे, समाज संघटित राहण्यासाठी दुष्प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी प्रयत्न करणे या पुरुषार्थाची जोड द्यावी. थोडक्‍यात स्वतःच्या मर्यादित कुटुंबाच्या बाहेर पडून समाजरूपी मोठ्या कुटुंबासाठी काम करणे म्हणजे वानप्रस्थाश्रम स्वीकारणे होय. 

देहेन्द्रियमनःअर्थबुद्‌ध्यात्मपरीक्षायां मनःसमाधौ इति - शरीर, इंद्रिय, मन, विषय, बुद्धी, आत्मा यांची परीक्षा करून या सर्वांचे वास्तव स्वरूप समजून घेऊन मनास समाधी अवस्थेपर्यंत नेण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे मनाचे संतुलन टिकविणे; आसपासच्या इतर लहान-मोठ्या व्यक्‍तींचे कालमानानुसार, सांप्रतकाळच्या सामाजिक, आर्थिक व्यवस्थेनुसार वेगवेगळे समज असू शकतात, तेव्हा त्यात लुडबूड न करणे; परस्वाधीनता येणार नाही, नुसती शारीरिकच नाही तर मानसिक स्वाधीनता कायम राहण्यासाठी प्रयत्नरत राहणे; हे संन्यासाश्रमाचे प्रत्यक्ष स्वरूप होय. 

या प्रकारे जीवनात वेळेवर योग्य त्या गोष्टींचा अवलंब केला, त्या त्या अवस्थेत आवश्‍यक ती सर्व कर्तव्ये पार पाडली तर त्यामुळे इहलोकातही सुख, यश, कीर्तीचा लाभ होतो व नंतरही स्वर्गप्राप्ती होते. 

अशा प्रकारे आयुर्वेदाची त्रिसूत्री, त्रिदंड आणि त्रिस्रैषणा या विषयीची थोडक्‍यात माहिती आपण पाहिली. सद्‍गुरू श्रीदत्तात्रेय जसे भवसागर तरून जाण्यास मदत करतात तसेच आयुर्वेदातील या संकल्पना समजून घेतल्या तर आरोग्याचा अनुभव घेता येईल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Some Trilogy concepts in Ayurveda article written by Dr Shree Balaji Tambe