सोमसाधना : ज्ञानाची उपासना 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 27 December 2019

मन जेवढे शुद्ध ठेवू, समाधानी ठेवू, मनावर जेवढे चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करू, तेवढी प्रज्ञा संपन्न राहील. त्यादृष्टीने मनोवृत्ती संयमित करून मन शुद्ध ठेवण्यासाठी अष्टांगयोगाचा उपयोग, सात्त्विक आहार, आयुर्वेदोक्त सदवृत्ताचे आचरण, स्वास्थ्यसंगीत व मंत्रांचे श्रवण-पठण, ॐ कार उपासना हे सर्व महत्त्वाचे होय. 

मन जेवढे शुद्ध ठेवू, समाधानी ठेवू, मनावर जेवढे चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करू, तेवढी प्रज्ञा संपन्न राहील. त्यादृष्टीने मनोवृत्ती संयमित करून मन शुद्ध ठेवण्यासाठी अष्टांगयोगाचा उपयोग, सात्त्विक आहार, आयुर्वेदोक्त सदवृत्ताचे आचरण, स्वास्थ्यसंगीत व मंत्रांचे श्रवण-पठण, ॐ कार उपासना हे सर्व महत्त्वाचे होय. 

ज्ञानाचा अविनाशी स्रोत म्हणजे वेद. वेदाची परंपरा असणाऱ्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञानोपासना सर्वश्रेष्ठ असणारच. जगण्यासाठी आरोग्य हवे, धन-समृद्ध हवी हे खरे, पण जीवनात समाधान हवे असेल, मनःशांती हवी असेल तर त्यासाठी ज्ञानप्रतिष्ठा अत्यावश्‍यक असतेच. चरकसंहितेतील या सूत्रावरून हे समजू शकते. 
प्रशाम्यत्यौषधैः पूर्वो दैवयुक्‍तिव्यपाश्रयैः । 
मानसो ज्ञानविज्ञानधैर्यस्मृतिसमाधिभिः ।। 

शारीरिक दोष किंवा रोग हे औषधांनी किंवा दैवव्यपाश्रय चिकित्सेच्या म्हणजे दान, यज्ञ, सेवा, जप वगैरेंच्या मदतीने बरे करता येतात. मात्र मनाच्या आरोग्यासाठी किंवा मानसिक रोगावर उपचार करण्यासाठी ज्ञान, विज्ञान, धैर्य, स्मृती आणि समाधी यांचा वापर करून घ्यावा लागतो. 

या ठिकाणी ज्ञान म्हणजे आत्मविज्ञान, 'स्व'शी संवाद साधण्याचे, 'स्व'ला समजून घेण्याचे विज्ञान होय. तर विज्ञान म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रांचे अध्ययन होय. यावरून लक्षात येते की, उपजीविकेसाठी अभ्यास करायच्या शास्त्राच्याही आधी 'स्व'चे ज्ञान असणे गरजेचे समजलेले आहे. 

'सोम' उपासनेची तिसरी पायरीसुद्धा हीच आहे. आत्मविश्वास, उत्साह, यश, सुख, समाधान या गोष्टी कोणाला नको असतात? जीवन खऱ्या अर्थाने जगायचे तर त्यासाठी हे सर्व लागतेच. फक्‍त पैशांनी हे सगळे मिळत नाही हेसुद्धा आपण जाणतो. म्हणून सोम उपासनेत, इतर सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये ज्ञानप्रतिष्ठा महत्त्वाची आहे. ज्ञान-विज्ञानाची प्रेरणा आतून यावी लागते आणि त्यासाठी कारणीभूत असते प्रज्ञा. आयुर्वेदात प्रज्ञा संकल्पना विस्ताराने समजावलेली आहे. प्रज्ञा जोपर्यंत संपन्न असते तोपर्यंत व्यक्‍ती सर्व बाजूंनी यशस्वी जीवन जगू शकते. हुशारी, कल्पकता, चाणाक्षता, उत्कट संवेदनशीलता, विवेकशक्‍ती, समोरच्यावर प्रभाव टाकण्याची क्षमता, प्रसंगावधान राखून अचूक व पटकन योग्य निर्णय घेण्याची ताकद, खरे-खोटे, चांगले-वाईट हे पारखण्याची शक्‍ती 'संपन्न प्रज्ञा' देत असते. मात्र याच प्रज्ञेमध्ये बिघाड झाला तर त्यातून उद्भवणारा प्रज्ञापराध सर्व दोषांचा प्रकोप करण्यास समर्थ असतो. 

मेधा म्हणजे आकलनशक्‍ती, स्मृती म्हणजे स्मरणशक्‍ती, बुद्धी म्हणजे नेमके ज्ञान होण्याची, अचूक निश्चयापर्यंत घेऊन जाण्याची क्षमता आणि धृती किंवा धैर्य म्हणजे संयमनशक्‍ती. हे सर्व प्रज्ञेचे निरनिराळे पैलू आहेत. आत्मज्ञान असो किंवा व्यावहारिक ज्ञान, शास्त्राभ्यास असो, त्यासाठी प्रज्ञा प्रगल्भ असणे आवश्‍यक असते. आयुर्वेदात यादृष्टीने उपायही सुचवलेले आहेत. ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यापासून मडके बनणार आहे, कुंडी बनणार आहे, सुरई बनणार आहे का फुले ठेवण्यासाठी फुलदाणी बनणार आहे हे कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देताना ठरत असते, त्याप्रमाणे ज्ञानोपासनेसाठी सर्वांत महत्त्वाची असणारी प्रज्ञा गर्भावस्थेत चांगल्या प्रकारे संस्कारित करता येऊ शकते. म्हणूनच गर्भसंस्कार हा प्रज्ञा विकासाचा सर्वोत्कृष्ट मार्ग समजला जातो. यात गर्भधारणेपूर्वीच स्त्री-पुरुषांनी आहार-आचरणात घ्यायची काळजी, वीर्यशक्‍ती, बीजशक्‍ती व ओजतत्त्वाची ताकद वाढविण्यासाठी रसायनांचे सेवन, गर्भारपणात 'प्रज्ञा' साकार होत असताना स्त्रीने घ्यायचा विशेष आहार, प्रज्ञावर्धक घृते, रसायने यांचे सेवन, विशिष्ट संगीत, मंत्र यांचे श्रवण या सर्वांचा अंतर्भाव होतो. यानंतर बाळ जन्माला आल्यानंतरच्या पहिल्या काही महिन्यांतही मेधा, बुद्धी, स्मृती वगैरेंचा विकास होण्याचे काम चालू असते. तेव्हाही आयुर्वेदाने काही विशिष्ट उपचार सुचवले आहेत. 
सुवर्णप्राशनं ह्येतन्मेधाग्निबलवर्धनम्‌ । 
मासात्‌ परममेधावी व्याधिभिर्न च धृष्यते । 
षड्भिर्मासैः श्रुतधरः सुवर्णप्राशनात्‌ भवेत्‌ ।। 

....काश्‍यपसंहिता 
बाळ जन्माला आल्यावर थोड्याशा मध-तुपासह किंवा नुसत्या मधासह सोने उगाळून दिल्यास बाळाची मेधा वाढण्यास तसेच अग्नी, बल वाढण्यास मदत होते, याप्रमाणे महिनाभर रोज नियमितपणे सुवर्ण चाटवल्यास बाळ 'परममेधावी' म्हणजे उत्तम आकलनशक्‍ती असणारे होते. तर सहा महिने चाटवल्यास एकदा ऐकलेले लक्षात ठेवणारे म्हणजे स्मृतिसंपन्न होते. 

याखेरीज आयुर्वेदात ब्राह्मी, वेखंड, शतावरी, कुष्ठ, वटांकुर वगैरे प्रज्ञावर्धक औषधांपासून अनेक सिद्ध घृते, रसायने तयार करायला सांगितलेली आहेत, ज्यांच्यामुळे बालक मेधा-स्मृती-बुद्धिसंपन्न होणे शक्‍य होते. मोठ्या मुलांना प्रज्ञावर्धनासाठी केशर, सोन्याचा वर्ख, शतावरी वगैरे बुद्धिवर्धक, स्मृतिवर्धक औषधांनी तयार केलेल्या 'अमृतशर्करा'सह रोज पंचामृत देणे हा एक उत्तम उपाय होय. याशिवाय शंखपुष्पी, गुडूची, यष्टीमधू वगैरे मेधावर्धक द्रव्यांपासून तयार केलेली 'ब्रह्मलीन सिरप', 'ब्रह्मलीन घृत' अशी रसायने देता येतात. 

बुद्धी-मेधावर्धनासाठी जे काही इतर उपाय आयुर्वेदाने सुचवलेले आहेत ते असे- 
सतताध्ययनं वादः परतन्त्रावलोकनं तद्‌ विद्याचार्य सेवा चेति बुद्धिमेधाकरो गणः । 
...सुश्रुत चिकित्सास्थान 
नियमित अभ्यास करणे, सहकाऱ्यांबरोबर किंवा मित्रमैत्रिणींबरोबर त्याबाबत चर्चा करणे, ज्या शास्त्राचा अभ्यास करावयाचा आहे त्याला सहायक अशा इतर विषयांचे अवलोकन करणे, त्या शास्त्रातील पारंगत व्यक्‍तींची व आचार्यांची सेवा करणे यामुळे बुद्धी-मेधावर्धन होते. आजच्या आधुनिक काळात अशी गुरुजनांची, आचार्यांची प्रत्यक्ष सेवा करणे जरी शक्‍य झाले नाही तरी त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणे, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्याबद्दल मनात आदराची भावना ठेवणे एवढे तरी नक्कीच करता येण्यासारखे आहे. 
मेधा, बुद्धी, स्मृती या सर्व गोष्टी मन आणि मेंदूशी संबंधित असल्याने मन व मेंदूला ज्या ज्या गोष्टींनी जडपणा येईल त्या सगळ्या टाळणे आवश्‍यक होय. उदा. दिवसा झोपल्याने किंवा सकाळी फार उशिरा उठल्याने किंवा दिवसभर नुसतेच बसून राहिल्याने शरीरातील चैतन्य जड होऊन बुद्धी, स्मृती वगैरेही निस्तेज व जड होऊ शकतात. व्यवहारात आपण 'जडबुद्धी' असा शब्दप्रयोगही वापरतो. त्यामुळे सुस्ती आणणाऱ्या सर्व गोष्टी टाळणे, उलट सकाळी लवकर उठून तना-मनाला स्फूर्ती देईल, प्रेरणा देईल असे सूर्यनमस्कारासारखे योगासन करणे, ॐकार म्हणणे, मोकळ्या हवेत फिरायला जाणे हे चांगले. 

चेतासंस्था-मज्जासंस्था म्हणजे मेंदू, मेरुदंड आणि त्यातून संपूर्ण शरीराला चेतनेचा पुरवठा करणारे मज्जातंतू हे सर्व जितके संपन्न राहतील, उत्तम प्रकारे कार्यक्षम राहतील तितकी प्रज्ञा संपन्न राहण्यास मदत मिळेल. त्यादृष्टीने पाठीच्या कण्याला खालून वर या दिशेने प्रज्ञावर्धक व मज्जासंस्थेस बलदायक औषधांनी सिद्ध 'कुंडलिनी तेला'चा अभ्यंग करणे उत्तम होय. याने संपूर्ण मज्जासंस्थेचे पुनर्जीवन होऊन प्राणाचे मेंदूपर्यत अभिसरण सहजतेने होण्यास हातभार लागतो आणि प्रज्ञावर्धन होते. 

मेंदूची ताकद वाढावी, इंद्रिये कार्यक्षम राहावीत, आपापले आकलनाचे काम योग्य प्रकारे करत राहावीत यादृष्टीने रात्री झोपताना नाकात साजूक तुपाचे थेंब टाकणे, आठवड्यातून एक-दोन वेळा पादाभ्यंग करणे, डोक्‍याला, विशेषतः टाळूला, तेल लावणे. घरचे ताजे लोणी-खडीसाखर, तसेच आयुर्वेदिक साजूक तुपाचे नियमित सेवन, शतावरी कल्प, 'चैतन्य'कल्प टाकून घेतलेले एक-दोन कप दूध, भिजवलेले चार-पाच बदाम यांचाही उपयोग होतो. याशिवाय प्रज्ञावर्धनाचा सर्वात प्रभावी व नेमका उपाय आयुर्वेदाने सांगितला तो असा - 
मनःशुद्धौ बुद्धिप्रसादः ।....सुश्रुत चिकित्सास्थान 

धृतिः मनःसन्तुष्टिः ।।....सुश्रुत सूत्रस्थान 
अर्थात मन जेवढे शुद्ध ठेवू, समाधानी ठेवू, मनावर जेवढे चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करू, तेवढी प्रज्ञा संपन्न राहील. त्यादृष्टीने मनोवृत्ती संयमित करून मन शुद्ध ठेवण्यासाठी अष्टांगयोगाचा उपयोग, सात्त्विक आहार, आयुर्वेदोक्त सद्वृत्ताचे आचरण, स्वास्थ्यसंगीत व मंत्रांचे श्रवण-पठण, ॐ कार उपासना हे सर्व महत्त्वाचे होय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Somsadhana : Worship of Knowledge article written by Dr Shree Balaji Tambe