सोमयोग (4) : मोक्षम्‌ इच्छेत्‌ जनार्दनात्‌ 

Somyog (4) : Moksham Ichchet Janardanaat
Somyog (4) : Moksham Ichchet Janardanaat

विस्तारलेले जग, त्यात असलेली आर्टिफिशियल इंटेलिजन्सची शक्‍ती आणि एकूण बाहेर घडणाऱ्या सर्व घटना किंवा सुख मिळवायची बाह्यसाधने वाढलेली आहेत. यात आपल्याला टिकायचे असले तर मेंदूची वेगळ्या प्रकारे तयारी करावी लागेल. या तयारीला आपण प्रज्ञेकडे वाटचाल अशी संज्ञा देणे योग्य ठरेल. येथे नुसती स्मृती उपयोगाची नाही, नुसती बुद्धी उपयोगाची नाही, नुसते ज्ञान उपयोगाचे नाही, नुसता विवेक उपयोगाचा नाही, नुसती निर्णायक क्षमता उपयोगाची नाही. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण जगाची एकसंध कल्पना व एकसंध दृष्टी तयार झाली पाहिजे. तरच प्रज्ञा जागृत आहे असे म्हणता येईल. 
 

आत्तापर्यंत आपण सोमयोगाचे तीन भाग पाहिले. सोमयोगाची चौथी प्राप्ती "मोक्षम्‌ इच्छेत्‌ जनार्दनात्‌" ही आहे. मोक्ष ही एक दृष्टी आहे. समत्वाची दृष्टी आल्याशिवाय मोक्ष मिळत नाही. येथेही आपल्याला "समत्वं योग उच्यते" किंवा समदोष, सम अग्नि, समधातु व सममलक्रियःहे सगळे दिसतेच. सुख-दुःख हे आपण त्याकडे कसे पाहतो यावर अवलंबून असते. अडचणी व त्यातून काढायचा मार्ग हेही आपल्या पाहण्यावर अवलंबून असते. सौंदर्य-कुरूपता हेही आपण त्याकडे कसे पाहते यावर अवलंबून आहे. पाहण्याची दृष्टी बदलण्यासाठी चष्म्याची आवश्‍यकता नसते. आपल्या जाणिवेशी, आतल्या आत्म्याशी, परमात्म्याशी संपर्क असावा लागतो. आपल्याला जेव्हा "स्व'शी बोलता येते, आपल्याला ज्यावेळी स्वस्वरूपाची जाणीव होते, ज्यावेळी आपल्याला स्व बरोबर संवाद साधून आपल्याला दिशा ठरविता येते.

आपल्या आत असलेल्या निर्गुण, निराकार, सच्चिदानंद अशा तत्त्वाशी अनुसंधान व्हायला पाहिजे, या तत्त्वाच्या आधारावरच आपले जीवन चालले पाहिजे याची जाणीव होणे ही मोक्षाचा पहिली पायरी म्हणायला हरकत नाही. मोक्ष ही खूप मोठी शक्‍ती आहे. म्हणून मोक्षसाधना एका दिवसात होत नाही. हलके हलके शरीर व मेंदूची तयारी करावी लागते ज्यायोगे ही अत्युच्च शक्‍ती तेथे अधिष्ठित होऊ शकेल. सध्या मेंदूची कार्यक्षमता वाढत आहे. मेंदूकडून तयार करवलेल्या, जणू मेंदूची बाह्य प्रतिकृती असलेल्या संगणकाकडून काम करून घेण्याची सध्या सुरुवात झालेली आहे. अतिशय वेगाने निर्णय घेण्याची क्षमता असलेले, जवळजवळ सर्व जगाचे ज्ञान ज्यात साठवता येईल असे संगणक तयार होत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी उडणारी विमाने आपल्या कक्षेत बरोबर जात आहे की नाही हे एका क्षणात तपासण्यासाठी संगणक निघालेले आहेत. ठरविलेल्या वेळेवर चालू होऊन घरातल्या कानाकोपऱ्यात जाऊन घरातील कचरा गोळा करून पुन्हा आपल्या चार्जिंग स्टेशनला जोडले जाणारे रोबो संगणक तयार झालेले आहेत. हे सर्व आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अशा सदरात निर्माण झालेले आहे. आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून घ्यायचा असेल तर आपली समज तेवढीच वाढवावी लागेल. एखाद्या संगणकाचा उपयोग टाईपरायटरसारखा केला तर त्यात संगणकाचा काही दोष नसतो. 

आपल्या मेंदूची तयारी आपल्याला वेगळ्या प्रकारे करावी लागणार आहे. कारण हे विस्तारलेले जग, त्यात असलेली आर्टिफिशियल इंटेलिजन्सची शक्‍ती आणि एकूण बाहेर घडणाऱ्या सर्व घटना किंवा सुख मिळवायची बाह्यसाधने वाढलेली आहेत. यात आपल्याला टिकायचे असले तर मेंदूची वेगळ्या प्रकारे तयारी करावी लागेल. या तयारीला आपण प्रज्ञेकडे वाटचाल अशी संज्ञा देणे योग्य ठरेल. येथे नुसती स्मृती उपयोगाची नाही, नुसती बुद्धी उपयोगाची नाही, नुसते ज्ञान उपयोगाचे नाही, नुसता विवेक उपयोगाचा नाही, नुसती निर्णायक क्षमता उपयोगाची नाही. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण जगाची एकसंध कल्पना व एकसंध दृष्टी तयार झाली पाहिजे. तरच प्रज्ञा जागृत आहे असे म्हणता येईल. हा प्रवास नीट झाला नाही तर शारीरिक विकार, मेंदूचे विकार, विषाद वा क्रोध वाढून मनुष्यात आक्रमकता किंवा आततायीपणा निर्माण होऊ शकतो, जीवन एकलकोंडेपणात घालवावे लागू शकते व मानसिक विकार अधिक होऊ शकतात. म्हणून "मोक्षम्‌ इच्छेत्‌ जनार्दनात्‌" हे लक्षात ठेवून त्यानुसार तयारी करणे आवश्‍यक असते. कुठल्याही साधनेला, मग तो कुठल्यातरी मंत्राचा जप असो, पूजा-अर्चा असो, "मोक्षम्‌ इच्छेत्‌ जनार्दनात्‌"ची जोड दिल्याशिवाय आरोग्य, सुख, समृद्धी मिळणे अवघड दिसते. 

"जनार्दन' हा शब्द लोक-जन-मनुष्यमात्र यासाठी वापरलेला आहे. प्रत्येक मनुष्यमात्रात, चराचरांत परमेश्वर विभागला गेलेला आहे. दगडातही परमेश्वर असतो, पण तो पाहण्यासाठी भारतीय परंपरेची ताकद व दृष्टी असावी लागते. फुले-फळ-झाडे यांच्यात असलेला परमेश्वर थोड्या-फार अंशांनी कळू शकतो. कारण यांच्यात कार्यशक्‍ती असल्याचे आपण पाहू शकतो. प्राणीमात्र तर मनुष्यमात्रांच्या जवळ असल्याने त्यांच्यात परमेश्वर पाहणे सोपे असते. हिमालयासारख्या एखाद्या पर्वतालाच परमेश्वरी पूजेचा मान मिळतो. गंगा, यमुना, नाईल अशा मोजक्‍या नद्यांना देवाची उपमा दिली जाते. तुळशी, वटवृक्ष, मांदार, आवळा वगैरे झाडांची पूजा केली जाते व झाडांमध्ये देव पाहणे काही अंशी साधलेले दिसते. गाय, घोडा, हत्ती, मोर वगैरे प्राण्यांची पूजा झालेली दिसते. पुढे मनुष्यामात्राचा विचार करत असता संभ्रम उत्पन्न झालेला दिसतो. कारण पाहणाऱ्या व्यक्‍तीला समोरचा मनुष्य आपल्यासारखाच वाटतो, त्याच्यात परमेश्वर आहे हे पाहणे जड जाते. पण खरे पाहता समोरच्यात परमेश्वर दिसला तर स्वतःमध्ये असलेल्या परेमश्वराशी आपला संबंध येऊ शकतो, स्वतःमध्ये असलेल्या परेमश्वराशी संवाद घडू शकतो. त्यासाठी सर्वांप्रती समभाव, बंधुत्वभाव किंवा कुणाचाही द्वेष वा द्वैतभाव न बाळगता सर्वांबरोबर सहजीवन जगता यावे यासाठी समज तयार होणे आवश्‍यक आहे. दोन माणसे एका शर्टात मावत नाहीत. त्यादृष्टीने पाहिले तर हेही द्वैतच आहे, पण हे व्यावहारिक होय. एखादा मनुष्य राक्षसप्रवृत्तीचा असेल तर त्याला दूर ठेवणे, त्याचा बंदोबस्त करणे याला द्वैतभाव ठेवणे म्हणता येणार नाही. कारण अशी व्यक्‍ती एकूण ईश्वरी प्रक्रियेला, एकूणच मनुष्यमात्राच्या प्रगतीला हानिकारक ठरणारी असते. परंतु साधारणपणे सर्व मनुष्यमात्रांमध्ये परमेश्वर पाहायला हवा. म्हणजे सर्वांवर प्रेम करावे. प्रेम व सेवा, सेवा व शरण हे सर्व एकाच अर्थाचे शब्द आहेत. तेव्हा दुसऱ्याचे मत समजून घेणे, समोरच्याला शरण जाणे, इतरांची सेवा करणे म्हणजेच भक्‍ती किंवा प्रेम होय. तेव्हा जोपर्यंत सेवेचे व्रत, दानाचे व्रत घेतले जात नाही, किंवा त्यांची सवय लावून घेतली जात नाही तोपर्यंत मनुष्यमात्रात परमेश्वर दिसणे व एकता दिसणे अवघड आहे. म्हणून प्रत्येक व्यक्‍तीला, मग ती व्यक्‍ती उपासना करणारी असो वा नसो, शांती हवी असते. म्हणून इतरांशी गोड बोलणे, इतरांना मदत करणे, त्यांना आपल्यातील काही भाग देणे असे वागण्याची अपेक्षा असते. 

अशा तऱ्हेने जीवनात आपण जेव्हा या गोष्टींना महत्त्व देतो तेव्हा "मोक्षम्‌ इच्छेत्‌ जनार्दनात्‌" म्हणजे आपण केलेल्या आधीच्या सर्व कार्याची म्हणजे सूर्योपासना, अग्निउपासना, ज्ञानसाधना या सर्वांची पूर्तता या चौथ्या साधनेत म्हणजे जनताजनार्दनाची सेवा, मनुष्यमात्राच्या कल्याणाचा प्रयत्न यांच्यात विसर्जित होते. हे चार खांब सिद्ध झाले की मोक्षाचा अनुभव मिळू शकतो असे म्हणायला हरकत नाही. 

या ठिकाणी पुन्हा एकदा म्हणावे लागेल की मोक्ष म्हणजे एक जागा नव्हे तर ती एक शक्‍तीची तरंग लांबी, एक अस्तित्व किंवा ज्या ठिकाणी पूर्ण स्वातंत्र्य आहे, जेथे कुठल्याही तऱ्हेच्या वासनांचा किंवा बाहेरच्या वस्तूच्या मोहमायेचा परिणाम होत नाही, तर ज्या ठिकाणी समत्वभाव दिसतो व ज्यातून भक्‍ती व सेवाभाव जागृत होतो अशी अवस्था म्हणजे मोक्ष.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com