पिचलेला मणका

डॉ. जयदेव पंचवाघ
Friday, 22 November 2019

वयाबरोबर शरीराची झीज होत जाणे ही अगदी नैसर्गिक घटना आहे. कालाय तस्मै नमः। हे जरी खरे असले तरी काही अवयवातील झीज ही व्यायामाने व योग्य काळजी घेतली, तर लांबवता येते ही वस्तुस्थिती आहे. हाडांमध्ये होणारी झीज ही अशा प्रकारात येते. 

आपल्या शरीराची, शरीरातील हाडांची झीज होत असते. योग्य व्यायामाने, चालण्याने ही झीज होणे लांबवता येते. मणक्याच्या हाडांचीही अशीच झीज होत असते. अशी झीज झालेली असेल तर मणका पिचतोही. 

वयाबरोबर शरीराची झीज होत जाणे ही अगदी नैसर्गिक घटना आहे. कालाय तस्मै नमः। हे जरी खरे असले तरी काही अवयवातील झीज ही व्यायामाने व योग्य काळजी घेतली, तर लांबवता येते ही वस्तुस्थिती आहे. हाडांमध्ये होणारी झीज ही अशा प्रकारात येते. 

लोकांची अशी समजूत असते, की आपल्या शरीरातील हाडे ही एकदा तयार होऊन वाढली, की आहे तशीच राहतात. पण खरे तर प्रत्येक क्षणाला त्या हाडातील पेशी नवीन तयार होत असतात व काही पेशी झडून जात असतात. रक्तातून कॅल्शियम फॉस्फेटसारखे पदार्थ हाडातच जाऊन स्थिरावतात व हाडाला बळकटी देतात, पण त्याचवेळी हे पदार्थ हाडातून परत रक्तात शोषले जाण्याची क्रियासुद्धा कायम चाललेली असते. बॅंकेतील एखाद्याच्या खात्यात पैसे भरणे व काढणे कायम चालू असावे, तसेच हे आहे. कोणती प्रक्रिया जास्त होते यावर खात्याचा बॅलन्स किती हे ठरत असते. 

खोपकर आजींच्या वयामुळे त्यांच्या हाडाच्या खात्यात कॅल्शियमच्या नोटांचा तुटवडा निर्माण झाला होता आणि म्हणूनच अथर्व आणि महेशला त्या दिवशी सकाळी त्या रस्त्यातच बसकण मारून बसलेल्या दिसल्या. 

‘‘अरे महेश, या तर खोपकर आजी दिसतात. तुमच्या शेजारी राहतात ना? मी तुझ्याकडे आलो, तेव्हा मगाशीच  बाहेर पडताना दिसल्या मला. पण त्या अशा रस्त्यावर का बसल्या आहेत?’’ अथर्व म्हणाला. अथर्व आणि महेश नेहमीप्रमाणे सकाळी पळायला बाहेर पडले होते. खोपकर आजी महेशच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहतात, त्यामुळे त्यानेही त्यांना चटकन ओळखले. 

‘‘अरे, ॲक्‍सिडेंट वगैरे झाला की काय त्यांना...? आजी... अहो खोपकर आजी, ठीक आहात ना? अशा खाली काय बसल्या आहात? बरे वाटत नाही आहे का?’’ महेशने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून विचारले. 

खोपकर आजी गोंधळल्यासारख्या झाल्या होत्या, पण महेशला बघून त्यांचा जीव भांड्यात पडला. ‘‘अरे महेश, अगदी खऱ्या महेशासारखा आलास की रे. चालता चालता बकुळीचे फूल घ्यायला खाली वाकले आणि छातीच्या मागच्या पाठीच्या भागात एकदम जोरात कळ आली बघ. तशीच दोन पावले पुढे टाकायला गेले आणि खाली बसले. हे दुखणे सहन होण्याच्या पलीकडचे आहे रे!....’’ 

खोपकर आजी तशा मुळातच विनोदी स्वभावाच्या. एवढ्या असह्य दुखण्यातसुद्धा चेहरा हसरा ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या. ‘‘आजी तुम्ही काळजी करू नका. उठायचासुद्धा प्रयत्न करू नका.’’ महेश म्हणाला. अथर्व आजींपाशी थांबला आणि महेश पटकन घरी गेला. घर शेजारीच होते. एक हलकी प्लॅस्टिकची खुर्ची घेऊन परत आला. खोपकर आजींच्या मुलालासुद्धा त्याने बरोबर आणले होते. सर्वांनी मिळून त्यांना प्रथम घरी नेले व तेथून रुग्णालयाच्या ॲम्ब्युलन्सला फोन केला. 

रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागातून माझ्या रेसिडेंट डॉक्‍टरचा-अविनाशचा फोन आला. सत्तर-पंचाहत्तर वर्षांच्या एका बाईंना इमर्जन्सी विभागात आणले आहे व पाठीत असह्य वेदना असल्याने न्यूरोसर्जनने त्यांना बघणे गरजेचे आहे, असा निरोप मला आधीच मिळाला होता. अविनाशचा फोन आल्याने मी माझ्या क्‍लीनिकमधून बाहेर पडलो. त्याने एव्हाना आजींना तपासले होते व एक्‍स-रे करायलासुद्धा सांगितला होता. 

‘‘सर, या खोपकर आजी फिरायला म्हणून बाहेर पडल्या होत्या. काही कारणाने खाली वाकल्या आणि तेव्हापासून पाठीत असह्य कळ येते आहे. मी एक्‍स-रे करायला सांगितला आहे...’’ अविनाश म्हणाला. 

‘‘अविनाश, तू त्यांना नीट तपासलेस का? का नुसता एक्‍स-रे करायला सांगितला आहेस?’’ नवीन पिढीतील डॉक्‍टरांनी शिकण्याच्या काळापासूनच यंत्रांच्या अतिआहारी जाऊ नये, असा माझा आग्रह असतो व तो अविनाशला नवीन नव्हता. 

‘‘नाही सर, त्यांच्या थोरॅसिक स्पाईनच्या आठव्या व नवव्या मणक्‍याच्या भागात वेदना आहे. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळतानासुद्धा खूप वेदना होत आहेत. त्या मणक्‍यांवर मागून अंगठ्याने थोडा दाब दिला तरीही वेदना होत आहे.’’ मी खोपकर आजींना तपासले. अविनाशची निरीक्षणे बरोबर होती, पण या निरीक्षणांच्या निष्कर्षावरून खरे तर त्यांच्या पायांची तपासणी करणे गरजेचे होते. अचानक असह्य पाठदुखी सुरू होण्याचे मणक्‍याचे अचानक होणारे फ्रॅक्‍चर हे एकच महत्त्वाचे कारण होते. असे फ्रॅक्‍चर झाले असल्यास, त्याचा एखादा तुकडा मागे सरकून मज्जारज्जूवर दाब निर्माण करू शकतो. पायातील शक्ती व संवेदना त्यामुळे जाऊ शकतात. सुदैवाने खोपकर आजींच्या पायातील शक्ती शाबूत होती. पायातील रिफ्लेक्‍सेससुद्धा कुठल्याही प्रकारे मज्जारज्जूचा दाब दर्शवत नव्हते. तेवढ्यात इमर्जन्सी विभागातील नर्स एक्‍स-रे घेऊन आली. त्यात  छातीच्या मागील कण्याच्या नवव्या मणक्‍याला फ्रॅक्‍चर झालेले होते. हाडे ठिसूळ झाल्यामुळे होणाऱ्या प्रकारातले ते असावे असा अंदाज आम्ही बांधला. मी तो एक्‍स-रे अविनाशला समजावून सांगत होतो, तेवढ्यात खोपकर आजींचा मुलगा म्हणाला, ‘‘पण डॉक्‍टर फ्रॅक्‍चर व्हायला ती जोरात पडली वगैरे काहीच नाही.’’ 

‘‘मिस्टर खोपकर, तुमच्या आईच्या मणक्‍याला जे फ्रॅक्‍चर आहे, त्याला मणका पिचल्याने झालेले फ्रॅक्‍चर म्हणतात. वयोमानानुसार, हाडातील कॅल्शियम कमी झाल्याने हाडे ठिसूळ होतात. मणकेसुद्धा या आजाराची शिकार ठरतात. अशा व्यक्तींमध्ये, अचानक हालचाल करताना उदा. खाली वाकताना, वजन उचलताना मणका पिचतो. याला ऍस्टिओपोरोटिक कोलॅप्स फ्रॅक्‍चर असे म्हणतात.’’ मी खोपकरांना समजावले. 

वैद्यकीयदृष्ट्या या वेळी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे होते, ते म्हणजे कधी-कधी अशी फ्रॅक्‍चर मणक्‍यात कॅन्सर झाल्याने होतात. कॅन्सरची वाढ झाल्याने मणका पोखरून निघतो व पिचतो. परंतु खोपकर आजींच्या बाबतीत ही शक्‍यता फारच कमी होती, कारण असा कॅन्सर असता, तर आधीचे काही दिवस का होईना, पण थोडी तरी पाठदुखी त्यांना झाली असती. शिवाय एकंदर तब्येतीवरसुद्धा परिणाम पडला असता. 

तरीही आमच्या निदानावर शंभर टक्के शिक्कामोर्तब करण्यासाठी त्या भागाचा एमआरआय करणे गरजेचे होतेच शिवाय वेदना कमी झाल्यावर डेक्‍सास्कॅन ही तपासणीसुद्धा करणे गरजेचे होते. डेक्‍सा-स्कॅनमध्ये शरीरातील इतर महत्त्वाच्या हाडातील कॅल्शियमचा स्कोअर कळतो. यावरून इतर हाडांना फ्रॅक्‍चर होण्याची शक्‍यता कितपत आहे याचा अंदाज बांधून वेळीच उपचार करता येतो. 

खोपकर आजींच्या एमआरआयमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी सिद्ध झाल्या. एक, त्यांना झालेले फ्रॅक्‍चर हाडे ठिसूळ झाल्यानेच झालेले होते आणि दोन, त्यांच्या मज्जारज्जूवर थोडासुद्धा दाब आलेला नव्हता. 

सर्वप्रथम या आजाराला बेड-रेस्ट देऊन व वेदनाशामक औषधे देऊन बरे करण्याचा प्रयत्न करावा लागतो. काही व्यक्तींना या उपचारांनी हळूहळू बरे वाटू शकते. परंतु, या उपचारपद्धतीचा एक तोटा म्हणजे वय झालेल्या या रुग्णांना अनेक दिवस दुखणे तर सहन करावे लागतेच, पण त्याबरोबर त्यांचे रोजचे चालणे - फिरणे बंद होते. आपल्या शरीरातील सर्व संस्था जर या वयात व्यवस्थित कार्यरत ठेवायच्या असतील, तर हे चालणे - फिरणे फारच महत्त्वाचे असते. पिचलेल्या हाडात नवीन कॅल्शियम जमा होऊन त्याला थोडीफार बळकटी यायला अनेक महिने लागतात आणि म्हणूनच अशा रुग्णांचे चालणे - फिरणे आणि सामाजिक कार्यक्रमात भाग घेणे या काळात गडबडते. 

तरीसुद्धा, सुरवातीचा एक प्रयत्न म्हणून आम्ही खोपकर आजींना बेडरेस्टचा सल्ला दिला. त्यांच्या शरीरातील कॅल्शियम बॅंकेतील ‘बॅलन्स’ वाढवण्यासाठीसुद्धा औषधे सुरू केली. परंतु दोन आठवड्यांनी जेव्हा त्या परत आल्या, तेव्हा त्यांना स्ट्रेचरवरूनच आणावे लागले. त्या म्हणाल्या, ‘‘डॉक्‍टर, माझे दुखणे थोडेसे कमी झाले, पण उठून बसून नेहमीसारखे चालणे शक्‍य नाही. अशा प्रकारेच आता मला जगावे लागणार की काय? असा प्रश्‍न माझ्या मनात वारंवार येतो. यावर दुसरा उपाय नाही का?’’ ‘‘खरंच डॉक्‍टर, यावर दुसरा काही उपाय नाही का?’’ खोपकरांचा मुलगा म्हणाला. 

मी त्याला व त्याच्या भावाला बसायला सांगितले. ‘‘खोपकर यावर दुसरा उपाय निश्‍चितच आहे आणि आजींच्या बाबतीत तो जरूर करावा असे मला वाटते. पण ते छोटेसे ऑपरेशनच आहे. त्याला व्हर्टिब्रोप्लास्टी म्हणतात. यात, पिचलेल्या मणक्‍यात एक पोकळ नळीसारखी सुई सरकवण्यात येते आणि त्यातून बोन सिमेंट आत ढकलण्यात येते. हे बोन सिमेंट आत ढकलताना टूथपेस्टच्या घनतेचे असते, पण साधारण दहा मिनिटात ते दगडापेक्षा घट्ट होते. घट्ट होताना ते खूप गरम होते. त्यामुळे मणक्‍याच्या हाडाच्या आत असलेल्या व दुखावल्या गेलेल्या नसा या उष्णतेने कायमच्या बधिर होतात व दुखणे तात्काळ थांबते. तसेच, घट्ट झालेले सिमेंट त्या हाडाला बळकट देते.’’ खोपकर आजींनी हा पर्याय तात्काळ स्वीकारला. त्यांना ॲडमिट करून दुसऱ्याच दिवशी आम्ही त्यांची व्हर्टिब्रोप्लास्टी केली. या ऑपरेशनला बहुतेक वेळा पूर्ण भूल (जनरल ऍनेस्थेशिया) द्यावी लागत नाही. लोकल ॲनेस्थेशिया देऊनच ही प्रक्रिया सहजतेने पार पडू शकते. 

व्हर्टिब्रोप्लास्टी केल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी आजी व्यवस्थित चालू शकल्या. पाठीतील कळ ऐंशी टक्‍क्‍यांहून अधिक प्रमाणात नाहीशी झाली होती. अर्थात फ्रॅक्‍चर होताना आजूबाजूचे जे स्नायू दुखवले गेले होते ते ठीक होण्यास काही कालावधी जाणार होता. पण आता, अगदी दुसऱ्या दिवसांपासून त्यांना परत सकाळी फिरायला परवानगी मिळणार होती. 

शरीरातील इतर हाडांमधील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्याची औषधे व हार्मोन्स त्यांना आम्ही सुरू केलीच होती. त्यामुळे इतर हाडांना फ्रॅक्‍चर होण्याची शक्‍यता खूपच कमी होणार होती! 

ज्याप्रमाणे लोक बॅंकेतल्या बॅलन्सवर बारीक लक्ष ठेवून असतात, त्याचप्रमाणे विशिष्ट वयानंतर आपल्या शरीरातील कॅल्शियमच्या बॅलन्सवरसुद्धा लक्ष ठेवणे आवश्‍यक आहे. हाडे, स्नायू व मेंदू हे अवयव जितके वापरात राहतील, तितके ताजे टवटवीत राहतात, हे कायम लक्षात ठेवणे गरजेचे होय. 

घोडा का आजारी पडला, भाकरी का करपली... तर न फिरवल्यामुळे ही उक्ती आपल्याला माहीत आहेच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: spondyl article written by Dr. jaydev Panchwagh