मणक्‍याची शस्त्रक्रिया समज-गैरसमज

मणक्‍याची शस्त्रक्रिया समज-गैरसमज

‘‘डॉक्‍टर, मणक्‍याच्या शस्त्रक्रियेनंतर अनेक महिने झोपून राहावे लागते ना?’’ रमेशना बहुतेक ही माहिती कुणीतरी शेजारच्यांनी दिली होती. रमेशजी... वय सदुसष्ट वर्षे. मधुमेह व रक्तदाब दोन्ही आहेत. त्यांना गेली तीन वर्षे कंबरदुखी सुरू होती. हळूहळू कंबरदुखीबरोबरच मांड्या आणि पोटऱ्यांत कळ यायला लागली होती. एक वर्षापासून चालण्याचे अंतर हळूहळू कमी होत गेले होते. मला भेटायला आले, तेव्हा जेमतेम पाच ते दहा मिनिटे कसेबसे चालत होते. संध्याकाळी व्यायाम म्हणून फिरायला निघाल्यावर पहिल्या पाच मिनिटांतच कंबर, कुल्ले, मांड्या व पोटऱ्या ‘भरून’ येऊ लागायच्या. अजून दोन-पाच मिनिटांत पाय जड पडून आणि वेदना वाढून त्यांना थांबावेच लागायचे. रमेशजींच्या कमरेच्या मणक्‍याचा एमआरआय त्यांच्या डॉक्‍टरांनी केला होता आणि त्यांना शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला ऐकून त्यांच्या अनेक आसपासच्या हितचिंतकांनी त्यांच्यावर सल्ल्यांचा भडिमारच केला होता. 

रमेशजींना जो आजार झाला होता. त्याला ‘न्यूरोजेनिक क्‍लॉडिकेशन’ म्हणतात. या आजारात कंबर दुखणे, थोडे अंतर गेल्यावर मांड्या, पोटऱ्या भरून येणे, जड पडणे, बधिर होणे, त्यात मुंग्या व कळा येणे अशा गोष्टी सुरू होतात. त्यामुळे पुढे चालणे अवघड होऊन थांबावे लागते. काही वेळ थांबले, की परत पुढे चालता येते. हे जे ‘चालू शकता येईल’ असे अंतर असते, ते दिवसेंदिवस कमी-कमी होत जाते. शेवटी-शेवटी काही वेळ उभे राहिले तरी मांड्या व पाय भरून येऊन बसावे लागते. या आजाराचे योग्य निदान व उपचार झाले नाहीत, तर कालांतराने लघवीवरचे नियंत्रण (कंट्रोल) जाणे, पावलातली शक्ती जाणे यांसारखे त्रास होऊ शकतात. या आजाराच्या शस्त्रक्रियेचा निर्णय नेमका कसा घ्यावा व या निर्णयाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे, याचा विचार आवश्‍यक ठरतो. 

माझा असा अनुभव आहे, की अशा आजारात मणक्‍याची शस्त्रक्रिया का करावी, याबाबत रुग्णांच्याच नव्हे, तर या विषयाशी संबंधित नसलेल्या डॉक्‍टरांच्या मनातसुद्धा सुस्पष्ट कल्पना नसते. या शस्त्रक्रियेचा उद्देश फक्त ‘दुखणे जाणे’ हा नसून ‘दुखणे जाऊन परत तीन ते पाच किलोमीटर चालता येणे’ हा आहे. विशेषतः उतारवयात चालण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची असते. वय वाढेल, तसे चालण्याचे महत्त्व वाढत जाते. जर या वयात चालले नाही, तर मधुमेह, रक्तदाब, मानसिक औदास्य, परावलंबित्व वाढत जाते. सभा-समारंभांना जाणे बंद होते. आयुष्य उपभोगणेच खंडित होते. त्यामुळे ‘चालल्यावर पाय भरून येतात. म्हणून वयोमानानुसार मी चालणेच बंद करतो आणि मग माझे दुखणे जाईल,’ हा युक्तिवाद चुकीचा ठरतो. त्याचप्रमाणे, आजाराचे प्रमाण वाढल्यावर पायातली शक्ती व लघवी-संडासवरचा ‘कंट्रोल’ कमी होण्याची शक्‍यता असते, हे तर आहेच.

विशेषतः पासष्ट ते सत्तर वर्षे वयानंतर जर हा आजार झाला, तर केवळ गैरसमजामुळेच ही शस्त्रक्रिया टाळू नये, असे मला प्रकर्षाने वाटते. अर्थात, या आधी मनातल्या शंका तज्ज्ञाला जरूर विचाराव्यात, पण त्यात शास्त्रीय दृष्टिकोनच ठेवावा.

एक लक्षात घेतले पाहिजे, की कोणत्याही शस्त्रक्रियेत काही ना काही धोके असतातच. पूर्णतः निर्धोक शस्त्रक्रिया नसते. ते धोके टाळण्याचा प्रयत्न करीत डॉक्‍टर शस्त्रक्रिया करतात. पण, आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे शस्त्रक्रिया न करण्यातसुद्धा धोके असू शकतात व ते अधिक गंभीर असू शकतात. तसेच हे धोके टाळता येत नाहीत. मात्र, ही शक्‍यता आपण पाहत नाही. या दोन विधानांच्या पैकी आपल्या बाबतीत कुठले धोके अधिक आहेत, हे जाणून घेऊन या प्रश्नाच्या उत्तरावरच आपला निर्णय आधारित असावा. 

शस्त्रक्रिया कधी, कोणावर व कुठल्या पद्धतीने करावी, हे ठरवणे एक शास्त्र आहे. हे शास्त्र प्रगत व उपयुक्त आहे. गरज नसताना शस्त्रक्रिया करणे व गरज असताना ती टाळणे या दोन्ही धोकादायक गोष्टी आहेत. 

रमेशजींच्या कंबरेच्या तीन, चार व पाच नंबरच्या मणक्‍यांमधील नसा दाबल्या गेल्या होत्या. (कॅनॉल स्टेनोसिस) मायक्रोस्कोपच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करून तो दाब काढला गेला. हे शास्त्र इतके प्रगत आहे, की आता या शस्त्रक्रियेनंतर फार काळ झोपून राहावे लागत नाही. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर रमेशजींनी चालायला सुरुवात केली. आता शस्त्रक्रिया होऊन वर्ष झाल्यानंतर ते दीड तास सलग चालतात. सभा-समारंभाला जातात. त्यांचा मधुमेह व रक्तदाब नियंत्रित आहे. हेच खरे या शस्त्रक्रियेचे यश म्हणता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com