तारुण्यसूर्य

डॉ. श्री बालाजी तांबे (www.balajitambe.com)
Monday, 16 January 2017

शरीरात सूर्याचे स्थान वा स्वर्गाचे स्थान मेंदूच्या मध्यभागी असते. पृथ्वीवरचे स्थान म्हणजे नाभीच्या ठिकाणी असणारे मणिपूर चक्र या स्थानांवर असते. शरीराची उष्णता, यकृत, प्लीहा, अग्न्याशय हे सर्व याच्या आधिपत्याखाली येतात. शरीराचे पित्त, ज्यामुळे मनुष्य शौर्य व धडाडी दाखवतो, रागावतो वा शृंगारासाठी प्रवृत्त होतो ते पित्त या ठिकाणी सूर्यामार्फत शरीरावर सत्ता गाजवते. या सूर्याला जर ग्रहण लागले किंवा सूर्य अंधारात गेला तर, पचनसंस्था नीट चालत नाही, म्हणूनच आयुर्वेदामध्ये सकाळी लवकर उठून लवकर झोपायचे, सूर्यास्तानंतर वा रात्री अंधार असताना फार जेवायचे नाही, असे नियम बनवले गेले. बाहेर सूर्य नसताना शरीरातलाही सूर्य कमी काम करतो, म्हणून असे नियम केलेले असतात

"आरोग्यं भास्करात्‌ इच्छेत्‌' असं म्हटलेलं आहे. म्हणजे सूर्यापासूनच आरोग्याची इच्छा ठेवावी आणि सूर्यापासूनच आरोग्याची प्राप्ती होते. याचा अर्थ सूर्याची नुसती प्रार्थना करावी असे नव्हे, तर सूर्यप्रकाश घेणे, सूर्यनमस्कार करणे, सूर्याला मित्र म्हणून त्याच्याशी मैत्रीचे संबंध वाढवणे, त्याला अर्घ्य देणे अशा प्रकारे संपर्क ठेवावा लागतो. 
ंसंक्रांतीच्या महोत्सवानिमित्त केलेले आकाश व सूर्यध्यान आणि त्याला जोड म्हणून दिलेले दान हेच आरोग्यासाठी खास उपयोगी पडते. 

सूर्यशक्‍ती म्हणजेच तारुण्यशक्‍ती! सकाळी पहाटे जाग आली तरी अजून उजाडले नाही या कारणास्तव माणसे झोपून राहतात. पण म्हणजे एखाद्या दिवशी सूर्य उगवलाच नाही, तर काय माणसे उठणारच नाहीत, झोपूनच राहतील? कदाचित पहिल्या दिवशी थोडा जास्त वेळ झोपून राहतील, पण हळूहळू खरोखर असे होऊ शकेल की सर्व जग अंधारात बुडून झोपी जाईल. अशी आहे ही सूर्यशक्‍ती. सूर्य आहे म्हणूनच जग आहे. 
"जगन्मिथ्या' म्हटले जाते हे यामुळेच. सूर्याचा प्रकाश असल्यामुळेच केवळ आपल्याला समोरचे जग दिसते, तसे त्यावर मनाने प्रकाश टाकल्यामुळे ते समजते, पण ते प्रत्यक्ष असते का नाही व ते काय असते हे काही सांगता येत नाही, ही सर्व जादू सूर्याची आहे. शेकोटीजवळ बसल्यावर थोड्या वेळाने आपण आपोआप बाजूला होऊन शेकोटीकडे पाठ करून बसतो, कारण शेकोटीमुळे शरीर तापते ते फार वेळ सहन होत नाही. तसेच अधिक सूर्यप्रकाश मिळण्याच्या हेतूने पृथ्वी एकाच ठिकाणी थांबली तर सर्वच जळून जाईल. त्यामुळे एकदा पोटाकडून एकदा पाठीकडून अशा तऱ्हेने प्रकाश मिळण्याच्या हेतूने पृथ्वी सूर्याभोवती घिरट्या घालत राहते, प्रदक्षिणा करते. सर्व बाजूला जीवनाचा विकास व्हावा हा दुसराही हेतू यात असतो. यामुळे अंधार-उजेड-अंधार असे चक्र तयार होते. 

सूर्य शक्‍ती देतो व नंतर परत खेचून घेतो. उष्णतेने पाण्याची वाफ करून आकाशात ओढतो व पुन्हा ते पाणी पावसाच्या रूपाने पृथ्वीवर पाठवतो. असे हे संपूर्ण जीवनाचे चक्र सूर्यच चालवतो. बघता बघता झाडे वाढून त्यांना फळे येतात, नंतर ती फळे परत पृथ्वीच्या पोटात जाऊन सडून पुन्हा वृक्ष तयार होतात व फळाफुलांनी डवरतात. हे सगळे करण्यात निसर्गामध्ये दिसून येणारा उत्साह सूर्यामुळेच मिळतो. म्हणून सूर्याला "मित्र' म्हणतात. सूर्याच्या आत उफाळून येणारी सुप्त शक्‍ती असल्याने सूर्याला "हिरण्यगर्भ'ही म्हणतात. घेणे-देणे या गुणामुळे त्याला "आदित्य'ही म्हणतात. तो सर्व जगाची निर्मिती करून आपल्याला सर्व जगाचे ज्ञान देतो, अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करून त्यावर ज्ञानरूपी प्रकाश टाकतो म्हणून त्याला "भास्कर'ही म्हणतात. अशा तऱ्हेने सूर्याची सर्व शक्‍ती आपल्याला नाना तऱ्हेने अनेक ठिकाणी दिसते. एखाद्या सुंदरशा फुलाचे वेगवेगळ्या शक्‍तीत रूपांतर करण्याचे काम सूर्यच करतो. अनेक वर्षांनंतर त्याचे खनिज तेल होईल किंवा खनिज धातू तयार होईल किंवा सुंदर हिऱ्यासारखे रत्न तयार होईल. 

असा हा तरुण, राजबिंडा, सात घोड्यांच्या रथावर आरूढ होऊन भरधाव जातो. अत्यंत सौम्यपणे लालसर गुलाबी रंग उधळत सुखद ऊब देणारा सकाळचा सूर्य, कधी भयंकर तापवणारा असा तेजःपुंज दुपारचा तळपता सूर्य, विश्रांती घ्यायला निघालेला व इतरांनी विश्रांती घ्यावी असे सुचविणारा संध्याकाळचा सूर्य आणि शेवटी प्रेमीयुगुलांचा संकोच दूर व्हावा, या दृष्टीने अंधार केल्यावर शृंगाराला अनुकूल असणारा व सूर्याकडून परिवर्तित झालेल्या शक्‍तीमुळे प्रकाशित झालेला चंद्र, अशी ही सूर्याची नाना रूपे. 

सूर्य हा तरुण आहे व हे तारुण्य वेळात मोजलेले नाही, त्याच्या अस्तित्वाला किती वर्षे झाली यावर त्याचे तारुण्य अवलंबून नाही, तो सतत तरुणच असतो. गंमत अशी की त्याचा पुत्र शनी मात्र म्हातारा आहे. अशा तऱ्हेने काळालाही प्रिय असणारा, भडक लाल, शेंदरी, गुलाबी व चकचकीत पांढरा रंग असणारा तरुण सूर्य. तरुणांनी सूर्याकडून घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. सूर्याच्या सर्व कला व सूर्याचे सर्व स्वभाव ज्याच्यात असतील, तो तरुण. सूर्याला आपण मित्र म्हणतो खरे पण त्याच्याशी जवळीक करून त्याच्याकडून आपण जर काही शिकलो, त्याच्यापासून शक्‍ती मिळवली तरच आपले तारुण्य टिकून राहील. 

म्हणून सूर्याची शक्‍ती मिळवायची असेल तर सूर्योदयाच्या आधी ब्राह्ममुहूर्तावर उठून आसन, प्राणायाम, कपालभाती, उपासना, ध्यान वगैरे करतात; उषेची चाहूल लागल्यावर स्नान वगैरे आटोपून सूर्याच्या स्वागतासाठी हातात अर्घ्य घेऊन मंडळी उभी असतात. सूर्यनमस्कार हा तर जवळ जवळ सर्व आसनांचा राजा. सूर्यप्रकाशामुळे शरीराला आवश्‍यक असणारी अनेक द्रव्ये मिळतात. 

मेंदूच्या मध्यभागी शरीरातील सूर्याचे स्थान असते व त्या सूर्याला जर शक्‍ती मिळाली तरच शरीराचे सर्व व्यवहार व्यवस्थित चालतात. म्हणून भारतीय तत्त्वज्ञानाने गायत्री देवतेची संकल्पना सांगितली, गायत्री देवता संपूर्ण मेंदूमय-ब्रह्ममय आहे. तिला चार डोकी असून तिच्या सोनेरी केसातून विविधरंगी प्रकाशकिरणे बाहेर फाकत असतात. असा हा मेंदूचा कॉट्रेक्‍स हा भाग, ज्यात ह्या तऱ्हेचे प्रकाशाचे जाळे असते ज्यात सूर्यापर्यंत माहिती पोचवली जाते व तेथून पुढे ती माहिती मेरुदंडामार्फत सर्व शरीरभर पसरून शरीरावर अंकुश ठेवण्याचे किंवा शरीराकडून काम करून घेण्याचे कार्य करते. असे हे ज्ञान जी सूर्याला देते त्या गायत्रीची उपासना सूर्याबरोबरच केली जाते. 
तेव्हा शरीरात सूर्याचे स्थान वा स्वर्गाचे स्थान मेंदूच्या मध्यभागी असते. पृथ्वीवरचे स्थान म्हणजे नाभीच्या ठिकाणी असणारे मणिपूर चक्र या स्थानांवर असते. शरीराची उष्णता, यकृत, प्लीहा, अग्न्याशय हे सर्व याच्या आधिपत्याखाली येतात. शरीराचे पित्त, ज्यामुळे मनुष्य शौर्य व धडाडी दाखवतो, रागावतो वा शृंगारासाठी प्रवृत्त होतो ते पित्त या ठिकाणी सूर्यामार्फत शरीरावर सत्ता गाजवते. या सूर्याला जर ग्रहण लागले किंवा सूर्य अंधारात गेला तर पचनसंस्था नीट चालत नाही, म्हणूनच आयुर्वेदामध्ये सकाळी लवकर उठून लवकर झोपायचे, सूर्यास्तानंतर वा रात्री अंधार असताना फार जेवायचे नाही, असे नियम बनवले गेले. बाहेर सूर्य नसताना शरीरातलाही सूर्य कमी काम करतो, म्हणून असे नियम केलेले असतात. 

सर्व प्रकारची कपालभाती नाभीस्थानाला मध्य धरून आकुंचन होणाऱ्या पोटापासून ऊर्जेला वर सरकवून मेंदूकडे ऊर्जा पाठविण्यासाठी योजना केलेली असते. 
प्राणायामाबरोबरच पुढे वाकणे, मागे वाकणे, हातापायात ताण उत्पन्न करून मेरुदंडाला खेचणे वगैरे सर्व प्रकार सूर्यनमस्कारात होतात. 

ध्येयः सदा सवितृमण्डलमध्यवर्तीनारायणः सरसिजानसंन्निविष्टः ।केयूरवान्‌ मकरकुण्डलवान्‌ किरीटी हारी हिरण्मय वपुर्धृतशंकचक्रः ।। 
या श्‍लोकात केलेले सूर्याचे वर्णन अगदी समर्पक आहे. हा सूर्य केवळ आकाशात दिसणारा वा डोळ्यासमोर अंधारी आणणारा तेजस्वी सूर्य नव्हे, तर सात रंगांच्या सात शक्‍ती व सात घोड्यांच्या रथात स्वार होऊन संपूर्ण विश्वाला ज्ञान, शक्‍ती व समृद्धी प्रदान करणाऱ्या सूर्याचे अत्यंत समर्पक वर्णन केलेले आहे. 

डॉ. श्री बालाजी तांबे 
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला 410 405 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sun health family doctor