साधना ॐकाराची

ॐ हे एक वैश्विक स्पंदन आहे आणि त्यातूनच पूर्ण सृष्टी निर्माण झाली आहे, असा आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे.
Yoga
Yogasakal

ॐ हे एक वैश्विक स्पंदन आहे आणि त्यातूनच पूर्ण सृष्टी निर्माण झाली आहे, असा आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे. पद्मश्री श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी ‘सोम मेडिटेशन’ (संतुलन ॐ ध्यानयोग) ही ॐकार उपासना पद्धती विकसित केली.

शरीरातील सोमरस म्हणजे आपल्या मेंदूभोवती असलेले CSF(Cerebro spinal fluid). त्याला तजेला देऊन भौतिक यश, मानसिक आनंद, स्वास्थ्य आणि आत्मसमाधान मिळवता येत. ॐ म्हणायला अतिशय सोपा आहे. कोणत्याही वयाचा, कोणत्याही प्रांतातला व्यक्ती मग त्याची मातृभाषा कोणतीही का असेना, प्रत्येकाला ॐ म्हणताच येतो.अगदी मुक्यालाही ज्याचा उच्चार करता येतो असा हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे.

ॐ कारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः ।

कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ।।

ॐकार साधनेचे कामदं आणि मोक्षदं असे दोन्ही फायदे होतात. कामदं म्हणजे पायाभूत सुविधा देणारा आणि मोक्षदं म्हणजे समत्व भाव, भक्ती व सेवाभाव जागृत करणारा.

श्रीमद्‍भगवद्‍गीतेत

ॐ इति एकाक्षरं ब्रह्म व्याहरन् माम् अनुस्मरन् ।

यः प्रयाति त्यजनदेहं स याति परमां गतिम् ।। अ.८ श्लो.१३ ।।

ॐ काराचे चिंतन व पठण करावे. परमेश्वर सर्व चराचरात व सर्व प्राणिमात्रात असल्यामुळे परमेश्वरावर एकाग्रतेने श्रद्धा ठेवून शास्त्र व निसर्गप्रेरित मार्गाने वाटचाल करत ॐ कार म्हणावा असे भगवंतांनी सांगितले आहे. दैनंदिन जीवनात साधनेच्या माध्यमातून तयार झालेल्या ज्ञान व अनुभवांचा वापर केला की जीवनात आनंद, शांती अनुभवता येते.

श्री ज्ञानेश्वर माउलींनी वर्णन केल्याप्रमाणे

अकार चरणयुगुल, उकार उदर विशाल ।

मकार महामंडल, मस्तकाकारे ।।

ॐकाराचा खालचा भाग ‘अकार’ (अकार चरण युगुल) पृथ्वी तत्त्वाशी संबंधित असतो. म्हणून ‘अकार’ तिन्ही भागांमध्ये सगळ्यात मोठा असतो.

मध्ये ‘उकार’ (उकार उदर विशाल) जलतत्त्व व अग्नितत्त्वाशी संबंधित असतो.

तसेच सगळ्यात वरती ‘मकार’ (मकार महामंडळ मस्तकाकारे ) वायु व आकाश तत्त्वाशी संबंधित असतो. मकार सगळ्यात छोटा असतो. मकाराच्या वर अर्धचंद्र असतो. अर्धचंद्रावर बिंदू असतो जो शून्याचे प्रतिनिधित्व करतो.

यावरून वेदांमध्ये वर्णन केलेले ॐकाराचे रूप समजायला मदत होते.

नादाची उत्पत्ती आपल्या नाभीपासून होते. नाभी ही अतिशय महत्त्वाची आहे. आईच्या पोटात असताना नुसती शारीरिक नव्हे तर मानसिक शक्ती आपल्याला नाभीतून मिळत असावी. कधी अचानक ताण आला तर बऱ्याच लोकांना नाभीत ओढ लागल्यासारखी होते. जन्मानंतरही नाभी तितकीच महत्त्वाची असते. आयुर्वेदामध्ये काही औषधे किंवा औषधी तेल ही शरीरात पोचवण्यासाठी नाभीचा उपयोग केला जातो म्हणून ॐ कार म्हणताना प्रत्येक वेळी नाभीतून हालचाल होणे आवश्यक आहे.

आपण ॐ चा उच्चार ओम असा न करता अ-उ-म असा करायचा आहे. ॐ तीन प्रकारे म्हणता येतो. ऱ्हस्व म्हणजे अत्यंत कमी वेळात म्हणलेला जलद ॐकार. ॐकार जलद म्हणताना पोटाची हालचाल लोहाराच्या भात्यासारखी होते. ऱ्हस्व ॐकार म्हटल्याने भस्त्रिका, कपालभाती केल्याचा लाभ होतो आणि तो शरीराच्या खालच्या भागावर अधिक कार्य करतो. दीर्घ पद्धतीने ॐकार म्हटला तर छाती व फुप्फुसांवर कार्य करतो आणि लोम-अनुलोमचा लाभ देतो.

अनुनासिकयुक्त प्लुत पद्धतीने म्हणजेच अतिशय लांबवून ॐकार म्हटला तर मस्तकावर काम करतो. ॐकार गुंजनातून ऐकू येणारी आस किंवा वातावरणाने दिलेल्या प्रतिध्वनीकडे लक्ष ठेवावे. म्हणजे ऱ्हस्व ॐ म्हणताना ‘अ’काराला दीर्घ ॐ म्हणताना ‘उ’ काराला प्लुत ॐ म्हणताना ‘म’ काराला महत्त्व दिल्यासारखे आहे. ॐ कार म्हणत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत.

सकाळी उठल्यावर व रात्री झोपण्यापूर्वी १० ते १५मिनिटे ॐ म्हणणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यावर हात, पाय, तोंड धुवून साधना करता येते. रात्री झोपण्यापूर्वी ॐ म्हणून झाल्यावर लगेच झोपावे. साधनेची जागा व आसन नेहमी एकच असले तर साधना सोपी होते. कुठल्याही आसनात परंतु ताठ बसावे, डोळे मिटलेले वा अर्धोन्मीलित असावेत.

ॐकार म्हणताना श्वासावर नियंत्रण ठेवून एकाच स्वरात ॐ कार म्हणावा. प्रत्येक वेळी ॐकार म्हणताना पोटाची हालचाल व्हावी; आपल्याला ऐकू जाईल इतपत आवाजात म्हणावा; ॐकार बिंदुसंयुक्तम हे लक्षात ठेवून बिंदू ऐकण्याचा प्रयत्न करत ॐकार म्हणण्याचा उपयोग होतो. ॐकार म्हणत असताना स्वतः ऐकणे हे ॐकार गुंजनातील मर्म विसरू नये. हे करायला लागल्यावर आपल्याला कोणी म्हणत नसले तरी ॐ कार ऐकू यायला लागतो ज्याच्यामुळे तुम्हाला विश्वामध्ये जी अमर्यादित ऊर्जा आहे तिचा ॲक्सेस मिळू शकतो. त्याच्याने सोम (CSF) पुनर्स्थापित होतो.

मेंदूला चालना मिळाला की तो पूर्ण शरीराला व्यवस्थित कार्यरत ठेवू शकतो. ॐ साधनेनी तुमचं अंतर्ज्ञान वाढत. आपले शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे आणि ॐ कार म्हणण्याने पूर्ण शरीराच्या पंचमहाभूतांचे संतुलन करता येते. अशा प्रकारे सोम साधना सुरू केल्यानंतर पुढे जाऊन चक्रांची साधना आपण करू शकतो. सोम साधना करत असताना दुसऱ्याचे शुभ चिंतायचे, त्याला मदत करायची इच्छा ठेवायची. प्रार्थना व नम्रभावाचा विकास करणेही आवश्यक आहे. ज्यात स्वतःचा कुठलाही स्वार्थ नाही अशी लोकसेवा, समाजसेवा केल्याशिवाय कुठल्याही साधनेचे फळ मिळत नाही.

सोम ध्यान पद्धतीमध्ये श्री गुरुजींनी अजून काही सोप्या गोष्टी करायला सांगितल्या आहेत.

रोज न चुकता दिवा लावून ज्योतिध्यान करावे.

ज्योतिध्यान करण्यासाठी शुद्ध साजूक तुपाचे निरांजन सर्वोत्तम असते. हे शक्य नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. दिवा साधारण डोळ्यांच्यासमोर एक हात लांब ठेवून ज्योतीवर नजर एकाग्र करत ज्योतिध्यान - ज्योती त्राटक ५ ते १० मिनिटे करावे.

सूर्याची शक्ती ही अतिशय महत्त्वाची आहे. कुठलेही कार्य करायला आपल्याला शक्ती लागते. पचनासाठी, सर्जनशीलता या सगळ्यासाठीच अग्नी लागतो. जीवन सुखी होण्यासाठी आवश्यक ते सर्व काही मिळावे अशी ज्यांची इच्छा असते त्यांनी अग्नीची उपासना करणे फार आवश्यक आहे. हा ज्योतीस्वरूप अग्नी सूर्याचे प्रतीक आहे.

दिवसा कधीतरी स्वतःला रिलॅक्स करणे, ताण कमी करणे. मेंदूचा ताण कमी करण्यासाठी संगीत ऐकणे आवश्यक आहे. ताण दूर होण्यासाठी संगीताचा उपयोग होत असल्याने दहा मिनिटे डोळे मिटून संगीत ऐकत ऐकत ताणरहित व्हावे. यामुळे मेंदूचा थकवा दूर होऊन मेंदूला पुन्हा ताकद मिळते.

सकाळ संध्याकाळ ॐ कार व काही प्रार्थनासुद्धा म्हणाव्यात.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्याला पचतील अशाच गोष्टी खाणे, आपण जे काही खातो त्याच्या पचनासाठी वेळ देणे हे खूपच महत्त्वाचे आहे.

भगवद्‍गीतेत श्रीकृष्ण म्हणतात-

अहं वैश्वानरोभुत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।

प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ।। ।। अ. १५ श्लो. १४ ।।

याचा अर्थ असा की अन्न सेवन करणे तुझ्या हातात असले तरी ते पचवणे हे फक्त माझ्या हातात आहे त्यामुळे पचनाला वेळ देणे आवश्यक आहे.

सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।

मुर्ध्न्याध्यायात्मनः प्राणम् आस्थितो योगधारणाम् ।। ।। अ. ८ -श्लो. १२ ।।

असे सांगितले आहे. आपल्या इंद्रियांना आणि वासनांना ताब्यात ठेवणे अतिशय अवघड आहे. परंतु सुरुवातीला तोंडावर ताबा ठेवू शकलो तरी खूप काम होण्यासारखे आहे.

साधनेसाठी नियमित थोडा वेळ देणे महत्त्वाचे आहे. निरंतर, खंड न पडता ॐ कार साधना केली तर व्यवहारात कीर्ती, समृद्धी, आरोग्य हे तर मिळतेच. त्याच बरोबर मन व आत्मा यांची प्रसन्नताही अनुभवता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com