परीक्षा हवीच!

Suryanamaskar
Suryanamaskar

अनेकांना ‘परीक्षा’ या शब्दात जणू ‘शिक्षा’ शब्दाचाच भास होतो. त्यामुळेच परीक्षा म्हणजे जणू अग्निदिव्यच, असा भाव निर्माण होतो. परीक्षा शब्दाबरोबर येणारा भीतीचा भाव काढून टाकला, तर परीक्षा अत्यंत सोपी होते. कोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना मनात आत्मविश्‍वास असायला हवा. परीक्षा म्हणजे निव्वळ मेंदूची तयारी असे नाही, तर त्याच्या बरोबरीने एकूणच आरोग्याचा विचार करणे, ते निरामय असणे, सुदृढ असणे याला महत्त्व द्यायला हवे.

परीक्षा म्हटली, की एक अग्निदिव्य डोळ्यांसमोर उभे राहते. अनेकांना तर ‘परीक्षा’ या शब्दात जणू ‘शिक्षा’ शब्दाचाच भास होतो. त्यामुळेच परीक्षा म्हणजे जणू अग्निदिव्यच, असा भाव निर्माण होतो. सीतेने अग्निदिव्य केले होते. त्यात ती उत्तीर्णही झाली. पण, नंतर मात्र निकालात फेरफार करून, तिला नापास ठरवून रामाने तिचा त्यागच केला. अशासारख्या परिस्थितीमुळे ‘परीक्षा’ या शब्दातून भीतीचाच भाव निर्माण होतो. परीक्षा शब्दाबरोबर येणारा भीतीचा भाव काढून टाकला, तर परीक्षा अत्यंत सोपी होते. सीतेच्याच उदाहरणातून आपल्याला ते पाहता येते. अग्निदिव्यातून बाहेर पडलेल्या सीतेचा त्याग केल्यानंतरही ‘स्वामिनी निरंतर माझी...’ हा सीतेबाबतचा रामाचा भाव कायम होता. त्यामुळेच अग्निदिव्यातून बाहेर पडूनही रामाने त्याग केला तरी ते काही कारणपुरस्सर असल्याने सीतेच्या मनात रामाचा राग राहिला नाही आणि ‘सीताराम’ एकत्रच राहिले. अग्निदिव्याला सामोरे जातानाच्या सीतेच्या आत्मविश्‍वासासारखा आत्मविश्‍वास प्रत्येकाच्याच मनात कोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना असायला हवा. ‘मी अभ्यास केलेला आहे. माझ्याजवळ ज्ञान आहे. मी पासच होणार आहे; पण आता लोकरीतीप्रमाणे ते  ज्ञान सिद्ध करायला हवे. त्यासाठीच हा परीक्षेचा खटाटोप करायचा आहे’, असा भाव त्यासाठी निर्माण व्हायला हवा.

केवळ परीक्षा दिल्याने कोणी ज्ञानी होत नसतो. अभ्यास करतानाच अभ्यासविषयाच्या रसग्रहणातून ज्ञानसाठा संपन्न होत असतो. ती निरंतर चालत राहणारी प्रक्रया असते. तरीही परीक्षा ही द्यावीच लागते. त्यासाठी आत्मविश्‍वासाची आवश्‍यकता असते. तो निर्माण होतो आपण केलेल्या अभ्यासातून. तेव्हा आपण केलेला अभ्यास आणि त्यातून निर्माण झालेला आत्मविश्‍वास आपल्याजवळ असेल, तर परीक्षा सोपी जाते. अर्थात, आत्मविश्‍वासामुळे परीक्षा सोपी होत असली तरी हा आत्मविश्‍वास मानसिक नसून अनुभवजन्य असतो. म्हणजेच आपण केलेल्या अभ्यासावर तो अवलंबून असतो. मग प्रश्न येतो तो अभ्यास नीट लक्षात राहण्याचा.

शिकविलेले नीट लक्षात राहणे आणि आपल्या अनुभवांच्या संस्कारांवर घासून ते परीक्षेच्या वेळी नेमकेपणाने प्रकट करता येणे महत्त्वाचे असते. त्या दृष्टीने सर्वांत महत्त्व दिले जाते ते मेंदूच्या शक्‍तीला; पण नुसत्या मेंदूच्या शक्‍तीला फार महत्त्व देणे फसवे ठरू शकते. एखाद्या मुलाने खूप अभ्यास केलेला आहे. मेंदू अगदी तरतरीत आहे, अशा विद्यार्थ्याला परीक्षेच्या आधी दोन दिवस कुठे तरी काही चुकीचे खाल्ल्या-प्यायल्यामुळे जुलाब सुरू झाले, ताप येऊ लागला, तर परीक्षेचा साराच काळ वाया जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा परीक्षा म्हणजे निव्वळ मेंदूची तयारी असे जे समजले जाते, त्याच्याही बरोबरीने एकूणच आरोग्याचा विचार करणे, आयुष्य निरामय असणे, सुदृढ असणे याला महत्त्व द्यायला हवे. शरीराने साथ दिली नाही तर मेंदू अभ्यास करण्याला लायकच राहत नाही. तेव्हा हे लक्षात ठेवायला हवे, की ज्याचे आरोग्य चांगले आहे त्यालाच नीटपणे अभ्यास करता येतो. म्हणून आधी शरीराची नीट काळजी घ्यायला हवी.

पण मुळात परीक्षेचे ओझे असावे का? परीक्षा हे काही ओझे नव्हे. पण तसे वाटले तरी हरकत नाही. आपण अभ्यास केला की नाही यावर कुणाचे तरी लक्ष आहे याचे ओझे वाटले तरी हरकत नाही. आठवीपर्यंतच्या मुलांची परीक्षा घेऊ नये असा नियम सध्या झालेला दिसतो. या नियमाचा मुलांना खूप आनंद वाटला असेल पण ज्या ज्या देशात अशा तऱ्हेचा नियम काढून परीक्षेचे, पर्यायाने शिक्षणाचे महत्त्व कमी केले, वाटले तर शिका, वाटले तर नको, काहीही करा असे स्वातंत्र्य जेथे मुलांना मिळाले तेथे शिक्षणाच्या बाबतीत मोठ्या अडचणी उत्पन्न होऊन तेथील व्यवसायांना बाहेरच्या देशांमधून स्नातक व कामगार मागवावे लागतात ही  गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. भारतातून अनेक मंडळी परदेशात बोलावली जातात, तेथे त्यांना भरपूर पगार व सोयी-सवलती दिल्या जातात त्या यामुळेच. 

तेव्हा परीक्षा घ्यावीच असा विद्यार्थ्यांनी हट्ट धरला तर त्यांचा दोन प्रकारे फायदा होतो. एक म्हणजे वर्षभरात अभ्यासाकडे थोडे दुर्लक्ष झालेले असले तरी परीक्षेच्या निमित्ताने सगळा अभ्यास नीट केला जातो. परीक्षेच्या निमित्ताने रोजच्या दिनक्रमाला एक वेगळी शिस्त लागते. शिवाय आई-वडिलांचे जास्त लक्ष मुलांकडे वेधले जाते, त्यांच्या खाण्या-पिण्याकडे अधिक लक्ष दिले जाते, मुलांची परीक्षा आहे या कारणाने पालकही अनेक बंधने स्वतःवर घालून घेतात. यामुळे परीक्षेच्या काळात भरकटणाऱ्या मनाला जणू स्वयंशिस्त लागते. आणि परीक्षेचा दुसरा फायदा म्हणजे परीक्षेचा थोडासा ताण वाटला तर परीक्षेनंतरची सुट्टी अधिक आनंददायी ठरू शकते.

सूर्यनमस्कार हा दृष्टी सम्यक व व्यापक  होण्यासाठी, मेंदू तरतरीत होण्यासाठी व शरीरशक्‍ती वाढण्यासाठी अत्यंत उपयोगी असा क्रियायोगातील प्रकार आहे. रोज निदान बारा सूर्यनमस्कार घालावेत.

सूर्यनमस्कार घालताना पाठीला बाक देऊन आकाशाकडे पाहताना बुबुळे सुद्धा वरच्या टोकाला जातील याकडे लक्ष ठेवावे. तोंडात पाणी धरून बंद डोळ्यांवर पाण्याचा हबका मारणे, अधून मधून डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या वा दुधाच्या घड्या ठेवणे, दृष्टीला हितकर अशा औषधांचे पॅक डोळ्यांवर ठेवणे वगैरे उपायांनी डोळ्यांकडे जाणाऱ्या नसांमधील उष्णता कमी होते, डोळ्यांची भिंगे लवचिक राहण्यास मदत मिळते, पर्यायाने डोळ्याचे भिंग वाइड लेन्ससारखे काम करते. 

विद्यार्थ्याने आपल्या डोळ्यांची व मेंदूची काळजी घेतली व इलाज केला तर परीक्षेचा आनंदच वाटेल. आपण वर्षभर जे कार्य केले त्याची पावती मिळाल्याचे समाधान मिळेल व परीक्षा संपल्यावर सुट्टीचा आनंद द्विगुणित होईल, कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण येणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com