अंगावर सूज

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 20 April 2018

कोणत्याही प्रकारची सूज असली तरी पुनर्नवा लागू पडते, कारण ती रसायन, वयःस्थापन गुणांनी परिपूर्ण आहे. पुनर्नवा म्हणजे पुन्हा नवीन करणारे. वाढत्या वयाचे दुष्परिणाम नाहीसे करून शरीराला चिरतरुण ठेवण्यासाठी पुनर्नवा उत्कृष्ट समजली जाते. 

सूज हे खरे तर एक लक्षण आहे, त्यामुळे त्यावर उपचार करण्यापूर्वी ती कशामुळे आली आहे हे माहिती करून घेणे गरजेचे असते. सूज बाह्य कारणांमुळे येऊ शकते, तसेच ती आतील बिघाडांमुळेही येऊ शकते. मुका मार लागला, मधमाशी-गांधीलमाशी वा एखादा किडा चावला तर स्थानिक सूज येते. फार वेळ एका ठिकाणी बसण्याने, प्रवासानंतर बऱ्याचदा पायांवर सूज आलेली आढळते. लघवीच्या संबंधात काही दोष उत्पन्न झाला तरी पायांवर सूज येऊ शकते. स्त्रियांच्या बाबतीत पाळीच्या आधी काही दिवस अंगावर सूज येऊ शकते. गरोदरपणात शेवटच्या एक-दोन महिन्यांमध्ये पायांवर सूज जाणवू शकते. मूत्रपिंड, यकृत, फुप्फुसे, हृदय वगैरे महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यात बिघाड झालेला असला तरी त्याचे एक लक्षण म्हणून अंगावर सूज आलेली असू शकते. एखाद्या खाद्यपदार्थाची ॲलर्जी म्हणून किंवा तीव्र रासायनिक औषधाचा दुष्परिणाम म्हणूनही अंगावर सूज येऊ शकते. एकूणच काय तर सूज जाणवू लागली तर ती नुसती कमी होण्यासाठी उपचार करून चालत नाहीत, तर सूज का आली याचे नेमके कारण काय आहे हे शोधणे महत्त्वाचे असते. 

सूज येण्यामागे बिघडलेला वातदोष हा मुख्य कारक असतो, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे.  

रक्‍तपित्तकफान्‌ वायुर्दुष्टो बहिःसिराः ।
नीत्वा रुद्धगतिस्तैर्हि कुर्यायात्त्वङ्मांससंश्रयम्‌ ।।
...माधव निदान

वातप्रकोपक कारणांनी शरीरात जेव्हा वाताचा प्रकोप होतो, रक्‍त दूषित होते तेव्हा हा प्रकुपित वात रक्‍त, पित्त व कफ यांना शरीरातील बाह्य शिरांमध्ये ढकलत राहतो. बिघडलेले रक्‍त, पित्त व कफ वाताच्या मार्गातही अडथळा आणतात. याचाच परिणाम म्हणून त्वचा व मांस यांच्यामध्ये वायूचा दाब तयार होतो व ती जागा फुलते. यालाच ‘सूज’ असे म्हणतात. 

सूज डोळ्यांनी दिसू शकते; बोटातील अंगठी, बांगड्या किंवा पायातील चप्पल एकाएकी घट्ट झाल्याचे जाणवले तरी सूज आल्याचे समजू शकते. संपूर्ण अंगावर सूज असली तर बरोबरीने जडपणा, अनुत्साह, थकवा, त्वचा संवेदनशील होणे या प्रकारची लक्षणे सहसा आढळतात. वाताची सूज कमी-जास्ती होत राहते, त्या ठिकाणची संवेदना कमी होते, तेथील त्वचा काळपट रंगाची होते. वाताची सूज असल्यास वैशिष्ट्य म्हणजे सूज असलेल्या जागेवर दाब दिला तर जो खड्डा पडतो तो दाब काढला की तत्काळ भरून येतो. पित्ताची सूज असली तर त्या ठिकाणी आग होते, वेदना होतात, त्वचा लालसर होते. कफाची सूज कमी-जास्ती होत नाही तर स्थिर राहते. रात्री सूज वाढते आणि दाब दिल्यावर जो खड्डा पडतो तो लगेच भरून येत नाही तर हळूहळू बऱ्याच वेळाने भरून येतो. 

वातज, पित्तज, कफज या तीन नेहमीच्या प्रकारांव्यतिरिक्‍त आयुर्वेदात अभिघातज सूज व विषज सूज असे अजून दोन प्रकार सांगितलेले आहेत.

जेव्हा आघात, मार वगैरेंमुळे सूज येते तेव्हा तिला ‘अभिघातज‘ असे म्हणतात. तलवार किंवा अन्य शस्त्राने शरीर कापले गेले, छेदले गेले व त्यावर वेळेवर उपचार झाले नाही, कधी मुकामार लागला तर अशी सूज येते. याशिवाय बर्फाचा स्पर्श झाल्याने, बिब्ब्याचा रस लागल्याने, खाजकुहिलीचा (कुसं असलेली विशेष प्रकारची वनस्पती) स्पर्श झाल्यानेसुद्धा शरीरावर सूज येते. या सूजेमुळे दाह होतो व खाजही येते. ही सूज शरीरावर झपाट्याने पसरणारी असते.

विषाच्या संयोगाने जी सूज येते तिला ‘विषज’ असे म्हणतात. विषारी किडे, प्राणी, सर्प वगैरेंच्या स्पर्शाने अथवा विषारी प्राण्याच्या मल-मूत्रादींच्या संयोगाने, विषारी वृक्षाच्या संयोगात आल्याने, विषसंयोगाने विषारी झालेल्या वस्त्र, फुला-फळांच्या संयोगात आल्याने शरीरात आग होते, खाज सुटते, तसेच सूजही येते. या प्रकारची सूज सहसा मऊ असते, चटकन उत्पन्न होणारी असते, शिवाय त्यामुळे वेदनाही होतात.

सूज शरीरावर नेमक्‍या कोणत्या भागावर येते हे पाहून दोष कुठे साठून राहिले आहेत, याचा अंदाज करता येतो. उदा. आमाशयात (अन्न पचन होण्यापूर्वी ज्या ठिकाणी साठतो तो भाग) दोष असतील तर छाती, मान व चेहऱ्यावर सूज येते. पक्वाशयात (अन्न पचन झाल्यावर ज्या ठिकाणी राहते तो भाग) दोष असले तर सूज नाभी व हृदयाच्या मधल्या भागावर येते. मलाशयात दोष साठले, तर नाभीच्या खालच्या भागावर सूज येते. दोष जर संपूर्ण शरीरभर पसरलेले असले, तर संपूर्ण शरीरावर सूज येते. 

उपचार करताना सूज आल्याचे कारण, प्रकार, शरीरातील बिघाड बघावाच लागतो, केवळ लघवीला जास्त होण्यासाठी औषध दिले, की सूज कमी होईल अशा प्रकारे उपचार करून चालत नाही. म्हणूच आयुर्वेदात  सूज आल्यास अनेक औषधे सुचविलेली सापडतात. नेमके निदान करून त्याची योजना केल्याने उत्तम गुणही येताना दिसतो; मात्र सूज असल्यास करावयाच्या उपायांमध्ये मुख्य म्हणावे असे औषध म्हणजे पुनर्नवा. पुनर्नवा ही जमिनीलगत पसरणारी वेलीसारखी वनस्पती असते. पावसाळ्यात अधिक तरारून येते; परंतु संपूर्ण वर्षभर टिकते. खेडेगावात कोवळ्या पुनर्नव्याच्या पानांची भाजीसुद्धा करतात, पांढरा व लाल अशा दोन प्रकारची पुनर्नवा मिळते. पांढऱ्या पुनर्नव्याला पांढरी फुले येतात, तर लाल पुनर्नव्याला लाल फुले येतात. पुनर्नव्याचे मुख्यत्वे मूळ औषधात वापरले जाते; मात्र पुनर्नव्याची अख्खी वेलही वापरण्याची पद्धत आहे. सूज कोणत्याही प्रकारची असो, आतून व बाहेरून पुनर्नवा वापरण्याने गुण येतोच, अशी प्रशस्ती पुनर्नव्याची केली जाते. ताज्या पुनर्नव्याचा काढा करून घेतला आणि पुनर्नवा बारीक वाटून, गरम करून त्याचा लेप बाहेरून लावला तर सूज ओसरते. वाताची सूज असली तर पुनर्नव्याच्या काढ्यात सुंठीचे चूर्ण मिसळून घेण्याचा उपयोग होतो. पित्तामुळे सूज असली तर पुनर्नव्याच्या मुळाने संस्कारित दूध (क्षीरपाक) घेण्याचा उपयोग होतो. कफाची सूज असली तर गोमूत्रासह पुनर्नवा चूर्ण घेणे गुणकारी ठरते. यकृतातील तसेच वृक्कातील दोषांवरही पुनर्नवा उत्तम असते. पुनर्नवासव, पुनर्नवामंडुर, पुनर्नवाष्टक काढा घेण्याने अवघडातील अवघड उदर विकार बरे होताना दिसतात. 

पुनर्नवा कोणत्याही प्रकारची सूज असली तरी लागू पडते. कारण ती रसायन, वयःस्थापन गुणांनी परिपूर्ण आहे. पुनर्नवा म्हणजे पुन्हा नवीन करणारे. वाढत्या वयाचे दुष्परिणाम नाहीसे करून शरीराला चिरतरुण ठेवण्यासाठी पुनर्नवा उत्कृष्ट समजली जाते. 

पुनर्नवस्यार्धपलं नवस्य पिष्टं पिबेद्यः पयसार्धमासम्‌ ।
द्वयं तत्‌ त्रिगुणं समां वा जीर्णोऽपि भूयः स पुनर्नवः स्यात्‌ ।।
....अष्टांगहृदय उत्तरतंत्र

ताज्या पुनर्नव्याचे मूळ दोन तोळे या प्रमाणात दुधात उगाळून जी व्यक्‍ती पंधरा दिवस, दोन महिने किंवा वर्षभर सतत घेईल ती वृद्ध असली तरी पुन्हा तरुण होईल (तरुणाप्रमाणे शक्‍तीसंपन्न होईल). 

म्हणून बहुतेक सर्व रसायनांमध्ये पुनर्नव्याचा समावेश असतो. अधूनमधून पुनर्नवासव घेऊन यकृत, वृक्कादी अवयवांना मदत करणे हेसुद्धा आरोग्यासाठी हितावह असते. पुनर्नव्याप्रमाणे दशमूळ, गुडूची, हरीतकी, गोक्षुर वगैरे द्रव्येही सूज कमी करणारी असतात.

सुजेमध्ये गोमूत्र हे पथ्यकर आणि औषधाप्रमाणे हितकर सांगितलेले आहे. 
गोमूत्रस्य प्रयोगो वा शीघ्रं श्वयथुनाशनम्‌ ... ।।
....भैषज्य रत्नाकर 

रोज गोमूत्र पिण्याने सूज कमी होते. गोमूत्र प्यायचे असेल तेव्हा ते भारतीय वंशाच्या निरोगी गाईचे असावे. गोमूत्र जाडसर सुती कापडातून सात वेळा गाळून घेऊन त्यात समभाग पाणी मिसळून प्यायचे असते. साधारणतः सकाळी सात-आठ चमचे, संध्याकाळी सात-आठ चमचे या प्रमाणात गोमूत्र-पाण्याचे मिश्रण घेता येते; मात्र वैद्यांच्या मार्गदर्शनाने हे प्रमाण कमी-जास्ती करता येते. बकरीचे दूध हेसुद्धा सर्व प्रकारच्या सुजेवर पथ्यकर असते.   

पुराणयवशाल्यन्नं दशमूलोपसाधितम्‌ ।
अल्पमल्पं कटुस्नेहं भोजनं शोफिनां हितम्‌ ।।
....भैषज्य रत्नाकर 

एक वर्ष जुने जव आणि साठेसाळीचे तांदूळ यांना दशमुळांनी सिद्ध केलेल्या पाण्यात शिजवून तयार केलेल्या सूप, पेज वगैरे गोष्टी, थोडे तूप व थोडी तिखट द्रव्ये (सुंठ, मिरी, पिंपळी, लवंग वगैरे) यांचा समावेश असलेले भोजन सुजेमध्ये हितकर असते. 

सूज असल्यास पथ्य  
सूज असल्यास चरकसंहितेमध्ये पुढील पदार्थ पथ्यकर सांगितलेले आहेत, 
पिंपळीयुक्‍त कुळथाचे सूप
सुंठ, मिरी, पिंपळी व यवक्षार मिसळलेले मुगाचे सूप
एक वर्ष जुने यव व तांदूळ यांपासून बनविलेले पदार्थ
परवर, गाजर, मुळा, कडुनिंबाची कोवळी पाने यांची भाजी

सूज असल्यास पथ्य : कुळीथ, यव, तांदूळ, मूग, जुने तूप, ताक, मध, आसव, कारले, शेवगा, गाजर, परवर, मुळा, गोमूत्र, हळद, पुनर्नवा, पडवळ, गरम पाणी वगैरे
सूज असल्यास अपथ्य : विरुद्ध अन्न, मीठ, सुकवलेल्या भाज्या, गुळाचे पदार्थ, दही, आंबट गोष्टी, पचण्यास जड पदार्थ, उडीद, गहू, थंड पाणी, मका, पावटा, वाल, चवळी, सोयाबीन, श्रीखंड, चीज, रताळी, साबुदाणा वगैरे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swelling on the skin