β आज थोडंसं नाजूक विषयाबद्दल...

Breast Cancer
Breast Cancer

या महिन्यात तुम्हाला मुली घोळक्याने गुलाबी शर्ट घालून किंवा गुलाबी रिबीन लावून फिरताना दिसत असतील तर कुठलीही उपरोधिक चर्चा करण्याआधी त्यामागचा उद्देश लक्षात घ्या. ऑक्टोबर महिना हा ‘ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ‘ म्हणून मानला जातो. 2015 मध्ये भारतात ब्रेस्ट कॅन्सरने पीडित नवीन पेशंटची संख्या आहे- एक लाख पंचावन्न हजार. आणि मृत्यू झालेल्या महिलांची संख्या आहे जवळपास ऐंशी हजार. खेदाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे या कॅन्सरबद्दल म्हणावी तेवढी जागरूकता नाहीये. म्हणूनच आज हा लेखाचा प्रपंच.

मुळातच कॅन्सर हा असा प्रकार आहे ज्याला आपण बळी पडलो आहोत हे आपल्या खूप उशिरा लक्षात येतं. दुर्दैवाने त्याची विशेष लक्षणंही दिसून येत नाहीत. आणि जेव्हा कळतं तेव्हा मात्र उशीर झालेला असतो. कॅन्सर ही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे असं म्हणतात. त्यामुळं तो होऊच नये यासाठी स्वतःला जपणं अत्यंत गरजेचं आहे. स्वतःला जपताना, स्वतःच्याच शरीराची नीट ओळख असायला हवी. किमान ब्रेस्ट कॅन्सर ओळखता यावा म्हणून तरी. तो कसा ओळखायचा याबद्दल नीट माहिती घ्यायला हवी.

ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नक्की काय?

सर्वात आधी, ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांचा आजार म्हणून ओळखला जात असला तरी काही वेळा पुरुषांमध्येसुद्धा हा विकार आढळून येतो. अर्थात त्याचे प्रकार वेगळे आहेत. आज स्त्रियांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सरबद्दलच बोलूया.

स्त्रीच्या स्तनामध्ये चार मुख्य गोष्टी असतात. ‘फॅट‘, ‘कनेक्टिव्ह टिशू‘, ‘लोब्युल‘(दूध तयार करणाऱ्या ग्रंथी) आणि ‘डक्ट‘(तयार होणारं दूध स्तनाग्रापर्यंत पोहोचवणाऱ्या वाहिन्या). या सर्व गोष्टी पेशींपासून बनलेल्या असतात. कॅन्सर होतो म्हणजे या पेशींची अतोनात वाढ होते आणि गाठ निर्माण होते जी जीवघेणी असते. 

ब्रेस्ट कॅन्सर दोन प्रकारचा असतो-  

1. डक्टल(डक्ट मध्ये गाठ निर्माण होते)-  हा जास्त प्रमाणात आढळून येणारा प्रकार आहे 

2. लोब्यूलर(लोब्युलमध्ये गाठ निर्माण होते)- दोन्ही प्रकारात गाठी स्तनामध्ये निर्माण होत असल्या तरी कालांतराने इतर अवयांवरदेखील त्याचा दुष्परिणाम होतो.

आता महत्वाचा प्रश्न म्हणजे हे सगळं ओळखायचं कसं?

1. प्रामुख्याने आढळून येणारी गोष्ट म्हणजे हाताला जाणवू शकते अशा प्रकारची गाठ निर्माण होते. अनेकवेळा ही गाठ चरबीचीसुद्धा असते, जी त्रासदायक नसते. 

2. मासिक पाळीच्या वेळेस काहीजणींना स्तन जड वाटतात, दुखतात. याची काळजी करायची गरज नाही. पण मासिक पाळी जवळ नसतानासुद्धा वारंवार तशा प्रकारचं दुखायला लागतं, काखेमध्ये जडपणा जाणवतो. हे मात्र कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

3. स्तनाचा आकार बदलतो, टोक आतल्या बाजूला झुकतं.

4. स्तनाग्राचा रंग बदलतो. टोकदारपणा कमी होतो(वयानुसार होणारा बदल नव्हे).

5. स्तनाग्रामधून स्त्राव होतो. (पांढराद्रव किंवा रक्त)

बायकांनी स्वतःच हे ओळखणं गरजेचं आहे. कारण हा असा कॅन्सर आहे जो त्यांना स्वतःला बायोप्सीशिवाय ओळखता येऊ शकतो. आणि लवकर लक्षात आला तर शरीराची विशेष हानी न होता बरा देखील होऊ शकतो. त्यामुळं स्वतःला आरशात नीट निरखून बघा.. कसलीही शंका अली तर लगेच डॉक्टरांना भेटा.. ‘मी तरुण आहे मला काय होणार‘ असं म्हणू नका. तिशीनंतर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढत जातो.

डॉक्टर्स जर त्यांना काही संशयास्पद वाटलं मेमोग्राम, एक्स-रे करायला सांगतात. ज्यात कुठीलीही कापाकापी नसते. दिसलेली गाठ धोकादायक आहे कि नाही हे ठरवण्यासाठी बायोप्सी करतात आणि मग आलेल्या निदानानुसार उपचार पद्धती ठरवली जाते. [उपचारांबद्दल जास्त सांगत नाही कारण ते प्रत्येक व्यक्तीच्या निदानावर अवलंबून असतात. एक गोष्ट मात्र आहे विकाराची सुरुवात असेल तर फक्त गाठ काढली जाते नाहीतर संपूर्ण स्तन काढला जातो.]

ब्रेस्ट कॅन्सर होण्यामागे ठराविक असं एकच कारण नाही. बरेच डॉक्टर म्हणतात हा जीवन शैली बिघडल्यामुळे होणारा विकार आहे. (लाईफस्टाईल डिसऑर्डर) तरीदेखील काही कारणं सांगता येतील.

1. वयानुसार शरीरात होणारे बदल 

2. जनुकांचा प्रभाव  

3. अनुवांशिक. ब्रेस्ट कॅन्सर आणि अंडाशयचा कॅन्सर हे अनुवांशिक असू शकतात असं डॉक्टर म्हणतात

4. हार्मोनल ट्रीटमेंटस 

5. ज्यांची मासिक पाळी नेहमीच्या वयापेक्षा खूप लवकर सुरू होते ( 12 व्या वर्षाआधी) किंवा ज्यांची पाळी उशिरा थांबते (55 व्या वर्षानंतर) त्यांच्या शरीरात इस्ट्रोजेन जास्त काळ असतं आणि ‘इस्ट्रोजेन एक्सपोजर’ हे देखील ब्रेस्ट कॅन्सरचं एक कारण आहे. 

6. बाळाला योग्य प्रमाणात स्तनपान केलं नाही तरीदेखील ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका असतो

7. लाईफस्टाईल डिसऑर्डर होण्यामागे जी कारणं आहेत ती म्हणजे स्थूलपणा, अति प्रमाणात जागरण, मद्यपान, मानसिक ताण-तणाव

8. काही लोक म्हणतात कि चुकीची अंतर्वस्त्र वापरल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो. अजून तरी असं सिद्ध झालेलं नाहीये

हे सगळं टाळायचं असेल तर या काही गोष्टी करायला हव्या- 

1. नियमितपणे व्यायाम - याला अजिबात पर्याय नाही 

2. अतिमद्यपान टाळायलाच हवं. मद्यपानामुळे वंध्यत्वदेखील येऊ शकतं

3. कुठलीही हार्मोनल थेरपी शक्यतो टाळायला हवी

4. स्तनामध्ये कुठे गाठ नाही ना हे नियमितपणे बघायला हवं

तर मैत्रिणींनो, या महिन्यात ब्रेस्ट कॅन्सरबद्दल नक्की माहिती करून घ्या. आयुष्याचा गांभीर्याने याचा विचार करा. स्वतःला जपा....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com