दातांची निगा

डॉ. मानसी पावसकर
Sunday, 27 January 2019

दातांमध्ये अन्नकण अडकून ते तेथे कुजण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा आपल्याला पत्ताही नसतो. मग अचानक हिरडीतून रक्त येताना दिसते. दात किडला असल्याचे लक्षात येते. पण हे घडायला फार आधीच सुरवात झालेली असते. आपल्या दातांची काळजी आपणच घेतली पाहिजे.

दातांमध्ये अन्नकण अडकून ते तेथे कुजण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा आपल्याला पत्ताही नसतो. मग अचानक हिरडीतून रक्त येताना दिसते. दात किडला असल्याचे लक्षात येते. पण हे घडायला फार आधीच सुरवात झालेली असते. आपल्या दातांची काळजी आपणच घेतली पाहिजे.

जोशी काकूंना माझी भेट हवी होती. माझी अपॉइंटमेंट घेण्यासाठी त्यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. त्यांनी आमच्या रिसेप्शनिस्टला थोडक्‍यात माहिती दिली की, सध्या काहीही खाल्ले की दातांमध्ये रुतून बसते आहे आणि ते टूथपिकने काढण्याचा प्रयत्न केला की हिरडीतून रक्त येते. दंतवैद्यांची जाम भीती असल्यामुळे येण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे.

ही काही अगदीच ‘इमर्जन्सी केस’ नव्हती. त्यामुळे मी त्यांना कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करायला लावल्या आणि दोन दिवसांनंतरची अपॉईंटमेंट दिली. अपॉइंटमेंटच्या वेळेस त्यांच्या दातांची नीट तपासणी केली. दातांमधील खड्डे किती खोल आहेत हे बघायला एक्‍स-रे घेतले, रुटीन डेंटल क्‍लिनिंग, पॉलिशिंग झाले आणि त्यांना आम्ही दातांमधील गॅप भरून घेण्यासाठी पुढची अपॉइंटमेंट दिली. तोवर घरात उपचार सुरू राहावेत म्हणून हिरडीवरचे मलम, इंटर डेंटल टूथ ब्रश व पोटात घेण्यासाठी औषधेही लिहून दिली. त्यावेळी त्यांना दिलेल्या वेळा पाळून त्यांनी दंतोपचार करून घेतले. आणि त्यानंतर जोशी काकू सहा महिन्यातून एकदा तरी ‘डेण्टल चेकअप’ करून जातात. 

दातांची समस्या आपण प्रत्येक जण कधी ना कधीतरी अनुभवतोच. आमच्या वैद्यकीय भाषेत आम्ही याला ‘फूड इम्पॅक्‍शन’ असे म्हणतो. एक गोष्ट सर्वांनाच माहिती आहे की, आपल्या तोंडात बत्तीस दात असतात. प्रत्येक दात हा आपल्या बाजूच्या दाताशी एका विशिष्ट ‘पॉईंट’वर संपर्कात येत असतो. याला आम्ही ‘कॉन्टॅक्‍ट पॉईंट’ असे म्हणतो. यामुळे एकमेकांना मजबूत आधार देण्याचे काम केले जाते. कॉन्टॅक्‍ट पॉईंटमध्ये काही गडबड झाली की, ते सैलावू लागतात. मग सर्वात प्रथम, अन्नकण रुतून बसतात आणि दातांच्या समस्येचे चक्र चालू होते. मेथी, कोथिंबीर किंवा नॉनव्हेजमध्ये चिकन यांची अडकून बसण्याची ‘फेवरेट’ जागा म्हणजे हे सैलावलेले कॉन्टॅक्‍ट पॉईंट्‌. हे अडकलेले अन्नकण काढल्याशिवाय आपल्या मनाला काही चैन पडत नाही आणि म्हणून आपण  तिथे टूथपिक वापरतो. सतत टूथपिकची सवय लागल्यामुळे कॉन्टॅक्‍ट पॉईंट उघडे पडत जातात, त्या उघड्या पडलेल्या जागी हळूहळू हिरडीतून रक्त येणे चालू होते आणि मग शेवटी दात किडतो. त्यामुळे तोंडाला एक वेगळ्या प्रकारचा वास येतो. या टप्प्यावरही आपण जर दुर्लक्ष केलें, तर मग हळूहळू दात पूर्ण सैल होतो, दाताच्या आजूबाजूचे हाड झिजत जाते आणि मग दात काढण्यापलीकडे काहीही पर्याय उरत नाही.  

फूड इम्पॅक्‍शनची काही कारणे सांगता येऊ शकतात.
१) आपल्या दातांची निगा राखण्याचा निष्काळजीपणा.
२) वयानुसार दातांची झीज झाल्यामुळे देखील कॉन्टॅक्‍ट पॉइंट उघडे पडतात आणि तिथे फूड इम्पॅक्‍शन चालू होते.
३) नवीन दात येताना जर वेडेवाकडे आले असतील, तर योग्य वयात ऑर्थोडोंतिक ट्रीटमेंट घेऊन, व्यवस्थित कॉन्टॅक्‍ट पॉईंट निर्माण केले जाऊ शकतात. यामुळे हास्यही छान दिसते व दातांची  निगाही राखली जाते.
४) दात काढलेल्या मोकळ्या जागी इम्प्लांट किंवा ब्रिज करून, कॉन्टॅक्‍ट पॉईंट परत निर्माण केले जाऊ शकतात. मोकळी जागा जर तशीच ठेवली, तर आजूबाजूचे दात त्या जागी सरकतात आणि आणि त्यांचे कॉन्टॅक्‍ट पॉईंट्‌ उघडे पडतात. एखाद्या रुग्णाचा जर दात काढावा लागला, तर पुढच्या चार महिन्यातच त्या ठिकाणी ‘डेंटल इम्प्लांट’ बसवून घेण्याचा पर्याय वापरला पाहिजे. 
५) तोंडात कोणतेही डेंटल प्रोस्थेसेस असू दे, सिंगल डेंटल कॅप असो वा मोठा ब्रीज, त्यांचे मेंटेनन्स ठेवणे गरजेचे आहे. दररोज ब्रशिंग सोबत दर सहा ते आठ महिन्यांतून एकदा एक प्रोफेशनल क्‍लिनिंग करून घेतले, तर या कॅप्सच्या ठिकाणी अन्नकण रुतून बसण्याची तक्रार कमी होईल.
६) दातांमधील फट डेंटल  लामिनेट किंवा विनियर्सच्या सहायाने बंद करून कॉन्टॅक्‍ट पॉईंट निर्माण केले जाऊ शकतात. मात्र हे एक किचकट काम असून, निष्णात कॉस्मेटिक डेंटल सर्जनकडून करून घेणे तेवढेच गरजेचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teeth Care