#FamilyDoctor गुडघे दुखण्यामागील दहा कारणे

डॉ. निशात गोडा
Friday, 27 July 2018

वय गुडघ्यातून बोलू लागते, असे म्हणतात. वय वाढते तसे गुडघ्यांचे दुखणे जाणवू लागते. गुडघेदुखी का सुरू होते? त्याची काही कारणे आहेत का? त्यावर उपाय काय?

मैलोनमैल धावणं असो की एखादा नवा डान्स करून पाहणं असो, गुडघ्यांशिवाय काहीच करता येत नाही. आपल्या प्रत्येक हालचालीची धुरा गुडघ्यांवर असते. गुडघेदुखीचा त्रास सर्वच वयात जाणवत असला तरी वाढत्या वयासोबत हा त्रास वाढत जातो. गुडघे किंवा गुडघ्याच्या आसपासच्या भागातील मऊ ऊतींमध्ये (अस्थिबंध, स्नायूबंध किंवा बर्सा-सांध्यामधील द्राव) त्रास असतो. या त्रासामागे काही विशिष्ट कारणे असतात. गुडघेदुखी सर्वसामान्यपणे पुढील कारणांनी उद्भवते.

फ्रॅक्‍चर किंवा हाड सरकणे -  आघात किंवा पडल्यानंतर गुडघ्यांमध्ये होणारी तीव्र वेदना गुडघ्याचे हाड मोडल्याने होऊ शकते. मांडीचे हाड, नडगीचे हाड, तसेच गुडघ्याची वाटी सरकणे हे तीव्र गुडघेदुखीमागील कारण असू शकते. 

ओस्टोआर्थरायटीस - हा संधीवाताचा अगदी सर्रास आढळणारा असा प्रकार आहे. विशेषत- पासष्ट वर्षांहून अधिकच्या व्यक्तींमध्ये संधीवाताचा हा प्रकार अधिक दिसतो. सांध्यांची हालचाल सहज व्हावी यासाठी आपल्या हाडांच्या टोकांना सुरक्षित कुर्चाचे आवरण असते. या आवरणाची झीज झाल्याने संधीवात उद्भवतो. पाय लांब करणे किंवा दुमडणे शक्‍य न होणे, सांध्यांमधील दुखणे, सांधे आखडणे, थरथर ही संधीवाताची लक्षणे आहेत.

जळजळ होणारा संधीवात - सांधे किंवा ऊतींची जळजळ झाल्याने या प्रकारचा संधीवात उद्भवतो. संधीवाताभ, त्वचाक्षय, सोरायटिक आर्थरायटिस ही याची काही उदाहरणे आहेत. जळजळ होणाऱ्या संधीवाताचे मुख्य कारण म्हणजे ऑटोइम्युन म्हणजेच प्रतिकारशक्तीचा आजार. यात प्रतिकारशक्ती शरीराचे रक्षण करण्याऐवजी शरीरावर चुकीचा परिणाम करते. संधीवाताभामध्ये सांध्यांबरोबरच डोळे, फुफ्फुस, रक्तवाहिन्या अशा शरीराच्या इतर भागांवरही परिणाम होतो. थकवा, ताप, वजन घटणे, सांध्यांची सूज, दुखणे, सांधे आखडणे ही जळजळीच्या संधीवाताची लक्षणे आहेत. 

इलिओटिबिअल बॅंड (आयटी) िंसंड्रोम - पार्श्वभागाच्या किंवा कुल्ल्यांच्या बाह्य भागापासून गुडघ्याच्या बाह्य भागापर्यंत पसरलेला ऊतींचा घट्ट समूह म्हणजे आयटी बॅंड. आयटी बॅंड नडगीच्या हाडाला घासला गेल्याने सूज आणि त्रास जाणवणे यातून इलिओटिबिअल िंसंड्रोम उद्भवतो. धावपटू आणि बाइकस्वार यांना इलिओटिबिअल सिंड्रोमचा त्रास होण्याची शक्‍यता अधिक असते.

टॉर्न एंटेरिअर क्रूशिएट लिगामेंट - नडगीच्या हाडाला आणि मांडीच्या हाडाला जोडणारे एंटेरिअर क्रूशिएट लिगामेंट फाटल्याने ‘एसीएल’चा त्रास जाणवतो. फुटबॉल, सॉकर, बास्केटबॉल या प्रकारचे खेळ खेळताना झटकन स्थिती बदलल्याने एसीएल दुखापत होऊन गुडघ्यात वेदना होऊ लागते. टेंडिनिटीस (एक किंवा अनेक स्नायूबंधांमधील जळजळ)मुळेही गुडघेदुखी उद्भवते.

बूरसिटीज - बर्सा (गुडघ्याच्या सांध्याला बाहेरून सुरक्षा देणारी द्रवाची पिशवी) मध्ये जळजळ जाणवल्याने गुडघ्याचा या प्रकारचा त्रास होतो. बूरसिटीजमुळे गुडघ्याला सूज येते आणि गुडघे कडक होतात, तसेच नाजूक बनतात.

गाऊट आणि स्युडोगाऊट - हे संधीवाताचे प्रकार आहेत. सांध्यांमध्ये युरिक ॲसिडचे खडे तयार झाल्याने गाऊटचा त्रास होतो. तर, सांध्यांमध्ये कॅल्शिअम पायरोफॉस्फेटचे खडे तयार झाल्याने स्युडोगाऊटचा त्रास होतो. गाऊट आणि स्युडोगाऊट या दोन्ही प्रकारांत तीव्र वेदना आणि सूज असे त्रास होतात.

मेक्‍सिस फाटणे - गुडघ्यांवर पूर्ण वजन पडल्याने अचानक गुडघा वाकला तर नडगीचे हाड आणि मांडीचे हाड यात शॉक ऑबझॉर्बरची भूमिका बजावणारा कडक रबरासारखा भाग फाटतो. यामुळे गुडघ्याला सूज येते, प्रचंड वेदना होतात आणि हलणे किंवा पाय लांब करणेही अशक्‍य होते. 

जंतूसंसर्ग - थेट एखादा आजार किंवा दुखापत यामुळे सेप्टिक आर्थरायटिस होऊ शकतो. सूज, वेदना, तो भाग लाल होणे, ताप ही याची काही लक्षणे आहेत. संसर्ग सामान्यत- जंतू, जीवाणू किंवा परजीवी किटाणूंमुळे होतो.

लांबलेले दुखणे - काहीवेळा, पाठ, कुल्ले किंवा पावलांमधील बऱ्याच काळापासून असलेल्या दुखण्यामुळे गुडघे सुजतात. मेंदूकडून मिळणाऱ्या वेदनेच्या संदेशांमध्ये गोंधळ झाल्यानेही हा त्रास होतो.

गुडघ्यातील साधेसे दुखणेही संधिवात, ओस्टिओआर्थरायटिस यासारख्या गुंतागुंतीच्या आणि गंभीर आजारांकडे जाऊ शकते. त्यामुळेच, कोणत्याही प्रकारचे दुखणे वाढेपर्यंत थांबू नका आणि योग्य निदान आणि उपचारांसाठी अस्थिविकारतज्ज्ञाकडून सल्ला घेणेच उचित असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten reasons of knee pain