अर्धशिशीसाठी मूळ पेशी उपचार 

डॉ. प्रदीप महाजन 
Friday, 13 March 2020

अर्धशिशी कधी उसळेल हे सांगता येत नाही. त्यावर परिणामकारक औषधही उपयुक्त ठरेलच असे नाही. या दीर्घकाळच्या डोकेदुखीवर आता मूळ पेशींच्या प्रत्यारोपणाचा उतारा उपयुक्त ठरू शकेल, असे वैद्यकशास्त्राला वाटत आहे. 
 

अर्धशिशी कधी उसळेल हे सांगता येत नाही. त्यावर परिणामकारक औषधही उपयुक्त ठरेलच असे नाही. या दीर्घकाळच्या डोकेदुखीवर आता मूळ पेशींच्या प्रत्यारोपणाचा उतारा उपयुक्त ठरू शकेल, असे वैद्यकशास्त्राला वाटत आहे. 
 

अर्धशिशी(मायग्रेन)च्या आजारात मेंदूतील रक्तप्रवाहात असमतोल होऊन तो मेंदूच्या काही भागात वाढतो आणि काही भागात कमी होतो. रक्तप्रवाहातील या कमी-जास्तपणामुळे मेंदूत काही विशिष्ट संप्रेरकांचे स्रवण होते. या संप्रेरकांच्या असमतोलामुळे डोके एकाच बाजूस दुखू लागते. डोकेदुखीच्या विकारांच्या आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार, दीडशेपेक्षा जास्त प्रकारची डोकेदुखी आहे. सामान्य डोकेदुखीमध्ये मज्जातंतू, रक्तवाहिन्या आणि डोके व मानेच्या भागातील स्नायू ताणले जातात. त्यामुळे मेंदूत रासायनिक घटकांवर ताण येऊन डोके दुखू लागते. मायग्रेन, क्लस्टर डोकेदुखी आणि तणावामुळे होणारी डोकेदुखी या प्रकारात येतात. 

मायग्रेनची शास्त्रीय लक्षणे चिंताजनक आणि डोक्याच्या एका बाजूला होणारी वेदना आहे. ही वेदना काही तास ते काही दिवसांपर्यंत होत राहू शकते. प्रकाश, आवाज, गंध आणि कधी कधी अगदी स्पर्श करणेही अत्यंत संवेदनशील असते. काहींना डोक्याचा मागील भाग जड होतो, मानेचे स्नायू ताठ होतात, चेहरा, हातातून मुंग्या येणे, विचित्र वास येणे, वास सहन न होणे, अस्वस्थता, मानसिक चिडचिड वाढणे, नैराश्य, बोलताना जीभ अडखळणे, झोप न येणे, गरगरणे, अंधारी येणे, विशिष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होणे, आदी लक्षणे आढळून येतात. 

मूळ पेशी (स्टेम सेल) आधारित उपचार पद्धती ही शरीराच्या विविध व्याधींवर उपचाराकरिता अलीकडे वापरली जाते. मायग्रेन आणि इतर डोकेदुखीच्या संदर्भात संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, स्टेम सेल आणि ग्रोथ फॅक्टर अ‍ॅक्टिव्हिटी न्यूरोजेनिक तक्रारींवर लक्ष केंद्रित करून त्यावर मात करण्यास फायदेशीर ठरत आहे. शिवाय मायग्रेन असलेल्या रुग्णांमध्ये एंडोथेलियल प्रोजेनिटर सेल(ईपीसी)चे कार्य कमी झाल्याचे अहवाल आहेत. त्या रक्ताभिसरणातील विकृतींशी संबंधित असू शकतात. आपल्या शरीरातील मेन्स्चिमल पेशींच्या स्वय नूतनीकरण आणि बहू-विभेदनाच्या संभाव्यतेद्वारे ईपीसीचा पूर्ववत आणण्यास प्रभावशाली ठरत आहे. 

बदलत्या काळानुसार आजारांवर प्रभावी उपचार करण्यासाठी केवळ लक्षणांवर उपचार न करता त्या आजाराविषयी जाणून घेणे अधिक आवश्यक आहे. स्टेम सेल म्हणजे शरीरातील मूळ पेशी. या पेशी कोणत्याही प्रकारच्या नवीन पेशी निर्माण करण्यास सक्षम असतात. अनेक असाध्य रोगांपासून मुक्ती मिळविण्यासाठी स्टेम सेल थेरेपी सध्या महत्त्वाची मानली जाते. असाध्य आजाराने गस्त असणाऱ्या रुग्णांसाठी स्टेम सेल थेरेपी आशेचा नवीन किरण घेऊन आलेली आहे. ज्या रुग्णांवर सध्या सर्व प्रकारचे उपचार करूनदेखील यश मिळालेले नाही, त्यांच्यावर स्वतःच्या शरीरातून प्राप्त केलेल्या मूळ पेशींच्या प्रत्यारोपणाने उपचार केले जातात. त्यांचा आजार बरा होण्यात मदत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treatment of stem cells for migraine article written by Dr Pradeep Mahajan