उपचार अज्ञाताचा 

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 27 September 2019

प्रत्येक आजाराचे कारण भौतिकात सापडतेच असे नाही. पितृपक्ष हा पंधरवड्याचा कालावधी भारतीय संस्कृतीने जणू अज्ञाताला, भौतिक इंद्रियांनी किंवा पुस्तकी ज्ञानाने जे समजून घेता येत नाही; पण जाणवू शकते त्याला समर्पित केलेला दिसतो. ग्रहरोगाने बाधित झाल्यास औषधे, पथ्य, पंचकर्म यांच्यापलीकडे जाऊन सूक्ष्म स्तरावर, भौतिकात गणता न येणाऱ्या; पण अस्तित्व असणाऱ्या गोष्टींवर काम करण्यासाठी आयुर्वेदाने विविध उपचार सांगितलेले आहेत. 
 

प्रत्येक आजाराचे कारण भौतिकात सापडतेच असे नाही. पितृपक्ष हा पंधरवड्याचा कालावधी भारतीय संस्कृतीने जणू अज्ञाताला, भौतिक इंद्रियांनी किंवा पुस्तकी ज्ञानाने जे समजून घेता येत नाही; पण जाणवू शकते त्याला समर्पित केलेला दिसतो. ग्रहरोगाने बाधित झाल्यास औषधे, पथ्य, पंचकर्म यांच्यापलीकडे जाऊन सूक्ष्म स्तरावर, भौतिकात गणता न येणाऱ्या; पण अस्तित्व असणाऱ्या गोष्टींवर काम करण्यासाठी आयुर्वेदाने विविध उपचार सांगितलेले आहेत. 
 

जीवन जगणे सुकर व्हावे यासाठी संस्कृतीचे योगदान अनमोल असते. भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना, त्यामागचे विज्ञान समजून घेताना तर ही गोष्ट अधिकच पक्की होत जाते. पितृपक्ष हा पंधरवड्याचा कालावधी भारतीय संस्कृतीने जणू अज्ञाताला, भौतिक इंद्रियांनी किंवा पुस्तकी ज्ञानाने जे समजून घेता येत नाही; पण जाणवू शकते, त्याला समर्पित केलेला दिसतो. आयुर्वेदातही ‘ग्रहचिकित्सा’ हा एक स्वतंत्र विभाग दिलेला आहे. यात औषधे, पथ्य, पंचकर्म यांच्यापलीकडे जाऊन सूक्ष्म स्तरावर, भौतिकात गणता न येणाऱ्या; पण अस्तित्व असणाऱ्या गोष्टींवर काम करण्यासाठी विविध उपचार दिलेले आहेत. चरकाचार्यांनीसुद्धा चिकित्सेचे जे तीन प्रकार सांगितले, त्यात दैवव्यपाश्रय चिकित्सेचा सर्वप्रथम उल्लेख केला आहे. 
त्रिविधमौषधमिति, दैवव्यपाश्रयं, युक्‍तिव्यपाश्रयं, सत्त्वावजयश्च । 
...चरक सूत्रस्थान 
उपचार तीन प्रकारचे असतात- दैवव्यपाश्रय, युक्‍तिव्यपाश्रय व सत्त्वावजय. ज्या चिकित्सेमध्ये आहार, आचरण व औषधद्रव्यांची युक्‍तीपूर्वक योजना केली जाते ती ‘युक्‍तिव्यपाश्रय चिकित्सा’ होय, तर अहितकारक विषयांपासून मनाचा निग्रह करणे म्हणजे ‘सत्त्वावजय चिकित्सा’ होय. 
मात्र, या दोहोंच्या आधी येते ती दैवव्यपाश्रय चिकित्सा. 

दैवव्यपाश्रय - व्याधिप्रतिकारार्थं अदृष्टमाश्रित्य क्रियमाणं । 
...चरक सूत्रस्थान 
ज्यामुळे व्याधीचा प्रतिकार करता येतो आणि न दिसणाऱ्या, इंद्रियगम्य नसणाऱ्या गोष्टींच्या मदतीने रोगाला कारण ठरणाऱ्या हेतूंचा नायनाट करता येतो, ती दैवव्यपाश्रय चिकित्सा होय. 
तत्र दैवव्यपाश्रयं - मन्त्रौषधि-मणि-मंगलबल्युपहार-होम-नियम-प्रायश्चेत्तोपवास-स्वस्त्ययन-प्रणिपात-गमनादि । 
दैवव्यपाश्रय चिकित्सेत विशिष्ट मंत्र म्हणणे; औषधी द्रव्य, मणी, रत्ने शरीरावर धारण करणे; मंगल कर्म करणे; उपहार म्हणजे मदत, दान, नकारात्मक मानसिकतेचा त्याग करणे; हवन, यज्ञ करणे; नियमात राहणे; प्रायश्चित्त घेणे; लंघन, उपवास, व्रतांच्या माध्यमातून शरीर-मनाची शुद्धी करणे; स्वस्तिकामना करणे; आपल्यापेक्षा श्रेष्ठ जनांना शरण जाणे, पवित्र ठिकाणी राहून मन शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करणे वगैरे गोष्टींचा समावेश होतो. 

प्रत्यक्षं अल्पं, अनल्पं अप्रत्यक्षम्‌ । म्हणजे जे इंद्रियांना समजणारे आहे, स्पष्ट कळणारे आहे ते अतिशय थोडे आहे, उलट जे स्पष्ट समजत नाही, अदृष्ट आहे ते खूप जास्त आहे, असेही आयुर्वेदात सांगितलेले आहे. तर, या अदृष्टावर काम करणाऱ्या क्रियांचा अंतर्भाव दैवव्यपाश्रय उपचारात होतो. 

सध्या नवीन नवीन रोगांचे निदान होताना दिसते; पण त्यावर उपचार काय करावे हे माहीत नसते. अनेक रोग असे असतात, की उपचार केले तरी रोग बरा होईलच असे ठामपणे सांगता येत नाही. बहुतेक मानसिक रोगांवरही रोग केवळ नियंत्रणात ठेवणे शक्‍य असते, अशा सर्व प्रकारच्या रोगांवर ग्रहचिकित्सेची गरज असते. ‘ग्रह’ या शब्दाचा अर्थ येथे ‘प्लॅनेट’ या अर्थाने घ्यायचा नसतो, तर जो ‘ग्रासतो तो ग्रह’. यात सूक्ष्म जीवजंतू, जीवाणू, विषाणू, नकारात्मक शक्‍ती वगैरे अनेक गोष्टींचा समावेश होत असतो. ग्रहरोग हे आपणहून होत नाहीत, कळत-नकळत आपण या ग्रहांना आकृष्ट होण्याची संधी देत असतो. जसे- 
आधुनिक वैद्यकात जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून जखम झाली असता, तसेच शस्त्रकर्म करण्यापूर्वी किंवा नंतर काटेकोरपणे काळजी घ्यावी असे सांगितले जाते, तसेच सुश्रुताचार्य शुद्धता, स्वच्छता, पावित्र्य यांचे भान न ठेवणे आणि नियमांचे पालन न करणे, स्वतःच्या मर्यादा न पाळणे यामुळे ग्रहरोग होतात असे म्हणतात. ग्रहरोगाच्या बाबतीतील एक महत्त्वाची गोष्ट सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेली आहे, 
न ते मनुष्यैः सह संविशन्ति ।
न वा मनुष्यान्‌ क्वचिदाविशन्ति ।।
ये त्वाविशन्तीति वदति मोहात्‌ ।
ते भूतविद्याविषयात्‌ अपोह्याः ।। 

...सुश्रुत उत्तरतंत्र 
हे ग्रह, राक्षस, भूतादी (दूषित हवा, सूक्ष्मजंतू, व्हायरस) आपणहून मनुष्याच्या सहवासात राहत नाहीत किंवा आपणहून मनुष्याकडे येतही नाहीत. जे असे समजतात ते भूतविद्येबाबत अनभिज्ञ होत (मनुष्याने स्वतःच्या वागण्याने वातावरण व मन प्रसन्न केले, तर दुष्टशक्‍ती आकर्षित होतात). 

जे लोक शारीरिक, मानसिक स्तरावर शुद्ध राहतात, स्वतःच्या कर्तव्याचे पालन करतात, संस्कृतीने आखून दिलेल्या मर्यादेत राहतात, त्यांना ग्रहादींची बाधा होत नाही. मात्र, जे लोक अमंगल वातावरणात राहतात, उच्छृंखल वृत्तीने वागतात, ते आपणहून ग्रहरोगांना बळी पडतात. पूर्वी पाहिलेली दैवव्यपाश्रयचिकित्सा किंवा ग्रहचिकित्सेतील उपचार पाहिले तर त्यातून शारीरिक, मानसिक शुद्धी, नियमांच्या माध्यमातून चांगली वागणूक आणि वातावरणाची शुद्धीच अपेक्षित असल्याचे समजते. 

ग्रहचिकित्सा ही रोगानुसार आणि रुग्णाच्या ताकदीनुसार, प्रकृतीनुसार बदलत जाते; पण सामान्यतः ग्रहचिकित्सेमध्ये समाविष्ट होणाऱ्या उपचारांपैकी काही निवडक उपचार पुढीलप्रमाणे, 
धूमचिकित्सा 
घृतं सिद्धार्थकाः श्वेताः कुष्ठं भल्लातकं वचा ।
बस्तलोमानि तगरं भूर्जावर्तं सगुग्गुलुः ।।
दशांगो नाम धूपोऽयं प्रयोज्यः सर्वरोगिषु ।
अपस्मारे विशेषेण ग्रहेषूपग्रहेषु च ।। 
...काश्‍यप कल्पस्थान 

तूप, पांढरी मोहरी, कुष्ठ, बिब्बा, वेखंड, बकऱ्याचे केस, तगर, भोजपत्र व गुग्गुळ हा दशांग नावाचा धूप सर्व रोगांत प्रशस्त असतो, विशेषतः अपस्मार (एपिलेप्सी), विविध ग्रहरोग, उपग्रहरोगांत उपयोगी असतो. 

अंजन 
नक्‍तमालफलं व्योषं मूलं श्‍योनाकबिल्वयोः ।
हरिद्रे च कृतावर्त्यः पूर्ववत्‌ नयनांजनम्‌ ।। 

...सुश्रुत उत्तरतंत्र 
करंजाची बी, सुंठ, मिरी, पिंपळी, श्‍योनाक वृक्षाचे मूळ, बेलाचे मूळ, हळद, दारूहळद ही सर्व द्रव्ये योग्य प्रमाणात एकत्र करून त्याची वर्ती (लांबट गोळी) तयार करावी व ती पाण्यात उगाळून त्याचे डोळ्यात अंजन करावे. 

अभ्यंग 
जुने तूप, लसूण, हिंग, पांढरी मोहरी, वेखंड, दूर्वा, जटामांसी, काकोली, क्षीरकाकोली, गुळवेल, रसांजन, मनःशीळ, गुग्गुळ, धूप, ऊद वगैरे द्रव्यांनी; तसेच मांजर, अस्वल, साळ, मुंगूस वगैरे प्राण्यांचे केस, नखे वगैरे द्रव्यांनी सिद्ध केलेल्या तेलाचा किंवा तुपाचा संपूर्ण अंगाला अभ्यंग करणे. 

नस्य 
हरीतकी हरिद्रे द्वे लशुनो मरिचं वचा ।
निम्बपत्रं च बस्ताम्बुकल्कितं नावनाञ्जनम्‌ ।। 

हिरडे, हळद, लसूण, मिरी, वेखंड, कडुनिंबाची पाने ही सर्व द्रव्ये बकऱ्याच्या मूत्रासोबत वाटून त्याचे नस्य करावे, तसेच अंजनही करावे. 

लेप - अंगावर विशेष औषधी द्रव्यांचा लेप करणे. 
ब्राह्मी, विडंग, त्रिकटू, हिंग, जटामांसी, रास्ना, कळलावी, लसूण, अतिविषा, तुळस, वेखंड, मालकांगणी, नागदवणा, अनंतमूळ, हिरडा, तुरटी वगैरे औषधे हत्तीच्या मूत्रासोबत वाटावीत व त्यांचा शरीरावर लेप करावा. यामुळे उन्माद रोग नष्ट होतो. 

मंत्रचिकित्सा 
भूतेशं पूजयेत्स्थाणुं प्रमथारण्यांश्च तद्गुणान्‌ ।
जपन्‌ सिद्धांश्च तन्मन्त्रात्‌ ग्रहान्‌ सर्वानपोहति ।। 

...अष्टांगहृदय उत्तरस्थान 
भूतांचा ईश असणारे शंकरमहादेव व त्यांचे प्रमथादी गण यांची पूजा करावी, त्यांचे सिद्ध मंत्र जपावेत म्हणजे सर्व प्रकारची पीडा दूर होते. वेद-उपनिषदात शरीर व जीवशास्त्र समजावलेले आहे. या ग्रंथांमध्ये शक्‍तिकेंद्रे मंत्राने शुद्ध व ताकदवान होतात या आधारे मंत्रशास्त्राचा विकास केला आहे. 
ईश्वरं द्वादशभुजं नाथमार्यावलोकितम्‌ ।
सर्वव्याधिचिकित्सन्तं जपन्‌ सर्वग्रहान्‌ जयेत्‌ ।। 

या मंत्राचा जप केल्यास सर्व प्रकारच्या ग्रहांच्या पीडा, उन्माद, अपस्मार व इतरही सर्व मनोविकार दूर होतात. 

औषधांनी सिद्ध घृतपान 
साधितं पञ्चगण्यारण्यं सर्वापस्मारभूतनुत्‌ ।

दशमुळे, त्रिफळा, हळद, दारूहळद, वावडिंग, अनंतमूळ वगैरे औषधी द्रव्ये आणि गाईचे दूध, दही, गोमूत्र हे सर्व गाईच्या तुपाबरोबर उकळून तयार केलेले पंचगव्य घृत सेवन केले असता सर्व प्रकारचे अपस्मार व भूतरोग नष्ट होतात. 
हे सर्व उपचार अगोदर स्नेहनादी पंचकर्माद्वारा शरीराची शुद्धी करून मग करावेत, तरच ते प्रभावी ठरतात, असेही सांगितले आहे.
हन्याद्‌ अल्पेन कालेन स्नेहादिरपि च क्रमः ।। 
...सुश्रुत उत्तरतंत्र 
स्नेहन, स्वेदन वगैरे पूर्वतयारी करून क्रमाने शास्त्रोक्‍त पंचकर्म करून मग या धूम, अंजन, लेपन, अभ्यंग वगैरेंची योजना करावी, म्हणजे यांचा अल्प काळातच उत्तम गुण येतो. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The treatment is unknown article written by Dr Shree Balaji Tambe