क्षयरोग

क्षयरोग

क्षयासारखा रोग (टी. बी. मायक्रोबॅक्‍टेरियम टयुबरक्‍युलॉसिस या जीवाणूंपासून होणारा आजार), त्यावरील इलाज सापडूनही, एवढा वाढतो आहे. असे वाटते, की माणसाचे पराधीनत्व जणू सिद्ध करण्यासाठीच हा रोग असावा. एखाद्या रोगाचे निदानच झाले नाही किंवा त्यावर औषधच सापडले नाही, तर अशा अवस्थेत कमनशीब म्हणता येईल. या रोगावर इलाज व औषधे उपलब्ध असतानाही जर रोग आपला प्रभाव दाखवत राहिला, तर त्याला पराधीनत्व नाही तर काय म्हणावे?

रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने सध्याच्या जगाला समजेल अशा पद्धतीने १८८२ मध्येच क्षयरोगाच्या जंतूंचा शोध लावला. अर्थात, जंतूंचा शोध लागला नव्हता किंवा त्यांना नाव मिळालेले नव्हते, तेव्हा क्षयरोग होत नव्हता असे नव्हे. फार पूर्वीच्या काळापासून म्हणजे अगदी

अनादी काळापासून हा रोग अस्तित्वात आहे. रोगाचे जंतू समजल्यामुळे हा सांसर्गिक आजार आहे हे समजणे सोपे झाले. परंतु क्षयरोगी ज्या वेळेस खोकतो, शिंकतो, थुंकतो, त्या वेळेला रोगाचे जंतू श्वासाद्वारे निरोगी व्यक्‍तीच्या शरीरात प्रवेश करतात व क्षयरोग पसरण्याचा धोका असतो, हे ज्ञान पूर्वीपासूनच उपलब्ध आहे. रोगप्रतिकारशक्‍ती कमी असणाऱ्या व्यक्‍तीवर क्षयाचे जंतू पूर्ण परिणाम करून रोगोत्पत्ती करतात. वारंवार होणारी सर्दी क्षयरोगाकडे जाण्याची शक्‍यता अधिक असते. जवळ जवळ असे समजायला हरकत नाही, की प्रत्येकाच्याच शरीरात क्षयरोगाचे जंतू दबा धरून बसलेले असतातच. सर्दीकडे दुर्लक्ष केले, जेवताना-खाताना स्वच्छता बाळगली नाही किंवा क्षय झालेल्या रोगी व्यक्‍तीच्या उत्सर्गाचा अधिक सहवास घडला, तर ते दडून बसलेले जंतू कार्यान्वित होतात व क्षयरोगाचा प्रादुर्भाव होतो. अर्थात, शरीरातील प्रतिकारसैन्याची फळी मजबूत असली, तर जंतूंना वेळच्या वेळीच आवर घालून सीमेवरच त्यांचा नायनाट केला जातो. पण जर का शरीराकडे दुर्लक्ष करून चुकीचा आहार-विहार, प्रमाणाबाहेर कामाचा ताण, शरीरातील मुख्य उपयोगी धातूंचा नाश, तसेच अति मैथुन यामुळे शरीरशक्‍तीचा ऱ्हास झाला, तर क्षयरोगाच्या जंतूंचे आयतेच फावते. आहार कसा व किती प्रमाणात असावा याचे शास्त्र सांगता येते. पण मैथुनाच्या बाबतीत प्रत्यक्ष मोजमाप होऊ शकत नाही. कोणत्याही कारणाने किंवा मूत्रसंस्थेतील रोग, अति चिंता किंवा अति यौवनचिंतन यामुळे शरीरातील धातू म्हणजे वीर्य कमी होत जाते. स्त्रियांच्या बाबतीत मासिक धर्मामुळे दर महिन्याला रक्‍त कमी होत राहते. त्यातून जर आर्तवदोष असला, तर त्या आर्तवाबरोबर इतर धातू देखील बाहेर पडत राहतात. बऱ्याच वेळा स्त्रियांच्या अंगावर सफेद, लाल पाणी जाणे या क्रियेमुळेही धातूक्षय होत राहतो व प्रतिकारशक्‍ती कमी झाल्याने क्षयरोग बळावण्याची शक्‍यता अधिक असते.

सुरवातीस जरी हा फुप्फुसाचा विकार म्हणून सुरू झाला तरी तो आतडी, मज्जातंतू, हाडे वगैरे ठिकाणीही होऊ शकतो. मुख्य तीन प्रकारांबरोबर स्थानपरत्वेही अनेक प्रकार करता येतात. सहज बरा होणारा, कष्टसाध्य व असाध्य असे क्षयरोगाचे तीन प्रकार असल्यामुळे वेळच्या वेळी औषधे घेणे, औषध घ्यायचे अर्धवट न सोडणे, बरे वाटत नाही असे लक्षात आले तरीही औषध घेत राहणे हे आगत्याने करावे. तसेच तीन-चार आठवड्यांहून जास्त काळ जर खोकला चालू राहिला, तर लगेच क्षयरोगासाठी निदान (रोगनिश्‍चिती) करून घ्यावी. एच. आय. व्ही. पॉझिटिव्ह रुग्णांना क्षयाची बाधा होण्याची शक्‍यता अधिक असते. तेव्हा विशेष काळजी घ्यावी. शरीर धरत नाही किंवा वजन सारखे उतरत राहते, हलके हलके हाडे दिसायला लागतात, त्या वेळी रोगनिदान अवश्‍य करून घ्यावे.

इच्छा, हव्यास, वासना जेव्हा अति वाढतात, तेव्हा त्याच्या मनुष्यत्वाचा आणि त्याच्या शरीराचा क्षय होऊ लागतो. शेवटी जरी सर्व दोष क्षयरोगाच्या जंतूंना देणार असलो तरी माणसाचा निष्काळजीपणा, अति खाणे, अति जागरण, अति मैथुन या गोष्टीच शेवटी आयुष्य-क्षयास कारणीभूत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com