मूत्रदाह म्हणजे काय?

प्रा. डॉ. सुरेश पाटणकर, संतोष शेणई
Friday, 6 April 2018

मूत्रदाह म्हणजे मूत्रमार्गात विषारी जीवाणूंचा प्रवेश झाल्यामुळे निर्माण होणारा जंतुसंसर्ग. त्यामुळे या जंतुसंसर्ग झालेल्या मूत्रसंस्थानाच्या भागाला येणारी सूज ही अनेक प्रकारची लक्षणे आणि त्रासाला कारणीभूत होते. 

‘दाह’ म्हणजे जळजळ आणि जळजळ या शब्दातूनच जळण्याची क्रिया व्यक्त होते. चटका बसण्याचा किंवा भाजण्याचा अनुभव कधी ना कधी आपण घेतलेला असतोच. आगीच्या ज्वालेमुळे होणारी तीव्र संवेदना म्हणजे दाह. दाह या शब्दातच दुःख, वेदना दडलेली आहे. अशीच वेदना किंवा आगीच्या ज्वालेने होणारी संवेदना मूत्रमार्गामध्ये जाणवते, त्यालाच ‘मूत्रदाह’ म्हटले जाते. मूत्रदाह म्हणजे मूत्रमार्गात विषारी जीवाणूंचा प्रवेश झाल्यामुळे निर्माण होणारा जंतुसंसर्ग. त्यामुळे या जंतुसंसर्ग झालेल्या मूत्रसंस्थानाच्या भागाला येणारी सूज ही अनेक प्रकारची लक्षणे आणि त्रासाला कारणीभूत होते. 

मूत्रदाहाचे प्रकार 
मूत्रदाह किंवा जंतुसंसर्ग हा मूत्रपिंड, गाविनी किंवा मूत्रवाहक नलिका, मूत्राशय, पुरुषांमधील पूरस्थ (प्रोस्टेट) ग्रंथी किंवा स्त्री-पुरुषांमधील बाह्य मूत्रमार्ग यापैकी एका अवयवाच्या जंतुसंसर्गामुळे होऊ शकतो. काही वेळेस मूत्रदाह हा संपूर्ण मूत्रमार्गाचाही असू शकतो. क्वचितप्रसंगी हा मूत्रदाह खूप गंभीर स्वरूप धारण करू शकतो, त्यातून जीवासही धोका पोचू शकतो. Urinary tract infection असा त्याला पारिभाषक शब्द आहे. तीव्र आणि जुनाट असे मूत्रदाहाच्या त्रासाचे दोन प्रकार करता येतील. संसर्ग झाल्याने अचानक दाह सुरू होतो, तो तीव्र (Acute) असतो. काही तात्कालिक कारणांनी हा दाह होतो; पण काही रुग्णांमध्ये मूत्रदाह पुनःपुन्हा उद्‌भवतो. विशेषतः मधुमेहींमध्ये. त्याला जुनाट (Chronic) मूत्रदाह म्हणता येईल.  

मूत्रसंस्थानातील विविध भागांमध्ये जंतुसंसर्ग होऊ शकतो व त्या त्या भागाला सूज येऊ शकते. त्यानुसार त्याला वेगवेगळी नावे आहेत. जेव्हा मूत्रसंस्थानाच्या बहिःमार्गात सूज येते, तेव्हा त्या दाहाला ‘युरेथ्रायटिस’ (Urethritis) म्हणतात. केवळ मूत्राशयाला सूज आलेली असेल तर त्याला ‘सिस्टायटिस’ (Cystitis) म्हटले जाते. मूत्रपिंडाला संसर्ग झाल्यामुळे होणाऱ्या त्रासाला ‘पायलोनेफ्रायटिस’ (Pyelonephritis) म्हणतात. काही वेळा मूत्राशय व मूत्रपिंड यांना संसर्ग झाल्यामुळे दाह सुरू होतो, तो ‘उर्ध्वमूत्रमार्गदाह’ (Upper urinary tract infection) म्हणून आणि मूत्राशय व बहिःमार्ग यांना संसर्ग झालेला असल्यास ‘अधःमूत्रमार्गदाह’ (Lower urinary tract infection) म्हणून संबोधतात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की ज्या अवयवाला पहिल्यांदा संसर्ग झाला आहे, त्यावरून हे प्रकार केले आहेत. पण प्रत्यक्षात ज्या वेळी खालच्या भागाचा दाह होतो, त्या वेळी जंतू वरच्या भागातही जातात आणि ज्या वेळी वरच्या भागात दाह सुरू होतो, तेव्हा दूषित मूत्रामुळे खालच्या भागातही दाह सुरू होतो. त्यामुळे ‘मूत्रदाह’ (Urinary tract infection) या एकाच संज्ञेने या आजाराचे वर्णन करणे योग्य ठरेल. 

जीवाणूंचा प्रादुर्भाव
मूत्रदाह हा विषारी जीवाणू आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती यांच्यातील एक लढाईच आहे. या जीवाणूंचा मूत्रमार्गात प्रवेश होण्याची कारणे अनेक आहेत. हे जीवाणू आपल्या शरीरात काही ठिकाणी सर्वसामान्यपणे नांदत असतात. उदा. आपल्या मोठ्या आतड्यात ई कोलाय हे जीवाणू असतात. मूत्रमार्गाजवळच असल्यामुळे ते तिथे प्रवेश करतात. काहीवेळा रसवाहिन्यांमधून किंवा क्वचित प्रसंगी रक्तामधून संक्रमण झाल्याचेही दिसते. काही वेळेस शरीराबाहेरील गोष्टींमुळेही (उदा. कॅथेटर, स्टेंट) जंतुसंसर्ग झालेला दिसतो. या शिवाय मूत्रमार्ग रचनेत बिघाड झाल्यामुळेही हे घडू शकते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये जंतुसंसर्गाची लागण लवकर होते.

शरीरामध्ये दाह निर्माण करणाऱ्या जीवाणूंमध्ये अनेक प्रकार असतात. त्यातले काही प्रकार मूत्रमार्गातच सापडतात. त्यातही ई कोलाय या जीवाणूंचा प्रादुर्भाव जवळजवळ ऐंशी टक्के रुग्णांमध्ये दिसतो. यामध्ये के. न्यूमोनी या जीवाणूंचे प्रमाण हल्ली वाढत चालले आहे. सर्वसाधारणपणे एक ते चौदा वर्षे या वयोगटातील मुलींमध्ये मूत्रदाह होण्याची शक्‍यता दहा टक्के असते. हाच त्रास चार टक्के तरुण स्त्रियांमध्ये दिसून येतो. वाढत्या वयाबरोबर सर्वसाधारणपणे दोन टक्केप्रमाणे प्रत्येक दशकाबरोबर वाढत जातो. एकदा मूत्रदाहाचा विकार झाला की, तो परत-परत होण्याची शक्‍यताही असते.

लक्षणे
मूत्रदाह झाल्यानंतर अनेक लक्षणे दिसतात. त्यात प्रामुख्याने पुढीलप्रमाणे लक्षणे दिसतात.
मूत्रविसर्जन करताना जळजळ किंवा आग होणे, 
मूत्रविसर्जनानंतर मूत्रमार्गामध्ये किंवा ओटीपोटात टाचण्या टोचल्याप्रमाणे वेदना होणे, 
मूत्रविसर्जनाची क्रिया थांबून थांबून होणे, 
मूत्रविसर्जन करताना रक्त पडणे, 
मूत्राच्या रंगातही फरक दिसून येतो. काही वेळा लालसरपणा, धुरकटपणा किंवा ताकासारखा पांढरा आणि घट्टपणा, 
जंतुसंसर्ग मूत्रपिंडापर्यंत पोचल्यास पाठीमागच्या बरगड्यांखाली वेदना होणे, थंडी वाजणे, ताप येणे, थकवा जाणवणे असाही त्रास होतो. 

मूत्रपिंडकटीरदाह (Pyelonephritis)
मूत्रपिंडकटिराला संसर्ग झाल्याने हा विकार होतो. या विकारात सुरवातीला थंडी वाजून ताप येतो. कमरेमध्ये व पाठीमध्ये दुखू लागते. लघवीतून पू जाऊ लागतो. योग्य उपचारांच्या अभावी हे दोष तसेच राहू शकतात. हा विकार परत परत उद्‌भवू शकतो. विशेषतः मधुमेह असलेल्यांना हा विकार लवकर व तीव्र स्वरूपात होऊ शकतो. त्यावर तातडीने उपचार करून घेणे आवश्‍यक असते.  

जुनाट मूत्रदाह
मूत्रदाहाचा विकार एकदा झाला, की तो पुनःपुन्हा उद्‌भवण्याची शक्‍यता अधिक असते. हा जुनाट मूत्रदाह मूत्रसंस्थानाचे कार्य बिघडवतो. या विकारात मूत्रपिंडांचे कार्य योग्यरीत्या होत नाही. त्यांची कार्यक्षमता उणावत जाते. त्यामुळे लघवी पूर्णपणे बाहेर टाकली जात नाही. साहजिकच लघवीवाटे उत्सर्जक द्रव्येही शरीराबाहेर फेकली जात नाहीत, ती रक्तामध्ये साठत जातात. त्यामुळे रक्त दोषयुक्त होते. रक्तात युरिया वाढत गेला, तर ‘युरिमिया’ ही व्याधी होऊ शकते. या व्याधीने रुग्णाचा मृत्यू ओढवू शकतो. 

अतिगंभीर जंतुसंसर्गामुळे हृदय, रक्तदाब, मूत्रपिंड यांवर ताण पडून त्यांच्या कार्यक्षमतेत बिघाड होऊ शकतो. असा जंतुसंसर्ग आटोक्‍यात न आल्यास रुग्ण मृत्युमुखी पडू शकतो. मधुमेही रुग्णांमध्ये हा जंतुसंसर्ग फार लवकर गंभीर रूप धारण करू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: urinary tract article