esakal | लस द्या, लस! 
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

लस द्या, लस! 

sakal_logo
By
डॉ. हेमंत जोशी,डॉ. अर्चना जोशी

बाळांना लहानपणीच सर्व लसी द्यायला हव्यात. त्यामुळे मोठेपणी त्यांना काही आजार होण्यापासून दूर ठेवता येते. कोणी अशा लसी घेण्यापासून दूर राहिले असेल तर त्यांनी वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने लसी घ्यायला हव्यात. 

बाळाला लस द्यायला हवी, असे सजग पालक म्हणतात आणि वेळेवर लस देतातही. लस म्हणजे असते तरी काय? लस म्हणजे भविष्यकाळातील आजार टाळणारे औषध. जखम  होते, तेव्हा आपण  धनुर्वाताचे  [टिटॅनस टॉक्सॉइड] इंजेक्शन घेतो. याने धनुर्वात टळतो. टिटॅनस टॉक्सॉइड ही लस आहे. 
कुत्रा चावला तर आपण लस घेतो. 
लस आजारपण, त्याचा त्रास, मृत्यू, खर्च व गरिबी  टाळते. लसीकरण जरुरीचे आहे. सुरक्षिततेसाठी आहे. आणि मुख्य म्हणजे परिणामकारक आहे.  
लस हे या काळातील सर्वोत्तम वरदान औषध आहे. छत्री पावसापासून आपले संरक्षण करते, तसे लस आपले आजारांपासून संरक्षण करते. महाभारतातील कर्णाकडे कवच कुंडल होते, त्याने कर्णाचे शस्त्रांपासून रक्षण केले. लसी नवीन कवच कुंडले आहेत. सूर्यदेव आपल्या मुलाला, कर्णाला कवच कुंडल देतात. 
आम्ही सर्व लसी आपल्या मुलांना आणि स्वतःला दिल्या पाहिजेत. बाजीराव पेशवे, अलेक्झांडर  विषमज्वराने (टायफॉईडने) मरण पावले असे इतिहास सांगतो. सर्वाना टायफॉईड एकदा होतो. आपल्यापैकी खूप जणांना झाला असेल. पण मुलांना व्हायला नको असेल, तर आज लस द्या. 
    
लस का घ्यावी? 
लस आजारपण, दुखणे , खर्च आणि मृत्यूपासून वाचविते. 

लस देण्याची  सर्वात चांगली तारीख कोणती?  जन्मतारीख ही सर्वात चांगली तारीख आहे. ती सगळ्यांना आठवते. पहिल्या वर्षी दर महिन्याचा वाढदिवस लस देऊन साजरा करावा. नंतर दरवर्षी.  
त्या दिवशी उंची, वजन, पोटाचा घेर व रक्तदाब मोजा. वाढीच्या चार्टवर या सगळ्या नोंदी करा. मुलांच्या वाढीचा आलेख बघा. ती चांगली वाढत आहेत, याची खात्री करा. संपूर्ण तपासणीही करून घ्यावी. 
  
लसी कशा दिल्या जातात? 
पोलिओ, रोटा लसीचे थेंब तोंडाने दिले जातात. इतर सुई टोचून. 

सुई दुखते का? ताप येतो काय?  
नाही. सर्व नवीन लसी जवळ जवळ वेदना रहित आहेत. बहुतेक लसींमुळे ताप येत नाही. काही लसींमुळे थोडे दुखते आणि थोडा ताप येते.  पॅरासिटामोल तापाचे औषध देवून दुखणे व ताप जातो.  
   
एकात चार, एकात पाच, एकात सहा हे काय आहे? 
जेव्हा एका इंजेक्शनने चार, पाच किंवा सहा लसी एकत्र देतात, तेव्हा त्याला एकात चार, एकात पाच, एकात सहा असे म्हणतात.     

कोणाला लसीची गरज आहे? 
सर्वांना. आईच्या गर्भाशयात असल्यापासून शंभर वर्षांपर्यंत जगणाऱ्या सर्वांना गरज आहे. आपल्या कोणत्या लसी राहिल्या हे बघा. डॉक्टरांना विचारा. त्या घ्या. पूर्वी लाखो लोक देवी, धनुर्वात, कॉलरा, जुलाब, गोवर, डांग्या खोकला, डिप्थीरिया, पोलिओ इत्यादीने मरत. आता तसे होत नाही. 

लस केंव्हा द्यावी? 
आजार होण्यापूर्वी. पावसाळ्यापूर्वी छत्री व आजारी पडण्यापूर्वी लस घ्यावी.  
जन्मानंतर होणाऱ्या आजारांच्या लसी जन्माच्या वेळी आणि नंतर लवकरच दिल्या जातात.  
जन्म झाल्यावर पोलिओ, कावीळ बी (हिपॅटायटीस बी), बीसीजी (ही  क्षयरोगापासून बचाव करणारी) या लसी देता येतात. दीड महिन्यापासून रोटा जुलाबाची लस, न्यूमोकोकल, व एकमध्ये सहा लसी देतात. एकमध्ये सहा लस ही सहा आजारांपासून बचाव करते. पोलिओ, धनुर्वात, डांग्या खोकला, घटसर्प, कावीळ बी (हिपॅटायटीस बी), हेमोफिलस बी इन्फ्लूएंझी या लसी दीड महिन्यांपासून देतात. एक महिन्याच्या अंतराने तीन वेळा देतात. सहा महिने वयाला टायफॉईड व फ्लू लस देतात. 
गोवर, जर्मन गोवर, गालगुंड या तीन आजारांपासून वाचविणारी एमएमआर लस ही नऊ महिने वयाच्या बाळाला देतात.  
एक वर्ष झाल्यावर कांजण्या व कावीळ अ (हिपॅटायटिस ए) या लसी देतात.  
दीड वर्षाला व साडेचार वर्षाला, त्यानंतर पाच वर्षांनी आधी दिलेल्या काही लसी परत देतात. फ्लूची लस दर वर्षी घ्यावी लागते.  

एखादा डोस चुकल्यास काय करावे? 
तो  डोस लगेच घ्या. आधी घेतलेला डोस मोजला जातो. 
   
लसींचा खर्च योग्य आहे का? 
हो, आम्ही आजारांवर पैसे खर्च करतो. आम्ही गरीब होतो. लसीवर खर्च केलेला प्रत्येक  रुपया औषध, दु:ख व मृत्यू, बुडालेली रोजची कमाई असे किमान एक हजार रुपये वाचवते.   

वाढदिवसाला व केंव्हाही सर्वात चांगली भेट वस्तू कोणती?  
लस. मुलांनी नमस्कार केला की आपण म्हणतो की शंभर वर्षे छान राहा. त्यासाठी लस भेट देऊन आपण आपले शब्द खरे करू.    

लसीची नोंद जपून आयुष्यभर का ठेवावी? 
शाळेत ती मागतात. विद्यार्थी परदेशी जातात तेव्हा त्यांचा लस तक्ता बघतात. तो नसेल तर पुन्हा लस घ्यावी लागते. 

शाळा व महाविद्यालयीन मुलांना कोणत्या लसींची आवश्यकता आहे? 
सर्वांना टायफाइड लस पाहिजे. प्रत्येक  सैनिक घेतो. धनुर्वाताची लस घ्या. तुमचा लस तक्ता पहा. सर्व लसींचे राहिलेले डोस घ्या. 
  
तरुण मुलींनी कोणती लस घ्यावी? 
गर्भाशयाच्या कर्करोगाविरूद्धची. 
  
आजी आजोबांना कोणती लस हवी? 
न्यूमोनिया, फ्लू व धनुर्वात. 

आम्हाला या लसी कोठे मिळतात? 
१. आपले डॉक्टर    
२. शासकीय दवाखाने 
३. मुलांच्या रूग्णालयात 

अमेरिका, युरोप आदी परदेशात शिकायला जातात त्यांना काय जादा लसी घ्याव्या लागतात? 
मेनिन्गोकोलाल लस व बाकी सर्व लसी घेतल्याचा डॉक्टरांचा दाखला. 

गर्भवती आईला काय लसी देतात? 
गर्भवती आई लस घेते. यामुळे आई आणि नवजात बाळाला होणारे आजार टळतात.   
उदाहरणार्थ, टिटॅनस. आता गर्भवती मातांना धनुर्वात, डांग्या खोकला, घटसर्प आदि एकत्रित लस दिली जाते.  

हजला जातांना कोणत्या लसींची आवश्यकता आहे? 
पोलिओ, मेनिन्गोकोकल, इन्फ्लूएन्झा लस घेतल्यानंतरच तुम्ही हजला जाऊ शकता. राष्ट्रीय कार्यक्रमातील सर्व लसीं पण घ्याव्या लागतात.  
  
लसी काम कशा करतात?  
जेव्हा आपण  धनुर्वात लससारख्या लसीचा एक डोस घेतो तेव्हा  शरीरात संरक्षण देणारी  प्रतिकार शक्ती एका आठवड्यात तयार होते. ही दोन-तीन महिने टिकते. जेव्हा आम्ही ती दुसऱ्यांदा देतो, तेव्हा संरक्षणात्मक शक्ती वाढते. ती सहा महिन्यांपेक्षा जास्त टिकते. जेव्हा आम्ही तिसरा डोस देतो तेव्हा  संरक्षणात्मक शक्ती अजून वाढते. ती  काही वर्ष टिकते. मग आम्ही ती पाच वर्षांनंतर परत देतो. जर आपण अशा प्रकारे टिटॅनस लस घेतली तर दुखापतीनंतर आम्हाला टिटॅनस लसची आवश्यकता नाही. अशा प्रकारे बऱ्‍याच लसींसाठी आपल्याला तीन किंवा चार डोस घ्यावे लागतात. काही लसींसाठी एक किंवा दोन 
डोस पुरेसे आहेत. 
संरक्षणात्मक शक्ती वाढविणाऱ्या डोसाला बुस्टर डोस म्हणतात. जर शाळेतील एक मूल एखाद्या आजाराने आजारी पडले तर सर्व मुलांना हा आजार होऊ शकतो. हे टाळायला सर्व लसी घेतल्यानंतरच शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. 

लोक लसींबद्दल चुकीच्या गोष्टी का सांगतात? 
त्यांना योग्य गोष्टी माहित नसतात. या गोष्टी सर्वांना सांगा.     
  
मला कोणत्या लसींची आवश्यकता आहे हे मला कसे कळेल? 
लसींचा तक्ता पहा. त्यात वर आणि खाली एक आडवी वयाची ओळ आहे. आपल्या वयाच्या आकड्यावर उभी  पेन्सिल-पेन धरा. या रेषेच्या डावीकडे कागदावर दिलेल्या लसीचे सर्व डोस घ्या. लसीकरण माहिती असलेल्या डॉक्टर किंवा नर्सला विचारा.  

एक लस किती वेळा देतात? 
बीसीजी लस एक वेळा, तर धनुर्वात सारख्या काही लसी जास्त वेळा घ्याव्या लागतात. 

लसी किती आजारांपासून बचाव करतात? 
अंदाजे वीस. 

कांजण्या पार्टी 
  आपण कांजण्याची लस घेतो किंवा आपल्याला कांजण्यांचा आजार होतो. कांजण्या हा लहान वयात सौम्य आजार असतो. वय वाढते तसा आजार अधिक तीव्र होतो. युरोपमध्ये एखाद्याला कांजण्या निघाल्या की सर्व मुलांना त्याच्याशी खेळायला देत. यामुळे त्या सर्वाना लहानपणी  कांजण्या येत. साहजिकच मोठेपणी होणारा त्रास टळतो. त्याला ‘कांजण्या पार्टी’ म्हणत. या पार्टीपेक्षा कांजण्याची लस घेणे हेच श्रेयस्कर.