esakal | गरगर घुमते जग भोवती! 
sakal

बोलून बातमी शोधा

Vertigo

गरगर घुमते जग भोवती! 

sakal_logo
By
डॉ. पूर्वा तांबे,डॉ. पराग संचेती

व्हर्टिगो म्हणजे चक्कर. सारे जग भोवती घुमत असल्याचा भास होऊन आपला तोल जाणे. केवळ चालताना, उभे राहिल्यानंतरच नव्हे तर झोपलेले असतानाही हे घडते. हे नेमके का व काय घडते आणि त्यावर उपाय काय? तरूणांमध्येही ही लक्षणे का वाढू लागली आहेत? 
 
चालताना मध्येच आपल्या भोवतीचे जग गरगर घुमत असल्याचा भास होतो. कधी एका जागी उभे असतानाही अचानक डोळ्यासमोर गरगर घुमायला लागतो सारा परिसर. झोक जातो आहे. कधी झोपल्यावरही पाठीवरून कुशीवर होताना आपण पडत असल्याचा भास होतो. चक्रावून टाकणारी असते ही चक्कर. ‘व्हर्टिगो’ असे म्हणतो या चक्करेला. 


व्हर्टिगो (Vertigo) ही थोडी व्यापक गोष्ट आहे. व्हर्टिगो म्हणजे अगदी ढोबळ मानाने चक्कर! मेंदू, कान अथवा मान या अवयवांकडून , आपल्या हालचाली किंवा शरीराचे सभोवतालच्या परिसराशी असलेल्या स्थितीचा अंदाज बांधण्यात गल्लत झाल्यास चक्कर येऊ शकते . या लेखामध्ये पेरिफेरल व्हर्टिगो (कानातील लॅबिरिन्थमुळे होणारा) आणि त्यावरील उपचार यांचा आढावा घेऊ. 
व्हर्टिगो म्हणजे स्वतः किंवा बाजूचा परिसर स्वतः भोवती फिरत असल्याचा आभास. हा त्रास होत असताना ‘गरगरणे’ अथवा एका बाजूला झोक जात असल्यासारखे वाटणे, चालताना वर-खाली होत असल्यासारखे वाटणे अशी लक्षणे अनुभवास येतात. 


आपण पहिल्यांदा सर्वसाधारण म्हणजे स्वस्थ आणि सक्षम तोलयंत्रणा थोडक्यात पाहू. व्हेस्टिब्युलर सिस्टीम ही कानाच्या आतील भागात असलेले लॅबिरिन्थ व त्याच्याकडून मेंदूला माहिती पुरविणारी नस आणि मेंदूकडून डोळे, मान व पाय यांच्या स्नायूंना हालचालींविषयी येणारे आदेश अशी वैशिष्ठ्यपूर्ण परंतु गुंतागुंतीची साखळी आहे. या साखळीतील अंतःकर्णामधील अवयवांच्या किंवा त्यापासूनच्या सुरु होणारी नस यांच्या कार्यात बिघाड झाल्यास पेरिफेरल व्हर्टिगो होतो. 


आता दैनंदिन आयुष्यात वावरताना तात्पुरती कल्पना करा की, तुम्हाला चालताना किंवा साधे उभे राहताना सुद्धा दृष्टी स्थिर राहात नाही. अशा वेळेला तुम्ही तोल सांभाळू शकाल? व्हर्टिगोग्रस्त व्यक्तीला असाच काहीसा त्रास होत असतो. डोक्याच्या किंवा शरीराच्या हालचालींबरोबर दृष्टिक्षेपातील वस्तू दृष्टिपटलावर स्थिर न राहिल्यामुळे हालचाली सहज आणि प्रभावी होऊ शकत नाहीत. थोडक्यात डोक्याच्या हालचालींबरोबर दृष्टिक्षेपातील वस्तू दृष्टिपटलावर स्थिर राहण्यासाठी तोलयंत्रणा कार्यरत असते. आणि म्हणून चक्कर येणे आणि तोल जाणे या गोष्टींचा जवळचा संबंध असतो. व्हेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन थेरपीमध्ये विस्कळीत झालेले हे कार्य पुनःप्रस्थापित करण्यावर व्यायाम दिले जातात. अकार्यक्षम तोलयंत्रणेचे काम पुन्हा सुरळीत करण्यासाठीची भौतिक उपचारपद्धती म्हणजे व्हेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन थेरपी. 

व्हर्टिगो ः एक व्याधी 
बेनिग्न पॅरॉक्झिमल पोझिशनल व्हर्टिगो (बीपीपीव्ही) या आजारात बहुतकरून कुशीवर वळताना अथवा पाठीवर खाली झोपायला गेल्यास जोराची चक्कर येते. ही चक्कर काही सेकंद किंवा एखादे मिनिट राहते. आपल्या भोवतालच्या वस्तू, पंखा इत्यादी जोराने फिरल्याचा भास होतो. जेव्हा जेव्हा आपण स्थित्यंतर करू तेव्हा तेव्हा हा अनुभव येतो. हा चक्करेचा त्रास होत असतानाच अनेकवेळा डोके जड वाटणे, उलटी येणे, अथवा तोल जाणे अशी इतर लक्षणेही आढळून येतात. 


अंतर्कर्णामध्ये लॅबिरिन्थमध्ये जेल सारखे (एन्डोलिम्फ) नावाचे द्रव असते. अगदी सोप्या पद्धतीत सांगायचे तर आपण डोके ज्या बाजूला वळवू त्या बाजूचे एन्डोलिम्फ त्याचाशी संलग्न असणाऱ्या नसांना उत्तेजित करते व मेंदूला हालचालीच्या दिशेची माहिती मिळते. दोन्हीही कानातील लॅबिरिन्थ मिळून हे ‘दिशासूचक होकायंत्र’ डोक्याच्या आणि शरीराच्या हालचालीनुसार आपली नजर आणि तोल स्थिरावतात. 


लॅबिरिन्थमधेच असणारे कॅल्शिअम कार्बोनेट क्रिस्टल्स काही वेळेला मोकळे होऊन स्वैरपणे फिरू लागतात. ज्या बाजूच्या लॅबिरिन्थमध्ये हा बिघाड हॊतॊ त्या बाजूचे लॅबिरिन्थ डोक्याच्या हालचालीच्या दिशेची माहिती मेंदूला पुरविताना चुकते. आणि मग गोंधळलेला मेंदू स्थित्यंतराला अनुरूप प्रतिसाद देऊ शकत नाही. परिणामी चक्कर येते. व्हेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन थेरपीमध्ये प्रशिक्षित थेरपिस्ट काही विशिष्ट प्रकारे हालचाली देतात, ज्यामुळे हे सुटलेले कॅल्शिअमचे कण पुन्हा त्यांच्या जागी जातात आणि चक्कर येणे लागलीच थांबते. ही चक्कर सत्तर ते ऐंशी टक्के वेळा एका सिटींगमध्ये पूर्णतः बरी होते. काही वेळेला मात्र हे वैशिष्ट्यपूर्ण व्यायाम एकापेक्षा अधिक वेळेला लागू शकतात. 


चक्कर येण्याचे दुसरे कारण अंतःकर्ण आणि व्हेस्टिब्युलकडून मेंदूला माहिती देणाऱ्या नसाना संसर्ग झाल्याने होऊ शकते. चक्कर येण्याच्या आधी काही दिवस सर्दी खोकला होणे, अचानक कानाने कमी ऐकू येणे अशी प्राथमिक लक्षणे दिसतात. चक्कर येणे सुरु झाल्यावर दैनंदिन कामामध्ये तोल जाऊ लागतो. या वेळेस वैद्यकीय औषधोपचार महत्त्वाचा ठरतो. नसेला असलेली सूज ओसरल्यावर ही नस अधू होते आणि मेंदूला जाणारे संदेश चुकतात. ह्या टप्प्याला इजा झालेल्या नसेच्या बाजूला तोल जात राहतो. हा त्रास बराच काळ होत असल्यास चक्करेबरोबर तोल जाण्याची भावना राहते. त्यासाठी डोळ्याचे व डोक्याचे सुसूत्रित व्यायाम दिले जातात. त्या व्यतिरिक्त उभे राहणे आणि चालताना तोल साधण्यासाठी सुद्धा शिकवले जाते. 


बीपीपीव्ही अथवा व्हेस्टिब्युलर हायपोफंक्शन या दोन्ही त्रासात मेंदूचे कार्य सुरळीत असल्या कारणाने तोल साधता येणे पुन्हा शक्य होते. 
चक्कर येण्याचे आणखी एक कारण म्हणजे कवटी व मानेच्या वरच्या मणक्याचे बिघडलेले कार्य. ह्या चक्करेचा प्रकारात तोल सावरता ना येणे, गोंधळल्यासारखे होणे, मानेच्या हालचाली आखडणे, अथवा डोके दुखणे इत्यादी लक्षणे आढळतात. मानेतील वरील मणके व त्यातील सेन्सर्स, हालचालींतील बदल व स्थिती विषयीची माहिती मेंदूमध्ये असण्याऱ्या व्हेस्टिब्युलर अॅपारेटस देतात. आणि मानेच्या व पायांच्या स्नायूंना मेंदूकडून परत आदेश मिळतात, ज्यामुळे डोक्याची व मानेची नवीन स्थिती साधता येते. 


मानेच्या मणक्याचा संधिवात अथवा कवटी व मानेच्या वरील मणक्यांलगतचे स्नायू योग्य पद्धतीने काम करीत नसल्यास हे काम असुरळीत करतो. परिणामी स्वतःची सभोवतालच्या तुलनेत असलेल्या स्थितीचा अंदाज चुकतो आणि चक्कर येते किंवा तोल जातो. 


कम्प्युटरशी निगडित व्यावसायिकांमध्ये मानदुखी आणि चक्कर बऱ्याच प्रमाणात आढळून येतात. या चक्करग्रस्तांना मानेच्या मणक्याच्या स्नायूंचे व्यायाम देऊन त्यावरील ताण कमी करणे, तोल सांभाळण्यासाठीचे व्यायाम अशा दुहेरी पद्धतीने थेरपी दिली जाते. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी बरोबर बैठक कशी असावी याविषयी मार्गदर्शन केले जाते. 

व्हर्टिगो आणि जीवन गुणवत्ता 
सततच्या चक्करेमुळे मळमळणे, डोके जड राहणे आणि तोल सांभाळता न येणे, अशी लक्षणे त्रासदायक होतातच, पण हालचाल केली तर चक्कर येईल अशी भीती वाटू लागते. या भीतीमुळे एकतर माणूस दैनंदिन हालचाली टाळू लागतो अथवा अवाजवी काळजीपूर्वक करू लागतो. एखादी जलद अथवा अनपेक्षित हालचाल होताना तोल सांभाळण्याची नैसर्गिक सहजता गमावतो. आणि मग घरी किंवा बाहेर समाजात ही वावरतानाचा आत्मविश्वास हरवतो. परिणामी असुरक्षितता, चिडचिड आणि कधी कधी नैराश्यही येऊ शकते. अशा वेळीस समुपदेशनाचीही जोड़ महत्त्वाची ठरते. समुपदेशनामुळे असलेल्या व्याधीशी हातमिळवणी करणे सोपे होते आणि काळजी करणे कमी होऊन उपचारांचा फरक पडू लागतो. 

व्हर्टिगो आणि औषधे 
चक्कर येत असताना चक्करेवरची औषधे दिली जातात. व्हर्टिन किंवा स्टुजेरॉन या गोळ्या चक्करेची ‘तीव्रता’ कमी करतात, परंतु चक्कर येण्याच्या कारणावर इलाज करत नाहीत. म्हणून या गोळ्यांचा उपयोग ‘त्रास’ कमी करण्यासाठी नक्कीच होतो, पण उपचार म्हणून नाही. गोळ्या घेतल्याने नसेची उद्युक्तता कमी होते आणि चक्करेची तीव्रताही. परंतु हा अल्पकालीन उपाय आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावेत. 


वैद्यकीय आणि भौतिक उपचारांबरोबर जीवनशैलीतील बदलही चक्करेचा त्रास संपुष्टात आणतात. 

व्हेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन थेरपी बद्दल आणखी काही ... 
ह्या उपचारपद्धतीचे उद्दिष्ट दृष्टीस स्थिरता आणणे, तोल पुनःप्रस्थापित करणे, चक्कर थांबवणे अथवा कमी करणे आणि दैनंदिन जीवनमानातील कार्यक्षमता सुधारणे ही आहेत. 


चक्कर येण्याचे नेमके कारण, कालावधी आणि रुग्णाचे व्यक्तिमत्व व मानसिकता या गोष्टींवर उपचारांची दिशा ठरते. 


रिपोझिशनिंग मॅन्युव्हर्स, डोळे व डोके यांचे सुसूत्रित व्यायाम यांच्या व्यतिरिक्त हॅबिट्युशन एक्झरसाइज सुद्धा या थेरपीचा एक भाग आहे. ज्या व्यक्तींना एखादी जलद आणि अनावधाने झालेली हालचाल सुद्धा चक्करेची, तोल गेल्याची भावना देते . अशा वेळेला हे व्यायाम दिले जातात. ज्या हालचालीमुळे चक्कर येते अशी हालचाल नियंत्रित पद्धतीत दिली जाते. कालांतराने कानामधील तोलयंत्र आणि मेंदू यांचा मेल साधतो आणि जलद हालचालही तोल सांभाळून साधता येते. 

थोडक्यात 
चक्करेची लक्षणे म्हणजे गरगरणे, असमतोल, कानात आवाज ऐकू येणे, चालताना दृष्टिपटल अस्थिर वाटणे, थकवा, मानसिक अस्वस्थता ही असतात. 


सर्व चक्करेच्या आजारांवर संपूर्णतः इलाज नाही. परंतु औषधोपचार, व्हेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन थेरपी, जीवनशैलीतील बदल (पथ्य, नियमित व्यायाम) आणि काही वेळेला शस्त्रक्रिया या चौफेर उपायांनी हा आजार नियंत्रणाखाली ठेवता येतो येतो. अर्थात वर उल्लेखलेल्या व्हर्टिगोच्या त्रासावर प्रभावी उपचार आहे. परंतु त्यामागची तज्ज्ञाकडून कारणमीमांसा होणे आवश्यक आहे. 


चक्करेवरील गोळ्या आजाराचे तीव्रता शमवतात परंतु व्हेस्टिब्युलर रिहॅबिलिटेशन थेरपी हा उपचार आहे. 


तोल जाणे , वारंवार पडणे ही लक्षणे केवळ वयोवृद्धीमुळेच दिसतात असे नाही, तर ही लक्षणे व्हर्टिगो या आजाराची असू शकतात. 
दोन्ही कानांनी चांगले ऐकू येत असेल तरी कानातील तोलयंत्रणेचे कार्य बिघडल्यास चक्करेचा त्रास होऊ शकतो. 


चक्कर येते म्हणून हालचाल करणे बंद केल्याने तोलयंत्रणेला मिळणारी चालना थांबते व त्रास बळावतो. त्वरित तपासणी, उपचार आणि सक्रिय राहणे ही या आजारावरची गुरुकिल्ली आहे. 


आजच्या बदललेल्या जीवन शैलीमध्ये लॅपटॉप्स, मोबाइल्सचा वापर अवाजवी होत आहे आणि त्यामुळे अगदी तरुण वयामध्ये सुद्धा व्हर्टिगोचा त्रास होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. चुकीच्या सवयींमुळे असा आजार ओढवला जाऊ नये याची जबाबदारी स्वतः घेणे आवश्यक आहे. 


चक्कर येण्याची कारणे फक्त वर उल्लेखलेली नाहीत. मेंदूचे विकार, अर्धशिशी, डोकेदुखी, आतल्या कानाचे विकार इत्यादी सुद्धा चक्कर येण्यास जबाबदार असू शकतात. परंतू या बाबतीत वैद्यकीय चिकित्सेचा आणि उपचारांचा भाग आहे.