लग्न तुळशीचे 

Wedding basil
Wedding basil

मनुष्यप्राण्यांत स्त्रीप्रतिष्ठा महत्त्वाची समजली जाते म्हणून स्त्रीच्या आवडीप्रमाणे तिला तिचा साथीदार मिळाला पाहिजे. म्हणूनच लग्नसंस्थेची प्रतिष्ठा वाढावी या दृष्टीने तुळशीचे लग्न ही संकल्पना आपल्या परंपरेत सांगितलेली आहे. या सणाला ‘कृष्णाचे लग्न’ असे म्हणत नाहीत, तर ‘तुळशीचे लग्न’ असे म्हणण्याची पद्धत आहे, कारण लग्न स्त्रीच्या इच्छेनुसार व्हायला हवे, हे लक्षात राहावे. 

स्त्री-पुरुषांमधील संबंधांना खऱ्या प्रेमाचे, नैतिकतेचे अधिष्ठान देण्यासाठी व निसर्गचक्र चालविण्यासाठी लग्न हा भारतीय संस्कृतीचा अत्यंत उदात्त विचार. धन-ऋण, माया-संकल्पना, जड-शक्‍ती या जोड्या निसर्गात असतातच. एका बाजूला जड पृथ्वी व दुसऱ्या बाजूला सूक्ष्म आकाश. या दोघांमध्ये सतत देवाणघेवाण होत असते व त्यांच्या एकरूपतेतून निसर्गात सर्जन होत राहते. प्रत्येक प्राण्याला विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण असते. कुठल्याही प्रकारचे शिक्षण न घेता किंवा बाहेरून आज्ञा न मिळता विरुद्धलिंगी प्राणी एकत्र येणे ही निसर्गानेच केलेली योजना आहे. पण त्यातल्या त्यात मनुष्यप्राण्यांत स्त्रीप्रतिष्ठा महत्त्वाची समजली जाते म्हणून स्त्रीच्या आवडीप्रमाणे तिला तिचा साथीदार मिळाला पाहिजे. 

याच दृष्टिकोनातून भारतीय परंपरेत कन्यादानाचे महत्त्व सांगितलेले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून लग्नसंस्थेची प्रतिष्ठा वाढावी या दृष्टीने तुळशीचे लग्न ही संकल्पना आपल्या परंपरेत सांगितलेली आहे. या सणाला कृष्णाचे लग्न असे म्हणत नाहीत, तर तुळशीचे लग्न असे म्हणण्याची पद्धत आहे, कारण लग्न स्त्रीच्या इच्छेनुसार असावे हे लक्षात राहावे. 

कथा आपणा सर्वांना माहीत आहे. वृंदा नावाच्या स्त्रीचे श्री विष्णूंवर प्रेम होते. श्री विष्णूंना त्या वेळी लग्न करणे शक्‍य नव्हते म्हणून मी कृष्णावतार घेईन त्यानंतर माझीच शक्‍ती असलेल्या शाळिग्राम शिळेशी तुझे लग्न भारतीय परंपरेत लावले जाईल असे वचन दिले. त्यामुळे हे लग्न ‘तुळशीचे लग्न' म्हणून संबोधले जाते. तुळशी विवाह हा केवळ काही धार्मिक किंवा सामाजिक विधी नाही. मुळात स्त्री-पुरुष या अर्धअस्तित्वांना पूर्ण अस्तित्वाचा अनुभव घेण्यासाठी व निसर्गचक्र चालू राहण्यासाठी विवाहाची कल्पना भारतीय संस्कृतीत आहे. या कल्पनेला प्रचिती व पुरावा देण्यासाठी त्यातून अपत्यनिर्मिती म्हणजेच निसर्गचक्र सुरू राहण्यासाठीची कल्पना सांगितलेली आहे. 

भारतीय संस्कृतीने लोककल्याण व आरोग्यशास्त्र यात आपले श्रेष्ठत्व अबाधित राखण्यासाठी तुळशीविवाहाची परंपरा सुरू केलेली दिसते. आश्‍विन व कार्तिक हे शरदऋतूचे दोन महिने संपत आले की हेमंत ऋतूचे आगमन होण्याचे व त्याबरोबर विवाहाचा मुहूर्त सुरू होण्याचे वेध लागतात. वर्षा ऋतूत तशीही वातावरणातील शक्‍ती कमी झालेली असते, शरीरात पित्तसंचय होत राहतो, एकूण शरीराची ताकद कमी झालेली असते. त्यामुळे या ऋतूत सामाजिक उत्सवांसाठी, कार्यासाठी पाऊस अडचणीचा ठरतो. वर्षा ऋतूत वातावरणात आर्द्रता खूप प्रमाणात वाढलेली असते. अशा सर्व कालदोषांमुळे शरदानंतर येणारा हेमंत ऋतू स्त्री-पुरुषांच्या मिलनासाठी महत्त्वाचा समजला गेला. उत्तम संतानप्राप्तीसाठी योग्य वेळ मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा हेमंतऋतूची योजना केलेली आहे. केवळ कामवासनेमुळे एकत्र आलेल्या स्त्री-पुरुषाच्या मिलनातून अपत्य जन्माला न येता, समाजाला उपयोगी पडेल, देशभक्‍ती व जीवन जगण्यासाठी काही कार्य करेल असे अपत्य जन्माला यावे या दृष्टीने स्त्री-पुरुषाच्या मिलनासाठी या ऋतूची योजना केलेली आहे. 
तुळशीचे आरोग्यासाठी अनेक उपयोग आहेतच, तसेच पर्यावरणशुद्धीसाठी पण तुळशी खूप महत्त्वाची आहे. 

चरकसंहितेच्या सूत्रस्थानात एक श्‍लोक आहे, 
हिक्का कासविषश्वास-पार्श्वशूलानिनाशनः । 
पित्तकृत्‌ कफवातघ्नः सुरसः पूतिगन्धहा ।। 

...चरक सूत्रस्थान 
उचकी, खोकला, विषदोष, दमा, बरगड्यांमध्ये दुखणे वगैरे विकारांमध्ये तुळशी उपयुक्‍त असते. तुळशी कफ तसेच वातदोषाचे शमन करणारी, दुर्गंधाचा नाश करणारी असते. 
तुळशीमध्ये पर्यावरणाची शुद्धी करण्याचाही गुणधर्म असतो. तुळशीच्या आसपास रोगसंक्रामक जीवजंतूंचे प्रमाण निश्‍चित कमी असते. म्हणून भारतीय संस्कृतीत सकाळ-संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावून तुळशीला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत रूढ झालेली आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्‍ती वाढते, जंतुसंसर्ग होण्यास प्रतिबंध होतो. तुळशीची पाने व मंजिऱ्या वाळवून त्याचा धूप करण्याने तुळशीच्या जंतुघ्न गुणाचा फायदा मिळू शकतो. तुळशीच्या लाकडापासून बनवलेल्या मण्यांची माळ गळ्यात घातली जाते. 
म्हणून प्रत्येक घरात तुळस असावी, मग ती हिरवी रामतुळस असो वा काळसर-हिरवी कृष्णतुळस असो. ज्या ठिकाणी उष्णता व सूर्यप्रकाश भरपूर असतो तेथे कृष्णतुळस वाढते. सूर्यप्रकाशाच्या अभावात ही तुळस हिरव्या रंगाकडे जाऊ लागते. 

तुळशीचा रस मध मिसळून घेतला तर हे मिश्रण योगवाही असल्यामुळे शरीरातील प्राणशक्‍तीत लगेच मिसळतो. मध तसेच तुळशीचा रस दोन्ही योगवाही असल्यामुळे ताबडतोब गुण मिळाल्याचे दिसते. तुळशीच्या पानांचा वाफारा घेण्यामुळे सायनस, सर्दी, डोकेदुखी, डोके जड होणे अशा त्रासांवर फायदा होऊ शकतो. चहा बनविताना तुळशीचे एखादे पान टाकण्याचाही फायदा होतो. नेहमीचा चहा करताना आल्याचा छोटा तुकडा, तुळशीचे पान व गवती चहा टाकल्यास चहाही बाधत नाही आणि फायदा होतो. तुळशीच्या बियांना तकमारी६ असेही म्हटले जाते. या बिया पाण्यात भिजवाव्यात, फुलल्या की त्यात दूध, कपभर कोमट दुधात चमचाभर साखर किंवा शतावरी कल्प घेतल्यास फायदा होतो. तुळशीचे सिरप घरात ठेवण्यासारखे आहे. तुळशीच्या रसाच्या दुप्पट साखर किंवा गूळ टाकून मंद आचेवर शिजवण्यास ठेवावे. पाण्याचा अंश उडून गेला की सिरप तयार झाले असे समजून भरून ठेवावे. लहान मुलांना देण्यासाठी, तसेच बारा महिने तुळशी उपलब्ध नसणाऱ्या ठिकाणी हे सिरप उपयोगी पडते. 
तुळशी उष्ण गुणधर्माची असल्यामुळे गणपतीला वाहिली जात नाही.

वनस्पतिशास्त्रानुसार तुळशीला ‘ऑसिमम सॅन्क्‍टम' (Ocimum scantum) म्हणजे ‘पवित्र गंध’ म्हटले जाते. यातील ‘ऑसिमम’ शब्दाचा अर्थ ‘गंध’ असा आहे तर ‘सॅन्क्‍टम’ शब्द ‘पवित्र’ या अर्थाने आला आहे. 
अशा प्रकारे तुळशी अनेक प्रकारे उपयोगी असते. अशा या तुळशीचे प्रत्येक वर्षी प्रेमाने लग्न केले जाते. लग्नानंतर घरजावई झालेले श्रीकृष्ण तुळशीला घेऊन आपल्याच घरात राहतात. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com