आली दीपावली

डॉ. श्री बालाजी तांबे
Friday, 18 October 2019

दीपावलीच्या स्वागतासाठी योग्य नियोजन करा. ते नीट अमलात येईल याची काळजी घ्या. अन्यथा, सणावारी मानसिक ताण वाढण्याची आणि त्यायोगे आजारपण येण्याची शक्‍यता असते. 

दीपावलीच्या स्वागतासाठी योग्य नियोजन करा. ते नीट अमलात येईल याची काळजी घ्या. अन्यथा, सणावारी मानसिक ताण वाढण्याची आणि त्यायोगे आजारपण येण्याची शक्‍यता असते. 

‘दीपावली आली’ म्हणताना सर्वप्रथम विचार येतो, की या वर्षी दीपावलीचे खास असे काय करायचे? दीपावली आली की सर्वप्रथम येते साफसफाई व घराची रंगरंगोटी. नंतर येते नवे कपडे, दागदागिने यांची खरेदी. नंतर येतो फराळ, नंतर येते करमणूक किंवा असतो प्रवास. या सर्व गोष्टींचे नियोजन करून योग्य वेळी न झाल्यास सणावारी मानसिक ताण वाढतो व त्यातून पुढे येऊ शकतो आजार. 
पहिले साफसफाईचे काम बहुधा दसऱ्यापूर्वी करून झालेले असते. दसऱ्यानंतर घर रंगवायचा बेत केला तर दिवाळीच्या दिवसांमध्ये नाकातोंडात धुराळा जाण्यापलीकडे घराच्या रंगाचा आनंद मिळू शकत नाही. जशी आपल्या घरी दिवाळी असते तशीच ती रंगाऱ्यांच्या घरीही असते, तेव्हा काम अर्धवट सोडून कारागीर स्वतःच्या घरी- गावी जातात, म्हणून अशी कामे खूप आधी व्हावीत. घरात जमलेला कचरा काढून टाकणे, तो बाहेर रस्त्यावर न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावणे अशी कामे केली जातात.

स्वच्छता मोहीम राबवताना ती फक्‍त घरापुरती नसावी, ती आपण ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीच्या बाहेरच्या भागासाठीही असावी. शहरात टोलेजंग इमारती दिसतात, प्रत्येकाचे घर चकाचक असते; पण बाहेरून इमारत पाहिली तर ती शंभर वर्षांपूर्वी बांधलेली आहे की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती असते. इमारती बाहेरून कळकट झालेल्या असतात, कुणाचा तरी सांडपाण्याचा पाइप फुटून वाहत असतो वगैरे परिस्थिती असते. घर आतून स्वच्छ आहे, सुंदर आहे, टापटीप आहे, छान रंग मारलेला आहे, हे घरात गेलेल्यालाच कळते, सगळ्यांना कळत नाही. आम जनतेला घर दिसते ते बाहेरूनच. स्वच्छतेमुळे लक्ष्मीचे आवाहन होत असेल, म्हणजे लक्ष्मी घरात यावी असे वाटत असेल, तर घर बाहेरून पाहून आत जावे असे लक्ष्मीला वाटायला तर हवे. तेव्हा घराची अंतर्बाह्य स्वच्छता केली तर पुढे आपल्याकडून केल्या जाणाऱ्या दीपावलीच्या उत्सवाचा फायदा मिळतो. 

टीव्ही, स्कूटर वा गाडी, नवा फ्लॅट, गळ्यातील दागिना वगैरे काही दिवाळीच्या मुहूर्तावर आणायचे असेल तर अशा वस्तूंचे अगोदर बुकिंग करून ठेवणे आवश्‍यक असते. कारण नंतर दीपावलीच्या मुहूर्तावर आपल्याला हवी ती वस्तू न मिळण्याची आणि नंतर महिन्याभरानंतर डिलिव्हरी मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. हीच गोष्ट आपल्याला शिंप्याकडून कपडे शिवून घ्यायचे असतील तरी होऊ शकते. हल्ली तयार कपडे वापरण्याची प्रथा रूढ होते आहे; परंतु स्वतःच्या मापाने शिवून घेतलेले स्वतःच्या आवडीचे कपडे घालण्याचा आनंद काही वेगळाच असतो. शिवाय, कपडे शिवून घेतले तर पैशांचीही बरीच बचत होते. 

दिवाळीच्या फराळाची व्यवस्था करणे याचेही व्यवस्थापन करावे लागते. मुळात फराळ का करायचा? दीपावली येते शरद ऋतूमध्ये. या ऋतूत झालेला पित्ताचा उद्रेक बऱ्याच प्रमाणात कमी करण्याचे काम आश्विन महिन्यात केलेले असले, तरी दीपावलीचा काळ हा पित्ताला साथ देण्याचाच काळ आहे. शरीरात वाढलेल्या या पित्ताचा पचनासाठी उपयोग करून घेतला जातो. किंवा या पित्ताचा आपल्याला त्रास कशा प्रकारे टाळता येईल याची खबरदारीही घेता येते. दीपावलीचा फराळ सरसकट बाजारातून आणलेला नसावा. बाजारात मिळणारे सर्व पदार्थ खराब असतात असे नव्हे; परंतु ते टिकण्याच्या दृष्टीने त्यावर काही प्रक्रिया केलेल्या असू शकतात, किंवा त्यात काही विशिष्ट द्रव्ये टाकलेली असू शकतात. शिवाय, हे पदार्थ चटकदार व्हावेत, यासाठी काही क्षार वा आंबट पदार्थ टाकलेले असू शकतात. पदार्थ डोळ्यांना चांगले दिसावेत या हेतूने काही प्रक्रिया केलेल्या असू शकतात. एखादा पदार्थ बाजारातून आणून खाणे वेगळे; परंतु मोठ्या कुटुंबात किंवा शेजारी राहणाऱ्या चार-पाच कुटुंबांत एखाद्याच्या घरी फराळ बनवणे सर्वांत चांगले. दीपावली असली तरी आरोग्याची काळजी प्रथम घ्यायला हवीच. 

याचा आरोग्याशी काय संबंध, असे आपल्याला वाटू शकते; पण ऐन सणाच्या दिवसांत तब्येत बिघडली किंवा मनाप्रमाणे कार्यक्रम करता आला नाही, तर ताण वाढतो व आजारपण येते. 

दीपावलीची दुसरी तयारी म्हणजे दीपावलीत फराळ खाता यावा यासाठी पोट साफ करून घेणे. दीपावलीपूर्वीच पाच-सहा दिवस किंवा मध्ये एक दिवस मिळाल्यास, त्या दिवशी सौम्य जुलाबासाठी काही औषध घेऊन दोन-तीन जुलाब होऊन पोट साफ होईल याकडे लक्ष द्यावे. आल्याचा रस- लिंबाचा रस- मध (अर्धा + एक + एक या प्रमाणात) मिश्रण जेवणानंतर घेण्याने पचन होण्यास मदत मिळेल, खाल्लेल्या अन्नाचे पचन होईल, वात वाढणार नाही. 

तेल हे उत्तम वातशमन करणारे द्रव्य आहे. सणवार असतील त्याच्या एक आठवडा आधी रात्री झोपण्यापूर्वी दोन चमचे एरंडेल घेऊन त्यानंतर सुंठीचा काढा वा गवती चहा घेऊन सकाळी दोन-तीन जुलाब होऊन गेले, की मलभाग पूर्णपणे निघून जायला मदत होते, वातशमन होते. लहानपणापासून दहा-पंधरा दिवसांतून एकदा असे एरंडेल घेण्याची सवय ठेवली, तर मोठेपणी खूप फायदा होताना दिसतो. ज्येष्ठ नागरिकांना घेण्यासाठी संतुलन अन्नयोग किंवा तत्सम पचनगोळी या दिवसांत तयार ठेवावी. तसेच, झोपण्यापूर्वी घेण्यासाठी सॅन कूल किंवा त्रिफळा चूर्ण संग्रही ठेवावे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wel Come Deepawali article written by Dr Shree Balaji Tambe