हार्ट अटॅक की कार्डियाक अरेस्ट, अति घातक काय? 

What very dangerous, Heart Attack or Cardiac Arrest?
What very dangerous, Heart Attack or Cardiac Arrest?

हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट हे दोन्ही वेगवेगळे विकार असून लक्षणे आणि कारणे देखील वेगळी असतात. बहुतेक जणांना त्यातील फरक ज्ञात नसल्याने एकच समजण्याची चूक करतात. कार्डियाक अरेस्ट हा अधिक गंभीर आहे. त्यात तातडीची मदत कशी मिळते यावर प्राण अवलंबून असतात. 
 

गेल्या पंधरा वर्षांपासून भारतात हृदयरोगाचे प्रमाण ज्या गतीने वाढत आहे, ते सर्वांचे हृदय हेलावणारे आहे. 
 

हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट हे आज मृत्यूच्या काही प्रमुख कारणांपैकी महत्वाची कारणे आहेत. अनेकदा रुग्णाला किंवा वैद्यकीय शास्त्रास निगडित नसणाऱ्या लोकांना हार्ट अटॅक व कार्डियाक अरेस्ट या मधील फरक कळत नाही. त्यामुळे तातडीची वैद्यकीय सेवा न मिळाल्यास रुग्ण आपला जीव गमावतो. 
हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट हे दोन्ही वेगवेगळे विकार असून लक्षणे आणि कारणे देखील वेगळी असतात. याची माहिती जाणून घेण्याआधी हृदयाचे नैसर्गिक कार्य कसे चालते याचा थोडक्यात आढावा घेऊ. 

 

हृदय हे मुठीच्या आकार एवढा मांसाचा गोळा असून तो छातीच्या पिंजऱ्यात मध्यभागी, डाव्या बाजूस थोडा झुकलेला अशा स्थितीत वसलेला असतो. अशा या मांसाच्या गोळ्याचे कार्य दोन प्रमुख कार्यांवर अवलंबून असते. 
१. कोरोनरी धमन्यांद्वारे हृदयाला होणारा रक्त पुरवठा 
२. हृदयातून निर्माण होणारा विद्युत प्रवाह म्हणजेच हृदयाचे ठोके, स्पंदने. 

हार्ट अटॅक 
यालाच मराठीत हृदय रक्तवाहिन्यांच्या विकाराचा झटका असे देखील म्हणतात. 
हृदयाला कोरोनरी धमन्यांद्वारे रक्त पुरवठा केला जातो. परंतु काही कारणांमुळे धमन्यांमध्ये मेद संचय सुरु होतो. कालांतराने तो वाढत जाऊन धमन्या आतील बाजूंस अरुंद होऊ लागतात. मग त्या हृदयाला आवश्यक तेवढा रक्त पुरवठा करू शकत नाही.

साहजिकच हृदयाचे कार्य हळूहळू मंदावू लागते. कोरोनरी धमन्यांमध्ये होणाऱ्या या मेद संचयाला आज बोलीभाषेत रक्त वाहिन्यांमधील ब्लॉकेजेस, प्लाक इत्यादि संबोधले जाते. जेव्हा कोरोनरी वाहिनी ६० ते ८० टक्क्यांपेक्षा अधिक अवरोधित असते, अशा रुग्णांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण अधिक असते. 
 

हार्ट अटॅकच्या प्रमुख कारणांपैकी धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा असून पारिवारिक इतिहास (फॅमिली हिस्टरी) हेही अति महत्वाचे कारण आहे. 
 

हार्ट अटॅकची लक्षणे ही जास्त करून रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळेस दिसून येतात, असा बऱ्याच लोकांचा समज आहे. तो आताच्या अभ्यासाने चुकीचा ठरला आहे. मानसिक व शारीरिक ताणतणाव असलेल्या जीवन शैलीमुळे हृदयाचा झटका कधीही येऊ शकतो. या आजाराच्या वेदना छातीच्या व पाठीच्या मध्य भागी, डावा हात, जबड्याची खालची बाजू व उदराच्या ठिकाणी अधिक प्रमाणात जाणवतात. त्याचप्रमाणे छाती जड होऊन दम लागणे, नीट श्वास घेता न आल्यामुळे जीव घाबरा होऊन छाती आवळल्यासारखी वाटणे, काही रुग्णांमध्ये बसल्या जागी दम लागणे, हात पाय थंड पडणे, चक्कर येणे, चार पावले देखील नीट चालता न येणे ही लक्षणे दिसतात. तर बऱ्याच रुग्णांमध्ये हार्ट अटॅकच्या आदल्या दिवशी एसिडिटी, अतिसार, उलट्या हे देखील प्रामुख्याने वाढलेले दिसून येते. परंतु पोटाचे विकार म्हणून याकडे दुर्लक्ष केले जाते. 

कार्डियाक अरेस्ट 
कार्डियाक अरेस्ट म्हणजेच हृदय क्रिया बंद पडणे. 
हृदयाची क्रिया त्याच्याच ठोक्यांवर वा स्पंदनांवर अवलंबून असते. हे ठोके एका विशिष्ठ अंतराने मिनिटाला ७२ ते ७४ पडत असतात. यंत्रांनी ऐकल्यास लब- डब असा ठोक्यांचा आवाज येतो. या स्पंदनांमुळे हृदयाची हालचाल होते आणि हृदय शरीरातील अशुद्ध रक्त शुद्धीकरणासाठी फुप्फुसांकडे पाठवते, तर शुद्ध झालेले रक्त महाधमन्यांद्वारे संपूर्ण शरीरभर पसरविते. परंतु जेव्हा हृदयाच्या स्पंदनांची अतालता होऊन ती अचानक बंद पडतात, तेव्हा हृदयाची रक्त पाठवण्याची क्रिया थांबते. शरीराला होणारा रक्त पुरवठा खंडीत होतो व रुग्ण ताबडतोब आपला जीव गमावतो.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासाप्रमाणे कार्डियाक अरेस्टमुळे होणाऱ्या आकस्मिक मृत्यूचे प्रमाण हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूपेक्षा चौपटीने जास्त आहे. स्त्री-पुरुषांची तुलना केल्यास जास्त करून पुरुष या आजाराचे बळी ठरतात. 

कार्डियाक अरेस्टमुळे होणाऱ्या आकस्मिक मृत्यूची कारणे बघता असे लक्षात येते, हृदयाचा कोणताही आजार जडलेला नाही अशा व्यक्ती देखील यामुळे जीव गमावू शकतात. त्याच प्रमाणे हृदय रक्त वाहिन्यांचे आजार, हृदयाच्या झडपांचे आजार, हृदयाची अनैसर्गिक वाढ, स्पंदनांची अतालता व पारिवारिक इतिहास आदी या आजाराची काही ठळक कारणे आहेत. 

या आजाराची लक्षणे अचानक दिसून येतात. छातीत प्रचंड वेदना होऊन रुग्ण जमिनीवर कोसळतो. हाताची व मानेची नाडी बघितल्यास ती बंद पडलेली असते. 

हार्ट अटॅक वा कार्डियाक अरेस्टचा झटका आल्यास काय करावे? 
हार्ट अटॅकची लक्षणे दिसून आल्यास ताबडतोब होमिओपॅथीमधील डिजिटॅलिस नावाचे औषध किंवा अॅलोपॅथीमधील अॅस्पिरिन नावाची गोळी घ्यायला हवी. हातातील सर्व कामे सोडून एकाजागी शांतपणे बसणे व न खोकता हळूहळू श्वास घेत राहणे आवश्यक असते. तसेच तातडीने रुग्णवाहिका बोलावायला हवी. या रुग्णवाहिकांमध्ये तातडीची वैद्यकीय मदत मिळण्याची सुविधा असते. 

कार्डियाक अरेस्ट म्हणजे अचानक प्रचंड छातीत वेदना झाल्यास सर्वात आधी मदतीस हाक मारणे. रुग्ण जमिनीवर कोसळला असता मदतगाराने रुग्णाच्या मनगट व मानेवरील नाडी तपासावी. नाडी चालू नसल्यास मदतगाराने रुग्णाच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी पुनरुत्थान (Cardiopulmonary resuscitation) करायला हवे म्हणजेच रुग्णाच्या हृदयावरती मदतगाराने त्याच्या दोन्ही हातांनी जोरजोरात दाब देऊन हृदयाची स्पंदने पुनरावृत्त करण्याचा प्रयत्न करावा आणि तातडीची रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात भरती करावे. 

अशा घटनांमध्ये होमिओपॅथीची काही औषधे आपल्याला आणिबाणीच्या अवस्थेमधून बाहेर पडण्यास मदत करू शकतात. डिजिटॅलिस, क्रॅटॅगस ऑक्झॅकांथा, अर्सेनिकम अल्बम इत्यादि औषधे तातडीच्या वेळी उपयोगी पडतात असे लक्षात आले आहे. 

याचा अर्थ असा की, कार्डियाक अरेस्ट हा हार्ट अटॅकच्या तुलनेत अधिक गंभीर असतो. जवळपास ८९ टक्के रुग्ण आपला जीव जागीच गमावतात. म्हणून रुग्णवाहिनी पोहचेपर्यंत किमान प्रत्येक घरातल्या दोन व्यक्तींनी ‘हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी पुनरुत्थान’ पद्धती शिकून घेणे आज अनिवार्य आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com