#FamilyDoctor ‘ती’ चाळिशीत शिरताना..

Woman
Woman

चाळिशीत मासिक पाळी त्रासदायक होऊ शकते. रक्तस्राव वाढणे, पोटात दुखणे असे त्रास होतात. याआधी गर्भाशय काढणे हा एकच उपाय होता. आता अन्य उपायही उपलब्ध झाले आहेत.

ठराविक वयानंतर म्हणजे साधारणतः चाळिशीच्या आसपास मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे, पाळी लवकर-लवकर येणे अशी लक्षणे काही स्त्रियांमध्ये दिसतात. वरकरणी पाहता यात कर्करोगासारखे काही ठोस कारण आढळत नाही. यालाच अकार्यक्षम गर्भाशयाचा रक्‍तस्त्राव (डिस्फंक्‍शनल युटेरिन ब्लीडिंग) म्हणतात. काही वर्षांपूर्वी यावरील उपाय म्हणजे गर्भाशयाची पिशवी काढून टाकणे एवढाच होता. आता मात्र यावर काही नवीन उपाय निघाले आहेत. यापैकी एक उपाय म्हणजे एंडोमेट्रायल थर्मल ॲब्लेशन. यामध्ये गर्भाशयात ‘बलून’ सोडतात. मग यंत्राद्वारे त्यातून गरम पाणी फिरवतात. या उच्च तापमानाचा परिणाम गर्भाशयाच्या अंतःआवरणावर होऊन रक्तस्त्राव बंद होतो किंवा कमी होतो. हे साधारण मध्यम स्वरूपाचे शल्यकर्म असते व त्याला पूर्ण भुलीची गरज असते.

या उपचाराऐवजी आणखी एक पर्याय आहे. मात्र त्यासाठी आधी गर्भाशयाच्या आतील आवरणाला मोठा आजार (कर्करोगासारखी व्याधी) नाही याची खात्री करून घेतली जाते. त्यानंतर गर्भाशयात लिव्होनॉरजेस्ट्रेल या औषधाने भरलेली अंतर्ग्रहण कुपी (इंट्रायुटेरिन सिस्टीम) बसवता येते. यातून दिवसाला सुमारे वीस मायक्रोग्रॅम औषध बाहेर पडते व त्याचा परिणाम गर्भाशयाच्या आतील आवरणावर होतो. त्यामुळे रक्तस्त्राव खूपच कमी होतो. काही स्त्रियांमध्ये पाळी उशिरा-उशिरा येते. 

काही संप्रेरके (हार्मोन्स) पुरवणारी औषधे तोंडावाटे देऊनही रक्तस्त्राव कमी करता येतो. परंतु दिलेले औषध तोंडावाटे घेतल्यामुळे पुढे ती रक्तात मिसळून सर्व शरीरभर फिरतात. शरीरभर औषध फिरत असल्याने या औषधाचा जसा गर्भाशयाच्या आतील आवरणावर परिणाम होतो, त्याबरोबरीनेच सर्व शरीरावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे स्तन, यकृत यांसारख्या अवयवांवर पूर्ण लक्ष ठेवणे जरूरीचे असते. जेव्हा तोंडाद्वारे औषध देतो तेव्हा त्याचा डोसही जास्त लागतो. म्हणूनच अशा प्रकारच्या औषधांवर बंधने असतात. त्यांच्या दूरगामी दुष्परिणामांवर लक्ष ठेवणे भाग असते, म्हणून यापेक्षा अंतर्ग्रहण कुपीचा उपाय उपयुक्त ठरतो. या उपचार पद्धतीला एलएनजी-आययुएस म्हणतात.

काही स्त्रियांमध्ये तांबीसारख्या गर्भनिरोधक उपायांच्या वापरामुळे रक्तस्त्राव जास्त होतो. पाळी लवकर लवकर येणे, पोटात दुखणे असे त्रास होतात. त्या स्त्रियांसाठी एलएनजी-आययुएस हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे गर्भधारणाही होत नाही, शिवाय रक्तस्त्रावही कमी होतो. परिणामी अशक्तपणा येण्याचा धोकाही कमी होतो. या उपचार पद्धतीमध्ये कुपीत भरलेले औषधे रोज वीस मायक्रोग्रॅम एवढे कमी होत असल्याने त्याचे आयुष्य एकूण पाच वर्षांचे असते. थोडक्‍यात म्हणजे एलएनजी-आययुएसचा उपयोग अकार्यक्षम गर्भाशयाचा रक्‍तस्त्राव होणाऱ्या रुग्णांमध्ये चांगल्या प्रकारे होतो. तसेच गर्भनिरोधक म्हणूनही ते उत्तम काम करते. एलएनजी-आययुएस बसवल्यापासून गर्भाशयाच्या आतील आवरणावर पूर्ण परिणाम होण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. तोपर्यंत रुग्णाला इतर औषधे वापरून अधूनमधून होणारा रक्तस्त्राव थांबवता येतो. 

या साधनाचा वापर इतर व्याधींमध्येही केला जातो. गर्भाशयात फायब्रॉईडची गाठ असेल तर गर्भाशयात ही गाठ कोठे आहे, तसेच त्याचा आकार किती मोठा आहे, यावर या साधनाचा उपयोग अवलंबून असतो. एलएनजी-आययुएसच्या वापरामुळे या फायब्रॉईडची वाढ आटोक्‍यात राहते किंवा कमी होते, असा दावा केला जातो; परंतु यासाठी अजून भक्कम पुराव्याची आवश्‍यकता आहे. एवढे मात्र खरे की फायब्रॉईडने होणारा रक्तस्त्राव मात्र काही कालावधीनंतर या साधनामुळे कमी होतो. काही वेळा गर्भाशयाला असलेले श्‍लेष्मल (एंडोमेट्रियम) हे गर्भाशयाच्या आतील बाजूस वाढण्याऐवजी गर्भाशयाच्या बाहेर वाढते. अशा व्याधीमध्ये प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक असलेल्या गोळ्या तोंडावाटे दिल्या जातात. परंतु त्याचा लागणारा डोस हा जास्त आहे व साहजिकच त्याचे दुष्परिणामांचे प्रमाण वाढणार. यामुळेही एलएनजी-आययुएस अधिक सरस ठरते. त्याने गर्भाशयातून होणारा रक्तस्त्राव कमी होतानाच पोटदुखीही कमी होते असे दिसून आले आहे. 

काही वेळा श्‍लेष्मल गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये वाढते. अशा वेळी त्याला ॲडेनोमायॉसिस म्हणतात. यातदेखील रक्तस्त्राव जास्त होणे व पोटदुखी अशी लक्षणे दिसतात. या रुग्णांसाठीही याआधी गर्भाशय काढणे हाच पर्याय असे. परंतु आता एलएनजी-आययुएसचा या रुग्णांसाठीही चांगला उपयोग होतो असे आढळून आले आहे. 

गर्भाशयाची पिशवी काढून टाकण्याऐवजी एलएनजी-आययुएस पद्धती वापरण्याचे फायदे आपण पाहिले. पण या पद्धतीत काही उणिवाही आहेत. 

एलएनजी-आययुएसचा पूर्ण परिणाम साधण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. या काळात रुग्णाला रक्तस्त्राव होणे, पोटदुखी होणे असे त्रास होऊ शकतात. अशा वेळेस तात्पुरत्या स्वरुपाची इतर उपाययोजना बरोबरीने केल्यास नक्कीच फरक पडतो.

क्वचितप्रसंगी काही रुग्णांमध्ये एलएनजी-आययुएसनंतर  चेहऱ्यावर पुरळ येणे, वजन वाढणे, स्तनात दुखणे, ओटीपोटात दुखणे अशी लक्षणे दिसू शकतात; परंतु याचे प्रमाण मात्र खूपच कमी आहे.

एलएनजी-आययुएसमुळे पाळी उशिरा-उशिरा येते. त्यामुळे पाळी नक्की कधी येईल, याचा अंदाज करता येत नाही. ही अनिश्‍चितता काही वेळा त्रासदायक होऊ शकते.

अगदी क्वचित गर्भाशयाऐवजी गर्भाशयाच्या बाजूला बीजांडवाहिनीत गर्भ राहू शकतो. 

एलएनजी-आययुएसचा कालावधी पाच वर्षांचा असतो. या काळात प्रथम एक महिन्याने व नंतर दर सहा महिन्यांनी तपासणी करणे आवश्‍यक आहे.
या उपचारांसाठी योग्य रुग्ण निवडला पाहिजे. त्याने वर सांगितलेली सर्व काळजी घेतली तर त्या रुग्णाला चाळिशीत शिरतांना होणाऱ्या त्रासांवर एलएनजी-आययुएस हे नक्कीच वरदान ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com