स्त्रीशक्‍ती

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Friday, 13 April 2018

स्त्रियांमध्ये बाहेरून काही संसर्ग आलाच तर त्यावर ताबडतोब उपाय करण्याची गरज असते. पण हा सर्व विषय गुप्त, लपवाछपवीचा आहे, असे समजून मुली, स्त्रिया आपल्या त्रासाबद्दल घरात काही बोलत नाहीत. यामुळे विकार वाढीला लागतो. वेळीच लक्ष देऊन योग्य उपचार केले तर स्त्री उत्तम आरोग्यवान होऊन तिचे स्त्रीत्व, तिची प्रतिष्ठा स्थापित होऊ शकते. 

नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांतील स्त्रियांकडून, विशेषतः तरुण मुलींकडून विचारला जाणारा हा प्रश्न. अंगावरून लाल, पांढरे जाणे, मासिक धर्माच्या वेळी तीन-चार दिवसांऐवजी सात-आठ दिवस किंवा एखादाच दिवस रक्‍तस्राव होणे, मासिक धर्म अठ्ठावीस दिवसांऐवजी पंधरा-वीस दिवसांनी येणे किंवा चाळीस-साठ दिवसांनी येणे, असे प्रश्न विचारले जातात. त्यांना होणारे इतर त्रास हे यासंबंधात असणारे त्रास आहेत, हे विचारणाऱ्यांच्या लक्षात आले नाही तरी हे त्रास पाळीच्या संदर्भातील आहेत हे तज्ज्ञांच्या लक्षात येते.

मुळात स्त्रियांच्या मासिक धर्म म्हणजेच त्यांचे स्त्रीत्व. मासिक धर्म ही स्त्रियांची प्रतिष्ठा आहे, ते त्यांना मिळालेले वरदान आहे. याशिवाय जग निरंतर चालत राहावे ही कल्पनाच आकारात येऊ शकली नसती. स्त्रियांच्या शरीरात संप्रेरके (हॉर्मोन्स) वेगळ्या प्रकारे पुरुषांपेक्षा अधिक गुंतागुंतीच्या पद्धतीने कार्य करत असतात. संप्रेरकांचे कार्य आयुर्वेदात अग्नीसारखेच समजण्यास हरकत नाही. स्त्रियांना हा अग्नी खूप सांभाळावा लागतो. कंबरेतील अशक्‍तपणा, कंबरदुखीचे कारण अनेकदा नको त्या प्रमाणात अंगावरून जाणे हे असू शकते. कंबरेचे स्नायू अशक्‍त असले, मग ते अतिप्रमाणात सायकल चालविण्याने असोत, अवेळी गर्भारपणामुळे असोत, गर्भारपणात कमी अंतर असल्यामुळे असोत, मूत्राशयाच्या इन्फेक्‍शनमुळे असोत, अतिकामुक भावना जागृत झाल्यामुळे असोत (ज्या भावना अतिप्रमाणात असल्या तरी चांगले नसते किंवा ज्यांचे समाधान अजिबातच झाले नाही तरी चांगले नसते), अशा कारणांमुळे अंगावर अतिप्रमाणात जाण्याचा त्रास होऊ शकतो. मूत्रमार्गाची, गर्भाशयाची व पर्यायाने मूत्रविसर्जनाची स्वच्छता नीट असणे आवश्‍यक असते, अन्यथा जंतुसंसर्ग होऊ शकतो. मागे केलेल्या एका पाहणीत असे आढळले होते, शाळेतील स्वच्छतागृहांचे केवळ बोर्ड स्वच्छ असतात, अपवाद सोडता प्रत्यक्षात स्वच्छतागृह अत्यंत अस्वच्छ असतात. तेथे जाववतही नाही. तेथे केवळ नाकाला वास येतो असे नाही तर सर्वच तऱ्हेने ती अस्वच्छ असतात. त्यामुळे बाथरूमला जायला नको या कारणामुळे मुली पाणी कमी पितात. त्यामुळे त्यांना त्रास होत राहतो. यावर उपाय म्हणजे प्रत्येक शाळेला एक वर्ग कमी असला तरी चालेल; पण उत्तम स्वच्छतागृह असले पाहिजे, तसेच एखादा शिक्षक कमी असला तरी चालेल; पण स्वच्छतागृहाची स्वच्छता ठेवणारा, सतत तेथे असणारा कोणीतरी मनुष्य नेमला पाहिजे. तरच लहान मुलींच्या बाबतीत स्वच्छता पाळली गेल्यामुळे पुढे त्या गर्भाशयाचे किंवा मूत्रमार्गाचे विकार वगैरेंपासून मुक्‍त राहू शकतील. स्त्रीचे आरोग्य म्हणजेच जगाचे आरोग्य हे लक्षात घ्यायला हवे. पण शाळेतील स्वच्छतागृहांची स्वच्छता या गोष्टीकडे बहुतेक कोणाचेच लक्ष नसते. 

बाहेरून काही संसर्ग आलाच तर त्यावर ताबडतोब उपाय करण्याची गरज असते. पण हा सर्व विषय गुप्त, लपवाछपवीचा आहे, असे समजून मुली आपल्या त्रासाबद्दल घरात काही बोलत नाहीत व मुली बोलल्या तरी मोठी माणसे त्यांना गप्प करतात. यामुळे विकार वाढीला लागतो. 

मासिक धर्माच्या वेळी रक्‍ताच्या माध्यमातून जंतुसंसर्ग होणे सहज शक्‍य असते त्यामुळे या काळात स्त्रिया सहसा अनोळखी जागी जाऊ नये, घर सोडून न जाणे हाही एक उत्तम मार्ग असतो. या काळात स्त्रियांना विशेष विश्रांतीची गरज असते, अन्यथा जखम जास्त दिवस आत राहून रक्‍तस्राव अधिक प्रमाणात होऊ शकतो, जंतुसंसर्ग होऊ शकतो, काही वेळा ओव्हरीमध्ये सिस्ट होणे, फॅलोपियन ट्यूबमध्ये सिस्ट होणे, गाठीयुक्‍त रक्‍तस्राव होणे, पोटात दुखणे असे विकार होऊ शकतात. 

अंगावरून पांढरे जात असेल तर शरीरातील ताकद कमी होते. यासाठी मूत्राची तपासणी करून त्यातून प्रोटिन, अल्ब्युमिन जात नाहीत ना हे तपासून घेणे आवश्‍यक असते. अशा त्रासांवर आयुर्वेदात उत्तम इलाज सांगितलेले आहेत. 

हल्ली सोळा-सतरा वर्षाच्या मुलींनाही सिस्ट, पॉलिसिस्टिक ओव्हरी वगैरे त्रास होताना दिसतात. वेळीच लक्ष देऊन योग्य उपचार केले नाहीत, तर पुढे लग्न झाल्यावर अपत्यप्राप्तीची इच्छा असेल तेव्हा समस्या येतात. अशा वेळी उपचार करणे अधिक कठीण होऊन बसते. अशा प्रकारच्या त्रासांवर आयुर्वेदात उपचार सांगितलेले आहेत. त्रास झालाच तर पूर्ण औषधयोजना केल्यास स्त्रियांना त्रासापासून सुटका होऊ शकते. अंगावरून पांढरे जाण्याचा त्रास असला तर हा स्राव मूत्रात मिसळला गेल्याने मूत्रास काहीसा चिकटपणा येतो किंवा याचा डाग वस्त्रावर पडला तर त्या  डागाचे काठिण्य वेगळे असते. अंगावरून पांढरे जाणे याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालत नाही. घरातील वयस्कर महिलांनी याबाबत घरातील मुलींना योग्य ती काळजी घेण्याची सूचना देणे आवश्‍यक असते. असा त्रास झाला तर उष्ण, वातूळ, पित्तकर पदार्थ न खाणे चांगले. अशा प्रकारचा त्रास फार काळ होत राहिला तर शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते, रक्‍त कमी होते, ताकद कमी होते, वजन कमी होते, शरीराचा बांधेसूदपणा कमी होतो. यामुळेही मुलींमध्ये न्यूनगंड तयार होतो. यामुळेही अशा प्रकारच्या त्रासांकडे लक्ष देणे आवश्‍यक असते. मासिक धर्माच्या आधी एखादा दिवस अंगावरून थोडे पांढरे जाऊ शकते. पण अन्य कारणांनीही पांढरे जाण्याचा त्रास होऊ शकतो. पण वारंवार पांढरे जाणे व त्यामुळे मूत्रमार्गामध्ये कायम ओलावा राहणे हे बरोबर नाही. त्यावर लक्ष देणे अत्यावश्‍यक आहे. 

लाल पाणी अंगावरून जाणे हाही त्रास अनेकदा पाहायला मिळतो. या स्रावात रक्‍त असतेच. अशा वेळी मुलीला हिमोग्लोबिन वाढण्यासाठी औषधे देणे आवश्‍यक असते. त्यासाठी कामदुधा, धात्री रसायन, लघुसूतशेखर रस, मौक्‍तिकयुक्‍त कामदुधा, अतिप्रमाणात लाल जात असेल तर संतुलन फेमिफिटसारखे सिरप, ज्यात अशोकासारखे स्त्रीला उपयुक्‍त असणारे द्रव्य वापरलेले आहे. मासिक धर्माच्या वेळी अत्यल्प रक्‍तस्राव होत असला, तर कोरफडीचा वापर करून बनविलेले कुमारी आसव किंवा संतुलन फेमिनाइन बॅलन्स आसवासारखी औषधे घ्यावीत. 

स्त्रीच्या संप्रेरकांच्या संतुलनासाठी आयुर्वेदात सुचविलेला एक उपाय आहे योनीपिचू. कापसावर पाव चमचा तेल टाकून पिचू रात्रभर योनीमार्गात ठेवणे म्हणजे योनीपिचू. असा पिचू नियमित वापरण्यामुळे बरेच त्रास बरे होऊ शकतात. योनी स्वच्छ ठेवणे, धुपवणे हाही उपाय आयुर्वेदात सांगितलेला आहे. हाताला मेंदी लावल्यास शरीरातील उष्णता खेचून घेतली जाते. ओटीपोटावर, स्तनांच्या आजूबाजूला चंदन, वाळा यांची उटी लावण्यासाठी सुद्धा सुचविलेले आहे. 

तेव्हा असा कुठलाही त्रास होत असला तर आयुर्वेदिक उपचार नक्की करून घ्यावेत. कारण अशा प्रकारच्या विकारांकडे दुर्लक्ष केले तर पुढे समस्या येऊ शकते, पण वेळीच लक्ष देऊन योग्य उपचार केले तर स्त्री उत्तम आरोग्यवान होऊन तिचे स्त्रीत्व, तिची प्रतिष्ठा स्थापित होऊ शकते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman healthy article