‘पाळी’ला द्या टाळी!

संतोष शेणई
Friday, 22 March 2019

स्त्रियांची मासिक पाळी हा न बोलण्याचा, लपवण्याचा विषय नाहीच. ती अपवित्रही नाही. ती स्त्रीच्या जीवनातील सर्वांत सुंदर गोष्ट असते, हा विश्‍वास देणारे व स्त्रियांच्या आरोग्यसमस्यांविषयी चर्चा करणारे हे पुस्तक आहे. 

स्त्री   आरोग्यासंबंधी जागृती करणारे काही लेखन गेल्या काही वर्षांत बऱ्यापैकी प्रसिद्ध होत आहे. यात आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती अधिक असते. आपले शरीर आपल्याला समजायला हवे खरे, पण ते केवळ डॉक्‍टराच्या, शास्त्रज्ञाच्या नजरेतून दाखवले गेले, तर ते समजून घेणे अवघड होते. त्यात अरुचि असते. जर कोणी रंजकपणे समजावून दिले, तर ती गोष्ट अधिक समजते. या दृष्टीने डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे ‘आपाळी मिळी गुपचिळी’ हे पुस्तक वाचनीय झाले आहे. ते स्त्रियांना (खरे तर पुरुषांनाही) समजून घ्यायला आवडेल, असे आहे. स्त्रीच्या जीवनात ‘पाळी’ला खूप महत्त्व आहे. तिच्या आरोग्याच्या दृष्टीने, हे नवनिर्मितीच्या दृष्टीने पाळीला महत्त्व आहे. पण, त्याचबरोबर इतकी सुंदर गोष्ट अपवित्र ठरवण्यात आली आहे. तिच्याविषयी चर्चा करणे या समाजात जवळ जवळ निषिद्धच. पाळीविषयी समाजमनात गैरसमज आणि गंडच खूप आहेत. ‘पाळी’ हा शब्दही उच्चारायला मनाची तयारी नसते. या पार्श्‍वभूमीवर सामाजिक स्वास्थ्याच्याही दृष्टीने डॉ. अभ्यंकर यांनी स्त्री आरोग्याबाबतीत महत्त्वाची बोध-कथा येथे कथन केली आहे.  

शीर्षकापासूनच या पुस्तकात रुची निर्माण होते. पाळी, सॅनिटरी नॅपकिन यांसारखे शब्द सहसा उच्चारले जात नाहीत. ‘कावळा शिवला’, ‘तांब्या पालथा पडला’ अशी प्रतीकात्मक शब्दयोजना केली जाते. म्हणजेच असे विषय निघाले, की सगळे ‘आळीमिळी गुपचिळी’ असतात. त्यातील ‘आ’ च्या ठिकाणी ‘पा’ ठेवून समाजाच्या एका दुखऱ्या नसेवरच बोट ठेवले आहे. तेथूनच पुस्तकाविषयी उत्सुकता निर्माण होते.  त्यांच्या या लेखनांचे मोल या सामाजिक परिस्थितीमुळे अधिकच वधारते. यातील विषयही स्त्री आरोग्याच्या दृष्टीने व पाळीभोवती फिरणारे निवडून स्त्रीच्या, समाजाच्या मनातील गैरसमज दूर करण्याच्या प्रयत्नात लेखकाला यश आले आहे. पाळी, पीसीओडी, स्त्रीचे कामजीवनविषयक प्रश्‍न, गर्भनिरोधक साधने, कुटुंबनियोजन, गर्भारपण, बाळाचा रंग, त्याचे निरोगीपण याविषयीच्या शंका, गर्भपात, सिझर, वंध्यत्व, गर्भाशय काढण्याची खरंच गरज किती असते, मेनॉपॉज या विषयांवरचीही मोकळेपणाने चर्चा केली आहे.  

स्त्रीला जे काही शारीरिक आजार होऊ शकतात, ज्या काही समस्या निर्माण होऊ शकतात, त्याबद्दल डॉ. अभ्यंकर यांनी मोकळेपणाने आणि खुसखुशीत शैलीत लिहिले आहे. मूल गोरंच हवं का, या विषयावरचा ‘पी केशर अन्‌...’, किंवा ‘पुरुष नसबंदी, कुटुंब आणि समाज’ हे लेख म्हणजे खुसखुशीत विनोदाचा उत्तम नमुना म्हणता येईल. ते वाचनीय असल्याने हातात पडले की नक्कीच वाचले जाईल. पण, ते सर्व वयाच्या स्त्रियांसाठी उपयुक्त असल्यामुळेही स्त्रियांनी वाचायला हवे. या पुस्तकाच्या ‘पाठराखणी’मध्ये म्हटल्याप्रमाणे स्त्रीने स्वतःलाच हे पुस्तक ‘भेट’ द्यावे असे आहे. मनात प्रश्‍न खूप असतात. अनेक गोष्टी सर्वसामान्यांना वरवर माहीतही असतात. कधी तरी ऐकलेल्या असतात. पण, या ऐकण्यात, माहितीत एक तर गैरसमज करून देणारी, अशास्त्रीय, अंधश्रद्धायुक्त असे तरी असते किंवा त्यातले तपशील बोजड वैद्यकीय परिभाषेत तरी असतात. म्हणजे ते ज्ञान दूरच राहते. अशी तांत्रिक भाषा येथे वापरतानाही ती बोजड, कंटाळवाणी होणार नाही, याची काळजी लेखकाने घेतली आहे. विषय सुलभ करून सांगितला आहे. तरीही त्यातले वैद्यकशास्त्र हरवू दिलेले नाही. किंबहुना वैद्यकशास्त्राला कुठेही धक्का पोचणार नाही, याची काळजी घेत सहज संवाद केल्यासारखे ज्ञान वाचकांपर्यंत पोहोचवलेले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women healthcare Book