स्त्रियांचा मूत्रदाह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्त्रियांचा मूत्रदाह

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना मूत्रदाहाचा त्रास जास्त संभवतो. वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रियांना हा त्रास होण्याची कारणेही वेगवेगळी असतात. या त्रासाकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार करून घेणे इष्ट असते.

स्त्रियांचा मूत्रदाह

स्त्रिया मुळातच फार संकोची असल्याने अवघड जागीची दुखणी मोकळेपणाने वेळेवर सांगणे टाळतात. मूत्रदाहासारखी गोष्ट त्या बरेच दिवस सहन करतात. लघवीचे प्रमाण कमी झालेले असते, लघवीच्या वेळी प्रचंड आग होते, पण त्या निमूट असतात. खरे तर असे दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार करून घेणे महत्त्वाचे असते. पुरुषांच्या तुलनेत मूत्रदाहाचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त असते. लहान वयात, युवावस्थेत आणि रजोनिवृत्तीनंतर अशा सर्व काळात स्त्रियांना वेगवेगळ्या कारणानी मूत्रदाह होऊ शकतो. सर्वसाधारणपणे लहान मुलींमध्ये म्हणजे चौदा वर्षांखालील मुलींमध्ये मूत्रदाह होण्याचे प्रमाण दहा टक्के आहे. हा त्रास युवावस्थेतील स्त्रियांमध्ये चार टक्के दिसून येतो आणि वाढत्या वयात हे प्रमाण दोन टक्के असते.  

मूत्रसंस्था ही पूर्णपणे निर्जंतुक संस्था असते. मूत्रपिंडाचा नरसाळ्यासारखा तोंडाचा भाग, मूत्रवाहिन्या, मूत्राशय व मूत्रनलिका या सर्वांना मिळून मूत्रमार्ग असे म्हणतात. मूत्रमार्गाचा जंतुदोष हा मोठया प्रमाणात आढळणारा आजार आहे. स्त्रियांमध्ये त्यांच्या शरीररचनेमुळे मूत्रदाह होण्याचे प्रमाण जास्त आहे. स्त्रियांमधील बाह्य मूत्रमार्ग केवळ चार सेंटिमीटर लांबीचा असतो. बाह्यमूत्रमार्ग सरळ असतो. त्याच्या लगेचच मागे अर्धा सेंटिमीटरच्या फरकाने योनीमार्ग असतो व लगेच त्यामागे गुदद्वार असते. या रचनेमुळेच जंतुसंसर्गाला खूप वाव मिळतो. स्त्रियांमध्ये मूत्रनलिका आखूड असल्यामुळे बाहेरून जंतू आतपर्यंत लवकर पोचतात व जंतुदोष होतो. 

मूत्रमार्गात जंतुदोष सहसा खालून प्रवेश करतो. याला मूतखडे, लिंगसंसर्ग बाधा, शस्त्रक्रिया असे काही कारण असते. लघवी अडल्याने नळी घालून ती काढल्यावरही कधी कधी जंतुदोषाची बाधा होते. मासिकपाळीत स्वच्छता न पाळल्यास बाहेरचा जंतुदोष मूत्रमार्गात येण्याचा धोका असतो. लैंगिक संबंधानंतर, विशेषतः पहिल्या काही दिवसांत मूत्रसंस्थेचा जंतुदोष होऊ शकतो. रजोनिवृत्तीनंतर मूत्रमार्ग कोरडा पडल्याने मूत्रदाहाचा त्रास होतो. काही वेळा शरीरात इतरत्र असलेला जंतुदोष मूत्रसंस्थेत येऊन हा आजार तयार होतो. काही रुग्णांच्या बाबतीत असे कोणतेही कारण दिसत नसतानाही स्वतंत्रपणे मूत्रमार्गाचा जंतुदोष झालेला दिसतो. मूत्रसंस्थानाची श्‍लेष्मल त्वचा जंतू नष्ट करण्याचे काम करीत असतेच. पण काही कारणाने या श्‍लेष्मल त्वचेचे कार्य बिघडले तर जंतुंची वाढ होऊन मूत्रदाहाचा त्रास होतो. 

स्त्रियांमध्ये वेगवेगळ्या कारणानी जंतुसंसर्ग होतो. त्यातील एक कारण आहे ते म्हणजे शौचातील जंतूंचा योनीमार्गात प्रादुर्भाव होणे. योनी व गुदद्वार यांत जास्त अंतर नसते. या मधल्या भागाला पेरीनिअम म्हणजेच विटप म्हणतात. शौचाला गेल्यानंतर जर स्वच्छता नीट ठेवली गेली नाही, तर गुदाशयातील जंतू योनीमार्गात व तेथून मूत्रमार्गात सहज प्रवेश करू शकतात. विशेषतः लहान मुलींमध्ये जंतुसंसर्गाचे हे मुख्य कारण असते. विटपावरील जंतू मूत्रमार्गात गेले की तेथे त्यांना वाढीसाठी योग्य जागा मिळते. जंतू वाढले की मूत्रदाह सुरू होतो. मुलींना लघवीला जास्त वेळा जावे लागणे आणि लघवी संपूर्ण झाल्याची भावना न होणे ही जंतूसंसर्गाची लक्षणे कळतातच असे नाही. त्यानंतर त्यांना लघवी करताना जळजळ होऊ लागते. ताप येतो. त्या वेळीही ही लक्षणे मूत्रदाहाची असतील हे कित्येकदा लक्षात येत नाही. त्यामुळे पाठीमध्ये दुखणे, लघवीच्या जागी वेदना होणे अशी लक्षणे सुरू होतात आणि मग घरातील मोठी माणसे सावध होतात. त्यात बराच वेळ वाया जातो. स्त्रियांनी मूत्रदाह टाळण्यासाठी एक काळजी नेहमी घेतली पाहिजे. साधारणतः शौचानंतर ती जागा मागून पुढे अशी धुतली जाते. अशा प्रकारे धूत असताना हात गुदमार्गापासून योनीमार्गापर्यंत पुढे येतो आणि शौचातील जंतूंचा किंवा विटपावरील जंतूंचा योनीमार्गाशी संपर्क येतो. हे टाळण्यासाठी स्त्रियांनी शौचाची जागा मागून पुढे अशी न धुता पुढून मागे अशी धुवावी. तसेच विटपही स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. त्यामुळे जंतुसंसर्गाचे किमान हे कारण टाळता येणे शक्‍य आहे. 

लैंगिक संबंधांवेळचा ताण, गरोदरपणाच्या काळात मूत्रसंस्थानावर येणारा ताण व प्रसूतीच्या वेळी बाह्यमूत्रनलिकेला बसणारा धक्का यामुळेही मूत्रदाहाचा त्रास होऊ शकतो. शरीराला सहन न होणारे एखादे औषध किंवा मद्य मूत्रदाहास कारणीभूत होऊ शकते. 

लैंगिक संबंधांच्यावेळीही पुरेशी काळजी घेतली गेली पाहिजे. शरीरसंबंधाआधी जर मलमूत्राचा वेग आलेला असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. मूत्राशय किंवा गुदाशय भरलेले असताना शरीरसंबंध केल्यास त्या भागाला विशेषतः बाह्यमूत्रमार्गाला व मूत्राशयाला धक्का बसू शकतो. अयोग्य आसनांमुळेही मूत्राशयाच्या खालच्या भागाला व योनीभित्तींना इजा होऊ शकते. स्त्री पुरेशी उत्तेजित होण्याआधी, म्हणजेच योनीमार्ग पुरेसा ओलसर होण्याआधीच शरीरसंबंध केल्यास योनीभित्तींना इजा होते. तेथे सूज येते. धसमुसळेपणाने केलेल्या संबंधात बाह्यमूत्रनलिकेला धक्का बसू शकतो. काही स्त्रियांचा योनीमार्ग अत्यंत लहान असतो, तसेच काही वेळा योनीमार्गात जन्मजात विकृती असू शकते, किंवा विटप (योनी व गुदद्वार यांच्यामधील भाग) कडक असतो, अशावेळी पहिल्या संबंधानंतर योनीमार्गाला इजा पोचू शकते. यामुळे ‘हनीमून पायलायटिस‘चा त्रास संभवतो. लैंगिक संबंधातील जोडीदार बदलणाऱ्यांबाबतही योनीभित्तींना इजा पोचल्याने दाह होण्याचा संभव अधिक असतो. 

काही जणींना साबणांचं वावडं (एलर्जी) असतं, असा साबण किंवा कुटुंबनियोजनासाठी वापरली जाणारी जेली किंवा क्रीम यांनीही योनीभित्तींना इजा होऊ शकते. कुटुंबनियोजनाच्या साधनांमुळे, विशेषतः डायफ्रामची कडा आतून घासली गेल्यामुळे अधोमार्गात (लोअर युरिनरी ट्रॅक्‍ट) संसर्ग होतो. असा त्रास होत असल्यास ते साधन वापरणे बंद करणेच इष्ट होय. साबणाचा फेस केलेल्या टबातील स्नान टाळावे. तसेच योनीभित्ती डेटॉलने स्वच्छ करण्याचा प्रयत्न टाळावा.

गर्भारपणात मूत्रसंस्थानावर दाब येऊ शकतो. अशावेळी लघवी होण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात. त्याचा परिणाम म्हणून लघवी मूत्राशयात साचून तेथे जीवाणूंचा संसर्ग होऊ शकतो. गर्भारपणात लघवीतील आम्लाची व शर्करेची पातळी वाढलेली असू शकते. त्यामुळेही मूत्रदाह होऊ शकतो. सुरुवातीच्या काळात योनीमार्गात खाज येऊ लागते. त्या वेळीच उपचार केले तर पुढचा त्रास वाचतो. गर्भार स्त्रीची अगदी सकाळची लघवी तपासून त्यात ई-कोली (E-coli) या जीवाणूंबाबत खातरजमा करून घेता येईल. गर्भारपणी मूत्रदाह वाढणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कारण त्यामुळे रक्तदाब वाढण्याची, गर्भधारणेतील विषबाधा (Toxemia of pregnancy) होण्याचा व त्यामुळे माता व गर्भाला अपाय होण्याचा धोका संभवतो.

गर्भाशयभ्रंश होऊन जर गर्भाशय योनीमार्गात आले असेल, तर ते शस्त्रक्रिया करून जागेवर बसवावे लागते अथवा काढून टाकावे लागते. अन्य काही कारणानेही गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. अशावेळी मूत्रवाहिनीला इजा पोचल्याने मूत्राशयदाह होऊ शकतो. प्रसूतीनंतरही काही स्त्रियांमध्ये मूत्राशयाचे स्नायू कमजोर होण्याची शक्‍यता असते. मूत्राशयाला व बाह्यमूत्रनलिकेला जंतुदोषामुळे अथवा सूज आल्यामुळे मूत्राशयदाह (Cystitis) होतो. अशावेळी लघवी तपासून जंतू अथवा जीवाणूंचा प्रकार शोधावा लागतो. जर लघवीत जीवाणू सापडले नाहीत, तर विनाजीवाणू मूत्रदाह ( Abacterial Cystitis) होण्याची कारणे शोधावी लागतात. मूत्रदाहावर उपचार घेत असतानाच मूत्राशयाच्या स्नायूंवर ताबा येण्यासाठी एक छोटा व्यायाम करावा. एका टबात कोमट पाण्यात संपूर्ण कटीभाग बुडेल असे बसावे. योनीमार्ग, मूत्रमार्ग याचे स्नायू आणि कुल्ले घट्ट आवळून धरावेत, सैल सोडावेत, पुन्हा घट्ट आवळावेत असा व्यायाम त्या भागाला रोज स्नानाच्यावेळी द्यावा. दिवसातून दोन वेळा याप्रकारे कटीस्नान घेता आले तर उत्तम. याखेरीज त्या स्नायूंवर पुरेसे नियंत्रण येईपर्यंत निवांत बसलेले असताना, काम करताना जमेल तेव्हा त्या स्नायूंना याप्रकारे व्यायाम द्यावा. 

रजोनिवृत्तीच्यावेळी (मेनॉपॉज) इस्ट्रोजन या संप्रेरकाची (हार्मोन्स) कमतरता निर्माण  होते. त्याचा परिणाम म्हणून योनी व बाह्यमूत्रवाहिनीचा खालचा भाग आकुंचित होतो, तसेच कोरडा होऊ लागतो. तेथील ओलसरपणा कमी झाल्याने अंतःत्वचेला घर्षणाने जखमा होण्याची शक्‍यता वाढते. त्या त्वचेवर एरव्ही जंतू-जीवाणूंना प्रतिबंध करणारा श्‍लेष्मल स्रावाचा थर असतो, पण रजोनिवृत्तीनंतर तोही कमी होतो. परिणामी तेथे जंतुसंसर्ग होण्याची शक्‍यता खूपच वाढते. याच काळात काही वेळा मूत्रवाहिनीतही अडथळे निर्माण होतात व ती आकुंचित होते. त्यामुळे लघवी पूर्ण होत नाही. लघवी साचून राहिल्याने जंतुसंसर्ग होतो. अशा वेळी जंतुप्रतिबंधक औषधे दिली जातात. मूत्रवाहिनी अथवा योनीमार्ग आकुंचित झालेला असल्यास शस्त्रक्रियेद्वारे तो मार्ग रुंद केला जातो. काहीवेळा इस्ट्रोजन थेरपीही वापरली जाते. मात्र हे उपाय पुन्हा पुन्हा करावे लागतात.