दिवस डॉक्‍टरांचा

डॉ. श्री बालाजी तांबे  www.balajitambe.com
Tuesday, 2 April 2019

जिवाला क्‍लेश सहन होत नाही, दुःख सहन होईनासे होते त्या वेळी डॉक्‍टर हे देवासारखे समजले जातात व त्यानुसार या व्यवसायाचे उदात्तीकरण होत आहे व होत राहणार, हे निश्‍चित. हे समजून घेऊन डॉक्‍टर व रोगी यांच्यात दृढ विश्वास उत्पन्न व्हावा. रुग्णाला आलेले अनुभव डॉक्‍टरांना कळवावेत, त्यांच्याबद्दल श्रद्धा व विश्वास उत्पन्न व्हावा, यासाठी हा ‘जागतिक डॉक्‍टर्स डे’. 

ज्या   ठिकाणी डॉक्‍टरांचे कायमचे वास्तव्य नसते अशा बऱ्याच गावांमध्ये आठवड्यातून एक दिवस डॉक्‍टर येतात, तो ‘दिवस डॉक्‍टर’चा असे म्हटले जाते. जसे आसपासच्या छोट्याछोट्या गावांमधून आपापल्या वस्तू घेऊन त्यातल्या त्यात एका मोठ्या गावात सर्वजण आठवड्यातून वा महिन्यातून एक दिवस येतात, त्याला बाजाराचा दिवस असे म्हटले जाते, तसा हा डॉक्‍टरांचा दिवस. जसे घरात आठवड्यासाठी वा महिन्यासाठी वस्तू भरण्यासाठी बाजाराच्या दिवसाकडे डोळे लावून बसावे लागते, अन्यथा एखादी वस्तू घरात नसली तर बरेच श्रम व बराच प्रवास करण्याचा व्याप करावा लागतो. पण अचानक दाढ दुखायला लागली तरी डॉक्‍टरांच्या दिवसाकडे डोळे लावून वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नसते. 

वर्षातील एक महत्त्वाचा दिवस ‘डॉक्‍टरांचा दिवस’. बाजाराचा दिवस असला पण त्या दिवशी काही कारणाने बाजार भरलाच नाही तरी वेळ निभावून नेली जाते; परंतु डॉक्‍टरांचा दिवस नसताना आजारपण आले तर परिस्थिती निभावता येत नाही, रुग्णाला घेऊन डॉक्‍टरांकडे जावे लागते. याप्रमाणे डॉक्‍टर ही एवढी महत्त्वाची गरज आहे. ज्यांच्यामुळे ही गरज भागवली जाते, त्याच्याबद्दल वर्षातील एक दिवस कृतज्ञता व्यक्‍त करण्याच्या दृष्टीने एक जुलै हा ‘जागतिक डॉक्‍टर्स डे’ म्हटला जातो. 

डॉक्‍टरी व्यवसायामध्ये असणारा मानसिक ताण व मेहनत, वेळी-अवेळी घ्यावी लागणारी जबाबदारी हे लक्षात घेता डॉक्‍टरांना आठवड्यातून एक दिवस पूर्ण विश्रांती मिळण्याची गरज आहे. डॉक्‍टरांना स्वतःचा असा एकही दिवस मिळू नये हे डॉक्‍टरी व्यवसायाचे दुर्भाग्य म्हणावे लागेल. रोग्यांना सकाळी-दुपारी-रात्री केव्हाही डॉक्‍टरांकडे धावावे लागते हे जेवढे खरे, तेवढेच डॉक्‍टरांच्या वेळेचा, मनाचा, स्वास्थ्याचा विचार करणे आवश्‍यक असते. डॉक्‍टरी व्यवसाय हा किती महत्त्वाचा, उपयोगी आहे हे समजण्यासाठी हा डॉक्‍टरांचा दिवस लक्षात ठेवावा लागेल. 

आयुर्वेदातील चरकसंहितेत पहिल्याच अध्यायात एक श्‍लोक आहे, 
अथ मैत्रीपरः पुण्यमे आयुर्वेदं पुनर्वसुः।
शिष्येभ्यो दत्तवान्‌ षड्‌भ्यः सर्वभूतानुकम्पया ।।

म्हणजे सर्व प्राणिमात्रांविषयी मैत्रीची भावना असणाऱ्या प्रिय पुनर्वसूंनी सर्व प्राणिमात्रांवर अनुकंपा करण्याच्या दृष्टीने पुण्यप्रद आयुर्वेदशास्त्राचे ज्ञान आपल्या सहा शिष्यांना दिले. 
अगदी अलीकडच्या काळात संत नरसी मेहतांनी म्हटले आहे, 

‘वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराई जाणे रे’ म्हणजे जो दुसऱ्यांचे दुःख समजून घेतो तोच खरा पूर्ण मनुष्यत्वाला, विष्णुतत्त्वाला किंवा संततत्त्वाला प्राप्त होतो.  

वैद्यकीय ज्ञानाबरोबरच हदयामध्ये ज्या भावना समजून घेण्याचे विज्ञान आहे तेही डॉक्‍टरला सिद्ध  हवे. तरच डॉक्‍टरांना दुसऱ्याला होणाऱ्या पिडेचा अनुभव करता येऊ शकेल. 

यानंतर म्हटले आहे. ‘परदुःखे उपकार करे तोये मन अभिमान न आणे रे’ म्हणजे केलेल्या मदतीचा अभिमान मनात बाळगू नये. केलेल्या मदतीसाठी भलत्याच अपेक्षा ठेवणे किंवा रुग्णाकडून अवाच्यासवा मोबदला घेणे हे या व्यवसायाच्या नीतिमत्तेत बसणार नाही. 

एखाद्याला चांगले गुण मिळालेले आहेत म्हणून वैद्यकीय शाखेकडे प्रवेश घेऊन डॉक्‍टर होण्यापेक्षा, दुसऱ्याचे  दुःख बरे करेन, इतरांना अधिक प्राणशक्‍ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन व त्याला जीवन अधिक आनंदाने जगण्यासाठी त्याला त्याच्या शरीराने अधिक साथ दिली तर मला अधिक आनंद वाटेल असा स्वभाव असणाऱ्यांचा हा वैद्यकीय व्यवसाय. अशा या वैद्यकीय व्यवसायासाठी एक दिवस निश्‍चित करून कृतज्ञता दाखविण्यात फार मोठे कार्य केले आहे असे म्हणता येत नाही. 

कुठलेही काम करण्यासाठी संबंधित विषयाचे शिक्षण, ज्ञान असणे आवश्‍यक आहे, म्हणजेच तसा अधिकार असणे आवश्‍यक आहे. जे काम केले जाते ते कर्तव्यबुद्धीने, कोणीतरी आज्ञा दिल्यामुळे किंवा कोणीतरी विनंती केल्यामुळे केले जाणे अशा तीन प्रकारे केले तर त्याचा दोष राहत नाही. 

डॉक्‍टर व पेशंट यांच्यात विश्वास व प्रेम वाढविण्यासाठी डॉक्‍टरांनी औषधांबरोबरच अनुशासन, जीवनपद्धतीत व आहार-विहारात बदल आणि आत्मशांतीसाठी सल्ला दिल्यास अधिक उपयोग होईल. 

जिवाला क्‍लेश सहन होत नाही, दुःख सहन होईनासे होते त्या वेळी डॉक्‍टर हे देवासारखे समजले जातात व त्यानुसार या व्यवसायाचे उदात्तीकरण होत आहे व होत राहणार हे निश्‍चित. हे समजून घेऊन डॉक्‍टर व रोगी यांच्यात दृढ विश्वास उत्पन्न व्हावा. रुग्णाला आलेले अनुभव डॉक्‍टरांना कळवावेत, त्यांच्याबद्दल श्रद्धा व विश्वास उत्पन्न व्हावा यासाठी हा ‘जागतिक डॉक्‍टर्स डे’. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world doctor day