esakal | जागतिक महिला दिवस
sakal

बोलून बातमी शोधा

World women day

जागतिक महिला दिवस

sakal_logo
By
डॉ. श्री बालाजी तांबे


स्त्रीला रोज मान द्यावा असे जेव्हा म्हटले जाते त्याचा अर्थ असा की सर्वच बाबतीत      ती अग्रणी आहे. तिच्यामुळेच तयार होते घर, तिच्यामुळेच आवश्‍यकता भासते कामाची, तिच्यामुळेच आवश्‍यकता असते पुरुषाला बलाढ्य होण्याची. या स्त्रीशक्‍तीला प्रसन्न करण्यासाठी पुरुषाने स्वतःचे सर्वस्व सर्वतोपरी ओतावे हेही साहजिकपणे घडलेले आहे. भारतीय परंपरेत स्त्रियांना व स्त्रीशक्‍तीला समजून घेत असताना तिची कलात्मकता, तिचे सर्व सामुग्रीवरचे  आधिपत्य आणि तिची रौद्र शक्‍ती यांचा विचार केला गेला. स्त्री पुरुषापेक्षा शरीराने कमजोर असली, तरी वेळप्रसंगी तिच्याजवळ असलेल्या आंतरिक व मानसिक शक्‍तीचे रूपांतर प्रचंड स्फोटात होऊन शेवटी तीच जिंकणार हे नक्की असते. 

सध्या प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येक अस्तित्वाला एक दिवस ठरविण्याची पद्धत सुरू झालेली आहे. काही गोष्टी किंवा काही प्रसंग वर्षातून एकदा आठवण करण्याजोग्या असू शकतात, परंतु स्त्रीला तिचा म्हणून एक दिवस मिळणे हा तिच्यावर अन्याय ठरावा. जसे एखाद्या कार्यक्रमात एखादे गीत हृदयाला इतके भिडून जाते की सर्व मैफिलीवर या गीताने राज्य गाजविले असे वाटते. असे जरी असले तरी उरलेली मैफिल नको होती का? त्या गाण्याला वाद्यांची साथ करणारे जे होते ते नको होते का? सर्वांचा मिळून एक परिणाम असतो. वस्तुतः सर्व मैफिलच चांगली असावी लागते, त्यातल्या एका गाण्यासाठी कोणी आलेले नसते. 

तसे या संपूर्ण विश्वात स्त्रीत्व हे ओतप्रोत भरलेले आहे. स्त्रीत्वाचे प्रतिनिधित्व करणारी जी स्त्री तिचे वर्षात 365 दिवसच असायला हवेत. वर्षातील एक दिवस निवडून तो महिला दिन म्हणून ठरविणे हा अन्याय का वाटतो हे लगेच लक्षात येईल. स्त्रीची प्रतिष्ठा, तिचा मान अपरंपार आहे तसेच स्त्री ही संपूर्ण विश्वाचा प्राण आहे. भारतीय परंपरेत प्राचीन काळी ज्ञानाची ज्या ठिकाणी सुरुवात होते त्या ठिकाणी असते संकल्पना. हेच ते प्राचीन, पवित्र वेद-ज्ञान. जसे भूमितीतील सिद्धांतांमध्ये एक संकल्पना सिद्ध केलेली असते व त्यावर आधारित अनेक गणिते सोडवायची असतात. भारतीय परंपरेच्या आदि संकल्पनेत मुळात द्वैत नसतेच. त्यामुळे स्त्री व पुरुष या दोघांना एकच दर्जा दिलेला दिसतो. वीज असली पण दिवा लावला नाही तर विजेचे अस्तित्व कळणार नाही, तसेच दिवा असला पण त्याला विजेचे कनेक्‍शन दिलेले नसले तर दिव्याचाही काही उपयोग नाही. त्यामुळे विजेचा एक दिवस व दिव्याचा एक दिवस असे दोन्हींचे वेगवेगळे दिवस पाळता येत नाहीत. वीज व दिवा यातून पडणाऱ्या प्रकाशाचा एक दिवस आहे असे आपण ठरवू शकतो. 

स्त्री-पुरुष या जोडीला एक मोठे स्थान दिलेले आढळते. ते स्थान देत असताना त्यातील निर्णायक मत स्त्रीला दिलेले दिसते. अर्धनारीनटेश्वर हे स्वरूप जीवनकलेच्या विकासासाठी भारतीयांनी स्वीकारलेले आहे, त्यात फूट पाडण्याच्या दृष्टीने स्त्रीला वेगळी पाडणे हा स्वार्थी व संधिसाधू समाजाचा हेतू तर नसावा अशी शंका येते. 

स्त्रीला रोज मान द्यावा असे जेव्हा म्हटले जाते त्याचा अर्थ असा की सर्वच बाबतीत ती अग्रणी आहे. तिच्यामुळेच तयार होते घर, तिच्यामुळेच आवश्‍यकता भासते कामाची, तिच्यामुळेच आवश्‍यकता असते पुरुषाला बलाढ्य होण्याची. या स्त्रीशक्‍तीला प्रसन्न करण्यासाठी पुरुषाने स्वतःचे सर्वस्व सर्वतोपरी ओतावे हेही साहजिकपणे घडलेले आहे. 

स्त्री प्रतिष्ठा हा सर्व जगभर चर्चेचा विषय झाल्यानंतर भारतीय परंपरा असेच म्हणत होती असे म्हणण्याचे कारण नाही, कारण सर्व शास्त्रपरंपरांनी, याज्ञवल्क्‍य, पराशर, मार्कंडेय, भृगू वगैरे सर्व महामुनींनी यावर शास्त्र सांगून ठेवले आहे. संकल्पना कृतीत उतरवण्यासाठी कशा तऱ्हेने संकल्पनेचा आधार घ्यावा हे ज्यात सांगितले आहे ते शास्त्र. मुळात मनुष्याचे अस्तित्व टिकावे, मनुष्याला आरोग्य व दीर्घायुष्य मिळावे, त्याला आनंद फुलवता यावा आणि आनंद अनुभवता यावा यासाठी शास्त्रे निर्माण केलेली असतात. 
स्त्री व पुरुष या जोडीशिवाय हे होऊ शकणार नाही, त्यामुळे स्त्री व पुरुष या दोघांना शास्त्रांनी समान अधिकार देऊन जीवन जगण्याचा मार्ग दाखविला. आदिकालातील पुरुष जंगलात किंवा आधुनिक काळातील पुरुष ऑफिसमध्ये एकटे जात असले तरी त्याच्याबरोबर आलेली असते त्याच्या अर्धांगिनीची प्रेरणा. स्त्री नसली तर पुरुषाचे काम होणारच नाही. स्त्री-पुरुषाच्या जोडीत पुरुषाची निवड करण्याचा अधिकार स्त्रीला दिलेला असतो. तिच्या पसंतीनेच ‘वर’ पसंत केला जातो, तसेच स्त्री-पुरुषाच्या मिलनात स्त्रीच्या इच्छेला प्राधान्य दिलेले असते. स्त्रीच्या इच्छेशिवाय केलेल्या स्त्रीसंगाला बलात्कार अशी संज्ञा शास्त्रांनी दिलेली आहे आणि त्यासाठी मोठ्यात मोठी शिक्षा व्हावी अशी अपेक्षा असते. अशा प्रकारे स्त्री या प्रेरणादायी शक्‍तीला कायम आदर दिला जाणे आवश्‍यक आहे. 

स्त्रीच्या शरीराची रचना काहीशी वेगळ्या पद्धतीने केली गेली आहे. तिच्या शरीरात असणाऱ्या संप्रेरकांची, अग्नीची काळजी अधिक घेणे आवश्‍यक असते. यासाठी भारतीय परंपरेने तशा प्रकारची योजना केलेली दिसते. 

स्त्री व पुरुषाच्या शरीरात निसर्गाने काही बदल ठेवलेला आहे, पुरुषाजवळ असते शारीरिक शक्‍ती तर स्त्रीजवळ असते मानसिक व प्रजननाची शक्‍ती. शारीरिक शक्‍तीच्या जोरावर पुरुष स्त्रीवर अत्याचार करू लागला तर स्त्री प्रतिष्ठा, जागतिक महिला दिन वगैरे चर्चा सुुरू झाल्यास नवल नाही. स्त्रीची शारीरिक शक्‍ती कमी असल्यामुळे तिचा गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी कडक कायदे करावेत असे प्रतिपादन केले जाते. परंतु मुळात समाजाचे प्रबोधन होऊन पुन्हा एकदा मूळ वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी असतो जागतिक महिला दिन. 
भारतीय परंपरेत स्त्रियांना व स्त्रीशक्‍तीला समजून घेत असताना तिची कलात्मकता, तिचे सर्व सामुग्रीवरचे आधिपत्य आणि तिची रौद्र शक्‍ती यांचा विचार केला गेला. स्त्री पुरुषापेक्षा शरीराने कमजोर असली, तरी वेळप्रसंगी तिच्याजवळ असलेल्या आंतरिक व मानसिक शक्‍तीचे रूपांतर प्रचंड स्फोटात होऊन शेवटी तीच जिंकणार हे नक्की असते. भारतीय परंपरेत स्त्रीला सर्व अधिकार मिळावेत हे जसे सांगितलेले आहे तसेच तिला वेदकालीन काळापासून शिक्षणाचा अधिकार होता, मुलगी म्हणून तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार होता, पत्नी म्हणून तिला पतीच्या संपत्तीत अधिकार होता. समाजात प्रथम स्त्रीला मान देण्याची पद्धत होती.

भारतीय परंपरेचा थोडा अभ्यास केला तर जागतिक महिला दिनाचे महत्त्व अधिक कळून येईल आणि हा दिवस साजरा केल्याचे सार्थक होईल. आजच्या दिवशी आपल्या परिचयातील सर्व स्त्रियांना मानाने वागवणे, नमस्कार करणे, त्यांना आनंद होईल अशा तऱ्हेने वागणे, त्यांना प्रिय असेल ते देणे, त्यांना काही भेटवस्तू देणे, वगैरे आचार हा एक लहानसा सोपस्कार आहे. पुरुषाने मनापासून स्त्रीचा अधिकार स्वीकारला, तिचे महत्त्व ओळखले तरच जागतिक महिला दिनाचे खरे सार्थक होईल.