esakal | खाद्यभ्रमंती : लखनौमधील बेलफळाचा थंडगार ज्यूस…

बोलून बातमी शोधा

Belfal Juice
खाद्यभ्रमंती : लखनौमधील बेलफळाचा थंडगार ज्यूस…
sakal_logo
By
आशिष चांदोरकर

बरोबर सात वर्षांपूर्वी एप्रिल आणि मे महिन्यात जवळपास तीन आठवडे उत्तर प्रदेशमध्ये होतो. लोकसभा निवडणुकीचं वार्तांकन करण्याच्या निमित्तानं. सकाळी साडेसात-आठलाच उन्हाचा तडाखा जाणवायला लागायचा. दुपारी चार-पाच वाजेपर्यंत रणरणतं ऊन असायचं. त्यानंतर ऊन कमी व्हायचं, पण वातावरण गरमच असायचं. हौशीनं आपण आलो, पण या उन्हात आपण तग धरू शकू का, हा विचार पहिल्याच दिवशी मनात आलेला.

दोन गोष्टी आवर्जून केल्या. माझ्या आवडीचा विषय असलेली खादाडी अगदी मर्यादित ठेवली आणि दुसरं म्हणजे मांसाहारी पदार्थ फक्त एकदाच खाल्ले. अगदी थोडे. पहिले दोन दिवस लस्सी आणि लिंबू सरबतावर जोर होता. मला एका स्थानिक पत्रकारानं सांगितलं, की दिवसातून दोन ग्लास बेलफळाचा ज्यूस पित जा. तुम्हाला उन्हाचा काहीही त्रास होणार नाही. अजिबात चिंता करू नका.

आपण शंकराला जो बेल वाहतो त्याच झाडाच्या फळाचा ज्यूस. सुरुवातीला थोडी शंका वाटत होती, पण दौरा पूर्ण करायचा होता. त्यामुळं मी त्याचा सल्ला ऐकला. सकाळचा भरपेट नाश्ता आणि दिवसातून दोनदा बेलफळाचा ज्यूस आणि रात्री थेट जेवण. क्वचित कधीतरी लस्सी... बेलफळाचा ज्यूस खूपच मदतगार ठरला. हा ज्यूस एकदम थंड आणि पाचक. पोटाला बऱ्यापैकी आधार देणारा. बेलफळाच्या ज्यूसच्या गाड्या लखनऊ, रायबरेली, अमेठी, सुल्तानपूर, बाराबंकी वगैरे ठिकाणी मुबलक प्रमाणात दिसल्या. चौकाचौकांत या गाड्या असायच्या आणि लोक उभे राहून ज्यूस पिताना दिसायचे. वाराणसी वगैरे परिसरांत मात्र, या गाड्या फारशा दिसल्या नाहीत.

ज्यूस करायची पद्धत एकदम सोपी. कवठाच्या आकाराचं असलेलं बेलाचं फळ फोडायचं. त्यातला गर काढून घ्यायचा. तो मिक्सरमध्ये टाकायचा. आवश्यकतेनुसार किंवा तुमच्या मागणीनुसार साखर टाकायची. गरजेनुसार पाणी टाकायचं, तुम्हाला हवा असेल तर बर्फ आणि मिक्सर फिरवून ज्यूस तयार करून घ्यायचा. साखर घातल्यामुळं चवीला गोडसर लागणारा हा ज्यूस आमरसच्या रंगाचा आणि तितकाच घट्ट. (साखर घातल्याशिवायचा ज्यूस मला काही फार रुचला नाही.) खूप पातळही नाही नि खूप घट्टही नाही. अवघ्या दहा रुपयांत ग्लासभर ज्यूस. कधीकधी गरजेनुसार दोन ग्लासही प्यायले जातात.

उन्हाळ्यात बेलफळाचा ज्यूस पिण्याचे खूप फायदे आहेत. त्यामध्ये पाणी, साखर, प्रोटीन्स, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, आयर्न आणि व्हिटॅमिन्स आहेत. हा ज्यूस पोटाला थंड आणि पाचक आहे. त्यामुळं ऊन कितीही असलं तरीही तुम्हाला अजिबात त्रास होत नाही. बेलफळाच्या नियमित सेवनाचे अनेक फायदे आहेत. अनेक संशोधनं झाली आहेत. पण ते सांगायला मी तज्ज्ञ किंवा डॉक्टर नाही. पण बेलफळाच्या ज्यूसमुळे पोट शांत राहतं, शरीर थंड राहतं, फ्रेश वाटतं आणि पचनक्रिया चांगली राहते, हे मी प्रत्यक्ष अनुभवलंय. वाराणसी आणि परिसरात मात्र, बेलफळाचा ज्यूस विकणाऱ्या गाड्या दिसल्या नाहीत. त्याचं कारण काही समजलं नाही. ज्यूससाठी आवश्यक ती बेलाची फळं लखनऊ आणि परिसरातच चांगली मिळतात आणि इतरत्र मिळत नाही, हे कारण आहे की आणखी काही कळलं नाही, पण वाराणसीला पोहोचल्यानंतर बेलफळाच्या ज्यूसच्या गाड्या दिसल्या नाहीत.

आपल्याकडे बेलफळाचा ज्यूस कुठं मिळतो की नाही माहिती नाही. आपल्याकडं बेलाची झाडं बरीच आहेत, पण ज्यूससाठी आवश्यक फळं आपल्या महाराष्ट्रात मिळतात का, हे एकदा तपासून पहायला पाहिजे. पण तशा पद्धतीची फळ मिळत असतील, तर बेलफळाचा ज्यूस करून विकायला पाहिजे. उन्हाळ्यात नक्की प्रतिसाद मिळणार... बघा आहे का कोणाची तयारी हे करायची...