esakal | खाद्यभ्रमंती : ‘खान्देश जंक्शन’ची मिरचीची भाजी
sakal

बोलून बातमी शोधा

Mirchichi Bhaji

खाद्यभ्रमंती : ‘खान्देश जंक्शन’ची मिरचीची भाजी

sakal_logo
By
आशिष चांदोरकर

मध्यंतरी ‘खान्देश जंक्शन’च्या नीलेश चौधरींची भेट झाली. अगदी सहजपणे त्यांना विचारलं, काय जेवलात आज? ते म्हणाले, मिरचीची भाजी. मला वाटलं सिमला मिरचीची भाजी असेल. पण नंतर त्यांनी खुलासा केल्यानंतर मी चाटच पडलो. अहो, सिमला मिरचीची नाही, हिरव्या मिरचीची भाजी... एव्हाना मी पडायच्याच बेतात होतो. मला ही मिरचीची भाजी खायचीय, असं त्यांना सांगून ठेवलं. एका गुरुवारी त्यांचा फोन आला, की आज जेवायला या. मिरचीची भाजी केलीय.

पुण्यात नारायण पेठेत भानुविलास थिएटरसमोर नीलेश यांचं ‘खान्देश जंक्शन’ आहे. तिथं दर गुरुवारी मिरचीच्या भाजीचा बेत असतो. ही भाजी डाळ गंडुरी म्हणून पण ओळखली जाते. खान्देश आणि विदर्भाच्या सीमेवर ही भाजी हॉटेल आणि ढाब्यांवर हमखास मिळते. विशेषतः जळगाव, भुसावळ, बुलडाणा आणि शेगाव वगैरे भागात.

‘खान्देश जंक्शन’मध्ये गेलो तेव्हा मिरचीची भाजी तयार होती. मिरचीची भाजी, सोबत भाकरी, कांदा आणि सोबत खिचा पापड. मिरचीची भाजी खरोखरच किती तिखट असते, हे अनुभवण्यात मला खरा रस होता. भाजीचा झणझणीतपणा पहिल्याच घासाला अनुभवायला मिळाला. एकदम तेजतर्रार. पहिल्या क्षणाला जाणवलेल्या तिखटाच्या तुलनेत नंतर वाढत जाणारा तिखटपणा अधिक. तरी तुम्हाला थोडी कमी तिखट करून भाजी दिलीय, हे ऐकल्यानंतर भाजीच्या मूळ चवीची जाणीव झाली.

मिरचीचा सुरुवातीचा झटका तुम्हाला आणखी घास खायला उद्युक्त करत जातो. तिखट असली, तरी पुढचा घास कधी घेतोय, असं होऊ लागतं. एव्हाना घाम फुटलेला असतो. एका हातानं घाम पुसत दुसऱ्या हातानं जेवणावर ताव मारण्याचा प्रयोग सुरू असतो. सोबत भाकरी असल्यानं तिखटपणा थोडा कमी होतो आणि हे तिखटजाळ कॉम्बिनेशन जेवणाची गोडी वाढवित जातं.

नाव मिरचीची भाजी असलं, तरीही यात फक्त मिरची नाही. मिरची मुख्य कलाकार. इतर कलाकारांमध्ये आंबट चुका, हिरवे टोमॅटो, कांदे, अगदी थोडी मेथीच्या भाजीची पाने, शेंगदाणे, खोबरं आणि तुरीची डाळ. दोन जणांसाठी हिरव्या मिरचीची भाजी करायची झाल्यास साधारण सहा ते आठ हिरव्या तिखटजाळ मिरच्या घ्याव्यात. एक वाटी तुरीची डाळ, दोन हिरवे टोमॅटो, मेथीच्या भाजीच्या पाच-सहा काड्या. मेथीपेक्षा थोडा अधिक आंबट चुका. थोडे शेंगदाणे नि खोबरं. हे सर्व जिन्नस एकत्र कुकरमध्ये उकडून घ्यायचे आणि स्मॅश करून तयार ठेवायचे. नंतर जिरे-मोहरीसोबत आलं लसणाची पेस्ट फोडणीला टाकायची. चार ते पाच मिरच्या देखील फोडणीला टाकायच्या. सोबत हवं असल्यास शेंगदाणे नि खोबरं. आणि फोडणी तडतडली, की त्यामध्ये स्मॅश केलेले पदार्थ टाकायचे. रटारटा हलवायचं आणि अधिक एकजीव करायचं. उकळी आल्यानंतर मिरचीची भाजी तयार. मिरचीचीच भाजी असल्यानं ती तिखटजाळ होणंच अपेक्षित आहे. त्यातही काही जणांना थोडी कमी तिखट हवी असल्यास ते तूरडाळीचं प्रमाण वाढवू शकतात.

नीलेश चौधरींमुळं एका वेगळ्या भाजीची ओळख झाली. ‘खान्देश जंक्शन’मध्ये अस्सल खान्देशी वांग्यांचं भरीत, वरणबट्टी, शेवभाजी किंवा फौजदारी डाळ वगैरे अस्सल खान्देशी पदार्थ मिळतातच. आता भर पडली मिरचीच्या भाजीची. दर गुरुवारी ही भाजी खवय्यांसाठी उपलब्ध असणार आहे. कोणाला मिरचीच्या भाजीचा आस्वाद घ्यायचा असेल, तर गुरुवारी थेट ‘खान्देश जंक्शन’ गाठा नि देऊन टाका ऑर्डर...

loading image