
पुण्यात परवा खुन्या मुरलीधर मंदिरापाशी एका फूड जॉइंटवर ‘खिचडी-भजी’ मिळेल, असा बोर्ड पाहिला आणि दहा वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. ‘साम मराठी’मध्ये असताना ‘मी महाराष्ट्र बोलतोय...’ या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरणं होत होतं.
पुण्यात परवा खुन्या मुरलीधर मंदिरापाशी एका फूड जॉइंटवर ‘खिचडी-भजी’ मिळेल, असा बोर्ड पाहिला आणि दहा वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. ‘साम मराठी’मध्ये असताना ‘मी महाराष्ट्र बोलतोय...’ या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरणं होत होतं. त्यावेळी नांदेडहून परभणीला जात असताना वाटेत ‘झिरो फाटा’ असं गमतीशीर नाव असलेल्या ठिकाणी थांबलो होतो. तिथं ‘लिंगायत टी स्टॉल’वर सकाळी सकाळी ‘खिचडी-भजी’ आणि कढीचा आस्वाद घेतला होता. त्याची आठवण झाली.
नांदेडहून माहूरला जाताना वारंगा फाट्यावरची देखील खिचडी-भजी प्रसिद्ध आहे. पण आम्ही ‘खिचडी-भजी’चा सर्वप्रथम आस्वाद घेतला तो झिरो फाट्यावर. या ठिकाणापासून परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत साधारण बावीस किलोमीटर आहे. तर पूर्णा जंक्शन आणि प्रसिद्ध जवळा बाजार अठरा किलोमीटर अंतरावर आहे. फाट्यापासून सर्व प्रमुख ठिकाणं समान अंतरावर असल्यामुळं याचं नाव ‘झिरो फाटा’, अशी माहिती दोस्त अमोल लंगरनं दिली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आम्ही ‘लिंगायत टी स्टॉल’वर थांबलेलो. आता अनेक गोष्टी वाढविल्या असून, ‘वीरशैव लिंगायत हॉटेल, चाट ॲण्ड बेकर्स’ असं नामकरण झालंय. 1991मध्ये हा टी स्टॉल सुरू झाला. पूर्वी छोटी झोपडी किंवा पत्र्याच्या शेडमध्ये ‘लिंगायत’ सुरू झालं. स्टोव्ह होता, पण फक्त चहासाठी. खिचडी किंवा इतर पदार्थ दगडी चूल मांडून त्यावर केले जायचे. नंतर परिस्थिती सुधारली नि आता छान जॉइंटमध्ये त्याचं रूपांतर झालंय. चाट आणि बेकरीत तयार होणारे पदार्थही तिथं मिळतात. गुरुलिंग (बंडूआप्पा) आणि मच्छिंद्रनाथ शिंदे हे बंधू या फूड जॉइंटचं व्यवस्थापन करतात. एखाद्या हायवेवरील प्रसिद्ध टी स्टॉलप्रमाणेच लिंगायत टी स्टॉलवरही तिखट आणि गोड, अशा दोन्ही चवी अनुभवता येतात. अनेक ताटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू मांडून ठेवलेले असतात. कुठं बरणीत गोडीशेव, वेगवेगळ्या ट्रेंमध्ये निरनिराळ्या वड्या नि बर्फी, गुलाबजाम, चिवड्यांचं बरंचसं वैविध्य. चहा, शीतपेये आणि लस्सी वगैरे... थोडक्यात म्हणजे सर्वकाही.
पण इथली स्पेशालिटी म्हणजे कढी आणि खिचडी-भजी. सोबत आलू बोंडा, मूगडाळ वडा, पुरीभाजी आणि पापड वगैरे. गोडमध्ये बालुशाही लोकप्रिय. मात्र, कढी-खिचडी आवर्जून मागवावी अशीच. मूग डाळीची खिचडी, सोबत झणझणीत कढी आणि कांदा, मिरची, पालक किंवा ओवा-जिरे टाकून केलेली स्पेशल भजी. खिचडी फार मसालेदार नाही. ती कसर भरते कढी. बेसन नि मिरचीचा ठेचा लावून, आलं-लसणाची फोडणी देऊन एकदम झणझणीत केलेली कढी. कढी-खिचडीत कुस्करून खायला एक प्लेट भजी. खिचडी, एक प्लेट भजी आणि अमर्याद कढी यामुळं पोट एकदम फुल्लं होणारच.
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी सकाळच्या नाश्त्याला खिचडी-भजी आणि कढी मिळतेच. अनेक शेतमजूर किंवा कामगार यांना परवडेल, पोटाला आधार होईल आणि कमी तेलकट नि कमी मसालेदार, असा मेन्यू म्हणजे खिचडी. सोबत कढी. सोबत अगदी नावाला भजी. नाश्ता केल्यावर जडत्व किंवा आळस येत नाही. पोटाला आधारही मिळतो. शिवाय खिचडी तयार करायला आणि लोकांना पटकन संपवायला एकदम सोपी. त्यामुळं अनेक वर्षांपासून खिचडी-भजी हा लोकप्रिय नाश्ता आहे.
‘जगात जर्मनी, भारतात परभणी’ किंवा ‘बनी तो बनी, नही तो परभणी’ अशी ओळख असलेल्या परभणीत कधी जाणं झालं तर ‘खिचडी-भजी’चा नाश्ता करायला विसरू नका.
Edited By - Prashant Patil