esakal | खाद्यभ्रमंती : चटपटीत मसाला आलू...

बोलून बातमी शोधा

Masala Aloo

खाद्यभ्रमंती : चटपटीत मसाला आलू...

sakal_logo
By
आशिष चांदोरकर

वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना काही पदार्थ असे समोर येतात की अनेकदा आश्चर्य वाटतं...’अरे, हा काय पदार्थ आहे,’ असा विचार मनात येतो. पण तो पदार्थ पोटात गेल्यानंतर, ‘अरे व्वा, काय पदार्थ आहे,’ असं वाटून जातं. आपलं धुळे किंवा नागपूर असो किंवा गुजरातमधील भावनगर असो, तिन्ही ठिकाणी एक पदार्थ तुफान आनंद देऊन गेला. तो पदार्थ म्हणजे चटपटीत मसाला आलू...

रेसिपी एकदम सोपी. बटाटे उकडून घ्यायचे. आख्खेच ठेवायचे किंवा कापून तुकडे करायचे. थोडंसं तेल आणि तिखट, मीठ, मसाल्यात कालवायचे... झाला पदार्थ तयार. मसाले कोणते आणि किती वापरायचे ते त्या त्या प्रदेशावर नि करणाऱ्यावर अवलंबून... मागे एकदा निवडणुकीच्या कामानिमित्त धुळ्यात गेलो होतो. संध्याकाळी फिरताना राजलक्ष्मी नावाची एक गाडी दिसली. नेमकी कुठं ते आठवत नाही, पण साबुदाणा वड्यापासून ते भेळ, चाट आणि पाणीपुरीपर्यंत सारं काही त्या गाडीवर होतं. थोडासा कडक असा साबुदाणा वडा आणि वरून गोड दही टाकलेली प्लेट हाती आल्यानंतर माझं लक्ष चटपटीत मसाला आलूकडं गेलं. तिखट, मीठ, मसाल्यात कालवलेल्या बटाट्याच्या फोडी एकदम टेम्प्टिंग दिसत होत्या. साबुदाणा वडा संपविल्यानंतर चटपटीत आलूची ऑर्डर दिलीच. आंबटगोड नि तिखट चटणीबरोबर बटाट्याचे काप एकदम झक्कास लागत होते. फक्त उकडलेला बटाटा अशा पद्धतीनं चटपटीत करून विकता येऊ शकतो, हे तिथं पहिल्यांदा समजलं.

नंतर गुजरातची निवडणूक कव्हर करायला गेल्यानंतर भावनगरला जाणं झालं. तिथं असलेल्या एकमेव थ्री स्टार हॉटेलच्या बाहेर तीन गाड्या उभ्या होत्या. एक कच्छी दाबेलीची, दुसरी इडली आणि मेदूवडा सांबारची आणि तिसरी चटपटीत आलू नि पापडाची. शेकडो पापड (बहुतेक पोह्याचे) पिश्व्यांमध्ये भरून ठेवलेले. एका ठिकाणी उकडलेल्या बटाट्यांची रास होती. उकडलेल्या बटाट्याचे अर्धे काप, सोबत तेलात तिखटमीठ कालवून तयार केलेली चटणी आणि हवा असेल तर पापड. कमीतकमी गोष्टींमध्ये एखाद्याला कशा पद्धतीनं खिळविता येतं, हे त्या गाडीवर आम्हाला जाणवलं. आलू, चटणी आणि पापड हे कॉम्बिनेशन अक्षरशः वरच्या दर्जाचं लागत होतं.

मागे एकदा केरळला गेल्यानंतर अशाच पद्धतीनं तेलतिखटामध्ये साबुदाण्याच्या कंदाचे उकडलेले काप खाल्ले होते. साबुदाण्याच्या कंदाला तिथं कप्पं म्हणतात. त्या कंदापासून वेफर्स, भाजी, बिर्याणी असे अनेक पदार्थ तयार करतात, पण महामार्गावर एका चौकात माकपाच्या कार्यकर्त्यांसोबत तेलतिखटाबरोबर खाल्लेलं उकडलेलं कप्पं विशेष लक्षात राहिलं.

मध्यंतरी नागपूरला एका कामासाठी गेलेलो. तिथं संध्याकाळच्या सुमारास इतवारी भागात एका प्रसिद्ध चाट सेंटरवर जाणं झालं. तिथला चटपटीत मसाला आलू एकदम वेगळा आणि अधिक भारी वाटला. उकडलेले बटाटे न कापता तिखटमीठ आणि मसाल्यात मस्त घोळून तयार केलेले. आपल्याला देताना मात्र, त्याच्या बारीक फोडी करून तिखट आणि आंबटगोड चटणीसोबत देणार. हवं असेल तर चाट मसाल्याची पखरण केलेलं दही घालूनही देणार. भजी, पाट पॅटिस आणि सामोसे हे पदार्थ अफलातून होतेच. पण हा चटपटीत आलू विशेष भाव खाऊन गेला.

पुरी आणि बटाटा भाजी, बटाटा भजी, बटाटा वडा, पॅटिस, सामोसा, आलू टिक्की हे बटाट्यापासून तयार होणारे अनेक पदार्थ आपण खातो. अनेकांचं त्यावर विशेष प्रेम असतं. मुंबईत अनेक भैय्ये भेळेमध्ये उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालतात. पण अत्यंत साधा, सोपा, सुटसुटीत आणि स्वादिष्ट असा हा चटपटीत मसाला आलू आवर्जून खाण्यासारखा पदार्थ आहे. कधी कुठं संधी मिळाली, तर नक्की ट्राय करा... म्हणजे बाहेरच खायला पाहिजे, असं नाही. घरी करून पाहिला तरी हरकत नाही.