
गेल्या काही वर्षांत अनेकदा साताऱ्याला जाणं झालं. कारणं वेगवेगळी होती, पण प्रत्येक सातारा दौऱ्यात एक गोष्ट कायम होती आणि ती म्हणजे सुपनेकर. कधी यादो गोपाळ पेठेतील सुपनेकरांच्या मेसमध्ये स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद, तर कधी राजवाड्यावरच्या चौपाटीवर बटाटे वडा आणि उपवासाच्या फराळी पॅटिसची मजा. क्वचित सुपनेकरांच्या स्नॅक्स सेंटरला भेट. पण साताऱ्याला गेल्यावर सुपनेकर मस्ट.
साधारण ७० वर्षांपूर्वी सुपनेकरांची खानावळ सुरू झाली. सध्या हा व्याप सांभाळणाऱ्या नितीन सुपनेकर यांच्या आजींनी ही खानावळ सुरू केली. नोकरीच्या निमित्ताने नितीन यांच्या आजोबांचे दोन मित्र जेवायला घरी यायचे. आजींच्या हातची आमटी आणि भाजी त्यांना विशेष आवडायची. पण रोज फुकट न जेवण्याऐवजी पैसे देऊन जेवूयात, असे त्या दोघांनी ठरविले आणि ७० वर्षांपूर्वी खानावळ सुरू झाली. दोन मेंबरांपासून सुरू झालेली ही खानावळ आज साताऱ्याबाहेरही लोकप्रिय आहे.
एकदम झक्कास चिंचगुळाची आमटी, एक भाजी, पोळ्या, चटणी, कोशिंबीर आणि अनलिमिटेड ताक. आमटी आणि ताक यावर लोकांचं विशेष प्रेम. बाकी वेगवेगळ्या उसळी, पिठलं भाकरी, मुगडाळीची खिचडी आणि कढी, आळूची भाजी आणि मसाले भात, कुर्मा भाजी हे पदार्थ प्रसंगानुरूप उपलब्ध असतात. आम्ही गेले तेव्हा मसाले भात, बटाटे वडे, छोटे पापड, कांदा-बटाट्याची भाजी, साधा भात, आमटी आणि श्रीखंड असा मेन्यू होता. जेवण एकदम साधंच पण चव भन्नाट. घरी जेवल्याचा फिल सुपनेकरांकडे येतो. नितीन यांच्या पत्नी मीना स्वतः लक्ष घालून स्वयंपाक तयार करतात. खानावळ साताऱ्यात असल्यानं ‘मालक येथेच जेवतात,’ अशी टिपिकल पुणेरी पाटी तिथं पहायला मिळत नाही, पण सुपनेकर मंडळी लोकांना जे खाऊ घालतात तेच स्वतःही जेवतात. त्यामुळे जे काही बनते ते उत्तमच असते, असे मीना सुपनेकर आवर्जून सांगतात.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तुम्ही संध्याकाळच्या सुमारास गेलात, तर मग राजवाड्यासमोरच्या चौपाटीवरील मोबाईल कँटीनला जायला विसरू नका. नितीन आणि मीना यांचे सुमारे ३४ वर्षांपूर्वी लग्न झाले. लग्नानंतर बरोबर एका महिन्याने हे मोबाईल कँटीन सुरू झाले. इथे मिळणारा बटाटे वडा आणि उपवासाचे फराळी पॅटिस (पुण्यात याला उपवासाची कचोरी म्हणतात.) यांना तोड नाही. चवीला थोडासा गोडसर असलेला सुपणेकरांचा बटाटे वडा हा महाराष्ट्रातील सर्वोत्तम वड्यांपैकी एक आहे, असे म्हणायला कोणाचीच हरकत नसावी. त्यात कांद्याचा वापर अजिबात नाही. लसूण, मिरची, कोथिंबीर वगैरे जिन्नस आवश्यकतेनुसार. चवीला हलका गोड. पण तिखट वगैरे चवही जाणवते.
वड्याला साथ देणारी चटणी म्हणजे केवळ अफलातून. चटणीची स्निग्धता (किंवा ओशटपणा) त्याच्या दर्जाची साक्षीदार असते. सुपनेकर रोज साधारण शंभर लिटर दुधाचं दही लावतात. त्या दह्यापासून ही चटणी होते. अनेक लोक एका वड्याला तीन ते चार वड्यांची चटणी संपवतात आणि सुपनेकरही आढेवेढे न घेता चटणी देत असतात. यावरूनच चटणीची लोकप्रियता आणि सुपनेकरांचा दिलदारपणा समजतो.
फराळी पॅटिसची बातही न्यारीच. खोवलेला ओला नारळ, साखर, कोथिंबीर आणि जिऱ्यापासून बनविलेले सारण नि उकडलेला बटाटा तसेच साबुदाण्याच्या पिठापासून तयार केलेले बाहेरील आवरण. आतल्या नि बाहेरच्यांची एकदम झकास युती आणि त्यांना चटणीचा बाहेरून असलेला पाठिंबा या जोरावर उपवासाचे फराळी पॅटिस खवय्यांच्या जिभेवर निर्विवाद सत्ता गाजवते. गेल्या बारा वर्षांपासून आता सुपनेकर स्नॅक्स सेंटरही सुरू झालेय. नितीन यांचा मुलगा अजिंक्य ते सांभाळतो. सकाळी शिरा, पोहे, उप्पीट, मिसळ पाव, वडा नि पुरीभाजी. तर संध्याकाळी सँडविच, चायनीज, पिझ्झा, इडली, डोसा, उत्तप्पा, पावभाजी नि तवा पुलाव.
अर्थात, सुपनेकर म्हटले की मेस, बटाटा वडा आणि फराळी पॅटिसच डोळ्यासमोर येते. कारण ती फक्त त्यांची खासियत आहे. हिंदीमध्ये भोजन तयार करणाऱ्यांना ‘महाराज’ म्हणतात. त्यामुळे साताऱ्याचा विचार करायचा झाला, तर सुपनेकर हे साताऱ्यातील चवींचे ‘महाराज’ आहेत...
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.